शुक्रवार दि. २० डिसेंबर २०२४


डॉ. आंबेडकरांच्या अवमान प्रकरणी आजऱ्यात महाविकास आघाडीची निदर्शने

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलेल्या वादग्रस्त विधानाच्या पार्श्वभूमीवर आजरा येथील संभाजी चौकात निदर्शने करण्यात आली.
यावेळी बोलताना कॉ. संपत देसाई म्हणाले, संसदेच्या अधिवेशनात देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची बदनामी करणारे वक्तव्य केले. खरतरं संघ, भाजपा आणि त्यांच्या परिवारात पूर्वीपासूनच डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि संविधानाबद्दल आकस आहे. भारतीय संविधान आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे समतेचा आग्रह धरतात. संघ, भाजपा आणि त्यांचा संपूर्ण परिवार हा नेहमीच जाती वर्ण व्यवस्थेचे समर्थन करीत आला आहे. त्याची संपूर्ण विचारधारा ही विषमतेवर उभा राहिली आहे. महात्मा फुले,डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी इथल्या स्त्रियांना मुक्तीचा मार्ग दाखविला तोच त्यांना खटकत आहे. त्यामुळे ते जाणीवपूर्वक डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज आणि समतेचा आग्रह धरणाऱ्या सर्वांनाच बदनाम करण्याचा प्रयत्न करत आले आहेत.
बाबासाहेबांचे नाव घेणे हे त्यांना फॅशन वाटत असले तरी आमच्यासाठी ते पॅशन आहेत. ती आमची तीव्र टोकदार भावना आहे. ती आमची अस्मिता आहे. या देशातील अठरापगड जातीतील स्त्री-पुरुषांना सन्मानाने आणि निर्भयपणे वागण्याचे स्वातंत्र्य ज्या संविधानाने दिले त्याचे ते निर्माण करते आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नावही आमच्यासाठी जाज्वल अशी आत्यंतिक जिव्हाळ्याची बाब आहे. त्यामुळे ती फॅशन नसून आमची पॅशन आहे. बाबासाहेबांच्या बद्दल बदनामीकारक वक्तव्य करणाऱ्या गृहमंत्र्यांचा आम्ही तीव्र निषेध करतो.
यावेळी आम्ही सारे आंबेडकर, अमित शहा यांचा धिक्कार असो, भारतीय संविधानाचा विजय असो अशा घोषणां देत आंदोलकांनी परिसर दणाणून सोडला.
यावेळी डॉ. नवनाथ शिंदे, युवराज पोवार, सतीश कांबळे, व्ही. डी. जाधव यांची भाषणे झाली. आंदोलनात संभाजी पाटील, संजय सावंत, किरण कांबळे, रवींद्र भाटले, समीर चांद, प्रकाश मोरुस्कर, मारुती कांबळे, सुरेश दिवेकर, दिनेश कांबळे, काशिनाथ मोरे, संजय घाटगे, विक्रमसिंह देसाई, डॉ रोहन जाधव, कृष्णा सावंत यांच्यासह आंदोलक उपस्थित होते.

संग्राम गायकवाड यांच्या ‘मनसमझावन’ कादंबरीस ‘मृत्युंजय’कार शिवाजी सावंत कादंबरी पुरस्कार

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा येथील शतकोत्तर रौप्यमहोत्सवी श्रीमंत गंगामाई वाचन मंदिरातर्फे तसेच ग्रंथालयातर्फे देण्यात येणाऱ्या विविध साहित्य, भूमिपुत्र साहित्यिक, माता गौरव, उत्कृष्ठ ग्रंथालय व वाचक पुरस्कारही जाहीर करण्यात आले .
यावर्षीचा ‘मृत्युंजय’कार शिवाजी सावंत कादंबरी पुरस्कार संग्राम गायकवाड पुणे यांच्या ‘मनसमझावन’ या कादंबरीला (रोहन प्रकाशन, पुणे) जाहीर झाला आहे. कै. दाजी टोपले नाट्यलेखन पुरस्कार विजय साळवी रत्नागिरी यांच्या ‘एक चंद्रकोर’ या नाट्यसंहितेस (कवितासागर प्रकाशन, जयसिंगपूर), डॉ. बाबासाहेब आंबेडकर गद्यसाहित्य पुरस्कार समीर गायकावाड – सोलापूर यांच्या ‘खुलूस’ या पुस्तकास (रोहन प्रकाशन, पुणे), बालसाहित्याचा पुरस्कार सुरेश सावंत नांदेड यांच्या ‘कष्ठाची फळे गोड’ (दिलिपराज प्रकाशन, पुणे) या बाल कथासंग्रहास तर मैत्र काव्य पुरस्कार एकनाथ पाटील – इस्लामपूर यांच्या ‘अरिष्टकाळाचे भयसूचन’ (ललित पब्लिकेशन, मुंबई) या काव्यसंग्रहास जाहीर करणेत आला आहे. भूमीपुत्र साहित्यिक गौरव पुरस्कार आजऱ्यातील सुप्रसिध्द नाट्यलेखक, दिग्दर्शक व नाटयअभिनेते डॉ. श्रध्दानंद ठाकूर यांना देण्यात येणार आहे.
यावर्षीचा माता गौरव पुरस्कार श्रीमती पूजा प्रवीण तिप्पट यांना जाहीर करण्यात आला आहे. कै. काशिनाथअण्णा चराटी उत्कृष्ठ ‘अ’ वर्ग ग्रंथालय पुरस्कार क्रांतिवीर रत्नाप्पाण्णा कुंभार सार्वजनिक वाचनालय गंगानगर इचलकरंजी, कै. माधवरावजी देशपांडे उत्कृष्ठ ‘ब’ वर्ग ग्रंथालय पुरस्कार महात्मा गांधी सार्वजनिक वाचनालय मुगळी, ता. गडहिंग्लज तर कै. बळीरामजी देसाई उत्कृष्ठ ‘क’ वर्ग ग्रंथालय पुरस्कार – सिध्दिविनायक वाचनालय व सांस्कृतिक संस्था कोवाडे, ता. आजरा यांना जाहीर करणेत आला आहे. ग्रंथालयातर्फे देण्यात येणारे उत्कृष्ठ वाचक पुरस्कार बालविभागातून कु अंशुमन हिम्मत भोसले, अभ्यासिकेतून – सौ पूनम रमेश नार्वेकर, महिला वाचक श्रीमती राजश्री विजय गाडगीळ तर पुरूष वाचक श्री. अनंत शिवराम आजरेकर यांना जाहीर करण्यात आले आहेत.
या पुरस्कारांचे वितरण साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त साहित्यिक कृष्णात खोत (पन्हाळा) यांचे शुभहस्ते बुधवार दिनांक २५ डिसेंबर २०२४ रोजी सायंकाळी ५.३० वाजता ‘मृत्युंजय’ कार शिवाजीराव सावंत स्मृतीदालन, जूनी पोष्ट गल्ली, आजरा येथे समारंभपूर्वक करण्यात येणार असल्याचे वाचनालयाचे अध्यक्ष वामन सामंत, उपाध्यक्षा विद्या हरेर, कार्यवाह कुंडलिक नावलकर व रवींद्र हुक्केरी यांनी केले आहे.

बंद घराची कौले काढून टीव्ही लंपास

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
सरोळी ता. आजरा येथील संभाजी आप्पा देसाई यांच्या बंद घराची कौले काढून ३० हजार रुपये किमतीचा टीव्ही अज्ञात चोरट्यांनी लंपास केला.
याबाबतची फिर्याद देसाई यांनी आजरा पोलिसांत दिली असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.

डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी केलेल्या वक्तव्याचा ‘वंचित’ कडून निषेध...

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सभागृहात डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी केलेल्या वक्तव्याचा आजरा येथील वंचित बहूजन युवा आघाडीने जाहीर निषेध करून गृहमंत्री यांनी तात्काळ राजीनाम्याची मागणी आजरा तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.
यावेळी तालूका अध्यक्ष संतोष मासोळे यांनी ज्या संविधानाने देशातील गृहमंत्रीपद मिळाले त्या अमित शहानी बाबासाहेबांविषयी काढलेले उदगार लोकशाहीला घातक असून, दैववादाला खतपाणी घालणारे असल्याचे सांगितले.
यावेळी जिल्हा उपाध्यक्ष दत्तात्रय कांबळे, सचिव मारूती कांबळे, संघटक बाळू कांबळे, उज्ज्वला खवरे, रूपाली कांबळे, काॅ.संजय घाटगे, काॅ काशिनाथ मोरे, हिंदूराव कांबळे, अरूण परिट, गणपती आयवाळे, श्रीकांत कांबळे, सुरेश मासोळे, आनंदा कांबळे, बंडू कांबळे याच्या सह कार्यकर्ते उपस्थित होते.

शाळकरी विद्यार्थ्यांचा मृत्यू…

उत्तूर : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
उत्तूर विद्यालयामध्ये शिकणाऱ्या पेंढारवाडी येथील तेजस संजय आजगेकर या पंधरा वर्षीय शाळकरी विद्यार्थ्याचा अल्पश: आजाराने गडहिंग्लज येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला.
त्याच्या मृत्यूने पेंढारवाडीसह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. त्याच्या पश्चात आई, वडील, बहीण असा परिवार आहे.

सिरसंगीच्या उपसरपंचपदी सरिता कुंभार

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
शिरसंगी व येमेकोंड ग्रुप ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी सरिता कुंभार यांची निवड करण्यात आली आहे. सरपंच संदीप चौगले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत ही निवड करण्यात आली. माजी उपसरपंच पांडुरंग टकेकर यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त पदावर सौ.सरीता सागर कुंभार यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
यावेळी सदस्य वसंत सुतार, राजाराम आडसोळ,सुमन होडगे रेश्मा कांबळे, रेश्मा कुंभार , सुनिता आडसोळ उपस्थित होते ग्रामसेवक किशोर पाटील यांनी आभार मानले.







