mrityunjaymahanews
अन्यआजरा तालुका विशेषकोल्हापूरक्रीडागुन्हाजीवनमंत्रटेक्नोलॉजीठळक बातम्यादेशबिझनेसभारतमनोरंजनमहाराष्ट्रराजकीयरोजगारविदेशसामाजिकस्थानिक

सातच्या बातम्या

 रविवार  दि. १३ जुलै २०२५         

बाहेरगावचे मतदार आजरा नगरपंचायत हद्दीत…?
निवडणूक डोळ्यासमोर ठेवून इच्छुकांचे उपद्व्याप

                   ज्योतिप्रसाद सावंत

      आजरा नगरपंचायत निवडणुकीचे पडघम वाजू लागले असून काही इच्छुक उमेदवारांनी गेल्या काही दिवसांपासून बाहेरगावचे मतदार आजरा नगरपंचायत हद्दीतील आपल्या संभाव्य प्रभागांमध्ये घुसडण्यास सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमीवर अन्याय निवारण समिती आक्रमक झाली असून अशी बाहेरगावची घुसडण्यात आलेली नावे मतदार यादीतून काढावीत व संबंधितांवर कारवाई व्हावी असा पवित्रा समितीने घेतला आहे.

       गतवेळची निवडणूक मोठ्या चुरशीची झाली असल्याने यावेळी एकेका मतदाराला निवडणुकीत महत्त्व प्राप्त होणार आहे. कांही इच्छुक मंडळी गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेली आहेत. यातीलच काही चाणाक्ष मंडळींनी निवडणुकीत साम-दाम-दंड- भेद या सर्वांचाच वापर करायचे असे ठरवल्याने आपल्या संभाव्य प्रभागांमध्ये कमी पडणारे मतदान आत्तापासूनच मतदार यादीत घालण्याचे काम सुरू केले आहे. बोगस भाडेकरू दाखवण्यापासून ते रोजगार व कामानिमित्त आलेल्या कांही कामगारांची नावेही मतदार यादी घालण्यात आली आहेत. अशी सर्वच नावे शोधण्याचे काम प्रभागवार सुरू करण्यात आले आहे. याबाबत काही मंडळी प्रभाग रचना व अंतिम याद्यांचे स्वरूप स्पष्ट झाल्यानंतर हरकतीही घेण्याच्या मानसिकतेत असल्याचे समजते.

नगरपंचायत आजऱ्याची…
मतदार शिप्पूर, चंदगड सह विविध गावातील

      आजरा नगरपंचायतीचे निवडणूक जोरदार होणार असे स्पष्ट होत असल्याने आजरा तालुक्यातील नगरपंचायत कार्यक्षेत्राबाहेरील तालुक्यातील मतदार यादीमध्ये आले आहेतच परंतु त्याचबरोबर इतर तालुक्यातीलही कांही मतदार आता मतदार यादीत दिसू लागले आहेत अशा मतदारांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.

पावसाची विश्रांती…
रोप लावणी वेगावली…

         आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      आजरा तालुक्यात पावसाने विश्रांती घेतल्याने लांबलेल्या रोप लावणीची कामे वेगावली आहेत. पावसाने पूर्णच विश्रांती घेतल्याने अनेक ठिकाणी रोप लावणी करता पाण्याची व्यवस्था करताना शेतकरी वर्गाची दमछाक होत आहे.

      गेले दोन दिवस तालुकावासीयांना दिवसभर सूर्यदर्शन सुरु आहे. मान्सूनपूर्व पावसाला जोडूनच मान्सूनने जोरदार सलामी दिल्याने लावणीची कामे खोळंबली होती. अनेक ठिकाणी जोरदार पावसामुळे भाताचे तरवे कुजून गेल्याने रोपांचा भाव वाढला आहे.

      विशिष्ट वाणांच्या रोपांची वाट न पाहता मिळेल ते तरवे घेऊन रोप लावण्यामध्ये बळीराजा गुंतला आहे.

पर्यटकांकडून फोटोग्राफी…

     पावसाच्या असणाऱ्या उघडीपीमुळे वर्षा पर्यटनाकरता बाहेर पडलेला पर्यटक उत्सुकतेपोटी रोप लावणीकडे पाहत असून अनेक ठिकाणी पर्यटकांकडून रोप लावणीची फोटोग्राफी केली जात असलेली दिसते.

व्यंकटराव’ मध्ये पारितोषिक वितरण संपन्न…

          आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

       एस.एस.सी. परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा पारितोषिक वितरण सोहळा व्यंकटराव हायस्कूलमध्ये आजरा महाल शिक्षण संस्थेचे जेष्ठ संचालक कृष्णा पटेकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.

      मुख्याध्यापक श्री एम एम नागुर्डेकर यांनी स्वागत केले.

      शाळेच्या भौतिक सुविधा आम्ही पुरवल्या आहेत मात्र गुणात्मक विकासाकडे आपण सर्वांनी लक्ष दिले पाहिजे तसेच पुढील शिक्षणासाठी नवीन शैक्षणिक करिअरच्या वाटा शोधाव्या लागतील १९३२ पासून स्थापन झालेल्या या आजरा तालुक्याच्या खेडोपाड्यातील बहुजन समाजातील विद्यार्थी घडविणाऱ्या आपल्या व्यंकटराव शाळेत विद्यार्थ्यांचा सर्वांगीण व गुणात्मक विकास करणे हेच खरे ध्येय आहे असे यावेळी पटेकर यांनी स्पष्ट केले.

संचालक श्री. सचिन शिंपी यांनीही आपल्या मनोगतात म्हणाले, शाळेतील विद्यार्थ्यांनी नेहमी आपल्या पुढील वर्गातील विद्यार्थ्यांनी जे यश संपादन केले आहे त्यापेक्षा पुढे जाऊन आपण शाळेच्या नावलौकिकात भर घालण्याचे स्वप्न पाहिले पाहिजे.

     संस्थेचे सचिव श्री अभिषेक शिंपी यांनी आपल्या मनोगतामध्ये विद्यार्थ्यांना एकाच छताखाली पहिलीपासून पदवीपर्यंतचे उच्चतम व दर्जेदार शिक्षण देण्यासाठी आपण नेहमी कटिबद्ध आहोत. त्या दृष्टीनेच अकॅडमी सुरू केल्याचे सांगितले. तसेच इथून पुढच्या काळात विद्यार्थ्यांना व अध्यापन करणाऱ्या शिक्षकांनाही आणखीन प्रोत्साहन मिळावे म्हणून त्यांचा सन्मान व सत्कार वेगवेगळी पारितोषिके देऊन सन्मान केला जाईल असे सांगितले.

      श्री. एस. जी. इंजल यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरव करण्यात आला.

     माजी विद्यार्थी डॉ. रोहन जाधव व सुयोग जाधव यांनी आपल्या बॅच कडून शाळेला वह्याची भेट दिली.यावेळी संस्थेचे खजिनदार श्री. सुनील पाटील, संचालक श्री. पांडुरंग जाधव, श्री. सुधीर जाधव, श्री. विलास पाटील, भादवण हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री. आर.जी कुंभार, श्री. जी.बी ढेकळे, श्री. एस. जी‌. इंजल, डॉ. रोहन जाधव, सुयोग जाधव, दाते व पालक उपस्थित होते.

आजरा महाविद्यालयात निबंध व रांगोळी स्पर्धेचे आयोजन

            आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      जागतिक लोक‌संख्या दिनानिमित्त विद्यार्थांमध्ये लोकसंख्येबद्दल जागृती निर्माण होण्याच्या उद्दे‌शाने अर्थशास्त्र आणि भूगोल विभागांतर्गत रांगोळी आणि निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए. एन. सादळे, उपप्राचार्य प्रा.डी.पी. संकपाळ व कार्यालयीन अधिक्षक श्री. योगेश पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

       रांगोळी प्रदर्शनातून लोकसंख्येचा पर्यावरणावर ताण, पृथ्वी वाचवा, संसाधनाचे पुनरुत्पादन करा, प्रदुषण नियंत्रण, झाडे वाचवा, पेपर वाचवा असा संदेश विद्यार्थ्यांनी दिला. या स्पर्धेंमध्ये गुणानुक्रमे प्रथम क्रमांक कु. समृद्धी होलम, द्वितीय क्रमांक कु.अंजली सरदेसाई, तृतीय क्रमांक कु. समिक्षा पांगम व उत्तेजनार्थ कु. तृप्ती साळुंखे यांनी क्रमांक पटकावले. मान्यवरांचे हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.

      कार्यक्रमाचे प्रास्ताविक अर्थशास्त्र विभागाचे डॉ. महेंद्र जाधव, स्वागत प्रा. जिज्ञासा उपराटे व आभार प्रा. दिपाली कांबळे यांनी मानले.

      संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन व संयोजन अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ. संजय चव्हाण व भूगोल विभागाचे प्रा. रत्नदिप पोवार, प्रा. अनिल निर्मळे व प्रा. शोभा केंद्रे यांनी केले.

छाया वृत्त

      महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बारा गड-किल्ल्यांचा ‘युनेस्को’च्या जागतिक वारसा यादीत समावेश झाल्याबद्दल आजरा येथील शिवतीर्थ येथे शिवप्रेमींनी जल्लोष केला.

निधन वार्ता
शंकर होडगे

            आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      सरंबळवाडी (ता. आजरा )येथील सेवानिवृत्त गटसचिव शंकर जोती होडगे (वय ८२ वर्षे ) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले, त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, एक विवाहित मुलगी असा परिवार आहे. आजरा साखर कारखान्याचे कर्मचारी प्रमोद होडगे यांचे ते वडील होत.

      रक्षा विसर्जन आज रविवार दि. १३ रोजी आहे.

आज ‘गोकूळ’ चा मेळावा

स्थळ : चैतन्य सभागृह, महाजन गल्ली, आजरा

वेळ : सकाळी ११ वाजता

वार्षिक सर्वसाधारण सभा…

जनता सहकारी बँक

स्थळ : दुरदुंडेश्वर मंगल कार्यालय,आजरा

वेळ : दु.१.०० वाजता

 

संबंधित पोस्ट

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

भूमी अभिलेखचा कर्मचारी लाचलूचपतच्या जाळ्यात…

mrityunjay mahanews
error: Content is protected !!