

विवाहितेचा विनयभंग… एका विरोधात गुन्हा नोंद

आजरा : प्रतिनिधी
होनेवाडी ता. आजरा येथे विवाहितेचा विनयभंग केल्याप्रकरणी किरण बेळगुंदकर (वय २८ वर्षे) याच्या विरोधात आजरा पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, होनेवाडी येथील एका सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमात सुरू असणाऱ्या भोजन समारंभात व दि.७ फेब्रुवारी रोजी दुपारी संबंधित महिला शेतातील जनावरांच्या गोठ्याकडे जात असताना व वेळोवेळी किरण याने पाठलाग करून तिला लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून किरण याच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक नागेश यमगर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल आंबुलकर पुढील तपास करीत आहेत.


आमदार आपल्या घरी…
आ. प्रकाश आबिटकर यांचा नागरिकांशी थेट संपर्क

आजरा:प्रतिनिधी
मतदारसंघातील सर्वसामान्य नागरिकांशी थेट संपर्क साधता यावा या उद्देशाने आमदार प्रकाश आबिटकर यांनी ‘आमदार आपल्या घरी’ हा उपक्रम राबवण्यास सुरुवात केली आहे.
या उपक्रमांतर्गत दर शनिवारी मतदार संघातील ज्या व्यक्तींचा आपल्याशी थेट संपर्क होऊ शकत नाही अशा नागरिकांच्या घरी भेट देऊन आमदार आबिटकर त्यांच्याशी संवाद साधणार आहेत. आजरा येथून काल शनिवारपासून सदर उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. या उपक्रमास स्थानिक नागरिक व तरुणाईचा मोठा प्रतिसाद लाभत आहे.
सर्वसामान्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न
या उपक्रमाच्या पार्श्वभूमीवर बोलताना आमदार प्रकाश आबिटकर म्हणाले, कांही मंडळी विकास कामांसह विविध कामांच्या माध्यमातून आपल्याशी वेळोवेळी संपर्क साधत असतात परंतु मतदार संघातील अनेक नागरिकांचा आपल्याशी थेट संपर्क होऊ शकत नाही. याकरिता अशा नागरिकांशी या उपक्रमाद्वारे थेट संपर्क साधून त्यांच्याशी संवाद करता येणार आहे.


भाजपाच्या पेरणोली संपर्क कार्यालयाचे उद्घाटन..

आजरा: प्रतिनिधी
भारतीय जनता पक्षाच्या पेरणोली संपर्क कार्यालयाचे उद्घाटन जिल्हाध्यक्ष राहुल देसाई यांच्या हस्ते व जिल्हा उपाध्यक्ष अशोकअण्णा चराटी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले.
यावेळी गारगोटीचे सरपंच प्रकाश वास्कर,किसान मोर्चा आघाडीचे जिल्हाध्यक्ष नामदेव पाटील, जिल्हा सरचिटणीस अजित चव्हाण, प्रदेश सचिव भगवान काटे, माजी जिल्हा उपाध्यक्ष अरुण देसाई, सुधीर कुंभार, जितेंद्र टोपले, तालुकाध्यक्ष बाळ केसरकर यांच्यासह स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते.


संस्कृती कुंभार जिल्ह्यात प्रथम

आजरा:प्रतिनिधी
जल जीवन मिशन,जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन, जिल्हा परिषद कोल्हापूर व पंचायत समिती शिक्षण विभाग आजरा यांचे मार्फत घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय चित्रकला स्पर्धेत आजरा हायस्कूलची विद्यार्थिनी कु. संस्कृती धनाजी कुंभार हिने जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला. तिला रोख एकवीस हजार रुपये शिल्ड व प्रशस्तीपत्र देऊन गौरवण्यात आले.कला शिक्षक युवराज शेटके टी.एम. पाटील व सौ. विद्या हरेर यांचे मार्गदर्शन लाभले.


रिक्षा चालकांची जागेची मागणी..

सध्या आजरा शहरामधून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाच्या कामामुळे रिक्षा चालकांना रिक्षा थांबवण्याकरता जागा उपलब्ध नाही, रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतरही जागेचा प्रश्न निर्माण होणार आहे. याकरिता बस स्थानक परिसरात रिक्षा थांब्याकरीता जागा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी निवेदनाद्वारे आमदार प्रकाश आबिटकर यांच्याकडे केली आहे.
राज्य परिवहन महामंडळाचे वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करण्याच्या आश्वासन यावेळी आमदार आबिटकर यांनी दिले.


निधन वार्ता
गणपती कदम

हारुर ता. आजरा येथील गणपती भैरू कदम (वय ९२ वर्षे) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन विवाहित मुली ,दोन मुले ,सूना, जावई, नातवंडे असा परिवार असून रक्षा विसर्जन कार्यक्रम सोमवार दिनांक १२ फेब्रुवारी रोजी सकाळी हारुर येथे आहे.



