सोमवार दिनांक ५ मे २०२५



जरा हटके…
दहावीसह बारावीही लेकीबरोबर पास…
कांबळे कुटुंबीयात आनंदीआनंद…

आजरा : ज्योतिप्रसाद सावंत
परिस्थितीमुळे शिक्षण अपुरे राहिले. शिक्षणामुळे आपण थोडे मागे पडत आहोत याची जाणीव झालेल्या संतोष कांबळे या आजरा नगरपंचायतीच्या कर्मचाऱ्याने चक्क लेकीसोबतच जिद्दीने दहावी, अकरावी व बारावीची परीक्षा देऊन या परीक्षांमध्ये यश संपादन केले. एकाच वेळी बाप-लेक या परीक्षा उत्तीर्ण झाल्याने कांबळे कुटुंबीयात आनंदीआनंद आहे.
संतोष कांबळे हे आजरा नगरपंचायतीमध्ये कर्मचारी म्हणून काम करत आहेत. आरोग्य विभागाकडे काम करणारे संतोष कांबळे यांना आपल्या कमी शिक्षणाची वेळोवेळी जाणीव होत राहिली. मुलगी दहावीला असताना त्यांनी आपणही दहावीची परीक्षा देण्याचा निर्णय घेतला व येथूनच सलग तीन वर्षे त्यांनी मुली सोबतच दहावी, अकरावी व बारावीची परीक्षा दिली. या परीक्षेमध्ये वाणिज्य विभागातून मुलगी तर उत्तीर्ण झालीच परंतु त्याचबरोबर संतोष देखील कला शाखेतून उत्तीर्ण झाल्याने या बाप – लेकीच्या अनोख्या यशाची चर्चा सध्या आजरा शहरात सुरू आहे.


आजऱ्यात बाळासाहेब ठाकरे दवाखान्यात डॉक्टर उपलब्ध करण्याची मागणी

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा तालुक्यात शासनाने सुरू केलेल्या बाळासाहेब ठाकरे आपल्या दवाखान्यात डॉक्टर नियुक्त करण्याची मागणी तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षच्या वतीने निवेदनाद्वारे तालुका आरोग्य अधिकारी यांच्याकडे केली आहे. डॉक्टर उपलब्ध न झाल्यास मोर्चा काढण्याचा उबाठा सेनेचा इशारा देण्यात आला आहे.
निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्र शासनाने गेली एक वर्षे प्रत्येक तालुक्यात हिंदुह्यदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरू केला आहे. ज्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना आरोग्याची मोफत सुविधा मिळावी; पण आजरा शहरात सुरू केलेला दवाखान्यात अजूनही डॉक्टर उपलब्ध नाहीत त्यामुळे कोणत्याही रुग्णांना उपचार मिळत नाहीत. इतका खर्च करून शिवसेना प्रमुख बाळासाहेबांच्या नावाने चालू केलेल्या दवाखान्यात रुग्णांना डॉक्टर नसल्यामुळे उपचार मिळत नाहीत ही अत्यंत दुर्देवी बाब आहे. त्यामुळे तत्काळ त्या दवाखान्यात डॉक्टर उपलब्ध करून रुग्णांना दिलासा द्यावा; अन्यथा कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशारा देण्यात आला आहे.
निवेदनावर उपजिल्हा प्रमुख संभाजी पाटील, तालुका प्रमुख युवराज पोवार, ऑकार माद्याळकर, शिवाजी आढाव, महेश पाटील, संजय येसादे, रवी सावंत, शरद कोरगावकर आदींच्या सह्या आहेत.


आजरा तालुका मेडिकल असोसिएशनच्या अध्यक्षपदी डॉ गौतम नाईक
उपाध्यक्षपदी डॉ. कुलदीप देसाई

आजरा तालुका मेडिकल असोसिएशनची सन २०२५-२६ ची कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली. यानुसार अध्यक्षपदी डॉ गौतम नाईक, उपाध्यक्षपदी डॉ. कुलदीप देसाई, सचिव पदी डॉ. बळीराम पाटील, खजिनदारपदी डॉ. स्वप्नील कातकर यांची निवड करण्यात आली आहे. आय. एम. ए. चे उपाध्यक्ष डॉ. अनिल देशपांडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या बैठकीत कऱण्यात आल्या.
या प्रसंगी असोसिएशनचे माजी अध्यक्ष डॉ.भरत मोहिते, डॉ. संदीप देशपांडे, डॉ.प्रवीण निंबाळकर, डॉ. स्मिता फर्नांडिस असोसिएशन सदस्य डॉ. रोहन जाधव डॉ. सागर पारपोलकर उपस्थित होते.


हाजगोळी बु. येथील मरगूबाई मंदिराचा मंदिराचा वास्तुशांती समारंभ उद्यापासून

आजरा : मृत्युंजय महा न्यूज वृत्तसेवा
हाजगोळी बु ll. गावचे ग्रामदैवत श्री भावेश्वरी देवीचा १२ वा वर्धापन दिन सोहळा व श्री मरगुबाई देवीच्या नविन बांधण्यात आलेल्या मंदिराचा वास्तुशांती समारंभ उद्या मंगळवार दिनांक ६ पासून सुरू होत आहे.
मंगळवार दि. ६ मे रोजी भावेश्वरी मंदिर येथे सकाळी ८ ते ११ पर्यंत गणेश पुजन, पुण्याहवाचन, नवग्रह पुजन, देवीचा अभिषेक, होमहवन, आरती, गा-हाणे, दु. ११.३० ते १.०० पालखी मिरवणूक , दु.१ ते ३ पर्यंत देवीला नैवेद्य अर्पण व ओटी भरणी कार्यक्रम, सायंकाळी ४ ते ६ बाहेर गावातील भाविकांना व ७ ते ९.३० पर्यंत महाप्रसाद व रात्री १०.३० वाजताजिल्हास्तरीय खुल्या रेकॉर्ड डान्स स्पर्धा
गुरुवार दि. ८ मे रोजी सकाळी ८ ते ११ गणेश पुजन, पुण्याहवाचन, मातृका पुजन, नांदी श्राध्द,सकाळी ९ ते ११ देर्वीच्या मुर्तीची कलश व प्रासाद वास्तुंच्या घटांची सोबत घागरी सवाद्य मिरवणूक, दुपारी १२ ते दु. ३ पर्यंत जलाधिवास,धान्याधिवास, निद्रावास विधी, प्रासाद वास्तु व मुख्य देवतेचे होमहवन, रात्री ८ वाजता महिलांसाठी होममिनिस्टर कार्यक्रम व (बक्षीस वितरण कार्यक्रम) शुक्रवार दि. ९ मे रोजी सकाळी ८ वाजले पासून देवतांची पुजा व अधीपुजन मुख्य देवतेचे होमहवन, व मुर्ती प्राणप्रतिष्ठापना, कलशारोहण., तत्ववोतारण तत्वहवन बली, पुर्णाहुती, दान संकल्प, अभिषेक, महाआरती गा-हाणे वनैवेद्य. महिलांनी दुरडी आाणणे दुपारी १२.०० वाजता महाप्रसाद संध्याकाळी ७.०० ते रात्री १०.००,रात्री ११.०० वाजता ह.भ.प. श्री आनंदराव घोरपडे महाराज (सुलगांव) यांचे किर्तन व त्यानंतर पंचक्रोशीतील भजनी मंडळांचा जागर कार्यक्रम असे या कार्यक्रमाचे स्वरूप आहे.

निवासी डिप्लोमा कोर्स बाबत आजऱ्यात गुरुवारी मेळावा
आजरा: मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
दीपस्तंभ फौंडेशन विद्यमानाने सिम्बॉयसीस युनिव्हर्सिटी पुणे मार्फत कोल्हापूर जिल्ह्यातील तसेच आजरा तालुक्यातील २०२५ मध्ये दहावी पास होणाऱ्या डिप्लोमा करण्यासाठी इच्छुक असणाऱ्या मुलींसाठी सिम्बॉयसीस युनिव्हर्सिटी पुणे मार्फत संपूर्ण मोफत दोन वर्षीय निवासी डिप्लोमा कोर्स आयोजित केला आहे. गरजू हुशार मुलींसाठी परिस्थिती अभावी शिक्षणापासून वंचित राहू नये हा यामागे उद्देश आहे.
गुरुवार दिनांक ८ मे रोजी सकाळी १० वाजता अण्णा भाऊ हॉल, आजरा हायस्कुल आजरा येथे मेळावा आयोजित केला आहे इच्छुक विविध शाळा कॉलेजमधील विद्यार्थीनींनी यांस अवश्य उपस्थित राहावे . असे आवाहन सौ. जानकीताई सातोसकर मडगांवकर उपाध्यक्ष भाजपा महिला मोर्चा, पुणे.व श्री. सी. पी. अशोक
मुख्यअधिकारी सिम्बायोसीस युनिव्हर्सिटी स्किल डेव्हलपमेंट किवळे पुणे यांनी केले आहे.

शेतकऱ्यांसाठी आज कार्यशाळा…
आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
महाराष्ट्र शासन कृषि विभागाच्या वतीने
तालुका कृषि अधिकारी कार्यालय आजरा यांच्या मार्फत आज सोमवार दिनांक ५ मे २०२५ रोजी सकाळी ठीक १० वाजता तहसील कार्यालय सभागृहात खरीप हंगाम पूर्व शेतकरी कार्यशाळा आयोजित केली आहे. तरी सर्व शेतकरी बंधूनी उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.

निधन वार्ता
धोंडीबा कुंभार

सिरसंगी ता.आजरा येथील धोंडीबा यसबा कुंभार ( वय ६० वर्षे ) यांचे आकस्मिक निधन झाले.
त्यांच्या पश्चात पत्नी, दोन विवाहित मुले, सूना, नातवंडे असा परिवार आहे. रक्षा विसर्जन आज सोमवारी सकाळी नऊ वाजता आहे.



