mrityunjaymahanews
अन्य

सातच्या बातम्या


वाजले की बारा…
पावसाचे धुमशान… आठवडा बाजार उधळला…


          आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

    काल शुक्रवार दिनांक २ ऑगस्ट रोजी दिवसभर पावसाने अक्षरशः धुमाकूळ घालत आठवडा बाजाराचे बारा वाजवले.

     आजरा शहरासह तालुक्यांमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली. पावसाच्या या हजेरीमुळे शुक्रवारचा आठवडा बाजाराचे तीन तेरा झाले .. व्यापारी वर्गासह आठवडा बाजारासाठी आलेल्या तालुकावासीयांची चांगलीच धांदल उडाली.

      दिवसभर पावसाच्या जोरदार सरी कोसळत होत्या. गेल्या २४ तासात आजरा मंडल व परिसरात ६० मिलिमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे.

        शुक्रवार आणि पाऊस…

   आजरा शहरामध्ये शुक्रवारी आठवडा बाजार भरतो आणि नेमक्या आठवडा बाजारात जोरदार पाऊस सुरू असल्याचे चित्र वारंवार दिसते. निम्म्या शहराचे पाणी थेट रस्त्यावर येत असल्याने आठवडा बाजारामध्ये येणाऱ्या व्यापाऱ्यांसह महिलावर्ग व वयोवृद्ध नागरिकांना बरीच कसरत करावी लागते. बाजारपेठेत घुसणाऱ्या या पाण्याचा बंदोबस्त नगरपंचायत करणार तरी कधी? असा संतप्त सवाल शहरवासीय करू लागले आहेत .

पेरणोलीत गवे तर यमेकोंडमध्ये हत्तीचा धुमाकूळ

          आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

       आजरा तालुक्यात गेले पंधरा दिवस पावसाने शेती पिकांचे नुकसान सुरू आहे. अद्यापही पावसाचा धडाका सुरु आहे नदीकाठाची पिके पाण्याखाली गेली आहेत. ओढे व नाले शेतात घुसल्याने शेतीचे नुकसान झाले आहे. पावसामुळे शेतकऱ्याच्या चिंतेत वाढ झाली असतानाच पेरणोली येथे गव्यांच्या कळपांनी तर यमेकोंड परिसरात हत्तीने धुमाकूळ घालून शेती पिकांचे प्रचंड नुकसान केले आहे.

      गव्यांच्या कळपांनी पेरणोली पंचक्रोशीसह तालुक्याच्या पश्चिम भागातील शेतीत धुडघूस घालण्यास सुरूवात केली आहे. पेरणोली येथील बांबर नावाच्या शेतात नुकतीच भात रोपलावण केली होती. या रोपलावणीत गव्यांच्या कळपाने धुडघूस घातला. यामुळे विष्णु दारुडकर, शिवाजी दारुडकर व दारुडकर या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. सुमारे पाच एकरावरील भात पिकाला याचा फटका बसला आहे.

       यमेकोंडच्या जंगलात टस्कर

     यमेकोंडच्या जंगलात गेले पंधरा दिवस टस्कर तळ ठोकून आहे. त्यांने काल द्रोण ॲकेडमीतील पाण्याची टाकी फोडली आहे. प्रकाश सोले यांचे नुकसान केले आहे. बाबू गाईगडे यांच्या  ऊस पिकाचे नुकसान केले आहे.

     एकीकडे पावसाने तर दुसरीकडे गव्यांनी व हत्तीने नुकसान सत्र सुरू केल्याने शेतकरी वर्ग अडचणीत आला आहे.

बंदर हो गये अंदर…
धुमाकूळ घालणारी दोन वानरे वनविभागाच्या सापळ्यात


          आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

     आरदाळ ता.आजरा येथे वानर सेनेचा धुमाकूळ सुरू होता. वन विभागाने बंदोबस्त करण्याची मागणी करण्यात आली होती. या मागणीच्या पार्श्वभूमीवर वनविभागाने रचलेल्या सापळ्यात दोन वानरे अडकली.

    वन विभाग, आजरा मार्फत आरदाळ येथे भैरीदेव मंदिरावर सापळा लावण्यात आला. त्यामध्ये सकाळी एक वानर सापडले त्याला जंगलात सोडून दुसरा सापळा लावला. दुपारी आणखी एक वानर सापळ्यात सापडले आहे. आरदाळसह परिसरातील ग्रामस्थ समाधान व्यक्त करत असून ही मोहीम पुढे चालूच राहणार असून आणखी काही वानरे सापडतील अशी आशा आहे. या मोहिमेमध्ये आरदाळ ग्रामस्थ व ग्रामपंचायतीने वनविभागाला सहकार्य केले.

       सापळे आज-यात का लावत नाहीत ?

    आजरा शहरातील पंधरा ते वीस वानरांच्या टोळीचा धुमाकूळ सुरू असतो. शहरवासीय वानरांच्या उपक्रमाला कंटाळले आहेत. वन विभाग याकडे गांभीर्याने लक्ष देताना दिसत नाही. आज-यामध्ये ही मोहीम राबवावी व नागरिकांना वानरांच्या त्रासातून मुक्त करावे अशी मागणी आजरा शहरवासीय करीत आहेत.

१२ ऑगस्ट रोजी मलिग्रे येथे कार्यकर्त्यांचा व्यापक मेळावा.
आजरा येथे झालेल्या बैठकीत निर्णय

           आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

       चित्री, उचंगी, सर्फनाला, आंबेओहोळ, एरंडोळ, धनगरमोळा धरणे पूर्ण झाली असली तरी आजरा व गडहिंग्लज तालुक्यातील ५० टक्केहून अधिक गावे ही बिनपाण्याची राहणार आहेत. त्यांचा पाण्याचा हक्कच नाकारला जाणार आहे. आजरा, गडहिंग्लज तालुक्यातील शेती करून जगणाऱ्या प्रत्येक कुटुंबाला सुखाने जगता येईल इतके पाणी त्यांना मिळाले पाहिजेत अशी यामागे भूमिका राहणार आहे.

      आटपाडी तालुक्यात पाणी संघर्ष चळवळीने केलेल्या आंदोलनामुळे समन्यायी पाणी वाटपाचा प्रकल्प राबविला आहे. बंद पाईपने प्रत्येक शेतक-यांच्या शेतापर्यँत पाणी पोहचवले आहे. त्याच धर्तीवर आजरा गडहिंग्लज तालुक्यतील शेतक-यांना हक्काचे बारमाही पाणी मिळावे यासाठी चळवळीची दिशा ठरविण्यात येणार आहे.

      या मेळाव्याला मार्गदर्शन करण्यासाठी डॉ. भारत पाटणकर, मुंबई आयआयटी प्रमुख बकुळ राव, डॉ आदित्य खेबुडकर, सिव्हिल विभाग प्रमुख, डॉ. यतीन दिवाकर, डॉ.मेघराज, कॉ. संपत देसाई इत्यादी तज्ञ मंडळी येणार आहेत. मलिग्रे येथे होणाऱ्या या बैठकीस दोन्ही तालुक्यातील कार्यकर्त्यानी १२ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजता उपस्थित राहावे असे आवाहन श्री.अशोक तर्डेकर, संजय घाटगे, अशोक शिंदे, विश्वास बुगडे, शिवाजी भगूत्रे, बाबू येडगे, प्रकाश मोरुस्कर काशिनाथ मोरे यांनी केले आहे.

मासेवाडी येथे अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन

           आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

     वंचित आणि शोषित समाजाच्या दुःखांना वाचा फोडण्याचे काम लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांनी केले आहे .मराठी साहित्यामध्ये केलेले कार्य सुवर्णाक्षराने नोंद करण्यासारखे आहे लेखनासोबतच गोरगरीब लोकांच्या वेदना जाणून घेऊन समाजासमोर मांडण्याचे काम अण्णाभाऊ साठे यांनी केले आहे असे प्रतिपादन विद्या मंदिर, मासेवाडीचे मुख्याध्यापक रवींद्र येसादे यांनी केले .

     अण्णाभाऊ साठे जयंती निमित्त मासेवाडी येथे आयोजित कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते.

     अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्य लेखनाचा व्यासंग मोठा होता .रशियातील अभ्यासू व्यक्तींना प्रेरणा मिळेल असे काही लेख तेथील कॉलेजमध्ये अभ्यासासाठी वापरले आहेत व त्यांचा पुतळा रशियाची राजधानी मास्को या ठिकाणी उभारण्यात आला आहे हे निश्चितच अभिमानास्पद असल्याचे त्यांनी सांगितले.

     संतोष मासोळे यांनीही मनोगत व्यक्त केले.प्रारंभी प्रतिमा पूजन लोकनियुक्त सरपंच पांडुरंग तोरगले यांनी केले. प्रास्ताविक व स्वागत शिवाजी कोंडुसकर यांनी केले.यावेळी सनदी अंकुश कांबळे, सुरेश मासोळे व ग्रामस्थ उपस्थित होते.


 

संबंधित पोस्ट

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

वाघाच्या हल्यात बैल ठार

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

आवंडी धनगर वाड्यावर आठ देशी गाईंचा आकस्मिक मृत्यू..मलिग्रे येथील आगीत 5 म्हैशी जखमी,एक मयत…जिल्हा बँकेची आजरा तालुक्यात ९९.७१ टक्के वसुली…आजऱ्यात  कृषि दिन कार्यक्रम उत्साहात…संजय गांधी व श्रावणबाळ योजनेचे १ कोटी ५७ लाख जमा. आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर अनुदान जमा…पुन्हा गजराजाचे  वेळवट्टी येथे आगमन…..

mrityunjay mahanews
error: Content is protected !!