mrityunjaymahanews
अन्य

सातच्या बातम्या

मंगळवार

१६ जून २०२६

टोलकृती समितीतील स्वयंघोषित नेत्यांच्या भूमिका संशयास्पद…
आरोप करत शिंदे सेना समिती मधून बाहेर

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

टोल विरोधी कृती समितीतील कांही स्वयंघोषित नेतेमंडळी अधिकाऱ्यांबरोबर परस्पर बैठका लावणे, परस्पर पत्रकार बैठका घेऊन वेगवेगळ्या भूमिका जाहीर करणे अशा बाबी अवलंबत असल्याने व समितीतील काही मंडळी अर्थपूर्ण व्यवहारात गुंतली असल्याचे आरोप होत असल्यामुळे शिवसेना शिंदे गट या समितीतून बाहेर पडत आहे असे पत्रकार बैठकीद्वारे जाहीर करण्यात आले आहे. शिवसेना शिंदे गटाचे उपजिल्हाप्रमुख राजेंद्र सावंत यांच्या अध्यक्षतेखाली पत्रकार बैठक पार पडली.

यावेळी बोलताना तालुकाध्यक्ष संजय पाटील म्हणाले, नुकतीच काही मंडळींनी परस्पर पत्रकार बैठक घेऊन एकाच वेळी टोल बाबत वेगवेगळ्या भूमिका जाहीर केलेल्या आहेत. एकदा टोल हद्दपार झाला पाहिजे असे म्हणायचे, त्याचवेळी टोल कायमस्वरूपी बंद झाला पाहिजे , तालुक्याला टोल मधून वगळावे अशी भूमिका घ्यायची आणि ऐनवेळी तालुक्यातील पाच-पन्नास लोकांना रोजगार मिळेल म्हणून टोल असावा अशी भूमिकाही जाहीर करायची? यामुळे त्यांना नेमके काय म्हणायचे आहे याबाबत संभ्रमावस्था आहे. पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी मंत्री नितीन गडकरी यांना भेटून तालुक्याबाहेर टोल नाका हलवण्यासंदर्भात सकारात्मक हालचाली सुरू केलेल्या आहेत. अशावेळी ही मंडळी उलट सुलट भूमिका का घेत आहेत ? यातील काहींनी तर टोल नाक्यावर कामाला लावतो म्हणून काहींशी अर्थपूर्ण व्यवहारही केले आहेत असे समजते. आंदोलने अर्धवट सोडणे असा संबंधितांचा इतिहास आहे असा आरोपही करण्यात आला.

अन्याय निवारण समितीने शहरापुरतेच लक्ष घालावे इतर बाबतीत ढवळाढवळ करू नये असा इशाराही दिला आहे.

यावेळी इंद्रजीत देसाई, शहर प्रमुख विजय थोरवत, साळगावचे सरपंच धनंजय पाटील, सुनील दिवेकर, संतोष भाटले, नितीन यादव, दयानंद नेऊंगरे यांच्यासह शिंदे सेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

स्वातंत्र्यानंतर प्रथमच गावात आली आली एस.टी.
परोली ग्रामस्थ सुखावले

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

भाजप युवा नेते जयवंत सुतार यांचे विशेष प्रयत्नातून परोली ता. आजरा, जिल्हा कोल्हापूर, येथे स्वातंत्र्यानंतर प्रथमतः एसटी फेरी चालू झाली. या समारंभाचे उद्घाटन जयवंत सुतार यांचे हस्ते करण्यात आले. स्वातंत्र्यानंतर प्रथमच गावात एसटी आल्यामुळे परोली ग्रामस्थ सुखावले आहेत.

बस थांब्याचे उद्घाटन चंदगड भाजप संयोजिका सौ. भारतीताई जाधव यांच्या हस्ते करण्यात आले.यासाठी चंदगड विधानसभा मतदारसंघाचे आमदार शिवाजीराव पाटील, अशोकअण्णा चराटी यांचे सहकार्य लाभले.

याकामी विशेष प्रयत्न जयवंत सावंत, रोशन नेवरेकर, प्रतीक नेवरेकर, विजय सावंत आदी ग्रामस्थ तसेच चाफवडे माजी सरपंच विलास धडाम यांचे देखील सहकार्य लाभले.

याप्रसंगी विलास धडाम,हर्षवर्धन महागावकर, राजाराम नेवरेकर, विनायक सरदेसाई, चेतन हरेर, जयवंत सावंत, रोशन नेवरेकर, प्रतीक नेवरेकर, विजय सावंत, जयवंत नेवरेकर, प्रकाश तीबिले प्रमुख उपस्थित होते.

आजरा नगरपंचायतीतील अधिकृत व अनधिकृत नळजोडण्यांचे सर्वेक्षण करून अहवाल सादर करण्याची मागणी

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

अन्याय निवारण समिती, आजरा यांच्या वतीने आजरा नगरपंचायतीच्या हद्दीतील अधिकृत व अनधिकृत नळजोडण्यांचे सर्वेक्षण करून सविस्तर अहवाल सादर करावा तसेच अनधिकृत नळजोडण्या नियमानुसार नियमित करण्याबाबतचे निवेद श्री. सूरज सुर्वे व मुख्य कॉन्ट्रॅक्टर श्री. आर. डी. देसाई यांना देण्यात आले.
यावेळी नगरसेवक श्री. परशुराम बामणे , सौ. स्मिता कुंभार (परळकर) तसेच अन्याय निवारण समितीचे पांडुरंग सावरतकर, जोतीबा आजगेकर, दिनकर जाधव, मिनीन डिसोझा, जावेद पठाण पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख कदम उत्तम कांबळे सुपरवायझर व इतर सदस्य उपस्थित होते.

निवेदनात शहरातील सर्व अधिकृत, अनधिकृत व घरगुती नळजोडण्यांचे प्रत्यक्ष सर्वेक्षण करून त्याची स्वतंत्र नोंद तयार करावी, अनधिकृत नळजोडण्या नियमांनुसार नियमित करून नगरपंचायतीच्या महसुलात वाढ करावी तसेच पाणीपुरवठा व्यवस्थेतील त्रुटी दूर कराव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे.

यावेळी निवेदनाची दखल घेत मुख्याधिकारी श्री. सुर्वे यांनी पाणीपुरवठा योजनेच्या ठेकेदारांना या संदर्भातील आवश्यक कार्यवाही आठ दिवसांच्या आत पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. तसेच सर्वेक्षण करून आवश्यक अहवाल सादर करण्याबाबतही संबंधित यंत्रणेला निर्देश देण्यात येतील, असे आश्वासन दिले.
या निर्णयामुळे आजरा शहरातील पाणीपुरवठा व्यवस्था अधिक पारदर्शक होऊन अनधिकृत नळजोडण्यांवर नियंत्रण मिळविण्यास मदत होईल, अशी अपेक्षा उपस्थितांनी व्यक्त केली.

अभिनंदनीय…

उत्तुर येथील अथर्व अमर पाटील यांनी JEE advance 2026 परीक्षेत All India Rank 709 (GEN-EWS) मिळवुन IIT हैदराबाद येथे पहिल्याच राऊंडमध्ये प्रवेश मिळवला.
त्याचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण पार्वती शंकर विद्यालय, उत्तूर येथे झाले आहे.

 

निधन वार्ता
सुभद्रा कांबळे

मसोली ता. आजरा येथील सौ. सुभद्रा मारुती कांबळे ( वय ६८ वर्ष) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.

त्यांच्या पश्चात पती, विवाहित मुलगा, तीन सुना, मुलगी, जावई, नातवंडे असा परिवार आहे. येथील सुप्रसिद्ध कलाकार एम. आर. उर्फ मारुती कांबळे यांच्या त्या पत्नी होत.

रक्षा विसर्जन गुरुवार दिनांक १८ रोजी सकाळी आहे.

जोतिबा येसणे


मडीलगे ता. आजरा येथील जोतिबा गणपती येसणे (वय ७० वर्षे ) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.

त्यांच्या पश्चात दोन विवाहित मुले,सूना, नातवंडे असा परिवार आहे. देवस्थान कमिटी सदस्य तानाजी येसणे यांचे ते वडील होत.

रामतीर्थ पर्यटन स्थळी स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

वनविभाग आजरा, आजरा तालुका सरपंच संघटना, मराठा महासंघ आजरा, आजी – माजी सैनिक संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने रामतीर्थ पर्यटन स्थळी स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.

सदर मोहिमेअंतर्गत रामतीर्थ फाटा ते रामतीर्थ पर्यटन स्थळादरम्यान रस्त्याच्या दोन्ही बाजूंच्या झाडांच्या फांद्या व झुडपे साफ करण्यात आली. तसेच परिसरातील प्लास्टिकच्या बाटल्या, प्लास्टिक पिशव्या व इतर टाकाऊ कचरा गोळा करून त्याची योग्य प्रकारे विल्हेवाट लावण्यात आली. या उपक्रमामुळे परिसर स्वच्छ, सुंदर व पर्यटकांसाठी अधिक सुरक्षित करण्यात मदत झाली.

या मोहिमेत वनविभागाचे वनपाल उत्तर आजरा, वनरक्षक आजरा, वनरक्षक साळगाव, वनरक्षक मडीलगे, वनसेवक, वन्यजीव बचाव पथकाचे सदस्य तसेच आजरा तालुक्यातील सरपंच, सरपंच संघटनेचे पदाधिकारी व सदस्य, मराठा महासंघाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते, तसेच आजी – माजी सैनिक संघटना आजरा चे पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले.

पर्यटन स्थळांचे नैसर्गिक सौंदर्य अबाधित राखणे, पर्यावरण संवर्धन करणे व नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत जनजागृती निर्माण करणे या उद्देशाने सदर मोहीम राबविण्यात आली. उपस्थितांनी पर्यटन स्थळ परिसर प्लास्टिकमुक्त व स्वच्छ राखण्यासाठी सर्वांनी सामूहिक प्रयत्न करण्याचे आवाहन केले.

सर्व संबंधितांच्या सक्रिय सहभागामुळे ही स्वच्छता मोहीम यशस्वीरित्या पार पडली.

 

थोडक्यात  …

♦ कारने उडवल्याने हरळी तालुका गडहिंग्लज येथील सौरभ सुरेंद्र फडतरे हा २८ वर्षीय तरुण जागीच ठार झाला पुणे बंगलोर महामार्गावर शिये फाटण्याची सदर अपघात झाला. 

♦ घरगुती वादातून नागरदळे तालुका चंदगड येथील मुंबई येथे वाहतूक शाखेत कार्यरत असणाऱ्या दयानंद कृष्णा पाटील या ४२ वर्षीय सेवानिवृत्त जमानाने स्वतःवर गोळी झाडून घेत आत्महत्या केली.

♦ गोकुळचे प्रशासकीय अधिकारी संजयकुमार सुद्रिक यांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

♦ सहाय्यक निबंधकांनी पवसायानात काढलेल्या ६५८ दुध संस्था गोकुळच्या मतदानासाठी अपात्र ठरवण्यात आलेल्या आहेत.

‘ आत्मा ‘अंतर्गत खरीप हंगाम भात पीक नैसर्गिक शेती शेतीशाळा

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा अंतर्गत आजरा तालुक्यातील दाभिल, सुलगाव येथे खरीप हंगाम भात पीक नैसर्गिक शेती शेतीशाळा तसेच आरदाळ येथे नाचणी पीक नैसर्गिक शेती शाळा वर्ग कार्यक्रम संपन्न झाला. श्री. युवराज पाटील सरपंच दाभिल सौ. रुपाली पाटील, सरपंच आरदाळ तसेच सौ. नंदिनी डोंगरे सदस्या सुलगाव उपस्थित होते.

या कार्यक्रमात डॉ. शैलेश कुंभार , प्रभारी अधिकारी कृषी संशोधन केंद्र राधानगरी यांनी भाताच्या विविध जाती, नैसर्गिक पद्धतीने बीज प्रक्रियेचे महत्त्व, बिजामृत तयार करण्याची पद्धत व बीजप्रक्रिया पद्धत, जमिनीची मशागत, बियाणे प्रमाण इत्यादी बाबत शेतकऱ्यांना सविस्तर माहिती दिली.

डॉ. योगेश बन, प्रमुख नाचणी संशोधन प्रकल्प विभागीय कृषी संशोधन केंद्र कोल्हापूर यांनी नाचणी पिकाच्या विविध जाती, बियाणे बीज प्रक्रिया, जमीन तयार करणे गादीवाफे तयार करणे,लागवड पद्धती, अल निनो उपाय योजना इत्यादी बाबत शेतकऱ्यांना माहिती दिली.तसेच महात्मा फुले कृषि विद्यापीठ राहुरी अंतर्गत शाश्वत शेतीसाठी सुरू असलेल्या “खेत बचाव अभियान व संतुलित खत वापर जागरूकता अभियान” कार्यक्रम अंतर्गत सेंद्रिय शेती, माती परीक्षण, जीवाणू खते, विद्राव्य खते वापर, हिरवळीची खते व संतुलित खत वापर याबाबत शास्त्रज्ञांनी मार्गदर्शन केले.

विद्यापीठाने प्रसारित केलेल्या माहितीपत्रकाचे शेतकरी बंधूंना वाटप केले.

श्री. किरण पाटील उपविभागीय कृषी अधिकारी गडहिंग्लज यांनी कृषी विभागाच्या विविध योजना तसेच बियाणे उपलब्धता इत्यादी बाबत मार्गदर्शन केले. सौ. मनीषा पाटील सहाय्यक कृषी अधिकारी यांनी पाणी फाउंडेशन अंतर्गत गट स्थापना व उपक्रमाबाबत माहिती दिली. श्री. अमित यमगेकर सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक यांनी नैसर्गिक शेती शेतीशाळा संकल्पना व शेती शाळेच्या सहा वर्गांमध्ये शिकायच्या बाबी याबाबत प्रास्ताविक केले. यावेळी कमलाकर पाटील, नामदेव पाटील, जनार्दन पाटकर, नंदकुमार वाजे, सुधा कांबळे,पूनम गायकवाड, विजया वर्देकर,संजय डोंगरे,पुनम कोंडुसकर,अंतू पाटील, सचिन पाटील,महादेव पुंडपळ, गीता पाटील,सुरेखा काटवळ आदी उपस्थित होते.

छायावृत्त

मुरुडे या.आजरा येथे नवागतांचे स्वागत ढोल ताशाच्या गजरात व बैलगाडीतून मिरवणूक काढून करण्यात आले.

आजचे पंचांग 

दिनांक : १७ जून २०२६
वार : बुधवार
माह (अमावस्यांत) : ज्येष्ठ
माह (पूर्णिमांत) : ज्येष्ठ
ऋतु : ग्रीष्म
आयन : उत्तरायण
पक्ष : शुक्ल पक्ष
तिथी : तृतीया (रात्री ०९.३८ पर्यंत) त्यानंतर चतुर्थी तिथी
नक्षत्र : पुनर्वसू नक्षत्र (दुपारी ०१.३६ पर्यंत) त्यानंतर पुष्य नक्षत्र
योग : ध्रुव योग (रात्री ०८.५० पर्यंत) त्यानंतर व्याघात योग
करण : तैतुला करण (सकाळी ११.११ पर्यंत) त्यानंतर गराजा करण
चंद्र राशी : मिथुन राशी (सकाळी ०८.१२ पर्यंत) त्यानंतर कर्क राशी
सूर्य राशी : मिथुन राशी
अशुभ मुहूर्त:
राहु काळ : दुपारी १२.३९ ते दुपारी ०२.१९ पर्यंत
सूर्योदय : सकाळी ०६.०२
सूर्यास्त : सायंकाळी ०७.१७
संवत्सर : पराभव
संवत्सर(उत्तर) : रौद्र
विक्रम संवत: २०८३ विक्रम संवत
शक संवत: १९४८ शक संवत

संबंधित पोस्ट

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सुपडा साफ…

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

‘उचंगी’ घळभरणी च्या पार्श्वभूमीवर जोरदार हालचाली… जादा पोलीस फौजफाटा तैनात

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews
error: Content is protected !!