रविवार १४
जून २०२६
‘ त्या ‘ अपघातातील एका महिलेचा मृत्यू…
तिघांसमोर उपचारासाठी
आर्थिक संकट…

मृत मालुबाई कांबळे/महागोंड
आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा-आंबोली राज्य मार्गावरील हाळोली फाटा येथे भरधाव चारचाकीने वाहनाने उभ्या असलेल्या प्रवाशांना १ जुनला जोरदार धडक होती. या भीषण अपघातात सोहाळे येथील तिघेजण व महागोंड येथील मालुबाई अशोक कांबळे या गंभीर जखमी झाल्या होत्या. त्यांचा कोल्हापूर येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला. सर्वसामान्य कुटुंबातील मालुबाई यांचा हकनाक मृत्यू झाला. तर उर्वरित तिघांसमोर उपचार घेत असताना मोठे आर्थिक संकट उभारले आहे.
याबाबत कार चालक भरतराज सुकुमरन (रा. हैदराबाद) याच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.संजय काळू कांबळे (वय ५४, रा. सोहाळे, ता. आजरा, जि. कोल्हापूर) हे आपली पत्नी व मुलगी यांच्यासह हाळोली गावाजवळ बसची वाट पाहत उभे होते. त्याच वेळी गोव्याहून हैदराबादकडे जाणारी हुंदाई कार भरधाव वेगाने आली.
या अपघातात फिर्यादी संजय कांबळे यांच्यासह उषा संजय कांबळे, शृतीका संजय कांबळे व मालुबाई अशोक कांबळे (रा. महागोंड) हे गंभीर जखमी होते. मालुबाई या उत्तूर व महागोंडचे माजी पोलीस पाटील अशोक कांबळे यांच्या पत्नी होत.
सध्या उपचार घेत असलेले सोहाळे येथील संजय कांबळे उषा संजय कांबळे व श्रुतिका संजय कांबळे यांचा उपचाराचा खर्च लाखोत आहे. सर्वसामान्य कांबळे कुटुंब कोणताही दोष नसताना अडचणीत आले आहे.

पुन्हा लम्पीचा तालुक्यात प्रवेश…
पशुधन विभाग सतर्क

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा तालुक्यात पुन्हा लम्पी आजाराने प्रवेश केला असून यामुळे पशुपालक चांगलेच धास्तावले आहेत. पशुधन विभागाकडून तातडीने लम्पी प्रतिबंधक लसीकरण हाती घेण्यात आले आहे.
सकृत दर्शनी सध्या आजरा शहरासह तालुक्यात लम्पी बाधित दोन जनावरे असल्याचे अधिकृतरित्या सांगितले जात असते तरीही तालुक्यात याचे प्रमाण अधिक असल्याचे समजते.
खरिपाच्या पार्श्वभूमीवर शेतकरी वर्गाची घाई सुरू असतानाच लम्पीने डोके वर काढल्याने शेती कामासाठी जनावरे खरेदी करताना खबरदारी घेण्याची गरज निर्माण झाली आहे. याबाबत पशुधन विभागाशी संपर्क साधला असता या वृत्ताला दुजोरा देण्यात आला असून आवश्यक ती खबरदारी घेतली जात असल्याने पशुपालकांनी काळजी करू नये असे सांगण्यात आले.

गुरुजींचा निरोप समारंभ महागात पडला…
चिमणे गावात ७० हून अधिक जणांना भोजनातून विषबाधा

उत्तूर : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा तालुक्यातील चिमणे येथे आयोजित करण्यात आलेल्या एका सेवानिवृत्त शिक्षकाच्या सत्कार समारंभानंतर आयोजित भोजनाचा कार्यक्रम अनेक जणांना अडचणीचा ठरला असून नागरिकांची प्रकृती अचानक बिघडल्याची घटना घडली. कार्यक्रमानंतर दिलेल्या भोजनानंतर सुमारे ७० हून अधिक जणांना त्रास जाणवू लागल्याने आरोग्य यंत्रणेची धावपळ उडाली.
भोजन घेतल्यानंतर काही वेळातच अनेकांना मळमळ, उलट्या, पोटदुखी आणि अशक्तपणाचा त्रास सुरू झाला. त्यानंतर बाधितांना तातडीने चिमणे येथील आरोग्य उपकेंद्रात दाखल करण्यात आले. काही रुग्णांना उत्तूर प्राथमिक आरोग्य केंद्रात तर आठ रुग्णांना पुढील उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले.
घटनेची माहिती मिळताच आरोग्य विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. गावात विशेष वैद्यकीय पथक तैनात करण्यात आले असून बाधितांवर उपचार सुरू आहेत. उपचारानंतर अनेकांची प्रकृती सुधारल्याचे सांगण्यात आले.
जिल्हा परिषद सदस्य शिरीष देसाई व पंचायत समिती सदस्य विकास चोथे, वसंत तारळेकर, वसंतराव धुरे यांनी उत्तूर प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट देत रुग्णांची विचारपूस केली. तसेच वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून परिस्थितीची माहिती घेतली.
डॉ. सौरभ कसबे यांनी दिलेल्या माहितीनुसार, बहुतांश रुग्णांची प्रकृती स्थिर असून परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आहे. वेळीच वैद्यकीय मदत मिळाल्यामुळे कोणतीही गंभीर परिस्थिती निर्माण झालेली नाही. बाधितांमध्ये महिला, पुरुष, ज्येष्ठ नागरिक तसेच लहान मुलांचाही समावेश आहे.
या घटनेमुळे परिसरात काही काळ चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र आरोग्य विभागाच्या तत्परतेमुळे सर्व रुग्णांवर वेळेत उपचार होऊन परिस्थिती आटोक्यात आली आहे.

अर्बन बँकेच्या चंदगड शाखेच्या नवीन इमारतीचा उद्घाटन सोहळा उत्साहात संपन्न…

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
दि आजरा अर्बन को-ऑप. बँक लि., आजरा (मल्टी-स्टेट) या बँकेच्या चंदगड शाखेच्या नव्याने बांधण्यात आलेल्या प्रशस्त व सुसज्ज इमारतीचा उद्घाटन सोहळा राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. प्रकाश आबिटकर यांचे शुभहस्ते पार पडला. माजी रोजगार हमी योजना राज्यमंत्री भरमूअण्णा पाटील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. आमदार शिवाजीराव पाटील, चंदगडचे नगराध्यक्ष सुनील काणेकर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर, बँकेचे संचालक, सभासद, ग्राहक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी ना. प्रकाश आबिटकर यांनी ग्रामीण भागात बैंकिंग सेवा विस्तारासाठी केलेल्या कार्याचे कौतुक केले. नवीन इमारतीमुळे ग्राहकांना अधिक दर्जेदार, सुरक्षित व आधुनिक बैंकिंग सुविधा उपलब्ध होतील असा विश्वास व्यक्त केला आणि बँकेच्या विकास कामाचा आढावा घेत बँकेच्या कार्याचे कौतुक केले. त्याचबरोबर चंदगड भागातील विकासासाठी आपण सर्वोतोपरी सेवा देण्याचे आश्वासित केले. आमदार शिवाजीराव पाटील यांनी बँकेच्या कार्याचा आढावा घेत बँकेची गोवा राज्यात नवीन शाखा सुरू करणेसाठी सर्वोतोपरी प्रयत्न करू असे आश्वासन दिले.
भरमूअण्णा पाटील यांनी बँकेच्या कार्याला शुभेच्छा दिल्या. यावेळी बँकेचे
चेअरमन अशोकअण्णा चराटी म्हणाले कि, आर्थिक सक्षमतेचे आणि व्यवसाय वाढीचे निकष पूर्ण करीत आजरा अर्बन बँकेची वाटचाल सुरू आहे. या वाटचालीमध्ये मागील आर्थिक वर्षामध्ये बँकेने १ हजार ९५७ कोटी व्यवसायाचा टप्पा पूर्ण केला आहे. आधुनिक बॅंकिंग साठी ज्या सुविधा आवश्यक आहेत ते सर्व बँकेकडे उपलब्ध आहे. केंद्र आणि राज्य सरकार यांच्या सर्व सवलतीच्या कर्ज योजना बँकेने उपलब्ध करून दिल्या आहेत. तसेच येत्या काळात पनवेल (मुंबई) व म्हापसा (गोवा) येथे नवीन शाखा सुरू करणेसाठी प्रयत्न करणार असलेचे सांगितले.
उदघाटन प्रसंगी बँकेचे व्हा. चेअरमन संजय चव्हाण, संचालक किशोर भुसारी, बसवराज महाळक, आनंदा फडके, श्रीमती शैला टोपले, विजयकुमार पाटील, जयवंत खराडे, डॉ. सुनील देशपांडे, विनय सबनीस, डॉ. सागर कुरुणकर, हृषिकेश सातोसकर, श्री. सिद्धेश नाईक, श्रीमती संध्याताई वाटवे, कुंदा डांग, किरण पाटील, अशोक पाटील, कान्होबा माळवे, ऍड. सचिन इंजल, मनोहर कावेरी, स्नेहल करंडे, आतिश देसाई तसेच शाखा मार्गदर्शक नारायण काणेकर, संजय भिसे, जयवंत नाङगोंडा, माजी संचालक सुरेश डांग, विलास नाईक, डॉ. अनिल देशपांडे, रमेश कुरुणकर डॉ .दीपक सातोसकर व परिसरातील प्रतिष्ठित मंडळी, मान्यवर बँकेचे पदाधिकारी उपस्थित होते. सूत्रसंचालन बँकेचे सहाय्यक सरव्यवस्थापक तानाजी गोईलकर यांनी केले. तसेच स्वागत व प्रास्ताविक बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रशांत गंभीर यांनी केले तर आभार व समारोप बँकेचे संचालक विजयकुमार पाटील यांनी मानले.

थोडक्यात जिल्हा …
♦ कोल्हापूर महानगरपालिकेच्या प्रवेश कर वसुलीच्या संभाव्य निर्णयावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी कडाडून टीका केली असून, हा निर्णय ‘तुघलकी’ असल्याचे म्हटले आहे.
♦ जिल्ह्यात मान्सूनचे आगमन काहीसे थबकले असून ७० टक्क्यांपर्यंत पावसाची तूट निर्माण झाल्याची माहिती पुढे आली आहे.
♦ गृहमंत्री अमित शाह यांचा १९-२० जून रोजी कोल्हापूर दौरा होणार असून, अंबाबाई दर्शन आणि जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
♦ ‘गोकुळ’ दूध संघाच्या बोगस ठराव प्रकरणावरून सहकार विभागाने कायदेशीर कारवाईचा इशारा दिला आहे.
♦ कोल्हापूर परिसरामध्ये गंभीर गुन्हेगारी घटना उघडकीस आल्या असून, यात तरुणीवर सामूहिक अत्याचार आणि सावकारीच्या जाचातून महिलेला वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

छायावृत्त

शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त रामतीर्थ पर्यटन स्थळ येथे शिवसैनिकांकडून स्वच्छता मोहीम राबवण्यात आली.

आजचे पंचांग
दिनांक : १४ जून २०२६
वार : रविवार
माह (अमावस्यांत) : अधिक ज्येष्ठ
माह (पूर्णिमांत) : अधिक ज्येष्ठ
ऋतु : ग्रीष्म
आयन : उत्तरायण
पक्ष : कृष्ण पक्ष
तिथी : चतुर्दशी (दुपारी १२.१९ पर्यंत) त्यानंतर अमावस्या तिथी
नक्षत्र : रोहिणी नक्षत्र (रात्री १०.१३ पर्यंत) त्यानंतर मृगशीर्ष नक्षत्र
योग : धृति योग (दुपारी ०१.१४ पर्यंत) त्यानंतर शूल योग
करण : शकुनी करण (दुपारी १२.१९ पर्यंत) त्यानंतर चतुष्पाद करण
चंद्र राशी : वृषभ राशी
सूर्य राशी : वृषभ राशी
अशुभ मुहूर्त:
राहु काळ : सायंकाळी ०५.३६ ते सायंकाळी ०७.१६ पर्यंत
शुभ मुहूर्त:
अभिजित : दुपारी १२.१२ ते दुपारी ०१.०५
सूर्योदय : सकाळी ०६.०२
सूर्यास्त : सायंकाळी ०७.१६
संवत्सर : पराभव
संवत्सर(उत्तर) : रौद्र
विक्रम संवत: २०८३ विक्रम संवत
शक संवत: १९४८ शक संवत



