

आठवडा बाजाराची बोंब…
बाजारपेठेत चिखलच चिखल…

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
नवीन नळ पाणीपुरवठा योजनेसाठी आजरा शहरातील मुख्य बाजारपेठेत पावसात पाईपलाईन घालण्यासाठी खुदाई केली असून काल झालेल्या जोरदार पावसामुळे बाजारभर सर्वत्र चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. चिखलामुळे आज शुक्रवारी होणारा आठवडा बाजार नेमका बसवायचा कोठे ? असा प्रश्न उपस्थित होत आहे. आता या नळ पाणीपुरवठा योजनेची नाटके किमान पावसाळा संपेपर्यंत तरी बंद करावीत अशी मागणी शहरवासीय करत आहेत.
उन्हाळ्यात या पाईपलाईनच्या कामाची गती वाढवून पूर्ण करून त्यावर डांबरीकरण होणे गरजेचे होते. सध्या पावसातच हे काम सुरू असून रस्त्याची मोठ्या प्रमाणावर खुदाई करण्यात आली आहे.. जे चित्र मुख्य बाजारपेठेत आहे तेच चित्र संपूर्ण शहरभर दिसत आहे. सर्वत्र चिखलाचे साम्राज्य असल्याने नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
आता किमान पावसाळाभर तरी या पाणीपुरवठा योजनेच्या कामाची नाटके बंद करावीत व शहरवासीयांचे हाल थांबवावेत अशी मागणी होत आहे.
टोल नाका उभारणीचे काम थांबले.
टोल मुक्तीचा निर्णय घ्या मगच काम सुरू करण्याची मागणी

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आज-याजवळ उभा करण्यात येत असलेल्या टोल नाक्याचे काम जोपर्यंत तालुकावासियांना टोलमुक्त करण्यात येत नाही व याबाबत निर्णय समजत नाही तोपर्यंत बंद करण्याची मागणी टोल विरोधी कृती समितीच्या वतीने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत करण्यात आली. अखेर याबाबत आठवडाभरात निर्णय देण्यात येईल असे प्रमुख अधिकाऱ्यांनी सांगून सदर काम तूर्तास बंद ठेवण्याची भूमिका घेतली आहे.
बैठकीमध्ये बोलताना कॉ. संपत देसाई यांनी १० जून रोजी टोलच्या विरोधात निघणाऱ्या सर्वपक्षीय मोर्चावर आपण ठाम आहोत. मुळातच कोणालाही विश्वासात न घेता उभा करण्यात आलेल्या या टोलनाक्याला तालुक्यातील नागरिकांचा विरोध आहे. तालुक्यातील स्थानिक नागरिकांबाबत टोल आकारणीची भूमिका काय आहे याबाबत खुलासा करण्याची मागणी केली. महामार्गासाठी संपादन केलेल्या जमिनीची पैकी बऱ्याच जमिनीची नुकसान भरपाई अद्याप मिळालेली नाही. नुकसान भरपाई देताना गडहिंग्लज व आजरा तालुक्यातील शेतकऱ्यांना वेगवेगळ्या दराने नुकसान भरपाई दिली आहे. ठिकठिकाणी उभारण्यात आलेले बस थांबे चुकीच्या पद्धतीने व चुकीच्या ठिकाणी उभारण्यात आले आहेत. रस्त्याचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाले असून मुळात हा मार्ग राष्ट्रीय महामार्ग आहे का ? असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला.
महामार्ग प्राधिकरणाच्या वतीने अधिकारी शिंदे यांनी टोल नाक्याची फक्त उभारणी केली जात असून तूर्तास कोणत्याही प्रकारचा टोल आकारला जाणार नाही. टोल नाक्याच्या वीस किलोमीटर परीघातील नागरिकांना मासिक तिनशे तीस रुपये प्रमाणे सवलतीचे पास दिले जातील. संपादित जमिनीची नुकसान भरपाई संबंधित शेतकऱ्यांनी तांत्रिक बाबींची पूर्तता न केल्याने देण्याचे काम थांबले असून बहुतांशी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात आली असल्याचे सांगितले.
यावेळी परशुराम बामणे प्रभाकर कोरवी ,संजय पाटील, प्रकाश मोरुस्कर आदींनी टोल रद्द करावा याबाबत ठाम भूमिका मांडल्या.
पुढच्या आठवड्यात याबाबत वरिष्ठांशी बोलणे करून निर्णय दिला जाईल असे शिंदे यांनी स्पष्ट केले. पुढील बैठक जोपर्यंत होत नाही तोपर्यंत टोल नाका उभारणीचे काम थांबवण्यात येईल असे देखील सांगितले.
यावेळी झालेल्या चर्चेत डॉ. धनाजी राणे, बंडोपंत चव्हाण, युवराज पोवार,दयानंद भोपळे, गौरव देशपांडे आदींनी भाग घेतला
बैठकीस तहसीलदार समीर माने, निवासी तहसीलदार म्हाळसाकांत देसाई, सहाय्यक पोलीस निरीक्षक नागेश यमगर, अनिल पाटील, रस्त्याचे ठेकेदार यांच्यासह अल्बर्ट डिसोजा, पांडुरंग सावरतकर ,महेश पाटील, अभिषेक रोडगी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
महामार्गाचा आराखडा बदलल्याचा आरोप…
महामार्ग उभारणी करताना कांही ठिकाणी एक पदरी, काही ठिकाणी दोन पदरी असा हा मार्ग उभारण्यात आला आहे. जमिनी संपादन करताना संभाव्य महामार्ग कोठून जाणार याबाबत दिलेली माहिती व प्रत्यक्षात महामार्ग जिथून तयार होत आहे ती जागा यामध्ये बरीच तफावत आहे.महामार्ग प्राधिकरणाने महामार्गाचा मूळ आराखडा बदलला असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.
शिवराज्याभिषेक दिनानिमित्त मराठा महासंघातर्फे वृक्षारोपण

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
अखिल भारतीय मराठा महासंघ,आजरा मार्फत शिवराज्याभिषेक दिनानिमित्त मराठा महासंघाच्या व इतर कार्यकर्त्यांच्या शेतामध्ये जाऊन वृक्षारोपण करण्यात आले. एरंडोळ तालुका आजरा येथील सरपंच सरिता सुभाष पाटील, तसेच डेप्युटी सरपंच भीमराव माधव, तंटामुक्त अध्यक्ष पाटील व इतर नागरिकांच्या उपस्थितीत मराठा महासंघाचे कार्यकारणी सदस्य विष्णू सुपल यांच्या शेतामध्ये वृक्षारोपण करून शिवराज्याभिषेक दिन साजरा केला .
यावेळी जिल्हाध्यक्ष मारुती मोरे ,तालुका अध्यक्ष बंडोपंत चव्हाण, जिल्हा उपाध्यक्ष चंद्रकांत देसाई ,तालुका उपाध्यक्ष शिवाजी पाटील व शंकराव शिंदे, कार्याध्यक्ष संभाजीराव इंजल, सरचिटणीस प्रकाशराव देसाई. तसेच तालुका कार्यकारणी सदस्य सूर्यकांत आजगेकर, दत्तात्रय मोहिते, शिवाजीराव इंजल, शिवाजीराव गडूळकर, चंद्रकांत पारपोलकर तसेच एरंडोल गावचे ग्रामस्थ उपस्थित होते
टोलमुक्ती आंदोलनामुळे मुक्ती संघर्ष समितीचे आंदोलन स्थगित
आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
मुक्ती संघर्ष समितीच्या वतीने अपंगांच्या दिव्यांगांच्या बाबतीतील सर्व मागण्यांचा गांभीर्याने विचार करून कायदेशीररित्या त्याची ताबडतोब सोडवून करावी.
अपंगांच्या न्याय्य हक्क मागण्यांसाठी तहसीलदार,मुख्याधिकारी, नगरपंचायत व गटविकास अधिकारी आजरा यांना निवेदन देऊन चर्चा केली होती. याबाबतीत तहसीलदार, मुख्याधिकारी, नगरपंचायत व गटविकास अधिकारी आजरा यांनी सकारात्मकरित्या प्रश्न सोडवण्यासाठीचा पुढाकार घेऊन प्रश्न मार्गी लावले नाही तर याबाबतीत अपंगांच्या विविध मागण्यांसाठी तहसिलदार व पंचायत समिती कार्यालयावर मोर्चा व नगरपंचायत कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन करणार होतो.परंतु टोलमुक्ती आंदोलन असल्यामुळे मुक्ती संघर्ष समितीने अपंगांसाठीचे आंदोलन व इतर विषयांसाठीचे बेमुदत आंदोलन तात्पुरते स्थगित केले.
यावेळी राज्याध्यक्ष संग्राम सावंत,सुरेश खोत,रूजाय डिसोझा,अबुसईद माणगावकर, संजय डोंगरे, बबन चौगुले,अहमद नेसरीकर,दिलीप कांबळे, इम्तियाज दिडबाग, अमिन कानडीकर, गौस माणगावकर, सुलेमान दरवाजकर,बबन कुरळे, आबुहुरेरा मानगावकर, जगदीश कुरुणकर ,सुमिता चंदनवाले व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.



