

तालुक्यात राजकीय उलथापालथींचे संकेत

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर आजरा तालुक्यामध्ये बऱ्याच राजकीय घडामोडींचे संकेत मिळू लागले आहेत. अर्थातच काँग्रेसला नवसंजीवनी मिळाली आहे तर भाजपामध्ये नाराजी दिसत आहे. राष्ट्रवादीचे दोन्ही गट पुन्हा एकत्र येण्याची तालुक्यात शक्यता आहे. समोर नगरपंचायत, विधानसभेसह पंचायत समिती, जिल्हा परिषद या प्रमुख निवडणुका असल्याने येत्या चार महिन्यांमध्ये तालुक्यात अनेक राजकीय उलथापालथी होणार हे स्पष्ट दिसू लागले आहे.
महाविकास आघाडीच्या शाहू छत्रपती यांना तालुक्यातून मताधिक्य मिळाले. यामुळे काँग्रेसचे चिन्ह बऱ्याच दिवसांनी घराघरांमध्ये पोहोचल्याचे दिसत आहे. गेल्या कांही दिवसांपासून माजी गृहराज्यमंत्री व विद्यमान आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांच्याशी तालुक्यातील बऱ्याच कार्यकर्त्यांनी जवळीक वाढवली आहे. केवळ या निवडणुकीपूरते आपण शाहू छत्रपतींसोबत राहणार अशी म्हणणारी आमदार प्रकाश आबिटकर यांची कांही कार्यकर्ते मंडळी लोकसभा निकालानंतर काँग्रेसच्या प्रवाहातच राहण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. राष्ट्रीय काँग्रेसची पदे घेताना कचवचणारी मंडळी आता पक्षाची पदे पदरात पाडून घेण्याकरीता धडपडू लागली आहेत.
या सर्व घडामोडीत सर्वात मोठी घुसमट भाजपाच्या स्थानिक कार्यकर्त्यांची होत आहे. मुळातच नवे व जुने कार्यकर्ते असे भाजपामध्ये मतभेद असल्याने वरिष्ठ नेते मंडळीही तालुक्यातील राजकीय घडामोडीत फारसे लक्ष घालताना दिसत नाहीत. भाजपाची एक फळी हाताळणारे अशोक चराटी यांना जिल्हा बँक, तालुका संघ, साखर कारखाना निवडणुकीत जिल्ह्यातील व राज्यातील वरिष्ठ नेत्यांबाबत आलेला अनुभव कटू असल्याने अशोकअण्णांचे कार्यकर्तेही सध्या नाराज दिसतात. जिल्हा बँकेसह आजरा कारखान्यात अनपेक्षितरित्या झालेल्या पराभवाची खंत अजूनही कार्यकर्ते व्यक्त करताना दिसतात. अशीच परिस्थिती आगामी नगरपंचायत व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राहिली तर आम्ही कोणाच्या जीवावर निवडणुका लढवायच्या ? असा उद्दिग्न सवालही कार्यकर्ते करताना दिसत आहेत. कार्यकर्त्यांच्या या म्हणण्यालाही अर्थ आहे. त्यामुळे भविष्यात एखादा धाडसी निर्णय चराटी यांनी घेतल्यास आश्चर्य वाटू नये.
एकीकडे मंत्री हसन मुश्रीफ, आमदार सतेज पाटील हे आपापल्या कार्यकर्त्यांना तालुक्यातील स्थानिक निवडणुकांमध्ये ताकतीने बळ देताना दिसतात तर दुसरीकडे भाजपाचे वरिष्ठ नेते निश्चितच सोयीस्कररित्या पाठ फिरवताना दिसतात हे वास्तव नाकारता येत नाही.
शिवसेनेचा उबाठा गट नागरिकांच्या प्रश्नावर वारंवार रस्त्यावर उतरताना दिसतो तर शिवसेनेच्या शिंदे गटात नेमके कोण आहे व त्यांचे पदाधिकारी कोण ? असा प्रश्न निर्माण होण्याजोगी स्थिती आहे.
आमदार सतेज पाटील यांची निवडणूक यंत्रणा राबवण्याची व कार्यकर्त्यांना बळ देण्याची पद्धत पाहून तालुक्यातील अनेकांना पंचायत समिती, जिल्हा परिषद व नगरपंचायत निवडणुकीला सामोरे जाताना लाख वेळा विचार करावा लागणार आहे. अशीच ताकद मंत्री मुश्रीफ देताना दिसतात. याचाच परिणाम म्हणून उत्तूर जि.प. मतदारसंघातून संजय मंडलिक यांना मताधिक्य देण्यात ते यशस्वी झाले आहेत.
आमदार प्रकाश आबिटकर हे आजरा जिल्हा परिषद मतदार संघात विकास कामांत निश्चितच आघाडीवर आहेत. परंतु या विकास कामांच्या जोरावर निवडणुकीत मताधिक्य पदरात पडेल असे चित्र सध्यातरी दिसत नाही. तातडीने त्यांना नव्याने कार्यकर्त्यांची मोट बांधण्याची गरज प्रकर्षाने जाणवू लागली आहे.
गत विधानसभा निवडणुकीत काठावरच्या मताधिक्याने निवडून आलेल्या आमदार राजेश पाटील यांना देखील आता तालुक्यात गांभीर्याने लक्ष घालण्याची गरज आहे. कोळींद्रे जिल्हा परिषद मतदार संघात संजय मंडलिक यांना मताधिक्य मिळालेले नाही हा त्यांच्या दृष्टीने धोक्याचा इशारा समजण्यास हरकत नाही.
राधानगरी-भुदरगड मधून सतेज पाटील संभाव्य उमेदवार…?
छत्रपती शाहूंच्या विजयानंतर विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील राष्ट्रीय काँग्रेसच्या आमदारांची संख्या वाढवण्याचे आव्हान आमदार बंटी पाटील यांच्यासमोर आहे. लोकसभा निवडणुकीपासूनच राधानगरी-भुदरगड व चंदगड विधानसभा मतदारसंघांमध्ये त्यांनी उमेदवारांची चाचपणी सुरू केली आहे. राधानगरी- भुदरगड मतदारसंघात शाहू छत्रपतींना मिळालेले मताधिक्य हे भविष्यात राष्ट्रीय काँग्रेसच्या उमेदवारास पोषक असे असणार आहे. स्वतः आमदार बंटी पाटील हे या मतदारसंघातून निवडणुकीला उभे राहण्याची शक्यता वर्तवली जात असून तशी चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू आहे. गोकुळ व जिल्हा बँकेतील राजकारण पाहता ते कागल मतदारसंघात फारसे लक्ष घालतील असे दिसत नाही.



