आजरा महसूल विभागाच्या महिला अधिकाऱ्याचा कार्यालयातच मृत्यू

आजरा तहसील कार्यालयातील महसूल सहाय्यक अंजना सर्जेराव पाटील(वय 52 रा.निपाणी)यांचा आज सोमवारी सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास आजरा येथील प्रशासकीय इमारतीमधील दालनात हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला.
सदर प्रकाराने तहसील कार्यालयातील कर्मचारी वर्गामध्ये खळबळ उडाली. त्यांना तातडीने आजरा ग्रामीण रुग्णालायत दाखल करण्यात आले.परंतु तत्पूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.
पेरणोली येथे चोरट्यांना रंगेहात पकडले…
पेरणोली ( ता.आजरा ) येथे कुरकुंदेश्वर देवस्थान परिसरातील घंटा चोरी करणाऱ्या चोरट्यांना स्थानिक नागरिकांनी रंगेहात पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले.अहमद शौकत थोडगे (वय ३०, रा. कडगाव ता. भुदरगड) व चांदसाब हसन महात (वय ३२, रा. कुंभारवाडी,शेणगाव ता. भुदरगड) ,अशी या चोरट्यांची नावे आहेत.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, रविवार दिनांक २८ ऑगस्ट रोजी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास कुरकुंदेश्वर देवस्थान परिसरातील मंडपीला बांधण्यात आलेल्या तांब्या-पितळेच्या सुमारे ५१ घंटा व पूजेचे साहित्य संबंधित चोरट्यांनी स्वतःच्या ताब्यात घेऊन तिथून पलायन करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान या परिसरात असणाऱ्या शेतकरी मंडळींना हा प्रकार संशयास्पद वाटल्याने त्यांनी गावकऱ्यांना बोलावून घेतले आणि थोडगे व महात यांची झडती घेतली असता त्यांच्या जवळ असणाऱ्या पिशव्यांमध्ये सदर घंटा आढळून आल्या. गावकऱ्यांनी त्यांना बेदम चोप देऊन पोलिसांच्या हवाली केले. किरण पांडुरंग सावंत यांनी दिलेल्या फिर्यादीवरून थोडगे व महात यांच्याविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

बहिरेवाडी येथे बिअर शॉपीत राडा… एक जखमी… चौघांविरोधात गुन्हा नोंद…
बहिरेवाडी (ता. आजरा) येथे पूर्वीच्या भांडणाच्या कारणावरून अशोक दत्तू नाईक (वय ६०, रा.बहिरेवाडी) यांना तलवार व काठ्यांनी मारहाण करून जखमी केल्याचा प्रकार बहिरेवाडी येथील बियर शॉपीमध्ये घडला. या प्रकरणी अशोक नाईक यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तानाजी गणपती नाईक, गोपाळ जयसिंग नाईक,शंकर जयसिंग नाईक व अनिता तानाजी नाईक यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे.
याप्रकरणी पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, गोपाळ नाईक , अनिता नाईक आणि शंकर नाईक हे आपल्या हातात काठ्या तर तानाजी नाईक हा तलवारीसह येथील बियर शॉपी मध्ये जाऊन फिर्यादी अशोक नाईक यांचा मुलगा आप्पा याला यापूर्वी माझा भाऊ जयसिंग नाईक याला मारहाण केली आहे त्याचा दवाखान्याचा खर्च आम्हाला द्या असे म्हणून दुकानातील बियरच्या बाटल्या व काऊंटर वर ठेवलेले काचेचे ग्लास फोडून नुकसान करून पुन्हा आपल्या हातात काठी घेऊन अशोक याला मारहाण करण्यास सुरुवात केली. याच वेळी इतर तिघांनीही त्यांना बेदम मारहाण करत शिवीगाळ केली. यामध्ये अशोक हे जखमी झाले आहेत.
आजरा पोलीस पुढील तपास करीत आहेत.

‘व्यंकटराव’मध्ये कै.अमृतराव देसाई यांची पुण्यतिथी साजरी
व्यंकटराव हायस्कूल व जुनिअर कॉलेज आजरा या प्रशालेमध्ये आजरा महाल शिक्षण मंडळ आजरा चे संस्थापक चेअरमन कै. अमृतरावजी (काका) देसाई यांच्या पुण्यतिथीनिमित्त प्रशालेतील त्यांच्या तैलचित्र प्रतिमेला संस्थेचे अध्यक्ष मा श्री जयवंतराव शिंपी साहेब यांचे शुभहस्ते पुष्पहार घालून पूजन करण्यात आले.
याप्रसंगी उपाध्यक्ष श्री. अण्णासो पाटील, सचिव एस्. पी. कांबळे, प्रशालेचे माजी प्राचार्य व संचालक श्री. सुनील देसाई, माजी प्राचार्य श्री. शिवाजी गुरव, प्राचार्य श्री. एस्. जी. खोराटे, पर्यवेक्षक श्री. एस्. एन. पाटील, सांस्कृतिक विभागातील प्रमुख व सर्व सदस्य, सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
याप्रसंगी श्री सुनील देसाई यांनी आपल्या मनोगतातून कै.अमृतरावजी काकांच्या जीवनातील काही प्रसंग कथन करुन त्यांच्या अतुलनीय व्यक्तिमत्त्व स्पष्ट केले. तालुक्याच्या विकासातील काकांचे योगदान व त्यांनी निर्माण केलेल्या विविध सेवा संस्था या आजही समाजासमोर आदर्शवत आहेत. खेडोपाड्यातील गोरगरीब व बहुजन समाजातील मुला मुलींनी शिक्षण घ्यावे म्हणून आजऱ्यामध्ये संस्थान काळात १९३२ साली आजरा महाल शिक्षण मंडळ अंतर्गत व्यंकटराव हायस्कूल सुरू केले. तसेच भादवण हायस्कूल, सिरसंगी येथे हायस्कूल काढले व आजरा तालुक्यातील खेडोपाड्यामधील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची सोय केली.
माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष व संस्थेचे अध्यक्ष श्री. जयवंतराव शिंपी यांनी काकांबद्दल व त्यांच्या सहवासात घालवलेल्या अनेक आठवणींना उजाळा दिला. काकांची न्यायनिवाडा करण्याची पद्धत, त्यांच्यामध्ये असणारी सर्वधर्म सहिष्णुता, तसेच विविध धर्माबद्दल त्यांच्या मनात असणारे अपार प्रेम याबद्दल सांगितले.

खेडे येथे विद्यार्थ्यांसाठी कार्यशाळा

ग्रामीण शाश्वत विकास अंतर्गत डॉ. व्ही. टी. पाटीलफाउंडेशन कोल्हापूर व कै माधवराव जीदेशपांडे परिवार यांच्यामार्फत दत्तक ग्राम खेडे येथे दिनांक २३ ऑगस्ट रोजी विद्यामंदिर खेडे येथे मुलांसाठी बौद्धिक विकासासाठी कार्यशाळा व महिलांच्यासाठी गणपती डेकोरेशन साठी लागणाऱ्या विविध वस्तू बनवण्यासाठी कार्यशाळा संपन्न झाली सदर कार्यशाळेसाठी सुपर ब्रेन गेम कोल्हापूर च्या संचालिका सौ प्रेमा चौगुले व सागर चौगुले यांनी विद्यामंदिर खेडे च्या मुलांना विविध बौद्धिक खेळां ची माहिती दिली व मुलांच्या कडून सदर खेळांच्या स्पर्धा घेतल्या.
सौ. प्रिया भूयेकर यांनी महिलांसाठी गणपती डेकोरेशन साठी लागणाऱ्या विविध वस्तूं तयार करण्याचे प्रात्यक्षिक घेतले. या कार्यक्रमासाठी डॉ. सौ. अंजनी देशपांडे, सौ. स्नेहा करंडे, सौ. शोभा लकमले सौ. स्मिता कांबळे, सौ. मोनाली चव्हाण, सौ. अस्मिता मोरे, सौ. ज्योती सावरतकर सौ.आरती चव्हाण, विद्या मंदिर खेडे चे सर्व शिक्षक यांचे विशेष सहकार्य लाभले.
सदर कार्यशाळेत ७५ विद्यार्थी व २५ महिलांनी सहभाग घेतला.कार्यशाळेनंतर सर्व मुलांना आजरा बँकेचे चेअरमन डॉ. अनिल देशपांडे यांच्याकडून वह्या वाटप करण्यात आल्या. सौ. चौगुले यांच्याकडून बौद्धिक खेळामध्ये प्राविण्य मिळवलेल्या मुलांना बक्षीस म्हणून बौद्धिक खेळांची भेट देण्यात आली. यावेळी डॉ. देशपांडे यांनी खेडे गावच्या विकासासाठी विविध उपक्रम राबवणार असल्याचे सांगितले त्याची सुरुवात आजच्या मुलांच्या बौद्धिक विकास कार्यशाळा व महिलांच्या या कार्यशाळेला सुरुवात केली आहे भविष्यामध्ये डॉ. व्ही.टी. पाटील फाउंडेशन कोल्हापूर यांच्या सहकार्याने विविध उपक्रमांचे आयोजन करणार असल्याचे सांगितले. या कार्यशाळेसाठी शाळा उपलब्ध करून दिल्याबद्दल सर्व शिक्षक, शाळा समिती ग्रामपंचायत यांचे आभार मानले.

रमेश पताडे यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदतीचा हात

कोल्हापूर जिल्हा ग्रामस्थ प्रतिष्ठान मुंबईचे सदस्य ,किणे ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष मुंबई मधील रस्सीखेच स्पर्धक श कै.रमेश तुकाराम पाताडे यांचे दिनांक २२/०७/२०२२ रोजी अल्पशा आजाराने निधन झाले.त्यांच्या उपचारांचा खर्च अवाढव्य होता, संघटनेच्या माध्यमातून ही मदत जमा करण्याचे काम चालू होते,पण रमेश चा उपचारादरम्यान मृत्यू झाला.शेवटी जमा झालेली ४० हजार रुपये इतकी रक्कम रमेशच्या कुटुंबियांना मदत स्वरुपात संघटनेचे अध्यक्ष: प्रवीण देसाई, सचिव: राजेंद्र निकम, उपाध्यक्ष: प्रविण पावले, श्रीकांत होरटे तसेच संघटनेचे इतर पदाधिकारी यांनी रमेश च्या कुटुंबियांना सुपुर्द केली.




