शुक्रवार २७ जून २०२५


दहा दिवसात तीन मृत्यू…
शिवाजीनगर हादरले

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
दहा दिवसांपूर्वी शिवाजीनगर येथील नवविवाहित जोडपे सागर सुरेश करमळकर व सौ. सुषमा सागर करमळकर यांची गॅस गिझर मुळे गुदमरून मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच करमळकर यांच्या घरापासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या आजरा शहरातील नामवंत अशा देसाई कुटुंबियांच्या घरातील अभिषेक अजित देसाई या ३१ वर्षीय तरुणाचा हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने मृत्यू झाला. केवळ दहा दिवसात पंधरा दिवसांपूर्वी विवाह झालेल्या नवविवाहित जोडप्यासह विवाह ठरलेल्या तरुणाचा मृत्यू झाल्याने शिवाजीनगर परिसर हादरून गेला आहे.
गोवा येथे नोकरीनिमित्त असणाऱ्या अभिषेकचे पंधरा दिवसापूर्वीच लग्न ठरले होते. लग्नाच्या हालचाली सुरू असतानाच त्याचा गोवा येथे हृदयविकार आणि मृत्यू झाला. लग्न होऊन पंधरा दिवस झालेले करमळकर दांपत्य व लग्नाची स्वप्ने पाहणारा अभिषेक या तिघांचा दुर्दैवी मृत्यू अनेक प्रश्न निर्माण करून गेला आहे .

वय आणि मृत्यू याचा काही संबंध नाही हे पुन्हा एक वेळ या दोन घटनांनी अधोरेखित झाले आहे.
अभिषेक याच्या पश्चात आई-वडील,भाऊ व भावजय असा परिवार आहे अत्यंत शांत व मनमिळावू अशा अभिषेकच्या निधनाने अनेकांना धक्का बसला आहे. त्याचे वडील अजित हे वाटंगी येथे सेवा सोसायटीचे सचिव म्हणून काम पाहतात.
सासरच्या मंडळींना धक्का...
अभिषेकचे गोवा येथीलच मुलीशी लग्न ठरले होते. गुरुवारी रात्री त्याला त्रास सुरू झाल्यानंतर त्याने मुलीशीही संपर्क साधून याबाबत कळवले. तातडीने मुलीचे नातेवाईक अभिषेकच्या खोलीवर हजर झाले. दुर्दैवाने अभिषेकचा मृत्यू झाला होता. दोन्ही कुटुंबे विवाह सोहळ्याचे स्वप्न पाहत असतानाच ही दुर्दैवी घटना घडली.

पावसाची विश्रांती…
बंधारे खुले..
सर्फनाला तुडुंब...

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा तालुक्यासह पश्चिम भागातील शेतकऱ्यांचे स्वप्न असणाऱ्या सर्फनाला प्रकल्पामध्ये प्रथमच शंभर टक्के इतका पाणीसाठा होत असून कोणत्याही क्षणी सांडव्यावरून पाणी बाहेर पडण्यार आहे .यामुळे तालुकावासियांसह पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांचे स्वप्न पूर्णत्वास गेले आहे. जून महिन्यातच सर्फनाला प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला आहे.
काल गुरुवारी पावसाचा जोर थोडा ओसरला असला तरी शुक्रवारी पहाटेपासून पावसाने पुन्हा जोरदार हजेरी लावली आहे. तालुक्यातील सर्व बंधारे वाहतुकीकरता खुले झाले आहेत. सर्फनाला प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे व चित्री प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग सुरू केल्याने नदीकाठच्या गावांना दक्षतेचा इशारा देण्यात आला आहे.
प्रकल्पनिहाय झालेला पाऊस व पाणीसाठा पुढील प्रमाणे…
सर्फनाला – आज अखेर एकूण पाणीसाठा १८.९८ दशलक्ष घनमीटर ( ९६+ % ) बुधवारी आठ तासातील पाऊस ४५ मिलिमीटर १ जून पासून प्रकल्प क्षेत्रात झालेला पाऊस – १७९७ मिलिमीटर
चित्री मध्यम प्रकल्प – आज अखेर एकूण पाणीसाठा ५४.४१४ दशलक्ष घनमीटर (७५.७५ % ) बुधवारी आठ तासातील पाऊस १२ मिलिमीटर -प्रकल्प क्षेत्रातील एक जून पासून झालेला पाऊस १२६९ मिलिमीटर
आंबेओहोळ मध्यम प्रकल्प – आज अखेर एकूण पाणीसाठा ३०.९८ दशलक्ष घनमीटर ( ८८.२४ %) बुधवारी आठ तासातील पाऊस ४ मिलिमीटर आज अखेर एकूण पाऊस ३६० मिलिमीटर

राजर्षी शाहूंना अभिवादन…
आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा शहरासह तालुक्यांमध्ये ठिकठिकाणी राजर्षी शाहू जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. शासकीय कार्यालयांसह शैक्षणिक संस्था मध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

येथील व्यंकटराव हायस्कूल व ज्युनियर कॉलेज आजरा या प्रशालेत ग लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची १५१ वी जयंती उत्साहात संपन्न झाली
यावेळी राजर्षी छ.शाहू महाराजांच्या प्रतिमेचे पूजन आजरा महाल शिक्षण मंडळ आजरा संस्थेचे अध्यक्ष श्री. जयवंतराव शिंपी यांचे हस्ते करण्यात आले.. यावेळी सचिव श्री. अभिषेक शिंपी, खजिनदार ,श्री. सुनील पाटील,संचालक .श्री. पांडुरंग जाधव, श्री. सचिन शिंपी ,श्री. सुधीर जाधव, प्राचार्य श्री. एम. एम. नागुर्डेकर पर्यवेक्षिका सौ.व्ही .जे.शेलार , ज्युनिअर कॉलेज विभाग व्यवस्थापक श्री. एम.ए. पाटील, प्राथमिक मुख्याध्यापक श्री रणजीत देसाई, सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
प्रतिमा पूजानानंतर लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे जीवन कार्य या विषयावर श्री. डी. आर. पाटील यांनी आपले विचार मांडले.त्यानंतर श्री व्ही.टी. कांबळे यांनी छत्रपती शाहू महाराजांवर स्वरचित शाहिरी पोवाडा म्हणून अभिवादन केले . अध्यक्षीय भाषणात श्री. जयवंतराव शिंपी यांनी शाहू महाराजांचे शैक्षणिक धोरण, सामाजिक कार्य कसे होते व त्यांनी समाजातल्या दिन- दलित कुटुंबातील विद्यार्थ्यांनाही शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले. आणि विशिष्ट नियमावलीही आखली . भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शिक्षणावरही त्यांनी खर्च करून त्यांना प्रोत्साहन दिले. म्हणून मुलांनी वाचलं पाहिजे. शिक्षण घेतले पाहिजे. थोरा मोठ्यांचं जीवन कार्य अभ्यासलं पाहिजे. शिक्षणानेच माणसाचा उद्धार होतो असे स्पष्ट केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. पी.व्ही पाटील व आभार श्री.व्ही.एच गवारी यांनी मानले.

पंडित दीनदयाळ विद्यालयात छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. या कार्यक्रमासाठी आजऱ्यातील शिवभक्त व सामाजिक कार्यकर्ते रमेश हुक्केरी यांच्या हस्ते छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले यावेळी मुख्याध्यापक संजीव देसाई, विजय राजोपाध्ये, भरत बुरुड उपस्थित होते विद्यार्थ्यांनी शाहू महाराज यांच्या विचारांची प्रेरणा घेऊन भविष्यामध्ये कार्य करावेत, त्यांना आपला आदर्श मानून त्यांनी घालून दिलेल्या विचारावर चालावे, गोरगरिबांना मदत करावी, भेदभाव, जातीपाती दूर करण्यासाठी प्रयत्न करावेत असे विजय राजोपाध्ये यांनी आपल्या प्रस्ताविकामध्ये सांगितले. छत्रपती शाहू महाराज यांच्या कार्याविषयीची माहिती शुभांगी निर्मळे यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांना करून दिली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भरत बुरुड यांनी तर तेजस्विनी बुरुड यांनी आभार मानले. यावेळी विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वर्ग व पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.

अंजुमन इत्तेहादूल इस्लाम आजरा संचलित डॉ. झाकीर हुसेन अँग्लो उर्दू हायस्कूल अ़ँण्ड ज्युनिअर कॉलेज आजरामध्ये अध्यक्ष हाजी आलम अहमद नाईकवाडे यांच्या अध्यक्षतेखाली सचिव हुसेन दरवाजकर खजिनदार अष्कर लष्करे व संचालक मंडळ, शाळेचे प्र. मुख्याध्यापक सलीम शेख सर्व शिक्षकवर्ग, विद्यार्थी यांच्या उपस्थितीत लोकनेते राजर्षी शाहू महाराज यांचे फोटोपुजन करून जयंती उत्सहात साजरी करण्यात आली.
जयंती निमित्त शाळेत विविध स्पर्धा घेण्यात आल्या. त्यामध्ये वक्तृत्व स्पर्धा, चित्रकला, गायन इ. समावेश होता. या स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला.

भादवण हायस्कूलमध्ये लोकराजा छत्रपती शाहू महाराज यांची जयंती व जागतिक अंमली पदार्थ सेवन विरोधी दिन विविध उपक्रमानी साजरा करणेत आला.शाळेतील अक्षरा सुतार, हर्षद देवरकर,स्वयंम चौगुले या विदयार्थ्यांनी शाहूमहाराजांचे चित्र रेखाटले. प्राची केसरकर,सृष्टी कोलते, प्राची शिंत्रे,शमिका मुळीक,पायल सुतार,सुशांत खुळे यांनी जागतिक अंमली पदार्थ सेवन विरोधी दिनानिमित्त अमली पदार्थ विरोधी विषयक चित्रे रेखाटले. या सर्व भित्ती चित्रांचे उद्घाटन व प्रतिमापूजन मुख्याध्यापक आर.जी.कुंभार यांनी केले.
यावेळी निबंध स्पर्धा व वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.निबंध स्पर्धेत मनाली पाटील,लक्ष्मी चौगुले,प्रतीक्षा डोंगरे,सानिका वडराळे या विद्यार्थिनींनी आपले विचार व्यक्त केले.गौरी कोलते,भूमिका मुळीक यांनी आपले मनोगत व्यक्त केले. शाळेच्या शिक्षिका सौ.भारती कांबळे यांनी शाहू महाराजांचे कार्य आणि त्यांचे जीवन यांचा आढावा घेतला. पी.एस.गुरव यांनी शाहू महाराजांच्या बरोबरच अमली पदार्थांचे सेवन किती घातक आहे याबद्दलची प्रतिज्ञा व माहिती दिली.
आभार आर.पी. होरटे यांनी व्यक्त केले. सहभागी विद्यार्थ्यांचे फुल व भेट देऊन गौरविण्यात आले.

मृत्युंजय महान्यूज इफेक्ट…
सातला बातमी दहाला खड्डे बुजवले

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा – दाभिल मार्गावरील दाभिल बंधाऱ्यावर अतिवृष्टीने आलेल्या पावसामुळे बंधाऱ्यावरील रस्ता उखडला असून याबाबतची बातमी ‘ मृत्युंजय महान्यूज’ वरून काल गुरुवारी सकाळी सात वाजता प्रसिद्ध करण्यात आली होती. पाटबंधारे विभागाने तातडीने याची दखल घेत बंधाऱ्यावर मुरूम टाकून खड्डे मुजवण्याचा प्रयत्न केला आहे.
बंधाऱ्यावर तात्पुरत्या स्वरूपात मुरूम टाकला असला तरीही पाऊस कमी होताच यावर सिमेंट कॉंक्रिटीकरण व डांबरीकरण करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

रविवारी विविध संघटनांच्या वतीने राजर्षी शाहू जयंतीचे आयोजन

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
बहुजन मुक्ती पार्टी, दलित मानवी हक्क संघटना, भारतीय बौद्ध महासभा, वंचित बहुजन विकास आघाडी, रिपब्लिकन सेना व सेक्युलर मुव्हमेंटच्या संयुक्त विद्यमाने रविवार दिनांक २९ रोजी सकाळी ११ वाजता राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती व्यंकटराव हायस्कूल येथे साजरी करण्यात येणार आहे.
कार्यक्रमाचे उद्घाटन मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष प्रशांत कुट्रे यांच्या हस्ते होणार असून प्रा. सौरभ देसाई, बामसेफ जिल्हा कार्याध्यक्ष यांचे व्याख्यान होणार आहे.
कार्यक्रमास सर्व संघटनांचे पदाधिकारी उपस्थित राहणार असल्याचे संयोजकांनी सांगितले.

छाया वृत्त…
जोरदार पाऊस… पावसामुळे मोरीवर पाणी… पाऊस जाताच मोरीची दुर्दशा… बांधकामाचा दर्जा उघड.. आजरा – भटवाडी मार्ग

निधन वार्ता
फातिमा इंचनाळकर

नाईक गल्ली, आजरा येथील फातिमा महमद इंचनाळकर ( वय ८४ वर्षे ) यांचे काल गुरुवारी सकाळी निधन झाले.
त्यांच्या पश्चात सहा विवाहित मुले, दोन विवाहित मुली,सुना, जावई ,नातवंडे असा परिवार आहे.
केडीसीसी बँकेचे सेवानिवृत्त कर्मचारी व रवळनाथ पतसंस्थेचे संचालक इब्राहिम इंचनाळकर यांच्या त्या आई होत.



