mrityunjaymahanews
अन्यआजरा तालुका विशेषकोल्हापूरगुन्हाठळक बातम्याराजकीयसामाजिकस्थानिक

सातच्या बातम्या

गुरूवार   दि. २८ ऑगस्ट २०२५   

आजऱ्यात बाप्पांचे उत्साहात स्वागत

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

आजरा शहरासह तालुक्यात विघ्नहर्त्या बाप्पांचे उत्साहात स्वागत करण्यात आले.
पावसाने विश्रांती घेतल्यामुळे सकाळपासूनच कुंभार गल्ली गजबजुन गेली होती सकाळच्या सत्रातच अनेकांनी घरगुती मुर्त्या पूजनासाठी घरी आणण्यास प्राधान्य दिले.

फटाक्यांची जोरदार आतषबाजी व पारंपारिक वाद्यांच्या दणदणाटात बाप्पा मोरयाच्या गजरात गणेश मुर्त्या नेल्या जात होत्या. दुपारी तीन वाजेपर्यंत बहुतांशी गणेश मूर्त्यांची प्रतिष्ठापना करण्यात आली.

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या मुर्त्या मात्र दुपारनंतर नेण्यात आल्या. आजपासून ठीक ठिकाणी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

उत्तूर परिसरात बाप्पाचे उत्साहात स्वागत

उत्तूर : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
(मंदार हळवणकर)

उत्तूर शहर व परिसरात घराघरांत तसेच सार्वजनिक गणेश मंडळांत गणरायांचे आगमन मोठ्या जल्लोषात झाले. सकाळपासूनच गावात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. पारंपरिक वाद्यांचा निनाद, ढोल-ताशांचा गजर, लेझीम पथकांचे आकर्षक ताल आणि “गणपती बाप्पा मोरया”च्या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.कुंभारवाडा परिसरात तर सकाळपासूनच भाविकांची मोठी गर्दी उसळली होती. भक्तगण जथ्थ्याच्या जथ्थ्यांतून गणपतीची मूर्ती डोक्यावर घेत मिरवणुकीत सामील होत होते. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांतच एक वेगळाच उत्साह दिसून येत होता.

स्त्रियांनी आरत्या गात, तर युवकांनी ढोल-ताशांच्या गजरात नाचत बाप्पांचे स्वागत केले. घराघरांत गणपतीची स्थापना करताना वातावरण मंगलमय झाले.सार्वजनिक गणेश मंडळांनी सजवलेल्या मंडपांनाही विशेष आकर्षण लाभले होते. विविध देखावे, विद्युत रोषणाई आणि आकर्षक सजावटींनी भक्तांना खिळवून ठेवले. काही मंडळांनी समाजप्रबोधनात्मक कल्पनेवर सजावट केली होती तर काही ठिकाणी धार्मिक व पारंपरिक स्वरूपाचे देखावे उभारण्यात आले होते. गणेशभक्तांनी मोठ्या श्रद्धा-भावनेने श्रींचे आगमन केले. सकाळपासून सुरू झालेली ही गडबड संध्याकाळपर्यंत सुरू राहिली.

सार्वजनिक मंडळांच्या बाप्पांचे आगमन रात्री उशिरापर्यंत सुरू होते. गणरायाच्या स्वागताने उत्तूर परिसर भक्तिभाव व उत्साहाच्या रंगात न्हाऊन निघाला असून पुढील दहा दिवस गावामध्ये धार्मिक कार्यक्रम, सांस्कृतिक उपक्रम आणि भजन-कीर्तनांची रेलचेल होणार आहे.

शिरसंगी किणे वाटंगी परिसरात गणरायाचे उत्साहात स्वागत


शिरसंगी : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

गेले दोन दिवस पडणारा पावसाने सकाळपासूनच उघडीप दिल्याने शिरसंगी, किणे, वाटंगीसह पूर्व भागात गणरायाचे उत्साहात आगमन झाले. खास गणेश चतुर्थी निमित्त पुणे मुंबई व इतर बाहेरगावी असणारी नोकरदार मंडळी गावी आले आहेत. गेले दोन दिवस पावसाची रिपरिप सुरू झाल्याने गणेश मूर्ती आता पावसातुनच आणावे लागणार का अशी भीती होती पण सकाळपासून उघडीप दिल्याने घरगुती बाप्पांच्या मुर्त्या वाजत गाजत फटाक्यांची आतषबाजी करत आणण्यात आल्या. दुपारी दोन नंतर मात्र पावसाने जोरदार हजेरी लावली.घरगुती गणरायाचे स्वागतात लहान थोरांनी सर्वांनी सहभाग घेतल्याचे चित्र पाहायला मिळाले.

सोसायटीचा शिपाई झाला सहकार आयुक्त पुणे चा अधिकारी

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा 

एमपीएसी च्या माध्यमातून सोसायटीचा शिपाई ते सहकार खात्याचा अधिकारी पदाला गवसणी घालणारा मलिग्रे ता. आजरा येथील धोंडीबा जाधव यांचा प्रवास निश्चितच कौतुकास्पद आहे.

आजरा तालुक्यातील मलिग्रे यथील ग्रामीण भागात अत्यंत गरीब परस्थितीतून शिक्षण घेत असताना, सर्वसामान्य मुलाप्रमाणे नववी पर्यंत कधीही नापास नाही. पण घरच्या कामातून अभ्यासाकडे लक्ष द्यायला वेळ नाही. अशा परिस्थिती दहावीच्या बोर्डाचा फाँर्म भरायला शिक्षकांनी विरोध केला. हा शाळेत नियमित येत नाही, सांगितलेला अभ्यास करत नाही, फाँर्म भरला तर शाळेची टक्केवारी कमी येणार, या पेक्षा याचा फाँर्म न भरलेला बरा, अशी शिक्षकानी खुणगाठ बांधली होती. पण धोंडिबाच्या मनात शिक्षणाविषयी प्रचंड आवड होती. कामातून सवड काढून अभ्यासाला वेळ देता येत नाही, याचे प्रचंड दु:ख होते. त्याने आपल्या आईला सोबत घेवून, शिक्षकांना फाँर्म भरायला भाग पाडले.

परीक्षा काळात मेहनत घेतली असली तरी, निकाला दिवशी धाकधुक वाढली होती. शेजारच्या मुलाने तो पास झाल्याचे सांगितलं, अनं दोन फटाक्यांच्या माळा लावल्या, त्या आनंदात धोंडिबाला सदतीस टक्के मार्क घेऊन पास झाल्याचे समजले, पण खात्रीने अभ्यास करणारे मित्र, नापास झाल्याने वाईट वाटले. पुढील शिक्षणा पेक्षा कोठे तरी नोकरी करावी म्हणून, चंदगड येथे हाँटेल मध्ये चार दिवस हाँटेल मध्ये काम करून, मालकाला पगाराचे विचारले, तर एक महिना काम पाहून, पगार दिला जाईल, हे एकून परत गावात येवून आजरा येथील टु व्हिलर मँकॅनिक च्या हाताखाली काम केले, परंतू सहा महीन्यात त्याचा धंदा बंद झाल्याने. खचून न जाता मिळेल ती कामे केली. पोलीस भरतीसाठी प्रयत्न करत असताना, योगायोगाने स्पर्धा परीक्षा सरानी एमीएसीचा अभ्यास करण्याचा सल्ला दिला. फार अवघड आणी कठीन परस्थिती असताना, मनातून स्पर्धा परीक्षांच्या कामाला सुरवात केली.  त्याच्या लहान मुलींनी ज्यापैकी एक सातवी आणी एक नववीला आहे. त्या मुलीनी त्याचा अभ्यास घेतला. सातत्याने अभ्यास वाचन मनन करीत स्पर्धा परीक्षा देत, अखेर एमपीएससी चांगल्या मार्काने धोंडिबा जाधव पास झाला. पुण्यातील सहकार आयुक्त, याच्या कडे सहाय्यक सहकारी अधिकारी म्हणून रूजू झाल्याने, केलेल्या कामाचे फळ मिळाले.

जिद्द, प्रामाणिक पणा, कष्टाने यश मिळते, यासाठी ग्रामिण भागातील विध्यार्थीनी, झोकून देवून अभ्यास करावा, असे आवाहन त्याने केले आहे.

रस्त्याची दुर्दशा… सार्वजनिक बांधकाम चे दुर्लक्ष

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

आजरा तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये रस्त्यांची अक्षरश: चाळण झाली असून वाहनधारकांसह तालुकावासियांमधून संताप व्यक्त केला जात आहे. रस्त्यांच्या दर्जाचा प्रश्न यामुळे अधोरेखित होत असून सार्वजनिक बांधकाम विभाग नेमका काय करतो आहे ? असा सवाल ही उपस्थित केला जात आहे.

आजरा गडहिंग्लज महामार्ग वगता अन्यत्र ग्रामीण भागातील रस्त्यांची पूर्णपणे दुर्दशा झालेली आहे. कमी प्रतीच्या कामामुळे सर्वत्र खड्ड्यांचे साम्राज्य असून चार चाकी वाहनांसह दुचाकी वाहन चालकांना वाहने चालवताना मोठी कसरत करावी लागत आहे. आजरा – नेसरी मार्गावर तर पूर्णपणे खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. आजरा ते शिरसंगी मार्ग खड्डयांनी भरून गेला आहे. तातडीने सदर खड्डे संबंधित ठेकेदारांकडून घ्यावेत अशी मागणी आता केली जात आहे.

लोकप्रतिनिधींची पिल्लावळ

सध्या तालुक्यामध्ये लोकप्रतिनिधींच्या पिल्लावळ ठेकेदारांचा सुळसुळाट झाला आहे. यामुळे आजरा शहरासह तालुक्यातील बऱ्याच रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. यातूनच लोकप्रतिनिधी ये-जा करत असले तरीही त्यांचीच पिलावळ ही ठेकेदार मंडळी असल्यामुळे हेतूपुरस्सर याकडे दुर्लक्ष होत आहे.

आजरा महाविद्यालयात विद्यार्थी व पालक मेळाव्याचे आयोजन

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

आजरा महाविद्यालयात शिष्यवृत्ती विभागाच्या वतीने विद्यार्थी व पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. सदर मेळाव्यामध्ये प्रा.संदिप देसाई यांनी महाडीबिटी पोर्टलवर शिष्यवृत्ती अर्ज कसे भरायचे याचे प्रात्यक्षिक दाखवले. महाराष्ट्र शासनाच्या विद्यार्थ्यासाठीच्या शिष्यवृत्ती योजनांची माहिती सांगून जातीचे दाखले, रहिवासी दाखले,जात पडताळणी इ. साठी लागणाऱ्या कागदपत्रांची माहिती दिली, तसेच शासनाच्या सारथी, बार्टी, महाज्योती योजना बद्दल चर्चा केली.
मेळाव्याचे अध्यक्ष व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक सादळे यांनीं विद्यार्थ्यांनी वेळेत आपले अर्ज भरून शासनाच्या योजनांचा लाभ घ्यावा असे अहवान विद्यार्थ्यांना केले तसेच महाविद्यालय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळवण्यासाठी सर्वोतपरी प्रयत्न करेल असे प्रतिपादन केले.

यावेळी उपप्राचार्य प्रा. दिलीप संकपाळ, कार्यालयीन अधीक्षक श्री. योगेश पाटील, लिपिक श्री राहुल देसाई व बहुसंख्य विद्यार्थी व पालक उपस्थित होते. प्रा. डॉ. राजीव करपे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. प्रा. सौ. केंद्रे यांनी आभार मानले.

निधन वार्ता
शामराव बल्लाळ

येथील शामराव दत्तात्रय बल्लाळ ( वय ७९ ) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, तीन मुले, सुना आणि नातवंडे असा परिवार आहे. आजरा महाविद्यालयातील मराठी विभाग प्रमुख डॉ. आनंद बल्लाळ यांचे ते वडील होत.

 

संबंधित पोस्ट

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

चित्री प्रकल्प १००% भरला…

mrityunjay mahanews

आजरा तालुका खरेदी-विक्री संघात दुरंगी लढत

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews
error: Content is protected !!