
लाडकी बहीण योजनेपासून कोणालाही वंचित ठेवू नका…आ. प्रकाश आबिटकर
आजऱ्यात कार्यशाळा व चर्चासत्र

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कार्यान्वित केली आहे. सर्व घटकांना विविध योजना देण्याचा प्रयत्न महायुती सरकारने सुरू ठेवला असून या योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी होण्याकरता लाभार्थ्यांशी संपर्क साधून कोणीही लाभार्थी या योजनेपासून वंचित राहणार नाही याची काळजी घेण्याची गरज आहे. जास्तीत जास्त फॉर्म भरून घ्यावेत, शक्यतो फॉर्म भरताना चुका टाळाव्यात. कोणत्याही लाभार्थ्यावर कळत- नकळत अन्याय होण्याची शक्यता असल्याने फॉर्म भरताना खबरदारी घेऊन प्रत्येक घटकाने आपापली जबाबदारी व्यवस्थित पार पाडावी असे आवाहन आमदार प्रकाश आबिटकर यांनी केले.
आजरा येथे तालुकास्तरीय ‘मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणी योजना कार्यशाळा व चर्चा सत्राचे ‘ आयोजन करण्यात आले होते. यावेळी अध्यक्षस्थानावरून आमदार आबिटकर बोलत होते.
प्रास्ताविकपर भाषणात गटविकास अधिकारी संजय ढमाळ यांनी या योजनेची पार्श्वभूमी स्पष्ट केली.
तहसीलदार समीर माने यांनी या योजनेतील त्रुटी कमी करण्यात आल्या असून पिवळे व केशरी रेशन कार्ड असणाऱ्या सर्वांना या योजनेचा लाभ घेता येईल. याचबरोबर इतर कागदपत्रांऐवजी पंधरा वर्षांपूर्वीचे रेशन कार्ड, निवडणूक ओळखपत्र अथवा जन्मदाखला हाच रहिवासी पुरावा मानला जाणार आहे. बँक खाते आधार लिंक नसेल तर ते करून घ्यावे व हमीपत्र भरून द्यावे. आधार क्रमांक व्यवस्थित टाकावा अशा सूचना केल्या.
आमदार आबिटकर पुढे म्हणाले, महिलांकरिता वर्षभरात तीन गॅस सिलेंडर मोफत, मुलींना मोफत शिक्षण व बहीण माझी लाडकी या योजना राबविण्यात येत आहेत. योजना राबवताना अंगणवाडी सेविका, आशा स्वयंसेविका यांची भूमिका महत्त्वाची राहणार आहे सुमारे १४ ते १५ हजार आजरा तालुक्यातील महिलांना याचा लाभ होणार आहे.
अन्य योजनांचे लाभार्थी असतील तरी त्यांचेही फॉर्म भरून घ्यावे. फॉर्म भरून घेताना जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत योजना कशी जाईल याची काळजी घ्यावी असेही आवाहन केले.

यावेळी नगरपंचायतीचे मुख्याधिकारी श्री सूरज सुर्वे,एकात्मिक बालविकास अधिकारी श्री. बापू शिंगारे,नायब तहसीलदार श्री. म्हाळसाकांत देसाई,सूनित चंद्रमणी शिक्षण विस्तार अधिकारी,अंगणवाडी पर्यवेक्षिका मनीषा कांबळे,लता केसरकर, शिवसेना तालुकाप्रमुख संजय पाटील, विजय थोरवत, इंद्रजीत देसाई, रणजीत सरदेसाई, संतोष भाटले मान्यवर उपस्थित होते.

भारत नगर व आझाद कॉलनी रस्ता प्रकरणी रहिवासी आक्रमक…
अन्याय निवारण समितीकडून आंदोलनाचा इशारा

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा शहरातील भारत नगर व आझाद कॉलनीमध्ये रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य असून याबाबत नगरपंचायतीकडे वारंवार मागणी करून सुद्धा रस्त्यावर मुरूम न टाकला गेल्याने नागरिक महिला वर्ग व विद्यार्थी वर्गाचे प्रचंड हाल होत आहेत या ठिकाणी कोणतेच वाहन जात नसल्याने तातडीने आवश्यक ती उपाययोजना करावी अशी मागणी अन्याय निवारण समिती व स्थानिक रहिवाशांच्या वतीने नगरपंचायत मुख्याधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे. ही मागणी पूर्णत्वास न गेल्यास गुरुवार दिनांक ११ जुलै रोजी नगरपंचायतीमध्ये चिखल टाकण्याचे आंदोलन करण्यात येणार असल्याचेही सांगितले गेले.
यावेळी मुख्याधिकाऱ्यांना सदर भागांचे फोटो दाखवण्यात आले व यातून स्थानिक नागरिकांनी मार्ग कसा काढायचा ? असा प्रश्न उपस्थित केला. नवीन पाणीपुरवठा योजनेच्या नावाखाली शहराची दुर्दशा सुरू असल्याचेही मत यावेळी परशुराम बामणे यांनी व्यक्त केले.
नगरपंचायतीकडून तातडीने मुरूम टाकण्यात येईल असे आश्वासन मुख्याधिकारी सुरज सुर्वे यांनी दिले.
यावेळी मुख्याधिकाऱ्यांशी झालेल्या चर्चेत अन्याय निवारण समितीचे अध्यक्ष परशुराम बामणे, विजय थोरवत,वाय. बी. चव्हाण,पांडुरंग सावरतकर, जावेद पठाण, दिनकर जाधव यांच्यासह मकसूद माणगावकर, तौफिक माणगावकर, बबलू घोडके आदींनी भाग घेतला.

शिवसेनेचे विविध मागण्यांचे ‘ महावितरण ‘ ला निवेदन
मोर्चाचाचाही इशारा

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा तालुका शिवसेनेच्या (उबाठा) वतीने वीज वितरण कमी कंपनीच्या उपभियंत्यांना विविध मागण्यांचे निवेदन देऊन मागण्यांची पूर्तता न केल्यास मोर्चाचा इशारा दिला आहे.
कर्नाटक राज्याप्रमाणे महाराष्ट्रातील नागरिकांना देखील ३०० युनीट पर्यंत घरगुती वापरातील वीलबील माफी मिळावी,
स्मार्ट मीटरची योजना ही ग्रामीण भागातील नागरिकांना परवडणारी नाही त्यामुळे त्या योजनेस आमचा विरोध असल्याने ती तात्काळ रद्द करावी,आजरा तालुक्यात वन्य प्राण्यांचा वापर शेतीमध्ये असल्याने शेतकऱ्यांना दिवसा शेतीपंपाला वीज मिळावी,१० एच. पी. पर्यंतच्या शेतीपंपाना वीजबील माफी मिळावी,ज्याप्रमाणे इचलकरंजी मधील वस्त्रोद्योगाला वीजबिल दरात सवलत दिली जाते त्याच प्रमाणे आजरा तालुक्यातील काजूप्रक्रिया उद्योग, भात प्रक्रिया उद्योग या उद्योगांना देखील विजबिल दरात सवलत मिळावी या प्रमुख मागण्या आहेत.
मागण्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार व्हावा अन्यथा पुढील काळात वीज वितरणच्या कार्यालयावर मोर्चा काढण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.
यावेळी उपजिल्हाप्रमुख संभाजी पाटील, तालुकाप्रमुख युवराज पोवार, शहर प्रमुख ओंकार माद्याळकर, राजकुमार भोगण, समीर चांद,महेश पाटील,रोहन गिरी, दिनेश कांबळे, इब्राहिम लाडजी ,रवी सावंत,रवी यादव, राजू बंडगर, अभि मनगूतकर, इम्तियाज माणगावकर, यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

भूमि अभिलेख कार्यालयाच्या कारभाराची चौकशी व्हावी….
तहसीलसमोर आंदोलन

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
भूमी अभिलेख कार्यालयाच्या कारभाराची चौकशी व्हावी यासाठी आजरा तहसील कार्यालयासमोर आंदोलन सुरू करण्यात आले आहे.
चुकीच्या पद्धतीने मोजणी करून आर्थिक गैरव्यवहार करणाऱ्या व वरिष्ठांचे काही न मानणाऱ्या मोजणी कर्मचारी योगेश पाटील यांची खातेनिहाय चौकशी झाली पाहिजे अशी मागणी आंदोलनातून करण्यात आली आहे. भूमी अभिलेख कार्यालयाच्या भोंगळ,मनमानी कारभाराबाबत तालुक्यामध्ये अनेक गावच्या तक्रारी आहेत या संदर्भात यापूर्वी या कार्यालयातील एक कर्मचारी लाच घेताना जाळ्या त अडकला असताना सुद्धा कोणत्याही कर्मचाऱ्याला भीती राहिलेली नाही त्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी मोजदाद करताना अन्याय केला जात आहे. उर्मट भाषा वापरली जात आहे.
तरी सदर कार्यालयाच्या कर्मचाऱ्यांची चौकशी करून त्यांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई झाली पाहिजे व तालुक्यातील जनतेला न्याय मिळाला पाहिजे अशी भावना ग्राहक पंचायतीचे शिवाजी गुरव यांनी यावेळी व्यक्त केली.
आंदोलनस्थळी माजी उपसभापती निवृत्ती कांबळे ग्राहक पंचायतीचे पदाधिकारी यांनी भेट देऊन विचारपूस केली अनेक शेतकऱ्यांनी आपापल्या तक्रारीबाबत या ठिकाणी चर्चा केली भूमी अभिलेख कार्यालयाचा कारभार न सुधारल्यास उग्र आंदोलन छेडले जाईल असे यावेळी निवृत्ती कांबळे यांनी सांगितले.

वजकाट्यातील फसवणूक थांबवा
मनसेचे निवेदन

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा शहरासह उत्तुर व इतर ठिकाणी व्यापाऱ्यांकडून वजन काट्यांमध्ये तफावत दिसून आल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने कृषी उत्पन्न बाजार समिती व वजन काटे निरीक्षक यांना निवेदन देऊन अशा प्रकारे शेजाऱ्यांची फसवणूक होत असेल तर मनसे शांत बसणार नाही असा इशारा यावेळी निवेदनातून देण्यात आला व
तात्काळ चौकशी करण्याची मागणी केली आहे.
शुक्रवारी आजरा व शनिवारी उत्तूर् येथे बाजार दिवशी वजन काटे निरीक्षक व कृषी बाजार समितीच्या अधिकाऱ्यांनी काटे तपासून चार काटे वाल्यांवर कारवाई केली, इथून पुढेही वजन काटे मालकांवर निरीक्षकांची नजर राहील असेही यावेळी अधिकाऱ्यांनी सांगितले.
यावेळी मनसे जिल्हा सरचिटणीस सुधिर सुपल, तालुका अध्यक्ष आनंदा घंटे, उपतालुका अध्यक्ष सुशांत पोवार, सुनील पाटील यांचे सह मनसे सैनिक व शेतकरी उपस्थित होते.

‘व्यंकटराव’मध्ये पारितोषिक व स्वागत समारंभ संपन्न

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
खेड्यापाड्यातून, वाडी वस्तीवरून येऊन विद्यार्थ्यांनी मिळवलेले यश हे कौतुकास्पद आहे. आपल्या शाळेची गुणवत्ता ही नेहमी वाढतच राहिली पाहिजे. गुणवत्ता वाढविण्यासाठी मेहनत घेतलेल्या शिक्षकांचे कौतुक करण्यात आले. येथून पुढेही असेच प्रयत्न सुरू राहिले पाहिजेत असे प्रतिपादन श्री. जयवंतराव शिंपी यांनी केले.ते व्यंकटराव हायस्कूल मध्ये आयोजित स्वागत व बक्षीस वितरण समारंभात बोलत होते.
संस्थेचे संचालक श्री. सुनील देसाई यांनी नवागतांचे स्वागत केले. आणि इतरही विद्यार्थ्यांनी त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन गुणवत्तेची परंपरा कायम ठेवण्यासाठी शुभेच्छा दिल्या.
वाटंगी हायस्कूल वाटंगी चे मुख्याध्यापक श्री. अनिल देसाई यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना आपण नेहमी मोठी स्वप्न पाहिली पाहिजेत. त्यानंतर त्या स्वप्नांचा पाठलाग करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न असायला हवेत आणि त्यामध्ये सातत्य असेल तर हमखास यश मिळते असा गुरुमंत्र दिला.
प्रशालेचे प्राचार्य श्री. आर .जी .कुंभार यांनी प्रास्ताविकातून कॉलेजची १००% निकालाची परंपरा अखंड ठेवल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. त्याचबरोबर वर्षभरातील घेतलेल्या उपक्रमांचा आढावा घेऊन नवागतांचे स्वागत करून बक्षीस धारक विद्यार्थ्यांचे कौतुकही केले. सर्व बक्षीस धारक विद्यार्थ्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
या कार्यक्रमास आजरा महाल शिक्षण मंडळाचे सचिव श्री. एस .पी. कांबळे, संचालक श्री. सचिन शिंपी, श्री. पांडुरंग जाधव, पर्यवेक्षिका सौ. शेलार तसेच पालक, विद्यार्थी आणि शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. श्री. एम. ए.पाटील यांनी आभार मानले.

अहो आश्चर्यम्…
तुफानी हजेरीनंतर पाऊस गायब…

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
रविवारी झालेल्या तुफानी पावसानंतर सोमवारी अचानकपणे पाऊस गायब झाला असून आजरा मंडल परिक्षेत्रामध्ये २४ तासात केवळ २ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. दिवसभर पावसाने चक्क उघडीप दिली. आंबेओहोळ प्रकल्प क्षेत्रात केवळ १८ मिलिमीटर तर चित्री प्रकल्प क्षेत्रात ५ मिलिमीटर पावसाची काल दिवसभरात नोंद झाली आहे. आंबेओहोळ प्रकल्पात ८० टक्के इतके पाणीसाठा झाला असून चित्री प्रकल्पामध्ये ५७.२१ टक्के इतका पाणीसाठा झाला आहे.
पावसाच्या या लहरीपणाचा विचित्र अनुभव आजरेकरांनी सोमवारी घेतला. एकीकडे आंबोली परिसरात धुवांधार पाऊस होत असल्याने नद्यांचे पाणी पात्राबाहेर येऊ लागले आहे, तर दुसरीकडे आजरा तालुक्यात मात्र पाऊस गायब झाला आहे.

