
पावसाचे धुमशान…
जनजीवन विस्कळीत

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा तालुक्यामध्ये रविवारी पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला. तालुक्याच्या पश्चिम भागासह प्रकल्प परिसरात व आजरा मंडल परिसरात (४७ मि.मी.) दिवसभरात काल जोरदार पाऊस झाला.
तालुक्याच्या पश्चिम भागातील जोरदार पावसामुळे साळगाव बंधारा पुन्हा एकदा पाण्याखाली गेला असून खबरदारीचा उपाय म्हणून स्थानिक प्रशासनाने साळगाव मार्गावरील वाहतूक बंद केली आहे. हिरण्यकेशी व चित्रा नदी दुथडी भरून वाहत आहे काही ठिकाणी नदीचे पाणी पात्राबाहेर येण्यास सुरुवात झाली आहे.
जोरदार पावसामुळे बळीराजा मात्र सुखावला असून ठीक ठिकाणी रोप लावणीची कामे वेगावली आहेत.

रविवारी सुट्टीचा दिवस असल्याने वर्षा पर्यटनासाठी रामतीर्थ परिसरात पर्यटकांनी मोठी गर्दी केली होती.कांही ठिकाणी घरांची पडझडही झाली आहे तर बऱ्याच ठिकाणी वृक्ष कोसळले आहेत. दिवसभर वीज पुरवठाही वारंवार खंडित होत होता.
आंबेओहोळ प्रकल्प क्षेत्रात ६१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून ८० टक्के पाणीसाठा (२८.१९० दर.ल.घ.मि.), चित्री प्रकल्प परिसरात ६० मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून ५३.५२% (२८.५८६ द.ल.घ.मि.)इतका पाणीसाठा झाला आहे. सर्फनाला व उचंगी प्रकल्पामध्येही पाणीसाठा झपाट्याने वाढत आहे.


मृत ससा जवळ बाळगल्या प्रकरणी वनविभागाकडून दोघांवर कारवाई

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
मृत जंगली ससा जवळ आढळल्याने सशाची शिकार केल्याच्या संशयावरून बहिरेवाडी (ता.आजरा) येथील सचिन अशोक नाईक व सुनील शामराव नाईक (दोघे रा. बहिरेवाडी ता. आजरा) या संशयितांना वनखात्याने ताब्यात घेतले आहे.
काल रविवारी आजरा वनपरिक्षेत्रातील वनपाल गडहिंग्लज वनरक्षक हे वनक्षेत्रात गस्त घालत असताना उत्तूर फाट्यावर ताब्यात घेतलेल्या दोघांच्या हातामध्ये दोन पिशव्या दिसल्या. या पिशव्यांची तपासणी केली असता त्यामध्ये १ मृत ससा,२ जाळ्या, १ विळा, १२ काठ्या, २ मोबाईल, २ पिशव्या असे साहित्य मिळून आले.या दोघांवर गुन्हा नोंद करुन साहित्य जप्त करणेत आले आहे.
ही कारवाई आजरा वनक्षेत्रपाल श्रीमती स्मिता डाके, बाळेश न्हावी, एस.के.निळकंठ, जी.व्ही.केंद्रे यांनी केली.


ग्रामपंचायत मेंढोली येथे वनौषधी गाव वृक्षारोपण व गुणवंत विद्यार्थी कौतुक सोहळा उत्साहात

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
ग्रामपंचायत मेंढोलीच्या हद्दीत वनौषधी गाव उपक्रमांतर्गत विविध जातीच्या शेकडो औषधी वनस्पतींचे वृक्षारोपण तसेच इयत्ता १० वी व १२ वी च्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा ग्रामपंचायत सदस्य व पालक यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
मेंढोलीचे लोकनियुक्त सरपंच विलास जोशीलकर यांनी वनौषधी गाव करण्याची घोषणा महाराष्ट्रदिनी केली होती. त्याला आज मूर्त स्वरूप देण्यात आले.
झाडांच्या संगोपनाची जबाबदारीही पार पाडणे तितकेच महत्त्वाचे आहे असे सरपंच यांनी यावेळी नमूद केले.
इयत्ता दहावी आणि बारावी परीक्षेत यश संपादन केलेल्या बोलकेवाडी व मेंढोली गावातील विद्यार्थ्यांचा सत्कार संपन्न करण्यात आला. सरपंच विलास जोशीलकर यांनी स्वतःला मिळणारे मानधन खर्च करून विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह देऊन त्यांचा गौरव केला.
यावेळी डॉ.मारुती डेळेकर यांनी विद्यार्थ्यांना शिक्षण म्हणजे काय? कशासाठी शिकावे? अशा प्रश्नांची मांडणी करत समर्पक शब्दात शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले. आपल्या देशासमोरील आव्हाने , गावातील वाचनालयाचे महत्त्व व भावी पिढीची शैक्षणिक वाटचाल यावर त्यांनी विद्यार्थी वर्गाला मार्मिकपणे प्रेरित केले. आजचा विद्यार्थी हा उद्याचा सुजाण नागरिक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. शिवाजी महाराजांचे आदर्श जाणीवपूर्वक विद्यार्थ्यांनी आत्मसात करून अंगीकारण्याची वेळ आज आल्याचे त्यांनी नमुद केले.

मेंढोली गावचे सुपुत्र व सद्या स्वीडनमध्ये नागरिकत्व घेऊन स्थायिक झालेले श्री.सुनील होडगे व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ.वसुधा होडगे ताई यांनीही विदेशातील अनुभव सर्वांना ऐकवले. विदेशात जाऊन स्वतः काम करत शिक्षण घेणे कसे सहज शक्य आहे हे सर्वांना पटवून दिले. मेहनत व जिद्द असेल तर कोणालाही यशाचे शिखर गाठता येते असे त्यांनी यावेळी आवर्जून नमूद केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षा सौ.वसुधा होडगे यांनीही मोजक्या शब्दांत स्वीडन देशातील अनुभव सांगितले.वनौषधी गाव ही संकल्पना पूर्णत्वाला जावी यासाठी श्री. संजय कृष्णा पाटील यांनी या उपक्रमासाठी देणगी देऊन मदत केली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक श्री. विनायक गुंजकर यांनी केले. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री शशिकांत सुतार यांनी केले. तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्री. उमाजी कुंभार यांनी केले.
कार्यक्रमासाठी ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य तंटामुक्त समिती अध्यक्ष जितेंद्र नांदवडेकर, ग्रामसेवक सुनिल गुरव तसेच ग्रामस्थ, पालक व विद्यार्थी उपस्थित होते.


