मंगळवार दिनांक २२ एप्रिल २०२५


साखर कारखाना अध्यक्षपदी मुकुंददादा…?

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
वसंतराव देसाई आजरा साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी जनता बँकेचे अध्यक्ष व माजी जिल्हा परिषद सदस्य मुकुंदराव देसाई यांची निवड निश्चित झाल्याचे समजते. आज होणाऱ्या संचालक मंडळाच्या बैठकीत यावर अंतिम शिक्का मोर्तब होईल.
अध्यक्ष पदासाठी माजी अध्यक्ष विष्णुपंत केसरकर व मुकुंदराव देसाई हे इच्छुक होते. या पार्श्वभूमीवर सत्ताधाऱ्यांचे नेते वैद्यकीय शिक्षण मंत्री नाम. हसन मुश्रीफ यांनी दोनच दिवसांपूर्वी संचालकांशी नूतन अध्यक्ष निवडीच्या पार्श्वभूमीवर संवाद साधला होता. संचालकांची मते जाणून घेतल्यानंतर अध्यक्षपदासाठी मुकुंदराव देसाई यांचे नाव निश्चित करण्यात आले असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.

आजरा येथील मोफत डायलिसिस सेवा केंद्रासह विविध योजनांचे लोकार्पण…

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
‘मृत्युंजय’कार शिवाजीराव सावंत ग्रामीण रुग्णालय , आजरा येथील मोफत डायलिसिस सेवा केंद्र, महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना लोकार्पण समारंभ आरोग्य मंत्री नामदार प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते व प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
यावेळी पालकमंत्री आबिटकर म्हणाले , ‘मृत्युंजय’ कार शिवाजीराव सावंत ग्रामीण रुग्णालय, आजरा येथे सुरु करण्यात येत असलेल्या मोफत डायलेसिस सेवा केंद्र, महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनांच्या माध्यमातून रुग्णांना चांगल्या दर्जाच्या, मोफत आरोग्य सुविधा द्या. येत्या वर्षभरात आजरा येथील सध्याचे रुग्णालय ३० बेड क्षमतेवरून ५० बेडचे करु, त्यासाठी आवश्यक सर्व सोयी-सुविधा उपलब्ध करुन दिल्या जातील.
आर्थिक दृष्ट्या सक्षम नसलेल्या सर्वसामान्य जनतेला शासकीय आरोग्य यंत्रणेच्या माध्यमातून चांगल्या दर्जाच्या आरोग्य सेवा देण्याचे काम व्हावे, त्यासाठी राज्यातील आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम करण्यात येत आहे.
आजरा येथे सुरु होत असलेल्या डायलिसिस सेंटरच्या माध्यमातून रुग्णांचा आर्थिक भार कमी होणार आहे. महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेमुळे आता मोफत औषधोपचार होणार आहेत. आरोग्य विभागातील सर्व यंत्रणांनी अधिक सक्षमपणे काम करुन रुग्णसेवा करावी.
सर्वसामान्य जनतेला आरोग्याच्या उपचारासाठी शहरात जावे लागते. यामुळे रुग्ण व नातेवाईकांना वेळ, पैसा तसेच मानसिक, शारीरिक त्रासही सहन करावा लागतो. हे टाळण्यासाठी ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र अधिक सक्षम करण्यावर भर आहे. सर्व प्रकारच्या वैद्यकीय सेवा ग्रामीण भागात उपलब्ध करुन देवून सर्वसामान्य जनतेला आरोग्याच्या सेवा मोफत उपलब्ध करुन देण्यासाठी शासन काम करीत आहे.
प्रास्ताविकात आरोग्य उपसंचालक डॉ. दिलीप माने म्हणाले, आरोग्य खात्याला शासनाकडून राज्यात ३५९ ॲब्युलन्स देण्यात आल्या असून कोल्हापूर जिल्ह्यासाठी ९ ॲब्युलन्स मिळाल्या आहेत. राज्यामध्ये ४४९ डायलिसिस केंद्रे मंजूर करण्यात आला असून आतापर्यत ५० डायलेसिस केंद्र सुरु करण्यात आली आहेत. आजरा येथील ग्रामीण रुग्णालयात डायलिसिस सेंटरमध्ये ५ अत्याधुनिक बेड व डायलिसिस मशीन उपलब्ध करुन देण्यात आली आहेत. ग्रामीण रुग्णालय,आजराचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अमोल पाटील यांनी रूग्णालयाच्या कामकाजाबाबत माहिती दिली.
यावेळी जयवंतराव शिंपी, ज्योत्स्ना चराटी, डॉ. सुप्रिया देशमुख डॉ. सुहास पिंपळे, तहसीलदार समीर माने, गटविकास अधिकारी संजय ढमाळ, मुख्याधिकारी सुरज सुर्वे,विलास नाईक, विजयकुमार पाटील, राजेंद्रभाऊ सावंत, गोविंद गुरव,धनंजय पाटील, काका देसाई, संजय पाटील, इंद्रजीत देसाई, नाथा देसाई, महेश दळवी, डॉ . प्रवीण निंबाळकर, डॉ. सुरजित पांडव, परशुराम बामणे, दशरथ अमृते, सुधीर कुंभार,सुरेश होडगे, विजय थोरवत, बाळासाहेब नाईक, असिफ पटेल, संतोष भाटले, गौरव देशपांडे, डॉ. स्मिता फर्नांडिस, डॉ. बी.एफ. गॉडद, शरीफ खेडेकर, नेताजी कातकर, दयानंद नेऊंगरे, आरोग्य विभागातील सर्व अधिकाऱ्यांसह आशा स्वयंसेविका व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सन्मान आणि कारवाईही…
आरोग्य विभागामध्ये जी मंडळी सर्वसामान्यांसाठी अहोरात्र काम करीत आहे त्यांचा आपण निश्चितच सन्मान करू पण कामचुकारपणा करून रुग्णांना वेठीस देणाऱ्यांची कदापीही गय केली जाणार नाही असे यावेळी आरोग्य मंत्री आबिटकर यांनी स्पष्ट केले.

अश्विनी बिद्रे हत्या प्रकरणात अभय कुरुंदकरला जन्मठेप, इतर दोघांना सात वर्षांची शिक्षा

पनवेल : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
सहाय्यक पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे हत्या प्रकरणी पनवेल सत्र न्यायालयाने मुख्य आरोपी अभय कुरुंदकर याला जन्मठेप तसेच २० हजारांचा दंडही सुनावण्यात आला आहे. तर या प्रकरणातील इतर दोन आरोपी कुंदन भंडारी आणि महेश फळणीकर या दोन आरोपींना प्रत्येकी सात वर्षांची शिक्षा सुनावली आहे. २०१६ मध्ये अश्विनी बिद्रे यांची हत्या करण्यात आली.
पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे अपहरण आणि हत्या प्रकरणात बडतर्फ वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय कुरुंदकर मुख्य आरोपी असल्याचंच समोर आलं. तर महेश फळणीकर आणि कुंदनलाल भंडारी यांना पुरावा नष्ट केल्याप्रकरणी दोषी जाहीर करण्यात आले. मात्र याप्रकरणातील दोन क्रमांकाचा आरोपी ज्ञानदेव उर्फ राजू पाटील याला पुराव्या अभावी निर्दोष सोडण्यात आलं. ९ वर्षानंतर या प्रकरणाचा निकाल लागला आहे.
अश्विनी बिद्रे यांच्या हत्येने संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली होती. त्यांची २०१५ मध्ये नवी मुंबईतील कळंबोली पोलीस ठाण्यात बदली झाली होती. मात्र त्या कळंबोली पोलीस ठाण्यात रुजू झाल्याच नव्हत्या. दीड वर्षांपासून त्या बेपत्ता होत्या. अश्विनी यांच्या कुटुंबीयांनी कळंबोली पोलीस ठाण्यात अभय कुरुंदकर यांच्याविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता. मात्र पोलिसांनी कुरुंदकर यांच्यावर कारवाई करण्यात आली नव्हती. यामुळे हे प्रकरण मुंबई उच्च न्यायालयात पोहोचले होते. उच्च न्यायालयाने अश्विनी बिद्रे यांचा शोध घेण्याचे आदेश पोलिसांना दिले होते. अनैतिक प्रेमसंबंधातून ही हत्या करण्यात आली. या प्रकरणात भाईंदरच्या नवघर पोलीस ठाण्याचा तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय कुरुंदकर मुख्य आरोपी होता. अश्विनी बिद्रे यांची हत्या करून आपल्या साथादीरांच्या मदतीने मृतदेहाची विल्हेवाट लावली होती.

सहकारामध्ये आजऱ्यातील शिक्षक पतसंस्थाचाही नावलौकिक : प्रकाश आबिटकर
रामतीर्थ शिक्षक पतसंस्था इमारत भूमीपूजन समारंभ

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा तालुक्याचा सहकार क्षेत्रात जिल्ह्यात आदर्श असून शिक्षकांच्या पतसंस्थाचाही नावलौकिक आहे. यामध्ये रामतीर्थ प्राथमिक शिक्षक पतसंस्थेचीही गत पंचवीस वर्षातील वाटचाल उल्लेखनीय आहे. असे गारवोद्गार पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी काढले.
येथील रामतीर्थ प्राथमिक शिक्षक पतसंस्थेचा रौप्यमहोत्सव, नुतन इमारत भूमीपुजन व सत्कार समारंभ कार्यक्रमात मंत्री आबिटकर यांनी मार्गदर्शन केले. अण्णा भाऊ संस्था समुहाचे प्रमुख अशोकअण्णा चराटी अध्यक्षस्थानी होते. माजी जिल्हा परिषद अध्यक्ष व गोकुळच्या संचालिका शौमिका महाडिक प्रमुख उपस्थित होत्या.
आजरा तालुका प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष मायकेल फर्नाडीस यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.

संस्थेचे संस्थापक मुख्याध्यापक जनार्दन नेऊगरे व सौ.विजया नेऊंगरे यांचा सेवानिवृत्तीनिमित्त विशेष सत्कार झाला. संस्थेच्या प्रर्वतक मंडळाचाही सत्कार झाला.
सौ. महाडिक म्हणाल्या, ही संस्था केवळ आर्थिक संस्था नाही. मूल्याधिष्ठ विचाराने भरलेली आहे. श्री. चराटी म्हणाले, तालुक्यातील सहकार क्षेत्राबाबत जिल्हा व राज्यात बोलले जाते. येथील बँका व पतसंस्था चांगल्या चालल्या आहेत. कोणाची कोणाशीही स्पर्धा नाही. प्रत्येकजण एकमेकाला सहकार्य करतो. संघाचे राज्य कोषाध्यक्ष संभाजी बापट, श्री. नेऊंगरे यांची भाषणे झाली.
या वेळी जनता बँकेचे अध्यक्ष मुकुंदराव देसाई, गोकुळच्या संचालिका श्रीमती अंजनाताई रेडेकर, उमेश आपटे, तहसीलदार समीर माने, गटविकास अधिकारी संजय ढमाळ, शिक्षक संघाचे माजी राज्याध्यक्ष राजाराम वरुटे, माजी सभापती मसणु सुतार, राजेंद्र सावंत, जयवंत सुतार, शिक्षक बँकेचे संचालक शिवाजी बोलके, संस्थेचे अध्यक्ष मारुती देसाई, सौ.रचना होलम, सौ.मनिषा गुरव, मुख्याधिकारी सुरज सुर्वे यासह संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
डॉ. मारुती डेळेकर यांनी सुत्रसंचालन व आभार मानले.
यावेळी रामतीर्थ सुयशगाथा स्मरणिकेचे प्रकाशन पालकमंत्री अबिटकर व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

वारकरी भवन उभारणीसाठी सर्व प्रकारचे सहकार्य :
मुकुंददादा देसाई

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा तालुक्यात सर्व वारकरी मंडळींनी एकत्र येऊन वारकरी भवन उभारणीचा जो संकल्प केला आहे त्याला सर्व प्रकारचे सहकार्य राहील. असे आश्वासन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष मुकुंददादा देसाई यांनी दिले ते आजरा येथे भरवलेल्या वारकरी मेळाव्यात बोलत होते. यावेळी कॉ. संपत देसाई, शिवाजी बोलके, दिगंबर देसाई यांची प्रमुख उपस्थिती होती.
सुरुवातीला रामकृष्ण हरी वारकरी संप्रदाय संस्थेचे अध्यक्ष गौरोजी सुतार यांनी प्रास्ताविक करून या मेळाव्याचा हेतू स्पष्ट केला. आपल्याला सगळ्यांच्या मदतीने वारकरी भवन उभा करायचे आहे. त्यासाठी सर्वांची मदत आवश्यक आहे.
यावेळी बोलताना कॉ. संपत देसाई म्हणाले की गेले दोन- तीन वर्षे वारकरी मंडळी एकत्र येऊन वारकरी भवन मांडण्याचा संकल्प करीत आहेत. त्यासाठी नगरपंचायत आणि महसूल कडे आपण जागा मागितली. तिथं जागा मिळाली नाही, पण आपल्याला जागा देण्यास देहूकर मंडळी आपण हुन तयार झाली, हे भवन व्हावे ही विठू माऊलीची इच्छा आहे. ती आपण सगळे मिळून पूर्णत्वाला नेऊ.
जिल्हा शिक्षक बँकेचे संचालक शिवाजीराव बोलके म्हणाले, सर्वांना सोबत घेऊन आपण सगळे मिळून हे भवन उभा करू, आता कोणतीही अडचण यात येणार नाही. तुम्ही सगळे एकदिलाने कामाला लागा.
पांडुरंग जोशीलकर, संतु कांबळे, लक्ष्मण शिंत्रे, राजाराम जाधव यांनीही मनोगते व्यक्त केली. यावेळी दीपाली गुरव, कल्पना जाधव, भिकाजी दारुटे, कोंडीबा आडे, बाबू घुरे, विश्राम निउंगरे, गंगाराम येडगे यांच्यासह वारकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बैठकीतील ठराव-
बोलकेवाडी येथे देहूकर महाराजांनी देऊ केलेल्या जागेवर वारकरी भवन उभारण्याचा ठराव सर्वानुमते हात उंचावून मंजूर करण्यात आला.

जनता सहकारी गृहतारण संस्थेला रु. ५५ लाख ५८ हजार नफा

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
रौप्यमहोत्सवाकडे वाटचाल करीत असलेल्या जनता सहकारी गृहतारण संस्थेने शंभर कोटी ठेवींचा टप्पा यशस्वीरित्या पूर्ण केला संस्थेला २०२४-२५ या आर्थिक वर्षात ५५ लाख ५८ हजार निव्वळ नफा झाला असल्याची माहिती अध्यक्ष मारुती मोरे यांनी दिली.
स्वतःचे घरकुल असावे हे प्रत्येक माणसाचं स्वप्नं असतं. ते प्रत्यक्षात साकारण्यासाठी जनता सह. गृहतारण संस्था ठामपणे सभासदांच्या पाठिशी उभी आहे. सभासद, कर्जदार व ठेवीदारांशी विश्वासाच नातं आहे.चालु आर्थिक वर्षात संस्थेकडे १०० कोटी ३३ लाख ३५ हजार १५९ रुपयांच्या ठेवी जमा झाल्या आहेत. तसेच ६२ कोटी ६१ लाख २२ हजार ८६२ रुपयांची कर्जे वाटप केली आहेत. संस्थेचे भागभांडवल १ कोटी १९ लाख ८५ हजार असुन संस्थेने ५५ लाख ५८ हजार निव्वळ नफा झाला आहे. गडहिंग्लज व कोल्हापूर या ठिकाणी स्वमालकीच्या इमारतीत संस्थेची कार्यालये आहेत, “महाराष्ट्र राज्य “कार्यक्षेत्र मिळवणारी महाराष्ट्रातील एकमेव गृहतारण सहकारी संस्था आहे व ISO९००१:२०१५ मानांकन प्राप्त संस्था आहे. ही संस्थेची जमेची बाजू असून संस्थेच्या सर्व शाखांमधील गुंतवणूक ३८ कोटी ५४ लाख रुपयांची गुंतवणूक केली असून सर्व शाखा संगणीकृत आहेत.
कार्यतत्पर व घरपोच सेवा देणारी संस्था म्हणून ओळख असलेल्या या संस्थेच्या आजरा, गडहिंग्लज, गारगोटी, कोल्हापूर, इचलकरंजी, सांगली व पाटणे फाटा (चंदगड) येथे शाखा आहेत. संस्था गृहकर्जासाठी १ कोटीपर्यंत व प्लॉट खरेदीसाठी रु.७५ लाख कर्ज देते. व सोनेतारण कर्ज या सारख्या विविध गोष्टीसाठी संस्था कर्ज पुरवठा करत आहे. संस्थेकडे SMS सुविधा, लाईट बील भरणा, RTGS / NEFT या सुविधा चालु आहेत.
यासाठी मुख्य कार्यालय व्हा. चेअरमन श्री. गणपतराव आरळगुंडकर, संचालक प्राचार्य. डॉ. अशोक सादळे प्रो. डॉ. अशोक बाचुळकर, प्रा. विनायक चव्हाण, प्रा. बळवंत कडवाले, प्रा. मनोज देसाई, र्धॲड. सुभाष डोंगरे, प्रा.डॉ. तानाजी कावळे, डॉ. अंजनी देशपांडे प्रा. सौ. लता शेटे, प्रा. सौ. नेहा पेडणेकर तसेच सर्व शाखांचे चेअरमन, संचालक मंडळ, मॅनेंजर श्री. मधुकर खवरे, प्रशासन अधिकारी श्री. मारुती कुंभार, शाखाधिकारी व कर्मचारी यांच्यासह सभासद, ठेवीदार, कर्जदार, ग्राहक यांचे मोलाचे सहकार्य लाभले असल्याचे अध्यक्ष श्री. मारुती मोरे यांनी सांगितले.

बिरेश्वरच्या आजरा शाखेला आरोग्यमंत्र्यांची सदिच्छा भेट

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
बीरेश्वर मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटी या संस्थेच्या आजरा शाखेला महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री नामदार प्रकाशराव आबिटकर यांनी सदिच्छा भेट दिली. माजी खासदार अण्णासाहेब जोल्ले व माजी मंत्री विद्यमान आमदार शशिकलाताई जोल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण महाराष्ट्रासह कर्नाटक व गोव्यामध्ये संस्थेच्या २२६ शाखा उत्कृष्ट पद्धतीने सुरू असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.
संस्थेचे शाखा अध्यक्ष ज्योतिप्रसाद सावंत यांच्या हस्ते मंत्री आबिटकर यांचा सत्कार करण्यात आला. आजरा शाखेने वर्षभरातच सात कोटींचा ठेवींचा टप्पा ओलांडला असून आजरा शाखेला पहिल्याच वर्षी १० लाख ८८ हजारांचा निव्वळ नफा झाला असल्याचे अध्यक्ष सावंत यांनी सांगितले.
कार्यक्रम प्रसंगी संस्थेचे संचालक महेश कुरूणकर, तानाजी डोणकर, अनिकेत शिंत्रे, सुरेश मिटके, सुशांत निकम, अण्णाभाऊ संस्था समूहाचे प्रमुख अशोकअण्णा चराटी, उद्योजक महादेव पोवार, विजय थोरवत, राजेंद्रभाऊ सावंत, नाथा देसाई, समीर मोरजकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
शाखा व्यवस्थापक दत्तात्रय सुतार यांनी आभार मानले.
भारत नगर वसाहती मधील पायाभूत सुविधांसाठी गुरुवारी संघर्ष मोर्चा

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा शहरातील भारत नगर वसाहती मधील पायाभूत सुविधांसाठी गुरुवार दि २४ एप्रिल रोजी संघर्ष मोर्चा काढून नगरपंचायत आवारात बेमुदत ठिय्या आंदोलन करणार असल्याची माहिती मुक्ती संघर्ष समितीचे राज्याध्यक्ष संग्राम सावंत यांनी दिली.
नगरपंचायतीच्या क्षेत्रात असलेल्या भारतनगरमध्ये गेली २० ते २२ वर्षापासून पायाभूत सुविधांचा अकाल पडला आहे. त्यामुळे पायाभूत सुविधा,विकास आणि सुधारणा ताबडतोब झाल्या पाहिजेत.तसेच इतर मागण्यांबाबत ताबडतोब कार्यवाही व अंमलबजावणी झाली पाहिजे.या संदर्भात ताबडतोब निर्णय घेऊन अंमलबजावणी केली नाही. तर गुरूवार दि.२४ एप्रिल रोजी “संघर्ष मोर्चा” काढून नगरपंचायत आवारात बेमुदत ठिय्या आंदोलन करणार असल्याचे सांगितले.
याबाबतचे निवेदन मुख्याधिकारी नगरपंचायत,उपाभियता सार्वजनिक बांधकाम विभाग व तहसीलदार आजरा यांना देण्यात आले.निवेदन देताना मुक्ती संघर्ष समितीचे राज्याध्यक्ष संग्राम सावंत, जिल्हा संघटक समीर खेडेकर, तालुका संघटक मजीद मुल्ला व भारत नगर मधील अब्दुलवाहिद सोनेखान, सलीम शेख, तोफिक माणगावकर, सल्लाउद्दीन शेख, खुदबूद्दीन तगारे, गुलाब शिकलगार, यासीन सय्यद, सलीम नाईकवडे, मुदस्सर इंचनाळकर, नईम नाईकवडे, शौकत पठाण यांच्यासह भारत नगर मधील रहिवासी व मुक्ती संघर्ष समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते.


