

कारखाना सुरळीत चालवण्यासाठी हसन मुश्रीफ शिवाय पर्याय नाही…
पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचे प्रतिपादन.

आजरा: प्रतिनिधी
आजरा सहकारी साखर कारखाना फार मोठ्या आर्थिक अडचणीतून जात आहे. हा साखर कारखाना या सगळ्या आर्थिक अडचणींमधून सावरण्याची धमक फक्त आमच्यातच आहे, कारखाना सुरळीत चालवण्यासाठी हसन मुश्रीफ याच्याशिवाय पर्याय नाही असा विश्वास वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केला. मडिलगे ता. आजरा येथे आजरा कारखाना निवडणुकीतील श्री. रवळनाथ शेतकरी विकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ जाहीर सभेत ते बोलत होते. कोणत्याही परिस्थितीत आजरा साखर कारखाना आर्थिक राडीतून बाहेर काढूच, असेही ते म्हणाले.
भाषणात मंत्री मुश्रीफ पुढे म्हणाले, आजरा कारखान्याची निवडणूक बिनविरोध व्हावी म्हणून मी, आमदार सतेज उर्फ बंटी पाटील व आमदार विनय कोरे यांनी भरपूर प्रयत्न केले, परंतु त्या प्रयत्नांना यश आले नाही. या निवडणुकीत आमचे राष्ट्रवादीचे पॅनल आहे. आजरा कारखाना कोणत्याही परिस्थितीत आर्थिक अडचणीतून सावरूनच दाखवू.
कारखाना परिसर ईको सेंसिटिव्ह झोनमध्ये असल्यामुळे तिथे डिस्टीलरी व को- जन उभारण्याला बंदी आहे. ती बंदी काढावी लागेल, त्यासाठी प्रसंगी देशाचे केंद्रीय मंत्री अमित शहा यांना भेटावे लागेल. डिस्टीलरी, इथेनॉल व को-जन हे तिन्ही प्रकल्प केल्याशिवाय तो कारखाना सुरळीत होणार नाही आणि हे करण्याची धमक आमच्यातच आहे.

माजी आमदार के. पी. पाटील म्हणाले, वास्तविक आजरा कारखाना व अण्णा -भाऊ यांचा काडीचाही संबंध नव्हता. कारखाना सुरू झाल्यानंतर पंधरा वर्षांनी अशोकअण्णा कारखान्यात आले. केवळ कारखान्यात आले नाहीत तर त्यांनी कारखाना बंद पाडण्याचे पाप केले. त्यामुळे सभासदांना व कामगारांना त्यांना हाकलून देण्याची वेळ आली. इंग्रजांप्रमाणे प्रथम कारखान्यात प्रवेश करून त्यानंतर कारखाना बंद पाडण्याबरोबर कारखान्याचे वाटोळे लावण्याचे काम चराटी यांनी केले. कारखाना चालू ठेवणे जिल्हा बँकेशिवाय कोणाला शक्य नाही. कामगारांचे पगार, ऊस उत्पादकांची बिले सभासदांना साखर यासह विविध प्रश्न मार्गी लावण्याकरता मंत्री मुश्रीफ यांचेशिवाय पर्याय नाही असेही त्यांनी सांगितले.
माजी चेअरमन विष्णुपंत केसरकर म्हणाले,गत निवडणुकीत नाइलाजाने चराटी यांच्यासोबत राहावे लागले. मात्र चराटी यांचा कारभार इतका स्वच्छ आणि पारदर्शक होता की अक्षरशः त्यांना कामगारांनी कोंडून घालून त्यांच्याकडून राजीनामा घेण्याबरोबर कारखान्याची गाडी काढून घेण्याची वेळ आली. स्वतःची सूतगिरण बंद अवस्थेत, दूध संस्था बंद अवस्थेत, काजू फॅक्टरी बंद, पतसंस्था बंद असे कर्तृत्व असणाऱ्या चराटी यांनी कारखानाही बंद ठेवण्याचे काम केले. चराटी बाजूला झाल्यानंतर शिंत्रे यांना अध्यक्ष केले. परंतु शिंत्रे यांचा कारभार सर्वांनी पाहिलाच आहे असेही त्यांनी सांगितले.

जिल्हा बँकेचे संचालक सुधीर देसाई म्हणाले, हमारे पास बहुत पैसा है म्हणणा-यांनी कारखाना देशोधडीला लावून बंद पाडला. बिनविरोध प्रक्रिया सुरू असताना अंजनाताई रेडेकर व अशोकअण्णांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या भावना भडकावण्याचा प्रयत्न केला. कारखाना चालू करणाऱ्यांना बाहेर काढले, कारखान्याची गाडी आजरा नगरपंचायतीकरता फिरवली यामुळे कामगारांनी त्यांचा राजीनामा घेण्याची नामुश्की आली.
यावेळी माजी संचालक दिगंबर देसाई, उमेदवार दीपक देसाई, संभाजी तांबेकर शिवाजी नांदवडेकर, सरपंच बापू नेऊंगरे, हरिबा कांबळे, संताजी सोले यांचीही भाषणे झाली.

सभेस ज्ञानदेव पोवार, अनिकेत कवळेकर, सखाराम येसणे, भाऊसो पाटील, डॉ. राजलक्ष्मी देसाई, पंचायत समिती सदस्य शिरीष देसाई, विजय वांगणेकर, प्रकाश दळवी, तालुका संघाचे संचालक महादेव पाटील, विक्रम देसाई, राहुल शिरकोळे, सुनील देसाई(खोराटवाडी) यांच्यासह मडिलगे येथील ग्रामस्थ उपस्थित होते
प्रामाणिकपणा नव्हे तर कुरघोडी
साखर कारखाना निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी आपण आग्रही होतो.राष्ट्रवादीच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी तर निवडणुकीतून बाहेर रहाण्याचा निर्णय घेतला होता. एकीकडे निवडणूक बिनविरोधचे प्रयत्न सुरू असताना दुसरीकडे मात्र कुरघोड्या सुरू होत्या. राष्ट्रवादीला सन्मान देण्याऐवजी राष्ट्रवादीवर पळपुटे, सभासदांचे व कामगारांचे विश्वासघातकी अशा वल्गना करण्यात आल्या. काही मंडळींची घमेंड व बेछुटपणा भरलेली भाषणे व मूर्खपणामुळे निवडणूक लादली गेली असेही मंत्री मुश्रीफ यांनी स्पष्ट केले.
त्यांचा स्वभावच नडला…
माजी अध्यक्ष वसंतराव धुरे म्हणाले, कारखान्याकरिता मंत्री मुश्रीफ यांचे योगदान मोठे राहिलेले आहे. कारखाना आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी आता तेच प्रयत्न करू शकतात याची पूर्ण कल्पना विरोधकांना आहे. परंतु वरिष्ठांचे न ऐकण्याचा श्रीमती रेडेकर व चराटी यांचा स्वभाव आहे. हा स्वभावच बिनविरोधला बाधा आणणारा ठरला.
कालपर्यंत एकमेकांची उणीदुणी काढणारे एकत्र
कालपर्यंत एकमेकाची उणीदुणी काढणारी मंडळी कारखान्यात आता एकत्र आली आहेत. कोणी कारखाना आर्थीक संकटातून बाहेर काढणार म्हणत आहे.. तर कोणी साखर वाटणार म्हणत आहे आजपर्यंत तुम्हाला कोणी अडवले होते? असा सवालही त्यांनी अशोकअण्णा चराटी, शिंत्रे, श्रीमती रेडेकर यांना उद्देशून केला. धडपडणारा कार्यकर्ता म्हणून अशोकअण्णा यांना चेअरमन केले पण त्यांना आमदारकीची स्वप्ने पडू लागली.




राष्ट्रवादीने कारखाना निवडणूक लादली :सतेज पाटील

आजरा: प्रतिनिधी
पालकमंत्री हसन मुश्रीफ, मी व विनय कोरे यांनी कारखाना निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी खूप प्रयत्न केले मात्र राष्ट्रवादीतील कांही मंडळींच्यामुळेच ही निवडणूक लागली. शेवट पर्यंत त्यांना विचारले. त्यांचे निवडणुकीतून बाहेर रहाणार हेच उत्तर होते.
आम्हाला मागे फिरणे शक्य नव्हते मग आम्ही जोडणी केली त्यात गैर काय?असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
आजरा येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. सतेज पाटील म्हणाले, ऊस व दुध यावरच जिल्ह्याचे अर्थकारण आहे.कारखान्यावर खर्चाचा भार पडू नये यासाठी प्रयत्न केले. तरीही निवडणूक लागली मात्र आम्ही आजरा कारखान्याला वाऱ्यावर सोडून देणार नाही.मुश्रीफ यांनीही जिल्हा बँकेच्या माध्यमातून सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे.
केंद्रीय पॅकेजसाठी प्रयत्न करणार त्यामुळे कारखाना निश्चित चालणार. यासाठी सर्वांनी सहकार्याची भूमिका घेतली पाहिजे. गाळप वाढले पाहिजे. पाणी प्रकल्पा मुळे ऊस वाढणार याचा फायदा घ्यायला हवा.यामध्ये कोणीही राजकारण आणू नये. कारखाना टिकावा हाच प्रत्येकाचा दृष्टीकोन असायला हवा.
ज्या-त्या तालुक्याचे राजकीय समीकरण वेगवेगळे असते. त्यामुळे आजरा कारखान्यात मंत्री मुश्रीफ व आपण वेगवेगळ्या भूमिकेत असलो तरीही जिल्हा पातळीवर आमचे मस्त चालले आहे असेही त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी अशोक चराटी, जयवंतराव शिंपी, श्रीमती अंजना रेडेकर, प्रा.सुनिल शिंत्रे, विलास नाईक,उमेश आपटे, अभिषेक शिंपी यांच्यासह उमेदवार उपस्थित होते.






