

कारखाना अडचणीत असताना तुम्हाला बंटी पाटील चालला…? तो आता का चालत नाही..? आमदार सतेज पाटील यांचा थेट सवाल

आजरा: प्रतिनिधी
आजरा कारखान्याच्या गेल्या तीन निवडणुकांमध्ये आपण सक्रिय राहिलो. कारखाना अडचणीत आल्यानंतर दहा कोटी रुपयांची मदत करताना ते पैसे परत मिळतील की नाही याबाबत कोणतीही शंका न बाळगता कारखान्याला मदत केली. अशावेळी आपण चालू शकलो मात्र आता निवडणुकीत बंटी पाटील का चालत नाही ? असा थेट सवाल आमदार सतेज पाटील यांनी आजरा येथील अण्णाभाऊ संस्था समूह, कै. केदारी रेडेकर संस्था समूह, जयवंतराव शिंपी यांचे कार्यकर्ते आणि भाजपा कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलताना केला.
यावेळी बोलताना आमदार सतेज पाटील म्हणाले, संस्था टिकावी ही आपली प्रामाणिक भूमिका आहे याच भूमिकेतून कारखान्याची निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी प्रयत्न केले जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही जिल्ह्यातील विविध संस्थांची मातृसंस्था आहे सर्वसामान्यांच्या ठेवींचे संरक्षण करण्याकरता आम्हाला संचालक म्हणून पाठवले आहे त्यामुळे सत्ता आल्यानंतर केडीसीसी बँक आपल्या पाठीशी राहील त्याविषयी कोणीही काळजी करू नये.
सर्वांना सोबत घेऊन बिनविरोध चा प्रयत्न केला. जागावाटपही ठरले परंतु सत्तेतून बाहेर राहण्याच्या राष्ट्रवादीच्या निर्णयानंतर आपण घेतलेल्या निर्णयापासून मला मागे फिरणे केवळ अशक्य होते. आजरा कारखान्याची निवडणूक म्हणजे सत्ता मिळवण्याची लढाई आहे असे समजू नका तर ही लढाई संस्था टिकवण्याची लढाई आहे असेही त्यांनी स्पष्ट केले. एनसीडीसीचेही पॅकेज मिळवण्यासाठी आपला प्रयत्न राहील कारखान्याला चांगले दिवस येतील अशीही त्यांनी आशा व्यक्त केली.

गोकुळच्या संचालिका श्रीमती अंजनाताई रेडेकर म्हणाल्या, वास्तविक ही निवडणूक कारखान्याला परवडणारी नाही. भविष्यात कारखाना सक्षमपणे चालण्यासाठी केंद्र सरकारच्या विशेष पॅकेजसह कमी व्याजदरातील कर्ज उपलब्ध करून घेण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. या निवडणुकीत चाळोबा देव विकास आघाडीच्या प्रमुख मंडळींची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. हे सर्व आपले संस्थाप्रमुख आहेत याकरिता या संस्थांमधील कर्मचाऱ्यांनी मनापासून निवडणुकीत आपले योगदान द्यावे असे आवाहन केले.

अण्णाभाऊ संस्था समुहाचे प्रमुख अशोकअण्णा म्हणाले, ज्या कर्मचाऱ्यांनी आपणाला कारखान्याबाहेर राहण्यासाठी प्रयत्न केले तेच कर्मचारी आता आपल्या पाठीशी आहेत. सुधीर देसाई व केसरकर कारखान्यातून बाहेर गेल्याशिवाय कारखान्याचे कामकाज सुरळीत चालणार नाही. कारखाना भाजपाच्या ताब्यात घ्यावा सर्व प्रकारचे सहकार्य करू असे आश्वासन भाजपाचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले असल्याचेही त्यांनी सांगितले. कारखाना निवडणूक होऊन सत्तेवर येताच महिन्याभरात सभासदांना साखर देण्याची घोषणाही त्यांनी केली.
ज्येष्ठ संचालिका सौ. सुनीता रेडकर यांनी राष्ट्रवादी मुळे कारखाना अडचणीत आला असल्याचा आरोप करून सर्वसामान्यांचे सभासदत्व रद्द करण्याचे पाप काही मंडळींनी केले असल्याचे सांगितले.
यावेळी प्रा. सुनील शिंत्रे, विलास नाईक यांचीही मार्गदर्शनपर भाषणे झाली.

सभेस जयवंतराव शिंपी, आजरा अर्बन बँकेचे अध्यक्ष रमेश कुरुणकर, डॉ. अनिल देशपांडे, शिवसेना जिल्हाप्रमुख युवराज पोवार, सुनील देसाई, मारुती मोरे, शशिकांत सावंत, सखाराम केसरकर, कृष्णा येसणे, डॉ. इंद्रजीत देसाई, सचिन शिंपी, विजयकुमार पाटील, भैय्या टोपले, नागोजी पाटील, विलास पाटील, किशोर भुसारी, रमेश रेडेकर, अशोक पोवार, राजू पोतनीस, विक्रम पटेकर, सुरेश डांग, किरण कांबळे, अमित खेडेकर, समीर पारदे, डॉ. दीपक सातोस्कर, प्रकाश पाटील, अश्विन डोंगरे, संजय चव्हाण यांच्यासह विविध संस्थांतील कर्मचारी, आघाडीचे सर्व उमेदवार व मान्यवर उपस्थित होते.
सभेचे सूत्रसंचलन मनोज देसाई यांनी केले तर जनार्दन टोपले यांनी आभार मानले.

मंत्री मुश्रीफ यांच्या शिडीची आम्हाला गरज नाही…
कारखान्यावरील आर्थिक आरिष्ट दूर करण्यासाठी व कारखान्याला ऊर्जितावस्था आणण्यासाठी शासकीय यंत्रणा पाठीशी असणे गरजेचे आहे. राज्य सरकारच्या हातात फारसे काही राहिलेले नाही आणि केंद्र सरकारकडे जाण्यासाठी मुश्रीफसाहेब तुमच्या शिडीची आम्हाला गरज नाही असा टोला यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तानाजी देसाई यांनी लगावला. स्टंट करणारी विरोधक मंडळी रिंगणात आहेत. त्यांची दुटप्पी भूमिका सर्वसामान्य सभासदांना कळून चुकली आहे असे तरी सांगितले.
त्या ७० कोटींमध्ये तुमचे योगदान काय…?
साखर कारखाना बंद पडल्यानंतर बँकेची देणी भागवण्याकरिता व परत कर्ज मिळवण्याकरता ७० कोटी रुपये उभा करत असताना तुम्ही कुठे होता ? त्यातले तुमचे योगदान काय ? असे सवाल विरोधकांना उमेदवार अभिषेक शिंपी यांनी केले. जिल्हा बँक व जिल्हास्तरीय नेत्यांच्या ताकदीवर काही नादान मंडळी आमच्याशी संघर्ष करू पाहत आहेत असेही त्यांनी सांगितले.







