

पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्यासह आमदार सतेज पाटील आज तालुक्यात

आजरा:प्रतिनिधी
जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ व राष्ट्रीय काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार सतेज पाटील आज कारखाना निवडणूक पार्श्वभूमीवर आजरा तालुक्यात येत असून ते आज काय बोलणार ? याकडे तालुकावासीयांचे लक्ष लागून आहे.
मंत्री मुश्रीफ व आमदार पाटील यांच्या नेतृत्वाखाली बिद्री साखर कारखान्याच्या निवडणुकीत सत्ताधारी आघाडीने घसघशीत विजय मिळवला. या निवडणुकीचा धुरळा खाली बसतो न बसतो तोच आजरा साखर कारखान्याची निवडणूक प्रचार रणधुमाळी सुरू झाली आहे. बिद्रीच्या रणांगणात हातात हात घालून के. पी. पाटील यांना साथ देणाऱ्या या दोन मातब्बर नेत्यांच्या कार्यकर्त्यांनी आजरा कारखान्यात मात्र परस्परविरोधी आघाड्या तयार केल्या आहेत.
या दोन्ही आघाड्यांना मंत्री मुश्रीफ व आमदार पाटील यांच्या पाठबळाशिवाय पर्याय नाही. काँग्रेस, भाजपा,सेना प्रणित आघाडीचे भवितव्य आमदार पाटील यांच्या हाती तर राष्ट्रवादीच्या आघाडीचे भवितव्य मंत्री मुश्रीफ यांच्या हाती असल्याने आज परस्परविरोधी आघाडीच्या प्रचाराच्या निमित्ताने हे दोन नेते नेमकी काय विधाने करणार ? याकडे तालुक्यातील जनतेचे लक्ष लागून आहे.


संधी द्या कारखाना कर्जमुक्त करू:श्रीमती अंजनाताई रेडकर

आजरा: प्रतिनिधी
दोन वर्ष बंद असलेला कारखाना सर्वांच्या प्रयत्नामुळे सुरु झाला. याला जिल्हा व राज्यातील नेत्यांनी पाठबळ दिले. त्यामुळे कारखान्याची निवडणूक बिनविरोध व्हावी अशी आमची भूमिका होती. दुर्देवाने निवडणूक होत असल्याने आमची आघाडी मैदानात उतरवली आहे. सभासदांनी संधी दिल्यास कारखाना सक्षमपण चालवून कर्जमुक्त करू, असे प्रतिपादन गोकुळच्या संचालिका व उमेदवार श्रीमती अंजनाताई रेडेकर यांनी केले.
भाजप, काँग्रेस व सेना प्रणित श्री. चाळोबादेव शेतकरी विकास आघाडीने कोवाडे, दाभेवाडी, कानोली, कोळींद्रे, पोश्रातवाडी, हांदेवाडी येथे प्रचार फेरी काढली. लाकूडवाडी येथे प्रचार सभा झाली. श्रीमती रेडेकर यांनी मार्गदर्शन केले. आघाडीचे उमेदवार प्रा. सुनिल शिंत्रे, सुधीरकुमार पाटील, आनंदराव बुगडे, सुरेश सावंत, सुनिता रेडेकर आदी उपस्थित होते.
श्रीमती रेडेकर म्हणाल्या, आजरा कारखान्यासाठी केंद्र सरकारकडून निधी उपलब्धत करून दिला जाईल अशी हमी राज्यातील भाजप नेते व आघाडी प्रणित नेत्यांनी दिली आहे. त्यामुळे कारखाना कर्जमुक्त करून सक्षमपणे चालवणार आहे. याचा सभासद मतदारांनी विचार करावा. आघाडीला संधी देवून एकहाती सत्ता दद्यावी. प्रा. शिंत्रे म्हणाले, काही मंडळींचा मला विरोध होता. त्यामुळे त्यांनी निवडणूक बिनविरोध होवू दिली नाही. सत्तेचा हव्यास आम्हाला नाही. कारखाना वाचवून तो कर्जमुक्त करावा हाच आमचा उद्देश आहे. या वेळी समीर पारदे, प्रकाश पाटील, विष्णू जाधव, शंकर कुराडे, लाकूडवाडीच्या सरपंच जयश्री गिलबिले, मास्ती मोरे, चंद्रकांत गिलबिले, भास्कर मोरे, यांच्यासह विविध संस्थाचे पदाधिकारी, सभासद व शेतकरी उपस्थित होते. पेरणोली- गवसे गटात आघाडीचे उमेदवार दशरथ अमृते, जनार्दन टोपले, भास्कर बुरुड, सहदेव नेवगे यांनी प्रचार फेरी काढली.
आजरा-श्रृंगारवाडी गटात आघाडीचे उमेदवार अशोक चराटी, अभिषेक शिंपी, विजय देसाई, संगीता माडभगत यांनी प्रचार फेरी काढली.




कारखान्याचा कारभार पारदर्शक करण्यासाठी बांधील :सौ.रचना होलम

आजरा: प्रतिनिधी
कारखाना चांगल्या प्रकारे कसा सुरु राहील यासाठी राष्ट्रवादीची नेतेमंडळी प्रयत्नवत आहेत. पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या मार्गदर्शनाखाली व आमदार राजेश पाटील यांच्या सहकार्याने कारखान्याचा कारभार पारदर्शक व काटेकोर करण्यासाठी आघाडी मैदानात आहे. सभासदांनी विश्वास दाखवून राष्ट्रवादीच्या रवळनाथ विकास आघाडीला एकहाती सत्ता द्या. असे आवाहन माजी सभापती व उमेदवार सौ. रचना होलम यांनी केले.
सरंबळवाडी, मलिग्रे, लाकूडवाडी, चाफवडे, मोरेवाडी, हुडे, उचंगी, श्रृंगारवाडी, एमेकोंड या गावात रवळनाथ शेतकरी विकास आघाडीने प्रचार फेरी काढली. मुरुडे येथे उमेदवार होलम यांनी सभासदांशी संवाद साधून भूमिका मांडली. वेळवट्टीच्या माजी सरपंच व उमेदवार सौ. मनिषा देसाई,सौ. राजू होलम आदी उपस्थित होते.
सौ. होलम म्हणाल्या, आजरा कारखाना बिनविरोधासाठी राष्ट्रवादीचेही प्रयत्न होते. पण जागा वाटपाच्या आडून विरोधकांनी राजकारण केले. आपल्या वाट्याला जागा कशा ज्यास्त येईल हे पाहीले. राजकीय ताकद दाखवण्याबरोबर कारखान्याचा कारभार पारदर्शक व काटेकोर करण्यासाठी निवडणूक रिंगणात आघाडी उतरवली आहे. सभासदांनी साथ द्यावी.
सौ.मनिषा देसाई म्हणाल्या, कारखाना वाचवाचा असेल तर राष्ट्रवादीशिवाय पर्याय नाही. राष्ट्रवादी प्रणित श्री. रवळनाथ विकास आघाडीला विजयी करावे. आजरा श्रृंगारवाडी गटात आघाडीचे उमेदवार मुकुंदराव देसाई, सुभाष देसाई व शिवाजी नांदवडेकर यांनी प्रचार फेरी काढली. उत्तूर- मडिलगे गटात आघाडीचे उमेदवार वसंतराव धुरे, मास्ती घोरपडे, दीपक देसाई व काशिनाथ तेली यांनी प्रचार फेरी काढली, आघाडीचे उमेदवार हरीबा कांबळे यांनी बुरुडे, मुरुडे येथे प्रचार फेरी काढली.


पालकमंत्री मुश्रीफ यांचा उत्तूर विभागात दौरा
पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचा शनिवार (ता.९) उत्तूर विभागात प्रचार दौरा होत आहे. भादवणवाडी, जाधेवाडी, खोराटवाडी, मासेवाडी, सोहाळे, पेंढारवाडी, आरदाळ, हालेवाडी, वडकशिवाले प्रचार फेरी व भादवण, मडिलगे येथे सभा होतील.

आमच्या मागण्या पूर्ततेची हमी द्या… मतदान घ्या…
श्रमिक मुक्ती दलाची भूमिका

आजरा: प्रतिनिधी
आजरा साखर कारखाना निवडणुकीत कारखान्याच्या हिताचा विचार करून स्वच्छ आणि पारदर्शक कारभाराची हमी व खालील अटींची पूर्तता करणाऱ्या उमेदवाराला मतदान करण्याचा निर्णय आज श्रमिक मुक्ती दलाच्या बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी कॉ. संपत देसाई होते.
श्रमिक मुक्ती दलाच्या नेतृत्वाखाली तालुक्यात कष्टकरी जनतेच्या अनेक चळवळी चालू आहेत. त्यामुळे या निवडणुकीत आमचा हस्तक्षेप महत्वाचा असल्याने खालील मुद्द्यांच्या आधारे उमेदवारांना मते देण्याचा निर्णय आज करण्यात आला.
१-श्रमुदच्या नेतृत्वाखाली जी आंदोलने उपक्रम तालुक्यात घेतले जातात त्या आंदोलन/उपक्रमात भागीदारी करणाऱ्या उमेदवारांना मते देणे…
२- तालुक्यात आज सर्फनाला सोडून सर्व धरणे पूर्ण झाली आहेत कारखाना पूर्ण क्षमतेने चालायचा असेल तर धरणातील पाण्याचे योग्य नियोजन करून ऊस क्षेत्र वाढविण्यासाठी पुढाकार घेण्याची हमी देणे…
३- कारखाना कर्जमुक्त करून तो सहकारी तत्वावर स्वबळावर चालविण्याची हमी देणे.
४-स्वच्छ व पारदर्शक कामाची हमी दिली पाहिजे…
५- संचालक होऊ इच्छिणाऱ्या उमेदवाराने कारखान्याकडे ऊस आणण्यासाठी विषेश प्रयत्न करण्याची हमी देणे…
६-कोल्हापूर जिल्ह्यातील इतर अग्रेसर कारखान्यांच्या बरोबरीने शेतकऱ्यांना ऊसाचे बिल देण्याची हमी देणे…
७- या तालुक्यातील भौगोलिक परिस्थितीचा विचार करून उत्पादकता वाढविण्यासाठी नवनवी बियाणे शेतकऱ्यांच्या पर्यंत पोहचविण्याचा ऊस विकास कार्यक्रम राबविण्याची हमी देणे…
८-सवलतीच्या दरात ऊस उत्पादक शेतकऱ्यांना व सभासदांना साखर वाटपाची हमी देणे…
वरील सर्व मुद्द्यांची हमी देणाऱ्या उमेदवरलाच मते देण्याचा निर्णय आज श्रमिक मुक्ती दलाने घेतला असून तालुक्यातील सर्व सभासदांनी या मुद्द्यांच्या आधारेच मतदान करण्याचे आम्ही आवाहन करीत आहोत.
यावेळी कॉ. संपत देसाई, प्रकाश मोरुस्कर, दशरथ घुरे, बाबू येडगे, शंकर पाटील, हरी सावंत, मारुती पाटील, भीमराव माधव, बाळू जाधव, श्रावण पवार, विष्णू मांजरेकर, नारायण भडांगे, विजय पाटील, मिनीन परेरा, एकनाथ खरुडे, श्रावण शेटगे, गोविंद पाटील(गावठाण) यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

निधन वार्ता
महादेव परीट

शिरसंगी येथील महादेव गोपाळ परीट ( वय ५१)यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, मुलगी, असा परिवार आहे.
गेली २५ वर्षे ते शिरसंगी परिसरात वैद्यकीय सेवा बजावत होते. डॉक्टर या नावानेच ते शिरसिंगी पंचक्रोशीत परिचित होते.
नरसिंग बुडके

सिरसंगी येथील रहिवासी नरसिंग बाळू बुडके वय (८६)यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, सुना, नातवंडे असा परिवार आहे.



