गटविकास अधिकाऱ्यांना काळे फासणे पडले महागात… विलास जोशिलकर याला तीन महिन्यांची कैद
आजऱ्यातील तत्कालीन गटविकास अधिकारी आकाप्पा कांबळे यांच्या अंगावर काळे फासून शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी मेंढोली (ता. आजरा) येथील विलास जोशीलकर याला तीन महिन्यांची साधी कैद व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. गडहिंग्लज येथील सहायक सत्र न्यायाधिश ए. आर. उबाळे यांनी ही शिक्षा सुनावली. या प्रकरणातील संदीप प्रकाश जाधव, शंकर राजाराम घेवडे, अरुण शंकर आजगेकर, संतोष मधुकर सुतार, गोविंद विठोबा बोलके, सचिन लक्ष्मण गुडूळकर, रवींद्र शंकर तळेवाडीकर, लखन प्रकाश जाधव यांची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता झाली आहे.
आजऱ्याचे तत्कालीन गटविकास अधिकारी आकाप्पा कांबळे १६ ऑगस्ट २०१६ ला लोकशाही दिनानिमित्त तहसील कार्यालयात उपस्थित होते. विलास जोशिलकर याने मोबाईलवरुन संपर्क साधून त्यांना पंचायत समितीत बोलवून घेतले. जोशिलकर याने १५ ऑगस्टची ग्रामसभा का घेतली नाही अशी विचारणा केली. यावर श्री. कांबळे यांनी ग्रामसेवकांनी ग्रामसभेवर
बहिष्कार टाकलेला असल्याने ग्रामसेवकांच्या अनुपस्थितीत सचिव नेमण्याचे अधिकार संबंधित सरपंचांना असल्याचे सांगितले. मात्र, जोशिलकर याने वाद घालत काळपट रंगाची पूड अंगावर टाकून शासकीय कामात अडथळा आणला. आजरा पोलिसात याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता.………
कोळींद्रे येथे मारामारी प्रकरणी दोघाविरोधात गुन्हा नोंद.
कोळिंद्रे (ता.आजरा)येथील शिवाजी दत्तू पाटील, विष्णू मारुती पाटील यांनी सौ.उषा नाना पाटील व त्यांच्या पतीला शिवीगाळ करून मारहाण केल्याप्रकरणी पोलिसांनी दोघांविरोधात गुन्हा नोंद केला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की शिवाजी पाटील, विष्णू पाटील व उषा पाटील या एकमेकांच्या भाऊबंद आहेत त्यांच्या मिळकत नंबर १५ मधील पायवाटेच्या कारणावरून वाद आहेत. दरम्यान शनिवार दिनांक ५ रोजी सौ. पाटील व त्यांचे पती घरी असताना शिवाजी पाटील व विष्णु पाटील यांनी घरातील लाईट बंद करून घरात घुसून दोघांना धक्काबुक्की, शिवीगाळ करत ठार मारण्याची धमकी दिली. त्यांच्या दारातील पाण्याची टाकी फोडून पाण्याची मोटर व स्कुटीचीही कोयत्याने तोडफोड करून नुकसान केले अशी फिर्याद सौ.पाटील यांनी आजरा पोलिसात दिली आहे. या फिर्यादीवरून दोघांविरोधात गुन्हा नोंद केला आहे.
…..
आनंदी कांबळे यांचे निधन…
येथील बसस्थानकाचे सेवानिवृत्त नियंत्रक श्री. एम्. ए. कांबळे यांच्या पत्नी आनंदी मारुती कांबळे (वय वर्षे ६७) रा. बुरुडे यांचे काल प्रदीर्घ आजाराने निधन झाले . त्या मोरेवाडी येथील प्राथमिक शिक्षिका प्रीती कांबळे व रवळनाथ प्राथ. च्या अध्यापिका निलांबरी कांबळे( कामत) , तसेच गडहिंग्लज येथील पोलीस हवालदार युवराज कांबळे यांच्या त्या मातोश्री होत. त्यांच्या पश्चात दोन विवाहित मुले, सुना , नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन रविवार दि. ६ रोजी आहे सोमवार दि. १४ फेब्रुवारी २०२२ रोजी दिवस कार्य व फोटो पूजन आहे.







