शरद शेट्टी यांचे निधन
आजरा येथील ज्येष्ठ व्यापारी शरद सातापा शेट्टी यांचे अल्पशा आजाराने सोमवारी रात्री १ वाजता निधन झाले. निधन समयी त्यांचे वय ५६ वर्षे इतके होते. गडहिंग्लज तालुक्यातील कौलगे हे मूळ गाव असणाऱ्या शेट्टी यांनी ‘आजरा बझार ‘ नावाने आजरा शहरात आपला व्यवसाय सुरु केला. अल्पावधीतच त्यांचा हा व्यवसाय नावारूपास आला. मनमिळाऊ स्वभावाचे शेट्टी यांच्या पश्चात पत्नी ,मुलगा, दोन विवाहित मुली असा परिवार आहे.
सैन्यदलात मुले असणारा बाप बसणार तहसील कार्यालयासमोर उपोषणाला …
शासनाकडे वेळोवेळी मागणी करूनही व शासनाचे आदेश होऊनही त्याचा अंमल होत नाही. एकीकडे आपली तीन मुले सैन्यदलात सेवा बजावत असताना स्थानिक प्रशासनाकडून मात्र आपली हेळसांड होत असल्याचा आरोप करत मडिलगे (ता. आजरा) येथील रावसाहेब दत्तू येसणे यांनी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून तहसील कार्यालयासमोर सहकुटुंब उपोषणाला बसण्याचा इशारा दिला आहे.
येसणे हे मडिलगे येथील कायमचे रहिवाशी असून सदर गावी त्यांची वडीलार्जीत मालकी हक्काची शेतजमीन मिळकत आहे.मौजे मडीलगे ता. आजरा येथील जमीन यास गट नं. ११३ ही जमीन त्यांचे प्रत्यक्ष कब्जे वहिवाटीस असुन उक्त क्षेत्रामध्ये मला वहिवाटीसाठी रस्ता नसलेबाबत मा. तहसिलदार यांचेकडे अर्ज केला होता. त्यावर आवश्यक त्या चौकशीअंती रस्ता सोडणेबाबत आदेश दिलेला आहे. परंतु सदर आदेशानंतर देखील प्रत्यक्ष जागेवर त्याचा अंमल झालेला नाही. आदेश मिळाले नंतर त्यानी वारंवार आवश्यक त्या ठिकाणी संयमित पाठपुरावा करून देखील आजअखेर त्याना न्याय मिळालेला नाही. यंत्रणेमधील प्रत्येक व्यक्ती आजपर्यंत त्यांना सहकार्य करणेऐवजी टाळाटाळ करीत आहेत असा आरोपही त्यांनी केला आहे.या सर्व प्रकाराला कंटाळुन ते व पत्नीसह येत्या २६ जानेवारी २०२२ पासुन तहसिलदार आजरा यांचे कार्यालयासमोर उपोषणास बसणेचा निर्णय घेतलेला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. येसणे यांची तीन मुले सैन्यदलात विविध ठिकाणी विविध हुद्द्यावर कामाला आहेत. त्यांच्या या इशाऱ्याने प्रशासकीय यंत्रणा खडबडून जागी झाली आहे.
……..
संकेश्वर-आंबोली मार्गावरील खड्डे तातडीने बुजवावेत… अन्यथा आंदोलनाचा सेनेचा इशारा.

सकेश्वर-आंबोली हा राज्य महामार्ग केंद्र व महाराष्ट्र शासनाने सार्वजनिक बांधकाम विभागाकडून महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडे वर्ग करणेत आला आहे. या मार्गावर लहान व मोठे खड्डे पडले आहेत. शिवसेनेने निवेदन दिल्यानंतर खड्ड्याचे पॅचवर्क करणेची निवीदा प्रसिध्द केली व खड्डे भरणेचे काम सुरु केले. परंतु ते काम दर्जाहिन झालेने परत खड्डे पडले आहेत.
संकेश्वर, गडहिंग्लज, आजरा, आंबोली, सावंतवाडी चौपदरी रस्ता मंजूर झाला आहे. पण अद्यापही निवीदा प्रसिध्द झालेली नाही. त्यामुळे रस्ता मेंटनन्स करणेची सर्वस्वी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाची जबाबदारी आहे. प्रथम दर्जाचे खड्डे भरणेचे काम पेव्हर पध्दतीने त्वरीत सुरु करावे व संकेश्वर- सावंतवाडी नवीन मार्गाचे काम त्वरीत सुरु करावे. अन्यथा शिवसेनेकडून शुक्रवार २८ रोजी १२.०० वाजता आजरा कार्यालयावर “धडक मोर्चा करण्यात येईल असा इशाराही देण्यात आला आहे. याबाबतचे लेखी निवेदन शिवसेना जिल्हाप्रमुख विजय देवणे यांनी महामंडळाचे अभियंता सांगावकर यांच्याकडे दिले आहे.
……….
कोरोना अपडेटस….
आजरा तालुक्यात आज तब्बल १८ रुग्णांची भर एकूण ३७ रुग्ण घेताहेत उपचार…
आजच्या बाधित रुग्णांमध्ये आजरा शहरातील दहा रुग्णांचा समावेश…
निधन वार्ता…मारुती तेजम
दर्डेवाडी( ता. आजरा) मारुती तेजम (वय ६८) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, दोन मुली, सुन, जावई नातवंडे असा परिवार आहे. येथील सामाजिक कार्यकर्ते सिद्धार्थ तेजम यांचे ते वडील होत.
मै तो रस्ते से जा रहा था…
ज्योतिप्रसाद सावंत
आता रस्ता म्हणजे आमच्यासारखे चारचाकी स्वार,दुचाकीस्वार व पादचा-यांकरीता करीता दळणवळण सुलभ व्हावे म्हणून शासनाने केलेली सोय. पण या रस्त्यावरून आता वाहने सोडाच चालणे देखील अवघड होऊन बसले आहे. जिथे जाल तिथे खड्ड्यांचे साम्राज्य. रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते हेदेखील कळेनासे झालेले आहे. गडहिंग्लज-आंबोली रस्त्याची तर पार दुर्दशा होऊन गेली आहे. दोन वर्षांनंतर आमचा कारखाना सुरू झाला. कारखान्याच्या ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांची गर्दी, गोव्याकडे जाणारी पर्यटकांची प्रचंड वाहतूक आणि भरीस भर म्हणून एसटीची झालेली दुरवस्था यामुळे आम्हाला आता स्वतःच्या दुचाकी किंवा चारचाकी शिवाय दुसरा पर्याय राहिलेला नाही. रात्रीचे सोडाच पण दिवसादेखील खड्डे चुकवण्याची कसरत करावी लागते. मागच्या सरकार मधले एक मंत्री म्हणत होते…’ खड्डे दाखवा आणि हजार रुपये मिळवा. ‘आता या सरकारने ‘खड्डा चुकवा आणि हजार रुपये मिळवा ‘ अशी घोषणा करायला काहीच हरकत नाही. आता हजार रुपये देतील काय नाही तो विषय नंतरचा.दिले कुणी आणी घेतले कुणी? पण घोषणा करायला काय हरकत ? तिकडे केंद्रातील मंत्री सांगत आहेत, माझ्याजवळ पैशाला तोटा नाही रस्ते चकचकीत झाले पाहिजेत. पण इथे ठेकेदार आणि अधिकाऱ्यांनी रस्त्यांचा पार धुरळा उडवून टाकला आहे. क्वालिटी कंट्रोल कडून जर रस्त्यांची तपासणी केली तर ठेकेदार ब्लॅकलिस्टमध्ये आणि अधिकारी घरी अशी अवस्था व्हायला फारसा वेळ लागणार नाही. रस्त्याला डांबरच नाही तर रस्ता टिकणार कसा ? लोकप्रतिनिधी टक्केवारीच्या मागे… अधिकारी कमिशनच्या मागे… सगळाच सावळा गोंधळ. बर हे तुमचं झालं. यामध्ये आम्हा वाहनधारकांचा काय दोष? रोड टॅक्स च्या नावाने तुम्ही आमच्याकडून पैसे काढून घेताच ना? आणि जरा कुठे रस्ता गुळगुळीत दिसत असेल तर तिथे तुमचा टोलनाका आलाच… वर्षानुवर्षे आम्ही टोल भरून घाईला आलो. बरं हा टोल आमच्या मानगुटीवरून कधी जाणार हे देखील आम्हाला समजनासं झालंय. प्रत्येक वेळी टोल वाढायलाच लागलाय. वास्तविक आता टोल थांबवा नाहीतर कमी तरी करा असे म्हणण्याची वेळ आली आहे. पेट्रोल, डिझेलचे दर वाढले.. टोलचे दर वाढले.. एसटी बंद… सर्वसामान्यांनी करायचं तरी काय? वडापने प्रवास करायचा म्हटलं तर ते लुटायला लागलेत. वीस-पंचवीस माणसं गाडीत कोंबून वडापच्या गाड्या रस्त्यावरून जाताना हाडांचा पार भुगा व्हायला लागला आहे. स्वतःची गाडी वापरायचं म्हटलं तर पेट्रोलपण घाला आणि गाडीच वाटोळंपण करून घ्या. रस्त्यांची दुरुस्ती जर जमत नसेल तर किमान रस्त्याशेजारी ठीकठिकाणी रुग्णवाहिकेंची तरी व्यवस्था करा. म्हणजे खड्डे चुकवताना वाहन चालक आडवा झाला तर लागलीच उपचार तरी मिळतील. आणि हो हे उपचार मोफत होण्याकरीता आवश्यक त्या यंत्रणाही सुसज्ज ठेवा. मुळातच आम्ही गाड्यांचे हप्ते आणि डिझेल ,पेट्रोल घालून घाईला आलोय. त्यामुळे दवाखान्याचा खर्च आम्हाला तरी परवडण्याजोगा आता नाही… बघा कसं जमतय…?








