

टोळ्यांच्या नावावर कारखान्याला चुना…
नव्या संचालक मंडळाकडून कारवाईच्या हालचाली

आजरा : प्रतिनिधी
एकीकडे आजरा साखर कारखाना आर्थिक दृष्ट्या अडचणीत असताना दुसरीकडे बोगस टोळ्या करून कारखान्याला चुना लावणारी मंडळी नूतन संचालक मंडळाच्या रडारवर असून यामध्ये बहुतांशी कामगारांचा समावेश आहे. टोळ्यांचे पैसे जमा करा… अन्यथा कारवाईला सामोरे जा… असा सज्जड दम देण्यास संचालकांनी सुरुवात केली आहे. यामुळे टोळ्यांच्या नावावर पैसे लाटणा-यांची चांगलीच गोची होणार असे दिसू लागले आहे.
कारखान्यावर कर्जाचा बोजा वाढला असताना मध्यप्रदेशातील तोडणी यंत्रणेच्या नावावर अनेकांनी भरमसाठ पैशाची उचल केली आहे. प्रत्यक्षात यावर्षी निम्म्याहून अधिक टोळ्या आल्या नसल्याचे स्पष्ट होत आहे. यामुळे निश्चितच या यंत्रणेने कारखान्याच्या गळीतावर मर्यादा आणल्या आहेतच पण त्याचबरोबर कारखान्याला चांगलेच आर्थिक अडचणीत आणले आहे हेही स्पष्ट होत आहे. लाखो रुपयांचा फटका या यंत्रणेच्या माध्यमातून कारखान्याला बसणार आहे.
नूतन संचालक मंडळाने ही बाब गांभीर्याने घेतली असून अशा बोगस टोळ्या करणाऱ्यांची यादी तयार केली असून असे टोळीधारक नूतन संचालक मंडळाच्या रडारवर असल्याचे समजते. एक तर कारखान्याला टोळ्या द्या अन्यथा कारखान्याचे पैसे परत करा अशी ठाम भूमिका घेतल्याने अशा टोळ्या करणाऱ्या मंडळींचे धाबे चांगलेच दणाणले आहे. यामध्ये कारखान्यातील काही कर्मचारी समाविष्ट असल्याचे समजते.


संचालकांनी पारदर्शी कारभारातून सभासदांचा विश्वास सार्थ ठरवावा :पालकमंत्री हसन मुश्रीफ
नूतन संचालक मंडळाचा कागलमध्ये सत्कार

आजरा: प्रतिनिधी
आजरा सहकारी साखर कारखाना पंचवार्षिक निवडणुकीमध्ये श्री. रवळनाथ शेतकरी विकास आघाडीचा ऐतिहासिक विजय झाला. विजयाची सर्व श्रेय शेतकरी सभासदांचे आहे. नूतन संचालकांनी पारदर्शी कारभारातून सभासदांचा विश्वास सार्थ ठरवावा, असे आवाहन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. शेतकरी सभासदांनी या आघाडीवर विश्वास ठेवल्यामुळेच एवढा मोठा ऐतिहासिक विजय झाला, असेही ते म्हणाले.
कागलमध्ये आजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या नूतन संचालक मंडळाचा सत्कार पालकमंत्री मुश्रीफ यांच्या हस्ते झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दिगंबर देसाई होते.
मंत्री मुश्रीफ पुढे म्हणाले, आज-याचे माजी आमदार स्व. वसंतराव देसाई यांनी अत्यंत खडतर आणि प्रतिकूल परिस्थितीत या कारखान्याची उभारणी केली होती. निवडणूक बिनविरोध व्हावी असे वाटत असतानाच विरोधकांनी ही निवडणूक लादली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पेटून उठलेल्या कार्यकर्त्यांनी जीवाचं रान करीत हाडाची काडं आणि रक्ताचं पाणी केलं.
केडीसीसीचे संचालक सुधीर देसाई म्हणाले, निवडणूक बिनविरोध व्हावी असे वाटत असतानाच चुकीची माणसं आत घालण्याला आम्ही विरोध केला. त्यानंतर पालकमंत्री मुश्रीफ यांच्या नेतृत्वावर सभासदांनी फार मोठा विश्वास व्यक्त केला.
माजी जिल्हा परिषद सदस्य वसंतराव धुरे म्हणाले, पालकमंत्री ना. हसन मुश्रीफ यांनी या निवडणुकीत आम्हाला हिंमत आणि ताकद दिली. नेता कसा असावा याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे पालकमंत्री हसन मुश्रीफ आहेत. नागपूर अधिवेशनातून ते चारवेळा प्रचारासाठी आज-याला आले.
दिगंबर देसाई म्हणाले, विरोधी आघाडीचे प्रमुख अशोकअण्णा चराटी यांच्या नेतृत्वाखाली मी १२ वर्षे काम केले आहे. अवघे साडेतीन कोटी या कारखान्याचे कर्ज राहिले होते. परंतु; त्यांच्या आडमुठेपणामुळे तो बोजा ७० कोटींवर गेला. त्यांच्या वाचाळ आणि उद्धटपणामुळेच या कारखान्याची वाताहात झाली.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष विकासराव पाटील, शहराध्यक्ष संजय चितारी, माजी उपनगराध्यक्ष सतीश घाटगे, बाबासो नाईक, सौरभ पाटील, विवेक लोटे, नेताजी मोरे, अस्लम मुजावर , संग्राम गुरव, अमित पिष्टे, वसंतराव धुरे, मारुतीराव घोरपडे, दीपक देसाई, मुकुंद देसाई, सुभाषराव देसाई, शिवाजीराव नांदवडेकर, उदयसिंह पोवार, रणजीत देसाई, गोविंद पाटील, मधुकर देसाई, राजेश जोशीलकर, राजेंद्र मुरुक्टे, अनिल फडके, विजय केसरकर, संभाजीराव पाटील, काशिनाथ तेली, हरिभाऊ कांबळे, सौ. रचना होलम, सौ. मनीषा देसाई, नामदेवराव नार्वेकर आदी प्रमुख उपस्थित होते.


बनावट आधार कार्ड प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाई करावी
श्री चाळोबा देव विकास आघाडीच्या उमेदवारांची मागणी

आजरा : प्रतिनिधी
आजरा शेतकरी सहकारी साखर कारखाना निवडणुकीमध्ये बनावट आधारकार्ड छापून त्याचा उपयोग मतदानासाठी करत असताना मडीलगे येथील बूथ क्र. १८ वर तीन जणांना पकडण्यात आले त्यावर पोलिसांमार्फत कारवाई सुरू आहे.
परंतू संपूर्ण निवडणूक प्रक्रियेमध्ये बरेच बनावट आधारकार्डांचा वापर करून बोगस मतदान झाले बाबतची माहिती संबंधित आरोपींनी दिलेली असून कारवाई केलेल्या तीनही आरोपींनी मतदान प्रतिनिधी व उपस्थित असलेल्या पोलिसांच्या तसेच इतर मतदारांच्या समोर जवळ जवळ ३५० ते ४०० बनावट आधारकार्ड तयार करून त्याचा उपयोग कारखान्याच्या निवडणुकीमध्ये बोगस मतदानासाठी केले असलेचे सर्वासमक्ष कबुल केले आहे. त्यांचेकडे बनावट आधारकार्ड व त्यांची खरी आधारकार्ड सर्वांसमक्ष पोलिसांकडे सुपूर्द केली आहेत व कबुली मतदान प्रतिनिधी, उपस्थित पोलिस व मतदारांच्या समोर दिली आहे. त्यामुळे पोलिस स्टेशनकडे नोंद असलेल्या गुन्ह्याचा सखोल तपास करून आरोपीकडे बनावट आधारकार्ड कशी आली? ती कुठे तयार केली? त्यासाठी कोणती यंत्रणा वापरली? त्यामध्ये कोण कोण सहभागी होते त्या सर्वांवर कायदेशीर कारवाई करणे गरजेचे आहे.
सदरचा गुन्हा हा भविष्यात वेगवेगळे गुन्हे घडण्यासाठी कारणीभूत ठरणार असल्यामुळे सदर आरोपींच्यावरती भा.दं. वी. स. कलम ४६५,४६३ , ४६४,४६८, ४६७,४२०, ३४ अंतर्गत वाढ करणेत यावी अशी मागणी सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील हारुगडे यांच्याकडे करण्यात आली आहे.
याबाबतच्या निवेदनावर आघाडीच्या सर्व उमेदवारांच्या सह्या आहेत.


आजऱ्यात पोलिसांचे संचलन

आजरा : प्रतिनिधी
मराठा आरक्षण, अंगणवाडी सेविकांचे आंदोलन, नाताळ,वर्षाखेर या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने आजरा पोलीस अलर्ट मोडवर आले असून आजरा शहरात पोलिसांनी संचलन केले.
सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील हारुगडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेल्या या संचलनामध्ये एक अधिकारी, १९ पोलीस अंमलदार, दोन सरकारी वाहने, एक अग्निशमन आणि आणीबाणी प्रतिबंधक वाहन, दोन अश्रुधूर, दोन अग्निशस्त्र व दोन गॅसगनधारक पोलिस रुग्णवाहिका यांचा समावेश करण्यात आला होता.
आजरा बस स्थानकावर पोलिसांच्या वतीने आणीबाणी प्रतिबंधक व दंगल नियंत्रण प्रात्यक्षिके करून दाखवण्यात आली.


विविध मार्गावर बस फेऱ्या सुरू करा
आगार प्रमुखांकडे मागणी

आजरा: प्रतिनिधी
आजरा -कोल्हापूर, पेरणोली, कडगाव, गारगोटी, बिद्री, मार्गे व आजरा पणजी, मडगाव चंदगड दोडामार्ग, म्हापसा पणजी -वास्को एस.टी. सुरु करावी अशी मागणी अखिल भारतीय जनहित पार्टीच्या वतीने करण्यात आली आहे.
आजरा हे तालुक्याचे ठिकाण असून गोवा- कोकणला जोडणारे मुख्य ठिकाण असून आजरा येथील स्टँडवरुण राज्यात अनेक ठिकाणी गाड्या सोडल्या जातात पण तालुक्यातून वरील दोन मार्गावर एकही गाडी नाही. आजरा ते कोल्हापूर जाताना मध्ये कर्नाटक लागते त्यामुळे महाराष्ट्र सरकारने महिला व जेष्ठ नागरिकांना दिलेली सवलत कर्नाटक पट्यात घेता येत नाही. तेथे तिकीट आकारणी केली जाते. तसेच आदमापुर येथे बाळूमामा दर्शनाला जाणारे भक्त किंवा करवीर, राधानगरी येथे जाणारे प्रवासी प्रांत कार्यालयात कामासाठी जाणारे लोक यांना एकही गाडी नाही. गाडी बदलत त्यांना जावे लागते. तरी या मार्गावर ज्यादाची एक गाडी सोडून प्रवाशांची सोय करावी गाडी सकाळी सोडून त्याच मार्गे परत यावी.
तसेच गोवा येथे अनेक तरुण कामासाठी आजरा येथून गेले आहेत. त्यांचे कायम गावी येणे -जाणे असते परंतु या मार्गावर एकही गाडी नाही,त्यामुळे त्यांना गावी येणे जाणे अवघड होते. तसेच येथील ख्रिश्चन समाज, मराठा / वैश्यवाणी / ब्राम्हण यांचे नातेवाईक या भागात आहेत. त्यांना जाणे-येणे फार मोठ्या वळणाचे फेरे मारून करावे लागत आहे तरी या मार्गावर ही गाडी सुरू करावी सकाळचे वेळी या मार्गावर गाडी सोडून ती परत सायंकाळी / रात्री येथे परत यावी.
वरील मार्गावर प्रवासी वाहतुकीसाठी कोणतीही स्पर्धा (वडाप /खाजगी वाहतूक) नाही. त्यामुळे यामार्गावर एस.टी. वाहतूक फायदेशीर होणार आहे. याचा विचार करून गाड्या सोडणेत याव्यात अशी मागणी करण्यात आली आहे.
याबाबतच्या निवेदनावर प्रभाकर कोरवी यांच्यासह कार्यकर्त्यांच्या सह्या आहेत


सह्याद्री समजून घेतल्याशिवाय शिवचरित्र समजणार नाही’:डॉ.अमर आडके

आजरा : प्रतिनिधी
आपलं व मातीचं तुटलेलं नातं जोडण्यासाठी सह्याद्री व किल्ल्यावर जावं लागेल, सह्याद्री समजून घेतल्याशिवाय शिवचरित्र समजणार नाही असे स्पष्ट प्रतिपादन दुर्ग अभ्यासक डॉ. अमर आडके यांनी केले. ते आजरा येथील श्रीमंत गंगामाई वाचन मंदिरच्या व्याख्यानमालेत ‘ सह्याद्री, स्वराज्य आणि शिवराय या विषयावर बोलत होते. अध्यक्षस्थानी वाचनालयाचे अध्यक्ष डॉ. अशोक बाचुळकर होते.
अफजलखानाचा वध शाहिस्तेखानाची बोटे तोडली व शिवराज्याभिषेक म्हणजे शिवचरित्र आहे का? असा सवाल डॉ. आडके यांनी केला. सह्याद्री व शिवचरित्र देऊन जिवंत ठेवणारी माणसं आजही जिवंत आहेत. सह्याद्रीच्या दऱ्या खो-यात छत्रपती शिवाजी महाराज यांना मावळ्यांच्या रुपात सापडलेली माणसं म्हणजे रत्ने आहेत. शिवचरित्र गंभीर नाही पण ते समजून घ्या. शिवचरित्र इतके मोठे आहे त्याला अन्य कोणत्या शब्दाची गरज नाही व ते शब्दात पकडताही येत नाही इतके छत्रपती शिवाजी महाराज मोठे आहेत. त्यासाठी गडकोटांच्या सह्याद्री व किल्ले फिरले पाहिजेत. आपण सह्याद्री व गडकोट किल्ले फिरू शकलो नाही तर आपण करंटे आहोत असेही डॉ. आडके म्हणाले.
औरंगजेबाच्या दरबारात छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज या दोघांचा आवाज घुमला. त्यामुळेच ते सह्याद्रीच्या शिखरांवरचे राजे आहेत असेही डॉ. अमर आडके यांनी सांगितले.
यावेळी वाचनालयाचे पदाधिकारी व शहरवासीय उपस्थित होते.


तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात पार्वती शंकर विद्यालय, उत्तूरचा डंका

आजरा: प्रतिनिधी
आजरा तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन पंचायत समिती आजरा व बापूसाहेब सरदेसाई आदर्श हायस्कूल गवसे याच्या संयुक्त विद्यमाने पार पडले.या प्रदर्शनाचा पारितोषिक वितरण समारंभ नुकताच पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जनता एज्युकेशन सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ अनिल देशपांडे होते.
उद्घाटनानंतर द्वितीय सत्रात प्राचार्य कल्याणराव पुजारी गडहिंग्लज यांचें व्याख्यान झाले तर विज्ञान प्रश्नमंजुषा स्पर्धा संपन्न झाली. तिसऱ्या दिवशी पारितोषिक वितरण समारंभ मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाला
विज्ञान प्रदर्शनाचा निकाल पुढीलप्रमाणे
प्राथमिक गट विद्यार्थी
प्रथम- साईश योगेश आमनगी,पार्वती शंकर विद्यालय उत्तूर
व्दितीय -वेदांग विद्याधर शिदें/ यशराज कुणाल पोतदार व्यंकटराव हायस्कूल, आजरा
तृतीय -संस्कार किरण कांबळे, रोझरी इंग्लिश स्कूल आजरा
प्राथमिक विभाग शिक्षक
प्रथम -सुनिल पांडूरंग कामत, विद्यामंदिर वाटंगी
व्दितीय -दशरथ शामराव कांबळे, विद्यामंदिर दाभिल
तृतीय -विठोबा लक्ष्मण शेवाळे, विद्या मंदिर कोवाड
माध्यमिक विभाग विद्यार्थी
प्रथम – आदित्य मारुती पाटील, पार्वती शंकर विद्यालय उत्तूर
व्दितीय -वेंदात वसंत नरके व अभिजित लक्ष्मण सावंत,पंडित दिनदयाळ आजरा
तृतीय -तुषार चंद्रकांत कांबळे व रुपेश राजेंद्र कांबळे ,आजरा महाविद्यालय आजरा
माध्यमिक विभाग शिक्षक
प्रथम -रोहिता विवेक सावंत, आजरा हायस्कूल आजरा
व्दितीय -किरण केरु कांबळे, आजरा हायस्कूल आजरा
तृतीय -सुनिल मारुती चव्हाण ,केदारी रेडेकर हायस्कूल पेद्रेवाडी
प्रयोग शाळा परिचर
प्रथम -इम्रानखान आसदखान जामदार, उत्तूर विद्यालय उत्तूर
व्दितीय -नरसिंह जोतिबा परीट, राजाभाऊ केसरकर हायस्कूल, निगुडगे
प्राथमिक विभाग प्रश्नमंजुषा
प्रथम क्रमांक -कन्या विद्यामंदिर, उत्तूर
व्दितीय क्रमांक- व्यंकटराव हायस्कूल आजरा
तृतीय क्रमांक. आजरा हायस्कूल आजरा
माध्यमिक विभाग प्रश्नमंजुषा
प्रथम क्रमांक- पार्वती शंकर विद्यालय उत्तूर
व्दितीय क्रमांक- आजरा हायस्कूल आजरा
तृतीय क्रमांक- आप्पासाहेब गायकवाड हायस्कूल महागोंड
सदर कार्यक्रमास संस्थेचे संचालक के. व्ही. येसणे,अनिकेत चराटी,गवसेच्या सरपंच सौ. रेखा पाटील, विस्तार अधिकारी विलास पाटील, पेरणोली सरपंच सौ. प्रियांका जाधव, शिवाजी पाटील, मारुती मुगुटकर ,आय. टी. आय.चे प्राचार्य दिग्विजय भूतल सर्व प्राथमिक माध्यमिक शाळाचे मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते.


खासदार निलंबनाच्या निषेधार्थ शिवसेनेची आज निदर्शने

आजरा : प्रतिनिधी
आज शुक्रवार दि २२ डिसेंबर रोजी दुपारी साडेअकरा वाजता संभाजी महाराज चौक येथे शिवसेनेच्या ( उ.बा.ठा.) वतीने भाजप सरकारने केलेल्या खासदार निलंबना विरोधात निदर्शन करण्यात येणार आहेत तरी सर्व शिवसेना पदाधिकारी ,युवासेना ,महिला आघाडी व शिवसैनिक यांनी उपस्थित रहावे असे आवाहन तालुका प्रमुख युवराज पोवार यांनी केले आहे.




