गुरुवार १३ नोव्हेंबर २०२५


‘त्याला’ पोलीस कोठडी

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
जीवे मारण्याची धमकी देऊन महिलेच्या पतीच्या आजारपणाचा फायदा उठवत महिलेला जीवे मारण्यासह तिचे अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन महिलेवर अत्याचार केल्याप्रकरणी किटवडे ता. आजरा येथील विठ्ठल रामलिंग पाटील याला न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक नागेश यमगर यांनी दिली.
संशयित विठ्ठल पाटील याने पीडित महिलेवर आंबोली ,कोल्हापूर तसेच त्याच्या राहत्या घरी वारंवार अत्याचार केल्याची फिर्याद पीडित महिलेने दिल्यानंतर पोलिसांनी त्याच्या विरोधात गुन्हा नोंद केला आहे. याप्रकरणी फॉरेन्सिक लॅबचे पथकही दाखल झाले आहे.
आजरा न्यायालयासमोर त्याला हजर केले असता तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
नगराध्यक्ष पदाचा तिढा सुटेना…
चराटी विरोधी आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता…

नगराध्यक्ष पदाचे प्रमुख दावेदार व ताराराणी आघाडीचे प्रमुख अशोकअण्णा चराटी यांच्या विरोधात गेल्या कांही दिवसांपासून सर्वपक्षीय एकवटले आहेत. परंतु नगराध्यक्ष पदासह कांही नगरसेवक पदांच्या जागांचा तिढा अद्याप सुटला नसल्याने या आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता आता निर्माण झाली आहे.
नगराध्यक्षपदासाठी या आघाडीतून अबूताहेर तकिलदार, संजयभाऊ सावंत, डॉ. श्रद्धानंद ठाकूर , परशुराम बामणे,सुधीर कुंभार यांची नावे चर्चेत आहेत. यावर काल रात्रीपर्यंत एकमत झाले नव्हते. परिस्थिती अशीच राहिल्यास आज सायंकाळपर्यंत धक्कादायक हालचाली होण्याची शक्यता आहे. दरम्यान उमेदवारी अर्ज करण्याच्या तिसऱ्या दिवशीही एकही अर्ज आला नसल्याचे निवडणूक विभागाच्या वतीने सांगण्यात आले.
आघाडीची रचना विरोधकांकडून केली जात असली तरीही त्यामध्ये होणारा विलंब अनेक गोष्टी अधोरेखित करीत आहे. काही मंडळींनी ही आघाडीच ‘हायजॅक’ केल्याने आघाडीचे अधिकृत उमेदवार जाहीर होण्यास विलंब होत असण्याबरोबरच नगराध्यक्षपदाचा उमेदवार ठरवण्यात अडचणी येत असल्याची चर्चाही आता होऊ लागली आहे.
या सर्व घडामोडीत राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुक्यातील सर्वेसर्वा आजरा कारखान्याचे अध्यक्ष मुकुंदराव देसाई यांनी आपली भूमिका जाहीर केलेली नाही. त्यांच्या भूमिकेवरही दोन्ही आघाड्यांच्या उमेदवाऱ्या अवलंबून आहेत.
ही परिस्थिती अशीच राहिल्यास चराटी विरोधी आघाडीमध्ये बिघाडी होण्याची शक्यता अधिक दिसू लागली आहे. यामुळे नवीन चाचपणी घटक पक्ष व गटांनी सुरू केली असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.

संतोष चौगले यांची निवड

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
संजय गांधी निराधार योजना आजरा तालुका समितीच्या सदस्यपदी शिरसंगी तालुका आजरा येथील संतोष चौगले यांची निवड करण्यात आली आहे.
चौगले हे आमदार शिवाजीराव पाटील यांचे कट्टर समर्थक आहेत. त्यांच्या या निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

“एसजीएम जीनियस कॉम्पिटिशन” या स्पर्धेत आजरा हायस्कूलचे यश

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
संत गजानन महाराज रुरल पॉलिटेक्निक, महागाव यांच्या वतीने घेण्यात आलेल्या “एसजीएम जीनियस कॉम्पिटिशन” या स्पर्धेत आजरा हायस्कूल येथील विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे.
या स्पर्धेत आजरा, गडहिंग्लज व चंदगड या तीन तालुक्यांतील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. त्यामध्ये आजरा हायस्कूल च्या इयत्ता दहावी (ड) मधील आर्यन सबनीस आणि प्रज्वल ढेकळे या दोन्ही विद्यार्थ्यांनी द्वितीय क्रमांक मिळविला आहे.या विजेत्या विद्यार्थ्यांना रोख तीन हजार रुपये, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. विद्यार्थ्यांना सौ. व्ही.एन.यादव यांचे मार्गदर्शन लाभले.
या यशाबद्दल मुख्याध्यापक ए.एल.तोडकर, उपमुख्याध्यापक सौ.एच.एस. कामत व पर्यवेक्षक ए.आर. व्हसकोटी यांनी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले.

वृक्ष पुनर्रलागवड प्रकरणी ‘संवेदना’ आक्रमक

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
हलकर्णी – महागाव – वाटंगी फाटा ते चंदगड राज्यमार्ग रस्ता रुंदीकरण करण्यापूर्वी होणाऱ्या संभाव्य वृक्षतोडीच्या पार्श्वभूमीवर तातडीने वनविभाग, सार्वजनिक बांधकाम, महसूल विभाग व निसर्गप्रेमी संघटनांची संयुक्त बैठक बोलवावी अशी मागणी संवेदना फाउंडेशनच्या वतीने तहसीलदार आजरा यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
यापूर्वी संकेश्वर – बांदा रस्ता रुंदीकरण कामांमध्ये रस्त्यात न येणारी झाडेही तोडण्यात आली आहेत. शंभर ते दीडशे वर्षाची पर्यावरण उपयुक्त अशी वड, पिंपळ, आंबा, किंजळ यासारखी झाडे अनधिकृतपणे तोडून तिथे पुन्हा लागवड करण्यात आलेली नाही. रस्ता रुंदीकरणाच्या दरम्यान होणाऱ्या वृक्षतोडीमुळे होणारे पर्यावरणीय नुकसान व जागतिक तापमान वाढ अशा गंभीर समस्यांची भरपाई कशाप्रकारे केली जाणार त्याची संबंधितांनी भूमिका स्पष्ट करावी असेही या निवेदनात म्हंटले आहे.
यावेळी अण्णा पाटील,संतराम केसरकर, डॉ. धनाजी राणे यांच्यासह संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.

शिवसेना उबाठाच्या शेतकरी सेना अध्यक्षपदी दिनेश कांबळे

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या आजरा तालुका शेतकरी सेनेच्या अध्यक्षपदी दिनेश कांबळे यांची पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशाने निवड करण्यात आली आहे .
यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख श्री संभाजी पाटील यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. शिवसेना तालुकाप्रमुख युवराज पोवार, प्रदीप पाचवडेकर, अमित गुरव, भिकाजी विभुते व इतर शिवसैनिक उपस्थित होते.

निधन वार्ता
मारुती घेवडे

उत्तूर ता.आजरा येथील मारुती धोंडीबा घेवडे (वय ७८ वर्षे ) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.
एक कुशल शेतकरी म्हणून त्यांची ओळख होती.
त्यांच्या पश्चात पत्नी,एक मुलगा, चार मुली, सुना, जावई नातवंडे असा परिवार आहे.
रक्षा विसर्जन आज गुरुवार दिनांक १४ नोव्हेंबर रोजी सकाळी नऊ वाजता होणार आहे.
बायजाबाई वाके

कोळिंद्रे ता. आजरा येथील बायजाबाई चाळू वाके (वय १०० वर्षे) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.
त्यांच्या मागे तीन मुले, तीन मुली, सुना, नातवंडे, परतवंडे असा मोठा परिवार आहे.
रक्षाविसर्जन आज गुरूवारी (ता. १३) सकाळी नऊ वाजता आहे. कोळिंद्रेचे माजी उपसरपंच विष्णू वाके व बांधकाम व्यावसायिक दत्ता वाके यांच्या त्या आई होत.


