शुक्रवार १४ नोव्हेंबर २०२५



उत्तुर येथील तरुण हॉटेल उद्योजकाची आत्महत्या

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
उत्तुर तालुका आजरा येथील प्रमोद नामदेव महाजन या ३२ वर्षीय हॉटेल उद्योजकाने कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.
याबाबत पोलिसातून मिळालेली माहिती अशी की प्रमोद महाजन याने दहा नोव्हेंबर रोजी आपल्या राहत्या घरी घरगुती वादातून विष प्राशन केल्याने त्यांना उपचाराकरता गडहिंग्लज येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असतानाच त्यांचा काल गुरुवारी पहाटे सव्वाचार वाजण्याच्या सुमारास मृत्यू झाला. याबाबतची वर्दी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी पोलिसात दिली असून पोलीस पुढील तपास करीत आहेत.
उत्तुर येथील हॉटेल तडका या नावाने व्यवसाय करणाऱ्या प्रमोद यांच्या निधनाने उत्तुर पंचक्रोशीत हळहळ व्यक्त होत आहे.

राजा मनाचा “सम्राट’
अशोकअण्णा

ज्योतिप्रसाद सावंत
आजरा तालुक्याच्या राजकीय, सामाजिक व शैक्षणिक पटलावरील धडाडीचा कार्यकर्ता म्हणून अण्णाभाऊ संस्था समूहाचे अध्यक्ष अशोकअण्णा चराटी यांची संपूर्ण जिल्ह्याला ओळख आहे.
काशिनाथण्णा चराटी, माधवराव देशपांडे यांच्या पश्चात अण्णाभाऊ संस्था समूहाची जबाबदारी अशोकअण्णा चराटी यांच्याकडे आली. माणसे हाताळण्याचे कौशल्य असणाऱ्या अशोकअण्णांनी ही जबाबदारी अत्यंत लीलया पेलली. केवळ अण्णाभाऊ संस्था समूहच नव्हे तर आजरा साखर कारखाना, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, कृषी उत्पन्न बाजार समिती येथेही त्यांनी आपल्या कामाची छाप पाडली. सडेतोड बोलणे व धडाडीचे निर्णय घेणे यात त्यांचा विशेष हातखंडा राहिला आहे. अशक्य ते शक्य करून दाखवणार व पटेल तेच बोलणार अशी त्यांची वेगळी ओळखही अल्पावधीत निर्माण झाली. आपल्या सहकाऱ्यांच्या साथीने त्यांनी अण्णाभाऊ संस्था समूहाला वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले आहे. जनता शिक्षण संस्था असो आजरा अर्बन बँक असो अथवा अण्णाभाऊ सूतगिरणी असो सर्व संस्थांची नावे त्या त्या क्षेत्रामध्ये मोठ्या अदबीने घेतली जातात यातून चराटी यांचे संस्थात्मक नेतृत्व सिद्ध झाले आहे.
शहराच्या विकासाचा आराखडा घेऊन आजरा ते मुंबई मंत्रालयाच्या वाऱ्या करणे केवळ चराटी यांना शक्य आहे. वयाची साठी ओलांडल्यानंतरही त्यांचा समाजसेवेचा सुरू असणारा हा अखंड वसा तालुक्यातील तरुणांच्या दृष्टीने निश्चितच दीपस्तंभ म्हणावा लागेल.
अशा या ‘राजा’ मनाच्या सम्राट अशोक अण्णांना वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा…!
अण्णा, शतायुषी व्हा…

आईच्या निधनानंतर पंधरा दिवसातच मुलाचाही मृत्यू

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
होन्याळी ता. आजरा येथील साठ वर्षीय आनंदी संतराम शेंडे यांचे महिनाभरापूर्वी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्यानंतर बुधवारी मुलगा अनिल शांताराम शेंडे ( वय ३६ वर्षे ) याचेही अल्पशा आजाराने निधन झाले.
महिनाभरातच आई व मुलाचे निधन झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. अनिल याच्या पश्चात वडील, भाऊ, भावजय असा परिवार आहे. 
नगराध्यक्षपदासाठी तीन तर नगरसेवकसाठी चार अर्ज दाखल

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी गुरुवारी चौथ्या दिवशी नगराध्यक्ष पदासाठी तीन तर नगरसेवक पदासाठी चार असे एकूण सात अर्ज दाखल झाले आहेत.
पहिल्या तीन दिवसात एकही अर्ज दाखल झाला नव्हता. गुरुवारी नगराध्यक्ष पदासाठी मंजूर मुजावर, अंजीरेआलम आबूताहेर तकीलदार, अमानुल्ला आगलावे तर नगरसेवक पदासाठी प्रभाग क्रमांक तीन मधून सुमैय्या खेडेकर, प्रभाग सहा मधून साधना मुरुकटे, प्रभाग बारामधून समीर गुंजाटी तर प्रभाग चौदा मधून सूर्यकांत नार्वेकर यांनी अर्ज दाखल केले आहेत.
आघाड्यांबाबत संभ्रमावस्था कायम
एकीकडे इच्छुकांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात केली असली तरीही अद्याप आघाड्यांनी अधिकृत उमेदवाऱ्या जाहीर केलेल्या नाहीत.

नगरपंचायत निवडणुकीत ताकदीने उतरण्याचा वंचित बहुजन आघाडीचा निर्धार

आजरा: मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा नगरपंचायतीची रणधुमाळी सुरू झाली असून येत्या दोन दिवसात पक्षाच्या उमेदवारांसह नगराध्यक्ष पदाचे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात पूर्ण ताकदीने उतरवण्याचा निर्धार आजरा येथे झालेल्या वंचित बहुजन आघाडीच्या बैठकीत करण्यात आला.
या निवडणुकीमध्ये सर्व सामान्य कार्यकर्त्याला न्याय देण्याचा प्रयत्न करा असा आदेश पक्षाचे अध्यक्ष प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांनी दिला असून पक्षाचे उपाध्यक्ष सोमनाथ साळुंखे यांनी आजरा येथे येऊन नगरपंचायतीच्या उमेदवारांची चाचपणी केली असता येथुन सर्व उमेदवार निवडणुकीत उभे करा अशा सूचना दिल्या.
या बैठकीला गौतम कांबळे, जिल्हा महासचिव दीपक कांबळे, जिल्हा खजिनदार आर बी. कांबळे,सचिव सर्जेराव कांबळे, संघटक अहमद युसुफ नसर्दी, निवडणूक समन्वयक दत्तात्रय कांबळे, प्रवीण कश्यप, सादिक माणगावकर, किरण संमेक, आर्यन कांबळे, संदीप कांबळे व प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.

निधन वार्ता
शांताबाई गुरव

साळगाव तालुका आजरा येथील शांताबाई गुरव (वय ८४ वर्षे) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते, साळगाव गावचे माजी ग्रामपंचायत सदस्य मधुकर गुरव यांच्या त्या मातोश्री होत.
त्यांच्या पश्चात दोन मुले, सुना,एक विवाहित मुलगी व नातवंडे आहेत.
जनाबाई झित्रे

दाभिलवाडी तालुका आजरा येथील जनाबाई काशिनाथ झित्रे (वय ८० वर्षे ) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.
त्यांच्या पश्चात दोन विवाहित मुले, विवाहित मुलगी, सुना, जावई, नातवंडे असा परिवार असून रक्षा विसर्जन आज शुक्रवारी सकाळी आहे. त्या विलास झित्रे व नामदेव झित्रे यांच्या आई होत.
रामचंद्र येजरे

हालेवाडी तालुका आजरा येथील रामचंद्र आबा येजरे (वय ८२ वर्षे) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.
त्यांच्या पश्चात दोन मुलगे,सुना,नातवंडे असा परिवार असून राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष श्री.संजय येजरे यांचे ते चुलते होत.



