mrityunjaymahanews
अन्य

सातच्या बातम्या

रविवार दिनांक ३० मार्च २०२५

यरंडोळच्या महिलेचा मुधाळ तिठृठा येथे अपघाती मृत्यू…

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      मुलीला भेटण्यासाठी  दुचाकीवरून गेलेल्या यरंडोळ येथील पाटील कुटुंबीयांना ऐन गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला अपघातासारख्या घटनेला सामोरे जावे लागले असून या दुचाकी अपघातात सौ.विमल निवृत्ती पाटील (वय ५२ वर्षे) यांचा जागीच मृत्यू झाला तर पती निवृत्ती राजाराम पाटील हे जखमी झाले आहेत.

याबाबत मिळालेली माहिती अशी…

      यरंडोळचे पोलीस पाटील निवृत्ती राजाराम पाटील हे दुचाकीवरून कळंबा, कोल्हापूर येथील आपल्या मुलीला भेटण्यासाठी गेले होते.  शनिवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास ते कोल्हापूर येथून  परतत होते. मुधाळ तिठ्ठयानजीक सोळा चाकी ट्रक त्यांना अरुंद पुलावर ओव्हरटेक करत असताना त्यांच्या दुचाकीला मागील बाजूने  धडक दिली. यामध्ये सौ. विमल या चाकाखाली येऊन त्यांचा मृत्यू झाला.

     सौ.पाटील यांच्या पश्चात पती, तीन मुली, एक मुलगा, सासू असा परिवार आहे.

       अपघाताची नोंद मुरगूड पोलीस ठाण्यात झाली असल्याचेही समजते. ऐन गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला झालेल्या या घटनेमुळे यरंडोळ पंचक्रोशीत हळहळ व्यक्त होत आहे.

ज्ञानगंगा ग्रामीण भागात पोहोचवण्याचे काम जनता शिक्षण संस्थेने केले : मंत्री हसन मुश्रीफ

          आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा 

      अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत काशिनाथअण्णा चराटी व माधवराव देशपांडे यांनी जनता शिक्षण संस्थेची स्थापना करून तालुक्यातील ग्रामीण भागातील मुलांच्या शिक्षणाची सोय केली त्यांच्या पश्चात संस्थेचे विद्यमान अध्यक्ष अशोक चराटी व त्यांच्या सहकाऱ्यांनी ही संस्था उत्कृष्ट पद्धतीने चालवली असून ठिकठिकाणी स्व मालकीच्या इमारती उभा करून ग्रामीण भागामध्ये ज्ञानगंगा नेण्याचा प्रयत्न चालवला आहे असे गौरवोद्गार वैद्यकीय शिक्षण मंत्री नाम. हसन मुश्रीफ यांनी काढले. मडिलगे ता. आजरा येथील जनता शिक्षण संस्थेच्या नूतन शाळा इमारतीच्या उद्घाटन समारंभ प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अशोक चराटी होते.

      प्रास्ताविकपर भाषणात जनता शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष विलास नाईक यांनी अनंत अडचणीतून सदर इमारत उभी केली असून इमारती भोवती संरक्षक कठडा बांधण्यासाठी मंत्री मुश्रीफ यांनी सहकार्य करावे असे सांगितले.

      यावेळी अशोक चराटी यांनी संस्था चालवताना येणाऱ्या अडचणी व त्यातून सुरू असलेली संस्थेची वाटचाल, शासनाची शाळांना आर्थिक मदत देण्याबाबतची उदासीनता याचा आढावा घेतला.

       यावेळी संचालक के.व्ही.येसणे यांनी देखील मनोगत व्यक्त केले. कार्यक्रम प्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अनिल देशपांडे, विजयकुमार पाटील, डॉ. दीपक सातोसकर, रमेश कुरुणकर, दिनेश कुरुणकर, सुरेश डांग, आजरा साखर कारखान्याचे संचालक दीपक देसाई, बबन पाटील, युवराज येसणे, पांडुरंग पाटील,भाऊसो पाटील, अनुसया हसबे, सरपंच बापू निऊंगरे, आजरा बँकेचे संचालक मारुती मोरे,सूतगिणीचे संचालक डॉ. संदीप देशपांडे, बी. जी. पाटील,पांडुरंग जाधव यांच्यासह मडिलगे,खेडे ग्रामस्थ, पालक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

       कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ए.वाय.येसणे यांनी केले तर आभार आर.एच. मुल्ला यांनी मानले.     

आजऱ्यात रंगपंचमीचा जल्लोष…
डीजेच्या तालावर तरुणाई थिरकली

          आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      आजरा शहर व परिसरात प्रथेप्रमाणे काल शनिवारी रंगपंचमी उत्साहात पार पडली. तरुणाईंसह बालगोपाल व महिलांनी रंगपंचमीचा आनंद लुटला.

      सकाळपासूनच बच्चे कंपनी एकमेकांवर रंग उडवण्यात दंग झाली होती. रंगपंचमी निमित्त ठिकठिकाणी डीजे ची व्यवस्था करण्यात आली होती. तरुणांकडून याला उस्फुर्त प्रतिसाद मिळताना दिसत होता.

      शाळा महाविद्यालयीन तरुण सह महिला वर्गही रंगपंचमीचा आनंद लुटताना दिसत होता.

रंगपंचमीच्या पार्श्वभूमीवर पोलीस व गृहरक्षक दलाच्या जवानांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

तळ्याचा माळ येथे आग…

गवताचे मोठे नुकसान

         आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

     आजरा येथे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या पुढील बाजूस असणाऱ्या तळ्याचा माळ परिसरातील भुईंबर बंधूंच्या गवताला शनिवारी दुपारी आग लागली.

      अचानकपणे लागलेल्या या जनावरांसाठी ठेवलेल्या गवतगंज्यांचे मोठे नुकसान झाले आहे दुपारची वेळ असल्याने आगीवर नियंत्रण ठेवताना संबंधितांची चांगलीच दमछाक झाली.

     आगीचे नेमके कारण समजू शकले नाही.

रस्त्याशेजारील वाहने…
इतर वाहनधारकांची डोकेदुखी

          आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      आजरा बस स्थानक ते न्यायालयीन इमारतीपर्यंत आजरा-आंबोली मार्गावर रस्त्याशेजारी उभी केली जाणारी चार चाकी व अवजड वाहने इतर वाहनधारकांच्या दृष्टीने डोकेदुखी ठरत आहेत.

     रस्त्याच्या दुतर्फा ही वाहने उभी केली जात असल्याने रात्रीच्या वेळी समोरून येणारी वाहने इतर वाहनधारकांना दिसत नाहीत. परिणामी यामुळे एखादा मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही पोलीस प्रशासनाच्या वाहतूक नियंत्रण विभागाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन एखादी दुर्घटना घडण्यापूर्वीच या वाहनधारकांवर कारवाई करून बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.

       फोटो क्लिक…

      संकेश्वर – बांदा महामार्गावर शनिवारी दुपारी वेळवट्टी फाट्याच्या पुढील बाजूस रस्त्याशेजारीच गव्यांच्या कळपाने बिनधास्तपणे वावरताना वाहन चालकांना दर्शन दिले.

 निधन वार्ता

   सुशीला दोरुगडे

          आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

     सोहाळे तालुका आजरा येथील सुशीला दत्तात्रय दोरुगडे ( वय ७५ वर्षे ) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.

      त्यांच्या पश्चात तीन विवाहित मुले ,एक विवाहित मुलगी, सूना,जावई, नातवंडे असा परिवार आहे. रक्षा विसर्जन सोमवार दिनांक ३१ रोजी आहे.

 

संबंधित पोस्ट

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

दरोड्यातील मुद्देमालासह आठ जण पोलिसांच्या ताब्यात…

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

mrityunjay mahanews
error: Content is protected !!