मंगळवार ९ जून २०२६

संशयकल्लोळ…
हरपवडेपैकी चव्हाण वसाहतीत महिलांमध्ये मारामारी
एक जखमी ; तिघींविरोधात गुन्हा नोंद

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
हरपवडेपैकी चव्हाण वसाहतीतील एका महिलेचे पेरणोली येथील एका महिलेच्या पतीशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून पेरणोली येथील संबंधित महिलेने चव्हाण वसाहतीवरील महिलेस अन्य दोन साथीदार महिलांसह घरात घुसून डोळ्यात चटणी टाकून टोण्याने जबर मारहाण केल्याची फिर्याद जखमी महिलेने दिली आहे.
यावरून पेरणोली येथील दोन महिला व केरवडे ता. भुदरगड येथील एका महिलेच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
पुढील तपास हवालदार पांडुरंग येलकर करीत आहेत.
घनसाळ उत्पादक शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत : शिल्पा खोत
आजऱ्यात घनसाळ उत्पादक शेतकऱ्यांचा मेळावा

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
घनसाळ या देशीवाणाचे संवर्धन व संरक्षण व्हावे. या भाताचे क्षेत्र वाढावे यासाठी जिल्हा परिषदेने यापूर्वी पाठपुरावा केला आहे. घनसाळचे दर्जेदार उत्पादन मिळण्याबरोबर शेतकऱ्यांना चांगला दर मिळावा यासाठी जिल्हा परिषद यापुढेही प्रयत्नशील राहणार असून घनसाळ उत्पादक शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत दिली जाईल. अशी ग्वाही जिल्हा परिषद अध्यक्षा शिल्पा खोत यांनी दिली.
येथील ‘मृत्यूंजय’ कार शिवाजी सावंत स्मृती दालनात जिल्हा परिषदेच्यावतीने कै. बळीरामजी देसाई देशीवाण संवर्धन योजनेअंतर्गत घनसाळ उत्पादक शेतकऱ्यांचा मेळावा झाला. अध्यक्षा शिल्पा खोत अध्यक्षस्थानी होत्या. जिल्हा परिषद उपाध्यक्ष तानाजी पाटील, महीला व बालकल्याण सभापती विद्या पाटील, आजरा पंचायत समिती सभापती जयश्री गाडे, आजरा कारखान्याचे अध्यक्ष मकुंदराव देसाई, जिल्हा परिषद सदस्य सुधीर देसाई, शिरीष देसाई, उपसभापती यशोदा पोवार, पंचायत समिती सदस्य विकास चोथे, समीर पारदे प्रमुख उपस्थित होते.
कृषी अधिकारी दिनेश शेटे यांनी स्वागत केले. जिल्हा कृषी विकास अधिकारी राजेंद्र माने यांनी प्रास्ताविकात देशीवाण संवर्धन कार्यक्रम शुध्द बियाणे निर्मिती शेतकऱ्याना प्रोत्साहान देण्याची योजना जिल्हा परिषद शेष फंड अंतर्गत यंदा देण्याचे ठरले आहे. याविषयी माहीती दिली. उपाध्यक्ष श्री. पाटील म्हणाले, घनसाळ भाताचे संवर्धन व संरक्षण करण्याबरोबर शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती साधण्यासाठी जिल्हा परिषदेने पुढाकार घेतला आहे. शेतकऱ्यांना बियाणे शेतकऱ्यांना बियाणे व आवश्यक खते पुरवली जातील. घनसाळचे दर्जेदार उत्पादन घेण्याबरोबर शेतकऱ्यांना चांगला दर मिळवून देण्यासाठी शेतकरी ते थेट ग्राहक अशी साखळी तयार केली जाईल. सुधीर देसाई म्हणाले, घनसाळला जीआय मानांकन मिळाले आहे. यामधे होणारी भेसळ दूर करण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. शास्त्रज्ञ डॉ. शैलेश कुंभार यांनी बीजोत्पादन व शास्त्रीय पध्दतीने घनसाळ लागवड याबाबत मार्गदर्शन केले. आजरा शेतकरी मंडळाचे अध्यक्ष संभाजी सावंत यांचेही भाषण झाले.
यावेळी सहाय्यक गटविकास अधिकारी परेश पुजारी, बसवराज गुरव, डॉ. रविंद्र गुरव, रणजित देसाई, सी. आर. देसाई, युवराज पोवार, संभाजी इंजल, निवृत्ती कांबळे, शांताराम पाटील, टी. एस. देसाई, सुरेश कालेकर यांच्यासह घनसाळ उत्पादक शेतकरी उपस्थित होते. गटविकास अधिकारी सुभाष सावंत यांनी आभार मानले.

शक्तीपीठ महामार्ग विरोधात निघणारा मोर्चा यशस्वी करण्याचा निर्धार…
चंदगड, आजरा, भुदरगड तालुक्यात शक्तीपीठ विरोधी रथयात्रा उत्साहात

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
शक्तिपीठ महामार्ग विरोधी मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचा निर्धार चंदगड आजरा तालुक्यातील शेतकऱ्यांनी केला आहे. आज चंदगड येथील कानूर गावातून शक्तिपीठ विरोधी रथयात्रात निघाली कानूर मधून ही यात्रा कुरणी, म्हाळुंगे, बुजवडे, गवसे या गावातून आजरा तालुक्यात आली. यावेळी म्हाळुंगे सरपंच विठोबा गावडे, कृष्णा पाटील सहभागी झाले होते.
आजरा तालुक्यात पोळगाव, एरंडोल, वेळवट्टी, देवर्डे, मसोली या गावातून पेरणोलीमध्ये आली. प्रत्येक गावात कोपरा सभा घेत शक्तिपीठ महामार्गाला आपला विरोध का अशी भूमिका यावेळी कॉ. संपत देसाई, कॉ. सम्राट मोरे, के के भारतीय या कार्यकर्त्यांनी मांडली. प्रत्येक गावात कोपरा सभा होऊन ही रथयात्रा पुढे भुदरगड तालुक्यात निघाली.
शक्तिपीठ विरोधी रथयात्रेत विजय पवार, मायकल बारदेस्कर, पांडुरंग मुगडे यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते
पेरणोली येथील सभेत तानाजी देसाई, सुभाष देसाई यांनी भूमिका मांडून उद्याचा मोर्चा यशस्वी करण्याचा निर्धार केला. यावेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

तुटलेली झाडे लावणार कुठे…?
वनविभागाकडे समाधानकारक माहिती नसल्याचा वृक्ष प्रेमींचा आरोप

चंदगड – हलकर्णी रस्त्याच्या रुंदीकरणात ३ हजार ६६० तोडली जाणार आहेत. तर त्या बदल्यात १४ हजार ६४० झाडांची लागवड केली जाणार आहे. परंतु ही झाडे नक्की कोठे लावली जाणार ?, त्याची उंची किती ? आणि झाडाचे संगोपन कोण आणि कसे करणार ? याची कोणतही माहीती वनविभागाकडे नाही. अशी माहीती वृक्षप्रेमी ग्रुपने पत्रकार परिषदेत दिली. पूर्वी आजऱ्यात मोठ्या प्रमाणात झाडांचे दाट अच्छादन होते. ते वैभव परत करण्याची मागणीही केली.
येथील वृक्षप्रेमी ग्रुपच्यावतीने पत्रकार परिषद घेण्यात आली. या वेळी वनविभागाकडून माहीतीच्या अधिकारात मिळालेली धक्कादायक माहीती सांगीतली. डॉ. गौरी भोसले, पुष्पलता घोळसे, प्रा. मीना मंगरुळकर, सुभाष विभूते, सी. आर. देसाई यांनी माहीती दिली.
डॉ. भोसले म्हणाल्या, संकेश्वर बांदा महामार्गाच्या रुंदीकरणात मोठ्या प्रमाणात वृक्षतोड झाली. पण ही झाडे लावण्यासाठी प्रयत्न दिसत नाही. झाडांची लागवड व संगोपन हे कागदोपत्रीच दिसत आहे. वनविभागाकडून माहीतीच्या अधिकारात चंदगड हलकर्णी रस्त्यावरील झाडांच्याबाबत माहीती मागीतली पण वनविभागाने वेळेत दिली नसल्याचा आरोप त्यांनी केलाः तहसीलदार व महसूल विभागाने मात्र सहकार्य केले. प्रा. मंगरुळकर म्हणाल्या, चंदगड – हलकर्णी रस्ता रुंदीकरणात तोडलेल्या झांडाची भरपाई कशी करणार याबाबत वनविभागाकडे स्पष्टता नाही. ही झाडे लावणार कुठे हे ही सांगीतले जात नाही.
श्री. विभूते म्हणाले, एखादे झाडाचे वय चाळीस वर्ष झाले की ते वारसास्थळात नोंदले जाते. अशी कितीतरी वर्षांची जूनी झाडे तोडली गेली आहेत. शक्तीपीठ महामार्ग झाला तर मोठ्या प्रमाणात वृक्षावर कुऱ्हाड चालणार आहे. दशरथ सोनुले, विलास पोवार उपस्थित होते.
चळवळीच्या दबावामुळे वाचली १३ झाडे
चंदगड- हलकर्णी रस्त्याच्या रुंदीकरणात वाटंगी फाटा ते महागाव मार्गावरील मध्यम आकाराची १३ वडाची झाडे वाचवण्यात वृक्षप्रेमीना यश आले आहे. ही झाडे वाचावीत यासाठी दबावगट तयार करायची वेळ आली. असे पुष्पलता घोळसे यांनी सांगीतले.
खाजगी जमिनीतील झाडे तुटण्यास प्रतिबंध हवा
तालुक्यात खासगी जमिनीतील झाडांची मोठ्या प्रमाणात तोड होत आहे. ट्रक भरून लाकूड बेळगावकडे जात असते. यावर कोणतेही नियंत्रण व निर्बंध नाही. यामुळे तालुका आसाड बनेल अशी भिती सी. आर. देसाई यांनी व्यक्त केली.
नवीन रस्ते झाले, मात्र सांडपाणी व पावसाचे पाणी रस्त्यावर…
गटारी तातडीने साफ करण्याची मागणी

आजरा शहरातील अनेक रस्त्यांचे डांबरीकरण पूर्ण झाले असून काही ठिकाणी कामे अंतिम टप्प्यात आहेत. मात्र ही कामे सुरू असताना ठेकेदाराकडून खुदाई व साहित्य टाकण्याच्या प्रक्रियेदरम्यान गटारींमध्ये माती, दगड व इतर साहित्य पडल्याने अनेक गटारी तुंबल्या आहेत.
दि. ६ जून २०२६ पासून शहरात सुरू झालेल्या पावसामुळे तुंबलेल्या गटारींचे पाणी तसेच सांडपाणी थेट रस्त्यांवरून वाहू लागले आहे. यामुळे नागरिकांना गैरसोयींचा सामना करावा लागत असून ही परिस्थिती आरोग्याच्या दृष्टीनेही धोकादायक ठरत आहे.
यापूर्वी अन्याय निवारण समितीच्या वतीने सार्वजनिक बांधकाम उपविभाग, आजरा येथील उपअभियंता तसेच आजरा नगरपंचायतीचे मुख्याधिकारी यांना निवेदन देऊन रस्त्यांची कामे पूर्ण झाल्यानंतर संबंधित ठेकेदाराकडून गटारी तातडीने साफ करून घेण्याची मागणी करण्यात आली होती.
या पार्श्वभूमीवर नगरपंचायतीच्या नगरसेवकांनी सार्वजनिक बांधकाम उपविभाग, आजरा येथील उपअभियंता कार्यालयात भेट देऊन याबाबत जाब विचारला. तसेच संबंधित ठेकेदाराकडून तात्काळ गटारींची साफसफाई करून घेणे, रस्त्यांवर शिल्लक राहिलेली खडी व इतर साहित्य हटविणे आणि रस्ते वाहतुकीसाठी सुरक्षित व सुलभ करणे याबाबत सूचना देण्यात आल्या.
नगरसेवक श्री. परशुराम बामणे
, श्री. अभिषेक शिंपी, श्री. परेश पोतदार, श्री.मुसा सरफराज पटेल, श्री. निसार लाडजी, श्री. आसिफ सोनेखान आणि श्री. विक्रम पटेकर, माजी नगरसेवक श्री. किरण कांबळे , श्री. आरिफ खेडेकर, श्री. गौरव देशपांडे उपस्थित होते. यावेळी संबंधित अधिकाऱ्यांनी ठेकेदारास आवश्यक सूचना देऊन प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करून गटारींची साफसफाई करण्यात येईल अशी ग्वाही दिली.
निधन वार्ता
लक्ष्मण आपगे

कानोली ( ता. आजरा ) येथील जेष्ठ नागरिक लक्ष्मण तुकाराम आपगे ( वय -९६) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.
त्यांच्या पश्चात दोन विवाहित मुली, सून, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन बुधवार दि. १० रोजी कानोली येथे आहे..

रस्ताही झाला… गटर्सही स्वच्छ झाल्या
पंधरा वर्षांनी आला चाफे गल्लीवासीयांना सुखद अनुभव

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
चाफे गल्ली येथे गेली पंधरा वर्षे गटर व रस्ते यांचे काम रेंगाळले होते.नागरिक आशेने पाहत होते की आज ना उद्या गटर्स,रस्ते होतील. वर्षानुवर्षे फक्त चर्चा सुरू होती कार्यवाही मात्र शून्य होती.
ग्रामपंचायतीची नगरपंचायत झाली तरीही या आरोग्याच्या दृष्टीने गंभीर मुद्द्याकडे दुर्लक्ष होते. आता मात्र रस्ता झाला. एक गटार बांधकाम पूर्ण झाले व दुसरी गटर दक्षिण बाजूची स्वच्छता मोहीम चालू आहे. आरोग्य आणि स्वच्छतेच्या पार्श्वभूमीवर गटारीतील साचलेली घाण काढून स्वच्छ करण्यासाठी नगरसेविका प्रा. पूनम लिचम यांनी उचलून धरला आणि हे काम पूर्णत्वाकडे नेले आहे. चाफे गल्लीतील नागरिकांकडून आता समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
उत्तूर येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन
उत्तूर : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री ना. चंद्रकांतदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त राजे विक्रमसिंह घाटगे को-ऑप. बँक लि., कागल व राजे विक्रमसिंह घाटगे फाउंडेशन, उत्तूर यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
हे रक्तदान शिबिर बुधवार दि. १० जून २०२६ रोजी सकाळी ९ ते दुपारी २ वाजेपर्यंत हनुमान मंदिर, नेहरू चौक, उत्तूर (ता. आजरा) येथे पार पडणार आहे. प्रत्येक रक्तदात्यास प्रोत्साहनपर रेनकोट भेट देण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांकडून देण्यात आली.
या शिबिरात युवक, सामाजिक कार्यकर्ते व नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे. शिबिरासंदर्भात अधिक माहितीसाठी श्री. दिपक आमणगी (९५६१७०४२११) व श्री. संतोष पाटील (९६५७७१०५७५) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

आजचे पंचांग
दिनांक : ९ जून २०२६
वार : मंगळवार
माह (अमावस्यांत) : अधिक ज्येष्ठ
माह (पूर्णिमांत) : अधिक ज्येष्ठ
ऋतु : ग्रीष्म
आयन : उत्तरायण
पक्ष : कृष्ण पक्ष
तिथी : नवमी (१० जून पहाटे ०२ ३४ पर्यंत) त्यानंतर दशमी तिथी
नक्षत्र : पूर्वाभाद्रपदा नक्षत्र (सकाळी ०९.३९ पर्यंत) त्यानंतर उत्तराभाद्रपदा नक्षत्र
योग : प्रीति योग (सकाळी ०८.१७ पर्यंत) त्यानंतर आयुष्मान योग
करण : तैतुला करण (दुपारी ०३.०५ पर्यंत) त्यानंतर गराजा करण
चंद्र राशी : मीन राशी
सूर्य राशी : वृषभ राशी
अशुभ मुहूर्त:
राहु काळ : दुपारी ०३.५६ ते सायंकाळी ०५.३५ पर्यंत
शुभ मुहूर्त:
अभिजित : दुपारी १२.११ ते दुपारी ०१.०४
सूर्योदय : सकाळी ०६.०१
सूर्यास्त : सायंकाळी ०७.१४
संवत्सर : पराभव
संवत्सर(उत्तर) : रौद्र
विक्रम संवत: २०८३ विक्रम संवत
शक संवत: १९४८ शक संवत



