mrityunjaymahanews
अन्य

शुक्रवार सातच्या बातम्या

शुक्रवार 

२४ जुलै २०२६

आजरा बंदला उस्फूर्त प्रतिसाद


आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

दिल्लीमधे जंतर मंतर येथे विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जच्या निषेधार्थ दिनांक गुरूवार २३ जुलै रोजी पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदला आजरा तालुक्यातील सर्व व्यापारी संघटना, व्यापारी बांधव तसेच नागरिकांनी उत्स्फूर्त आणि सकारात्मक प्रतिसाद दिला. दुपारपर्यंत बाजारपेठेत शुकशुकाट होता.

बंदच्या अनुषंगाने वंचित बहुजन युवा आघाडी जिल्हा उपाध्यक्ष दत्तात्रय कांबळे, तालुका अध्यक्ष संतोष मासोळे, भिकाजी कांबळे. कॉ. काशिनाथ मोरे, रुपाली कांबळे, सेक्युलर मुव्हमेंट जिल्हा अध्यक्ष अजय देशमुख यांनी मनोगते व्यक्त केले. यावेळी शासनाचा निषेध करण्यात आला.

प्रवीण कश्यप शाखा अध्यक्ष राहूल शिपूरकर, काशिनाथ कांबळे, रिपब्लीकन सेना जिल्हा उपाध्यक्ष सुरेश दिवेकर, ता अध्यक्ष-अविनाश कांबळे व्होण्याळकर, सुधीर कांबळे, राहुल कांबळे तसेच तालुक्यातून शिव शाहू, फुले आंबेडकर,पुरोगामी चळवळीतील कार्यकर्ते, अनुयायी यावेळी उपस्थीत होते.

कुत्री व बकऱ्यानंतर बिबट्याकडून घोडा ठार...

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

चांदेवाडी व सोहाळे येथे बकऱ्यांसह कुत्री पळवून नेणाऱ्या बिबट्याने वन विभागाला चकवा देत थेट हरपवडे धनगर वाडा गाठला असून बिबट्याच्या हल्ल्यात नागेश झोरे यांच्या मालकीचा घोडा ठार झाला आहे. बुधवारी सायंकाळच्या दरम्यान चरायला सोडलेल्या घोड्यावर बिबट्याने हल्ला केला. यात घोड्याचा मृत्यू झाला आहे.

झुलपेवाडीनंतर हणबरवाडीकडे बिबट्याची वाटचाल? वनविभागाचा अंदाज

उत्तूर : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

सद्यस्थितीस आजरा तालुक्यात दोन बिबट्यांचा वावर असण्याचे स्पष्ट झाले आहे. यापैकी आजरा तालुक्यातील झुलपेवाडी येथे काही दिवसांपूर्वी घडलेल्या एका बिबट्याच्या हल्ल्यानंतर आता कागल तालुक्यातील हणबरवाडी परिसरातही अशाच प्रकारची घटना घडल्याने बिबट्याच्या वावराबाबत वनविभागाने सतर्क झाला आहे. दोन्ही घटनांतील परिस्थिती आणि परिसरातील ठसे पाहता एकाच बिबट्याचा वावर असण्याची शक्यता अधिकाऱ्यांनी वर्तविली आहे. दि. २० जुलै रोजी हणबरवाडी येथील हसन तासिलदार यांच्या कुत्र्यावर हल्ला करून त्याला ठार करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.

परिसरात आढळलेल्या पावलांच्या ठशांवरून हा हल्ला बिबट्यानेच केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून त्या भागात ट्रॅप कॅमेरे बसविण्यात आले असून अद्याप बिबट्याचे छायाचित्र मिळालेले नाही. यापूर्वी १४ जुलै रोजी झुलपेवाडी येथील जाधव मळ्यात खंडू जाधव यांच्या कुत्र्यालाही बिबट्याने ठार केले होते. त्या घटनेनंतरही वनविभागाने परिसरावर लक्ष ठेवले असून बिबट्याचा माग काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.झुलपेवाडी, बेलेवाडी घाट, धामणे आणि हणबरवाडी या भागांना जोडणारा दाट जंगलपट्टा असल्याने बिबट्याने या मार्गाने स्थलांतर केल्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे वनविभागाचे म्हणणे आहे.

कांही दिवसांपूर्वी अमर कापसे यांनीही परिसरात बिबट्यासदृश प्राणी पाहिल्याची माहिती दिली होती.दरम्यान, नागरिकांनी रात्रीच्या वेळी जंगलालगतच्या भागात एकटे जाणे टाळावे, पाळीव जनावरे सुरक्षित ठिकाणी ठेवावीत आणि बिबट्याचा वावर आढळल्यास त्वरित वनविभागाला माहिती द्यावी, असे आवाहन वनपाल सागर पोवार व वनरक्षक रुद्रगोंडा पाटील यांनी केले आहे.

उत्तूरमध्ये स्व. अजितदादा पवार जयंतीनिमित्त महाआरोग्य सेवा अभियान

उत्तूर : मंदार हाळवणकर

स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त जनसेवा सप्ताहांतर्गत शासकीय योग व निसर्गोपचार महाविद्यालय व रुग्णालयाच्या वतीने महाआरोग्य सेवा अभियान घेण्यात आले.

या अभियानात १०० हून अधिक ग्रामस्थांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. योग, निसर्गोपचार, निरोगी जीवनशैली आणि आजार प्रतिबंधाबत मार्गदर्शन देण्यात आले. सोबतच मोफत औषधोपचार व ताणतणाव व्यवस्थापनासाठी समुपदेशनही करण्यात आले.

अभियानाचे उद्घाटन उत्तूर प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉ. सौरभ कसबे यांच्या हस्ते, तर महाविद्यालयात प्राचार्या डॉ. भाग्यश्री खोत यांच्या हस्ते स्व. अजितदादा पवार यांच्या प्रतिमेचे पूजन करून झाले. अभियानाच्या यशस्वी आयोजनासाठी डॉ. योगेश पोतदार, डॉ. समीक्षा कांबळे, डॉ. अनुरिता सकट, डॉ. प्रीती पाटील, डॉ. जीवन हनवटे तसेच महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग घेतला.

निधन वार्ता

मंजुळा चव्हाण

खेडे या.आजरा येथील श्रीमती मंजुळा गणपती चव्हाण यांचे वृद्धापकाळाने दि.२३ रोजी पहाटे १.३० वाजता निधन झाले.

त्यांच्या पश्चत मुलगे, सुना, मुली, जावई नातवंडे असा परिवार आहे.आज शुक्रवार दिनांक २४ सकाळी ९ वाजता रक्षाविसर्जन कार्यक्रम खेडे येथे आहे.

विस्तार अधिकारी पांडुरंग गणपती चव्हाण व दूरसंचार चे अधिकारी चंद्रकांत गणपती चव्हाण यांच्या त्या आई होत.

मारीपेदात नोरोना


वाटंगी तालुका आजरा येथील मारीपेदात मोतेस नोरोना (वय ८१ वर्षे ) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.

त्यांच्या पश्चात तीन मुली, दोन मुले, सुना जावई, नातवंडे असा परिवार आहे.

येथील सन्मित्र पतसंस्था वाटंगीचे संचालक केरेबिन नोरोना व अंतोन नोरोना यांच्या त्या आई होत.

सार्वजनिक बांधकाम विभागाकडील रस्त्याचे नगरपंचायतीकडे हस्तांतरण करण्याची मागणी


आजरा : मृत्युंजय महादेव वृत्तसेवा

आजरा नगरपंचायत ह‌द्दीतील मलीक बुरुड यांच्या समोरील पुरोहित बेकरी ते सीडीफार्म या दरम्यानचा आजरा-महागाव रस्ता सध्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत आहे. मात्र, या रस्त्याची नियमित दुरुस्ती, देखभाल व आवश्यक विकासकामे वेळेवर होत नसल्यामुळे या परिसरातील नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. सदर रस्ता नगरपंचायत हद्दीत असूनही तो सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत असल्याने रस्त्यावरील लहान-मोठी दुरुस्ती, गटारे, पावसाच्या पाण्याचा निचरा, पदपथ, स्ट्रीटलाईट, पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईन, रेनेज, केबल टाकणे तसेच इतर नागरी सुविधा पुरविताना प्रत्येक वेळी सार्वजनिक बांधकाम विभागाची परवानगी घ्यावी लागते. त्यामुळे विकासकामांना अनावश्यक विलंब होतो व नागरिकांच्या अडचणी वाढतात.

रस्त्याचे हस्तांतरण नगरपंचायतीकडे झाल्यास सार्वजनिक बांधकाम विभाग व नगरपंचायत यांच्यातील प्रशासकीय अडचणी दूर होऊन विकासकामांना गती येईल. त्यामुळे लवकरात लवकर हस्तांतरण करावे अशी मागणी नगरसेविका सौ. रेश्मा नौशाद बुड्ढेखान व नागरिकांनी केली आहे.

छाया वृत्त

डॉ. पोवार चॅरिटेबल ट्रस्ट अँड फौंडेशन यांच्या वती ने हात्तीवडे ता. आजरा गावचे सुपुत्र मुबई स्तीत कु.प्रितीश आनंदा पाटील चार्टर्ड अकाउंटंट C.A. परीक्षा पास झाल्या बदल सत्कार करण्यात आला. यावेळी विद्यार्थी विकास परिषद मुबई विभाग संपर्क प्रमुख सुधीर पोवार,डॉ. पोवार चॅरिटेबल ट्रस्ट अँड फौंडेशनचे संस्थापक डॉ. सचिन पोवार, उपाध्यक्षा सौ. संगीता भोसले,अजित देसाई, आनंदा पाटील अक्षय, सदेश शिवगण, सूरज शेटगे, नितीन पाटील, अशोक तेजम, श्रीधर वास्कर व इतर पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

       आजचे पंचांग 

दिनांक : २४ जुलै २०२६
वार : शुक्रवार
माह (अमावस्यांत) : आषाढ
माह (पूर्णिमांत) : आषाढ
ऋतु : वर्षा
आयन : दक्षिणायन
पक्ष : शुक्ल पक्ष
तिथी : दशमी तिथी (सकाळी ०९.१२ पर्यंत) त्यानंतर एकादशी तिथी
नक्षत्र : अनुराधा नक्षत्र ( २५ जुलै पहाटे ०४.३६ पर्यंत) त्यानंतर ज्येष्ठा नक्षत्र
योग : शुक्ल योग (रात्री ०८.१० पर्यंत) त्यानंतर ब्रह्म योग
करण : गराजा करण (सकाळी ०९.१२ पर्यंत) त्यानंतर वाणीजा करण
चंद्र राशी : वृश्चिक राशी
सूर्य राशी : कर्क राशी
अशुभ मुहूर्त:
राहु काळ : सकाळी ११.०७ ते दुपारी १२.४५पर्यंत
शुभ मुहूर्त:
अभिजित : दुपारी १२.१९ ते दुपारी ०१.११
सूर्योदय : सकाळी ०६.१४
सूर्यास्त : सायंकाळी ०७.१६
संवत्सर : पराभव
संवत्सर(उत्तर) : रौद्र
विक्रम संवत: २०८३ विक्रम संवत
शक संवत: १९४८ शक संवत

विशेष सूचना

बऱ्याच वेळा ‘ मृत्युंजय महान्यूज’ ची लिंक ओपन होत नाही अशा तक्रारी वाढलेल्या आहेत. लिंक ओपन करताना वायफाय वर ओपन न करता ती मोबाईल नेटवर्क सुरू करून ओपन केल्यास लवकर बातम्या पहावयास मिळतात.

कांही वेळा ट्राफिक जाममुळे/सर्वर मधील अडथळ्यामुळे लिंक लवकर ओपन होत नाही. थोडा वेळ थांबून लिंक ओपन करावी. काही तांत्रिक अडचणी सुरू आहेत. आम्ही दूर करण्याचा प्रयत्न करत आहोत.

….मुख्य संपादक

संबंधित पोस्ट

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

दरोड्याचा २४ तासात तपास ….

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

उत्तूर येथील दुचाकी अपघातात नवविवाहीत तरुणाचा मृत्यू

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews
error: Content is protected !!