
आजरा कारखाना निवडणूक दुरंगी
राष्ट्रवादी अखेर निवडणूक रिंगणात…
कारखाना निवडणूक राजकारणाला कलाटणी

आजरा:ज्योतिप्रसाद सावंत
राष्ट्रवादीने निवडणुकीपासून अलिप्त रहाण्याचा निर्णय मागे घेत सक्षम आघाडी उभा करून दंड थोपटल्याने आजरा साखर कारखान्याची निवडणूक दुरंगी व चुरशीची होणार हे स्पष्ट झाले आहे. या निर्णयामुळे कारखाना निवडणूक राजकारणाला कलाटणी मिळाली आहे.
बिनविरोध च्या दृष्टीने चार दिवसापूर्वी सुरू असणाऱ्या वाटाघाटी सुरू असतानाच आपणाला सत्तेत सन्मानकारक वाटा मिळत नसेल व निवडणुक बिनविरोध होत असल्यास आपला अडथळा नको असे सांगत राष्ट्रवादीच्या प्रमुख नेते मंडळींनी कारखाना निवडणुकीपासून राष्ट्रवादी अलिप्त राहील असा निर्णय जाहीर केला होता. तशी कल्पनाही वरिष्ठांना दिली होती.
स्थानिक नेते मंडळींनी घेतलेल्या या भूमिकेबद्दल कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांमध्ये मात्र उलट सुलट प्रतिक्रिया उमटत होत्या. राष्ट्रवादी समर्थक कारखान्याचे कामगार, सोबत असणाऱ्या इतर पक्ष व गटाचे उमेदवार या सर्वांचीच कोंडी या निर्णयाने झाली होती. यामुळे राष्ट्रवादीने या निवडणुकीत उतरावे असा दबाव गेले दोन दिवस प्रमुख नेते मंडळींवर कार्यकर्त्यांकडून टाकला जात होता.
या पार्श्वभूमीवर पालकमंत्री हसन मुश्रीफ यांची राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आज सकाळी भेट घेऊन प्राप्त परिस्थितीची माहिती दिली. मुश्रीफ यांनी मात्र सावध भूमिका घेत हा निर्णय कार्यकर्त्यांच्यावर सोपवला.
अखेर राष्ट्रवादीच्या प्रमुख नेते मंडळींनी उत्तूर येथे येऊन बैठक घेतली. या बैठकीमध्ये निवडणुकीतून अलिप्त राहिल्यास भविष्यात येणाऱ्या राजकीय अडचणींचा उहापोह करण्यात आला. अखेर निवडणुकीला सामोरे जाण्याचा निर्धार यावेळी व्यक्त केला गेला. त्यानंतर नेते मंडळींनी स्वतंत्र पत्रकार बैठकीत निवडणुकीत उतरण्यामागची भूमिका स्पष्ट करत आघाडीचे उमेदवार जाहीर केले.
यावेळी राष्ट्रवादीकडून जाहीर करण्यात आलेले श्री रवळनाथ शेतकरी विकास आघाडीचे आघाडीचे उमेदवार पुढीलप्रमाणे….
आजरा-शृंगारवाडी उत्पादक गट:-
मुकुंदराव देसाई(आजरा)
सुभाष देसाई(शिरसंगी)
शिवाजी नांदवडेकर( (वाटंगी)
हात्तिवडे-मलिग्रे गट:-
विष्णुपंत केसरकर(कीणे)
अनिल फडके(सुळे)
संभाजी पाटील(हात्तिवडे)
गवसे पेरणोली उत्पादक गट:-
उदय पवार(पेरणोली)
रणजित देसाईं(सुलगाव)
गोविंद पाटील(घाटकर वाडी)
उत्तुर-मडीलगे उत्पादक गट:-
वसंत धुरे (उत्तुर)
मारुती घोरपडे (उत्तुर)
दिपक देसाई (मडिलगे)
भादवण-गजरगाव उत्पादक गट:-
एम.के.देसाई (सरोळी)
राजेंद्र मुरकुटे (कानोली)
राजेश जोशीलकर (भादवण)
महिला राखीव गट:-
सौ.मनिषा देसाई (वेळवट्टी)
सौ.रचना होलम (पोळगाव)
इतर मागास राखीव प्रवर्ग:-
काशिनाथ तेली (होन्याळी)
अनुसूचित जाती जमाती प्रवर्ग:-
हरीभाऊ कांबळे(पेरणोली)
इतर संस्था वर्ग प्रतिनिधी:-
नामदेव नार्वेकर(पोळगाव)
भाजपा, शिवसेना, राष्ट्रीय काँग्रेस प्रणित श्री चाळोबा देव शेतकरी विकास आघाडीचे आघाडीचे उमेदवार पुढीलप्रमाणे…
उत्पादक गट:आजरा
अशोकअण्णा चराटी अभिषेक जयवंतराव शिंपी विजयराव देसाई
हात्तिवडे-मलिग्रे गट:-
प्रा. सुनील शिंत्रे
आनंदा बुगडे
सुरेश सावंत
गवसे पेरणोली उत्पादक गट:-
राजेंद्र सावंत
सहदेव नेवगे
दशरथ अमृते
उत्तुर-मडीलगे उत्पादक गट:-
उमेश आपटे
भिकाजी गुरव
प्रकाश चव्हाण
भादवण-गजरगाव उत्पादक गट:-
श्रीमती अंजनाताई रेडेकर
संजय पाटील
सुधीरकुमार पाटील
महिला राखीव गट:-
सौ.सुनीता रेडेकर
सौ.संगीता माडभगत
इतर मागास राखीव प्रवर्ग:-
जनार्दन विठ्ठल टोपले
अनुसूचित जाती जमाती प्रवर्ग:-
मलिक कुमार बुरुड
इतर संस्था वर्ग प्रतिनिधी:-
अशोक तर्डेकर
भटक्या विमुक्त जाती जमाती प्रवर्गातून आघाडीचे संभाजी पाटील बिनविरोध निवडले गेले आहेत.
सहा अपक्ष रिंगणात…
आजरा-शृंगारवाडी उत्पादक गटातून विद्यमान संचालक दिगंबर देसाई, महादेव होडगे, तुळसाप्पा पोवार,पेरणोली-गवसे गटातून शांताराम पाटील, शामराव बोलके तर भादवण-गजरगाव गटातून आनंदा पाटील हे अपक्ष निवडणूक रिंगणात आहेत.
अलिप्त राहण्याचा निर्णय का बदलला… राष्ट्रवादीचा खुलासा
१. कार्यकर्त्यांचा निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी वाढलेला रेटा
२. बिनविरोधच्या प्रक्रियेत मंत्री मुश्रीफ यांची महत्त्वाची भूमिका असूनही त्यांना विरोधी आघाडीकडून दिली गेलेली अपमानास्पद वागणूक.
३. कर्जाच्या बोजाला घाबरून निवडणूक रिंगणातून बाहेर पडल्याचा विरोधकांचा झालेला आरोप.
४. निवडणुकीपासून अलिप्त राहिल्यास भविष्यातील इतर निवडणुकांमध्ये पक्षावर होणारे विपरीत परिणाम.
५. राष्ट्रवादी समर्थक कामगार व ऊस उत्पादकांना पक्षाने वाऱ्यावर टाकल्याचा झालेला आरोप.
६. काही अपक्ष उमेदवारांनी कोणत्याही परिस्थितीत निवडणूक रिंगणात राहणारच अशी भूमिका घेतल्याने निवडणूक होणारच असेल तर आपण का मागे रहायचे… असा विचारही राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केला.
ऐन वेळी राष्ट्रवादीने घेतलेल्या निर्णयामुळे निवडणूक रंगतदार होणार आहे.
बडी नेतेमंडळी निवडणूक रिंगणात
सुरुवातीला निवडणूक लढवण्यास इच्छुक नसणाऱ्या वसंतराव धुरे, मुकुंदराव देसाई, विष्णुपंत केसरकर या मंडळींनीही पक्षाने घेतलेला निर्णय मान्य करत आपली उमेदवारी ठेवली आहे.
संभाजी पाटील यांना पुन्हा नशिबाची साथ…
आजरा नगरपंचायत निवडणुकीत चिठ्ठीवर निवडून आलेल्या शिवसेनेच्या संभाजी पाटील यांचे राजकीय नशीब बलवत्तर असल्याचे आज पुन्हा एकदा सिद्ध झाले. दोन्ही आघाड्यांपासून समान अंतरावर असणाऱ्या संभाजी पाटील यांची अनपेक्षितरित्या बिनविरोध निवड झाली. इतर गटात चुरशीची निवडणूक होत असताना भटक्या विमुक्त जाती जमाती प्रवर्गातून पाटील अलगतरीत्या बाहेर पडले.
कार्यकर्त्यांना संधी देण्यात राष्ट्रवादी यशस्वी
राष्ट्रवादी काँग्रेसचे स्वतंत्र पॅनेल करण्यात नेत्यांना यश आल्याने राष्ट्रवादीच्या कट्टर समर्थकांना पॅनेलमध्ये संधी देण्यात नेते मंडळी यशस्वी झाली आहेत. यामुळे जिल्हा बँक व तालुका खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीत कार्यकर्त्यांना दिले गेलेले शब्द पाळण्याची आयती संधीही नेत्यांना मिळाली.

पुन्हा एकदा पावसाने आठवडा बाजार उधळला

आजरा:प्रतिनिधी
आज-याचा आठवडा बाजार आणि पाऊस याचे अनोखे नाते असल्याचे यापूर्वी वेळोवेळी अनुभवास आले असून काल शुक्रवारी आठवडा बाजाराचे औचित्य साधून पुन्हा एक वेळ पावसाने जोरदार हजेरी लावत आठवडा बाजार तर उधळून लावलाच पण या अनोख्या नात्याचा प्रत्यय पुन्हा एक वेळ आजरेकरांना आला.
शुक्रवारी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास पावसाने जोरदार हजेरी लावली. पावसामुळे आठवडा बाजारासाठी आलेले व्यापारी, तालुकावासीयांची चांगलीच धांदल उडाली कोणतीही वातावरण नसताना अचानकपणे पावसाने हजेरी लावली. बाजारपेठेत पाणीच पाणी झाले. तासभर आठवडा बाजार ठप्प करण्यात पावसाला यश आले.
अवकाळीच्या या दणक्याने बळीराजाची चिंता वाढवली आहे. यावर्षी पाऊस समाधानकारक न झाल्याने सुगीचा हंगाम लांबला आहे. सध्या भात मळणी,नाचता कापणी सुरू असतानाच पावसाची हजेरी नुकसानीस कारणीभूत ठरत आहे. कारखान्यांचे गळीत हंगाम सुरू झाले आहेत तोडणी ओढणी यंत्रणा ठीकठिकाणी आपले बस्थान बसवत असतानाच पावसाच्या जोरदार हजेरीने तोडणी- यंत्रणेत व्यत्यय आला आहे.

जागतिक अपंग दिनानिमित्त आजऱ्यात कार्यक्रम

आजरा: प्रतिनिधी
३ डिसेंबर जागतिक अपंग दिनानिमित्त आजरा येथे डॉ. नवनाथ शिंदें यांच्या उपस्थितीत अपंग दिन किसान भवन आजारा येथे सकाळी ठीक ११.०० वाजता होणार असून या कार्यक्रमाला तालुक्यातील सर्व अपंग स्त्री पुरुषांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.
डॉ नवनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या कार्यक्रमास चळवळीचे कार्यकर्ते प्रकाश मोरुस्कर, अपंग संघटनेचे अध्यक्ष मुकुंद नार्वेकर, सरिता कांबळे, निवृत्ती फगरे, बाळू पाटील, सुशीला होरंबळे, शोभा पसारे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. अशी माहिती संघटनेचे सचिव संतोष सुतार यांनी दिली.

सोमवारचा मोर्चा यशस्वी करण्याचा शेतकऱ्यांच्या बैठकीत निर्धार

आजरा: प्रतिनिधी
पाटबंधारे खात्याने केलेल्या अन्यायी पाणीपट्टी वाढीच्या विरोधात आजरा तहसील कार्यालयावर सोमवारी काढण्यात येणार मोर्चा यशस्वी करण्याचा निर्धार किसान भवन येथे झालेल्या शेतकऱ्यांच्या बैठकीत करण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी शांताराम पाटील होते.
या मोर्चाचे निमंत्रक कॉ. संपत देसाई म्हणाले, अन्यायी पाणीपट्टी वाढ आणि महावितरणचा अनागोंदी कारभार शेतकऱ्यांना उध्वस्त करणारा आहे. त्यामुळे पाटबंधारे आणि महावितरण या दोन्ही विभागांना धडकी भरेल असाच मोर्चा यावेळीं आपण संघटित करूया. कुणीही या आणि शेतकऱ्यांना कसेही हाका हे आता खपवून घेतले जाणार नाही. तालुक्यातील मोटरपंपधारक शेतकऱ्यांनी या मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे.
शांताराम पाटील म्हणाले तालुक्यातील शेतकरी आता जागा झाला असून शासनाला हा निर्णय मागे घ्यायला लावल्याशिवाय गप्प बसणार नाही. त्यामुळे कोणी आम्हाला गृहीत धरू नये.
यावेळी प्रकाश पाटील, दशरथ घुरे, बजरंग पाटील , सयाजी कोडक, सचिन देसाई शंकर पाटील, बाबू एडगे, संजय घाटगे, प्रकाश मोरुस्कर यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मोर्चा ठीक ११.३० वाजता छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथून तहसील कार्यालयाकडे निघेल.

डॉ. फर्नांडिस यांच्यावर आज अंत्यसंस्कार

डॉ. अशोक फर्नांडिस यांचे काल शुक्रवारी वयाच्या ६२ व्या वर्षी अल्पश: आजाराने निधन झाले.
आज त्यांच्या मृतदेहावर मूळगाव हालेवाडी ता. आजरा येथे दुपारी १२.३० वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. तत्पूर्वी त्यांचा मृतदेह आजारा येथील त्यांच्या निवासस्थानी दर्शनासाठी ठेवण्यात आला आहे.


