mrityunjaymahanews
अन्यकोल्हापूर

आमदार प्रकाश आबीटकर यांच्या भूमिकेबद्दल भुदरगड – राधानगरी – आजरा तालुक्यात आश्चर्य

 

आमदार प्रकाश आबीटकर यांच्या भूमिकेबद्दल भुदरगड – राधानगरी – आजरा तालुक्यात आश्चर्य

…………..  (  ज्योतीप्रसाद सावंत) ….

महाराष्ट्रात शिवसेनेमध्ये बंडाचे  वादळ उठल्यानंतर पहिल्याच फेरीत मंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत सुरत व त्यानंतर गुवाहाटी गाठणारे भुदरगड,आजरा, राधानगरी विधानसभा मतदार संघाचे आमदार प्रकाश आबीटकर यांच्या भूमिकेबद्दल मतदारसंघात आश्चर्य व्यक्त होत आहे. केवळ आश्चर्यच नाही तर त्यांच्या भूमिकेबाबत संभ्रमावस्था आहे निर्माण झाली आहे .आ. आबीटकर मतदार संघात परत आल्यानंतरच अनेक गोष्टींचा उलगडा होणार आहे.

विधान परिषद निवडणुकीनंतर रातोरात नगर विकास मंत्री व शिवसेनेचे ज्येष्ठ बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी थेट सुरत गाठले. त्यांच्यापाठोपाठ शिवसेना आमदारांची रिघ सुरत-गुवाहाटी च्या दिशेने लागली आहे. या घटनेला अनेक कंगोरे आहेत. प्रत्येकाची बंडखोरीमागे विविध कारणे आहेत.पक्षात होत असलेली घुसमट, नेतृत्वाबद्दल नाराजी,  ईडी, आयकरसह केंद्रीय यंत्रणांचा चौकशीचा ससेमिरा अनेक मंत्री व आमदारांच्या पाठीमागे लागला आहे. यातून बचाव करून घेणे म्हणजे भाजपासोबत जाणे असा एकमेव पर्याय असल्यानेही या मंडळींनी भाजपशी हातमिळवणी केल्याची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रभर सुरू आहे.

आजरा भुदरगड व राधानगरी विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार प्रकाश आबीटकर यांचा मतदारसंघ आबीटकर यांच्या दृष्टीने अतिशय सुरक्षित समजला जातो. आबीटकर यांनी गेली दहा वर्षे या मतदारसंघाची चांगलीच मशागत केली आहे. केवळ पहिल्या फळीतीलच नाही तर दुसऱ्या फळीतील कार्यकर्त्यांचीही त्यांनी चांगले संबंध प्रस्थापित करून आपले स्थान घट्ट केले आहे. सद्यस्थितीला आमदार आबिटकर यांच्याविरोधात कोण? असा प्रश्‍न या मतदारसंघात उपस्थित केला जात होता. यातूनच आबीटकर यांचे या मतदारसंघातील वर्चस्व स्पष्ट होत होते. सुरक्षित मतदार संघ व केंद्रीय यंत्रणा यांचा कोणताही त्रास नाही असे असताना आबीटकर यांची भूमिका ही मतदारांना संभ्रमावस्थेत टाकणारी अशी ठरली. गुवाहाटी व सुरत येथील विविध व्हिडीओ क्लिप व फोटो पाहिले असता आबीटकर यांची देहबोली थोडी नाराजीची दिसत आहे.सत्तेत असणार्‍या शिवसेनेच्या मंत्रिमंडळाची स्थापना होत असताना जिल्ह्यातील शिवसेनेचे एकमेव आमदार असणारे व सलग दुसर्‍या वेळी विधानसभेत प्रवेश केलेले आमदार आबिटकर यांना मंत्रिपदामध्ये डावलले गेल्याची नाराजीही आबिटकर समर्थक कार्यकर्त्यांमध्ये होती. परंतु इतक्या टोकाचा निर्णय घेण्याइतपत ही नाराजी निश्चितच नव्हती.

सासूच वाट्याला येण्याची शक्यता…

आमदार प्रकाश आबिटकर व भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांचे यापूर्वी च्या युती सरकारमध्ये वेळो-वेळी खटके उडाले आहेत. त्यामुळे पाटील व आबीटकर यांच्यातील संघर्ष या मतदारसंघाला चांगलाच परिचित आहे. असे असताना भविष्यात भाजपाचे सरकार आले तर आबीटकर यांची अवस्था’ सासूसाठी वाटणी मागितली परंतु सासुच वाट्याला आली’… अशी होण्याची शक्यताही आता बोलली जात आहे.

कार्यकर्त्यांनी मतदारांशी संपर्क वाढवला

एकीकडे राज्यांमध्ये जोरदार राजकीय संघर्ष सुरू आहे या संघर्षाचा एक भाग आमदार प्रकाश आबीटकर हेसुद्धा आहेत. असे असताना आबीटकर यांच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी भुदरगड आजरा व राधानगरी तालुक्यामध्ये संपर्क वाढवून मतदारांची संवाद साधण्यास सुरूवात केली आहे.

आबीटकर यांच्या आगमनानंतर सत्यस्थिती समजणार

आबीटकर यांचे एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाणे, तिथून पुढे उलट-सुलट सुरू असलेल्या चर्चा यावर आमदार आबीटकर हे मतदारसंघात परत आल्यानंतरच ‘प्रकाश’ पडणार असून नेमके काय घडले हे त्यांच्याकडूनच ऐकणे उचित होणार आहे.

आज-यातच संतप्त प्रतिक्रिया…

आ.प्रकाश आबीटकर यांच्या विरोधातील काही मंडळींनी आबीटकर यांच्या भूमिकेबद्दल संतप्त भावना व्यक्त करत त्यांच्या संतापाला वाट मोकळी करून दिली. परंतु अनेकांनी सावध भूमिका घेऊन आमदार आबीटकर यांच्या तोंडून याबाबतचा खुलासा ऐकल्या नंतरच प्रतिक्रिया देण्याची भूमिका घेतली आहे.

संबंधित पोस्ट

आज-यात चोरी… सोन्या चांदीचे दागिने लंपास

mrityunjay mahanews

अर्ध्या तासात पावसांने उडाली आजरेकरांची दैना ; ऐन आठवडी बाजारात पावसाचे थैमान

mrityunjay mahanews

रिक्षा चालकाचा रिक्षातच हृदयविकाराने मृत्यू

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews
error: Content is protected !!