
आजरा कारखान्याने गळीत हंगाम 2021-22 मध्ये गाळप केलेल्या संपुर्ण ऊसाची बिले अदा
आजरा कारखान्यास दि.13/02/2022 ते 04/03/2022 या कालावधीत गळीतास आलेल्या 43476.52 मे. टन ऊसाची जाहीर ऊस दर प्र. मे.टन रु. 2900/- दि. 16.02.2022 पासुन जादा प्रतिटन रू.50/- विलंब अनुदान धरून होणारे रू.1278.00 लाखाची ऊस बिले संबंधीत ऊस पुरवठादार शेतक-यांच्या बँक खातेवरती वर्ग केली आहेत. तसेच तोडणी वाहतुकीची दि. 16.2.2022 ते 4.03.2022 अखेर आलेल्या ऊस तोडणी वाहतुकीची 34571.890 मे. टनाचे बिले रू.194.21 लाख संबंधीतांना आदा केली आहेत. आजरा साखर कारखान्याने सन 2021-22 या गळीत हंगामात 124 दिवसात 350074.691 मे. टन गाळप झालेल्या संपूर्ण ऊसाची आजअखेर रू.101.69 कोटी ऊस बिले व तोडणी वाहतुकीची रक्कम रू.18.56 कोटी याप्रमाणे होणारी सर्व बिले , कारखान्याने अदा केली आहेत. त्यामुळे कारखाना व्यवस्थापनाने आश्वासन दिलेनुसार कारखान्याच्या सन 2021-22 मध्ये गळीतास आलेल्या ऊसाची संपूर्ण ऊस व तोडणी वाहतुक बिले दिली असलेची माहिती चेअरमन श्री. सुनिल शिंत्रे यांनी दिली.
त्याचप्रमाणे कारखान्यावर विश्वास ठेवून कारखान्याकडे पाठविलेल्या ऊस पुरवठादार व ऊस तोडणी वहातुक कंत्राटदार यांचे मोलाचे योगदान लाभले. तसेच कोल्हापूर जिल्हा मध्य. सह. बँकेनेही अनमोल सहकार्य केल्याने कारखान्याने गाळपाचा यशाचा टप्पा गाठण्यास मदत झाली असे उद्गार यावेळी चेअरमन यानी काढून सर्व ऊस उत्पादक व तोडणी वाहतुक कंत्राटदारांचे आभार मानले.
त्याचप्रमाणे कार्यक्षेत्रातील सर्व ऊस उत्पादकांनी आपल्या सर्व ऊस क्षेत्राच्या नोंदी पुढील हंगाम 2022-23 करीता कारखान्याकडे शेती गट कार्यालयात कराव्यात. त्याचबरोबर कार्यक्षेत्रातील ठेकेदारांनीही तोडणी वाहतुकीचे करार कारखान्याकडे करून कारखाना पुढील काळात क्षमतेप्रमाणे ऊस गाळप करणेस सहकार्य करावे अशी विनंती केली. याप्रसंगी कारखान्याचे व्हा.चेअरमन श्री. आनंदराव कुलकर्णी, संचालिका श्रीमती अंजना रेडेकर, संचालक श्री. राजेंद्र सावंत, श्री. दिगंबर देसाई, श्री.मारूती घोरपडे, श्री. दशरथ अमृते, कार्यकारी संचालक, डॉ. श्री.टी.ए.भोसले, सेक्रेटरी श्री. व्ही. के. ज्योती, चिफ अकौंटंट, श्री. प्रकाश चव्हाण उपस्थित होते.
गावठी पिस्तुलसह दहा लाखाचा मुद्देमाल बहिरेवाडी येथे जप्त : दोघांविरोधात गुन्हा नोंद

बहिरेवाडी ता. आजरा येथे दि. ३० रोजी रात्री उशिरा उपविभागीय पोलीस अधिकारी गडहिंग्लज यांच्या आदेशानुसार आजरा पोलीस स्टेशनचे स पो. नि.सुनील हारुगडे आणि पोलीस ठाणे स्टाफ असे गांजा विरोधी पथकामध्ये कारवाई करीता भागामध्ये गस्त करीत होते. गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाल्यानुसार दोन व्यक्ती सोलापूर येथून गावठी बनावटी पिस्टल व २९ राऊंडसह आजरा पोलीस ठाणे हद्दीतून चार चाकीतुन येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. दरम्यान पोलिसांनी त्यांची गाडी अडवून चौकशी केली असता त्यांचा व्यवहार संशयास्पद आढळला. अधिक तपास केला असता त्यांच्या जवळ दोन गावठी बनावटीच्या पिस्तुलसह विविध कंपनीचे मोबाईल, रोख रक्कम आढळून आली. संशयितांना चोथ्याची खोप, बहिरेवाडी येथे ताब्यात घेतले असून रात्री उशिरा गुन्हा दाखल करून पुढील कारवाई करण्यात आली आहे.
या प्रकरणांमध्ये गावठी दोन पिस्तूलसह सुमारे 10 लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.सद्दाम रशीद शेख शहानवाज अल्लाउद्दीन शेख (रा. विरवाडे बुद्रुक,ता. मोहोळ, जिल्हा सोलापूर) या दोघांविरोधात या प्रकरणी आजरा पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे.




