mrityunjaymahanews
अन्यआजरा तालुका विशेषकोल्हापूरक्रीडागुन्हाजीवनमंत्रटेक्नोलॉजीठळक बातम्यादेशबिझनेसभारतमनोरंजनमहाराष्ट्रराजकीयरोजगारविदेशसामाजिकस्थानिक

सातच्या बातम्या

गुरुवार   दि. १  जानेवारी २०२६

दंगा नव्हे पोलिसांशी पंगा…
दोन महिलांसह एक जण गजाआड…
वृद्ध महिलेचे लांबवले होते दागिने…

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

आजऱ्याच्या आठवडी बाजारादिवशी पुढे दंगा सुरू आहे. पोलिसांचे चेकिंगही सुरू आहे अशी बतावणी करून मडीलगे येथील हौसाबाई शामराव भाईंगडे या ६५ वर्षीय वृद्धेला रुमालात दागिने काढून ठेवण्यास सांगून हातचलाकीने ते दागिने लंपास करण्याचा प्रकार २६ डिसेंबर रोजी घडला होता. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला यातील प्रमुख आरोपी राकेश यंक्काप्पा गोंधळी/ वय ३४ वर्षे, दुर्गवा गंगाप्पा कंडले/ वय ४५ वर्षे आणि मंजुळा राकेश गोंधळी /वय ४५ वर्षे ( सर्व रा. तहसीलदार प्लॉट, निपाणी तालुका निपाणी, जिल्हा बेळगाव) यांना मोठ्या शिताफीने स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी ताब्यात घेऊन राकेश याच्याकडून सोन्याची दोन कर्णफुले, दोन बुगड्या, मनी मंगळसूत्र व मंजुळा यांच्याकडून एक मंगळसूत्र कानातील सोन्याची दोन बुगड्या, सोन्याची फुले असा २४.५ ग्रॅम वजनाचा २ लाख ६६ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

सदर गुन्हा हा दिवसा व आठवडी बाजाराच्या दिवशी घडल्याने योगेश कुमार, पोलीस अधीक्षक यांनी हे प्रकरण गांभीर्याने घेऊन तपासा करीता स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाकडे सोपवले होते. याला अनुसरून पोलिस अंमलदार समीर कांबळे व राजू कोरे यांना त्यांच्या खबऱ्यांमार्फत माहिती मिळवली. चोरी केलेले दागिने घेऊन संबंधित तिघे आरोपी हे दागिने विकण्यासाठी उजळाईवाडी तालुका करवीर गावच्या हद्दीतील भारती विद्यापीठाकडून पुणे बंगलोर महामार्गावरुन जाणार असल्याचे समजल्याने त्यांना त्या ठिकाणी सापळा लावून पकडण्यात आले आहे.

या कारवाईत अप्पर पोलीस अधीक्षक डॉ.बी. धीरज कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण, सहा. पोलीस निरीक्षक सागर वाघ, पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे, समीर कांबळे (भादवण), राजू कोरे, योगेश गोसावी, सतीश जंगम,सतीश सूर्यवंशी, हिंदुराव केसरे, वैभव पाटील, संतोष बर्गे, शिवानंद स्वामी, संजय पडवळ, अमित मर्दाने, संजय हुंबे, प्रदीप पाटील,राजेंद्र वरंडेकर व मीनाक्षी पाटील सहभागी झाले होते.

सहकार भारती उत्कृष्ट पुरस्काराने जनता सहकारी गृहतारण संस्था सन्मानित

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

माणसं जोडणारी संस्था म्हणून ओळख असलेल्या जनता सहकारी गृहतारण संस्थेने सहकार क्षेत्रात काम करत असतानाच सामाजिक बांधिलकी जपण्याचे काम सातत्याने केलेला आहे “आयएसओ मानांकन महाराष्ट्र राज्य कार्यक्षेत्र” याबरोबरच संस्थेने रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण केले आहे. शिवाय शंभर कोटी ठेवींचा टप्पा ही पूर्ण केलेला आहे. संस्थेच्या आजपर्यंतच्या या कामाची दखल घेऊन सहकार भारतीच्या वतीने संस्थेला “सहकार भारती उत्कृष्ट संस्था” पुरस्कार सहकार भारतीचे “राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर उदय जोशी” यांच्या हस्ते जयसिंगपूर येथे झालेल्या कार्यक्रमात प्रदान करण्यात आला. आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष २०२५ च्या निमित्ताने मिळालेला हा पुरस्कार संस्थेच्या वाटचालीतील एक सोनेरी पान आहे. यामुळे संस्थेची सहकार क्षेत्रात वेगळी ओळख निर्माण झाली आहे.

घर बांधणी, फ्लॅट खरेदीसाठी दीड कोटी पर्यंत आणि प्लॉट खरेदीसाठी एक कोटी पर्यंत कर्ज, सोनेतारण कर्ज, ठेवतारण कर्ज, वीजबिल भरणा केंद्र त्याचबरोबर रौप्य महोत्सवाच्या निमित्ताने वेगवेगळ्या आकर्षक ठेव योजना सुरू करत संस्थेने सभासदांचा विश्वास संपादन केलेला आहे. संस्थेच्या सर्वच सात शाखांमध्ये या सेवा सभासदांसाठी उपलब्ध आहेत. विनम्र आणि तत्पर सेवेचा वसा घेत संस्थेने आजपर्यंतची वाटचाल पूर्ण केली आहे. संस्थेच्या या कार्याची दखल घेऊन सहकार भारतीच्या वतीने हा पुरस्कार देण्यात आला. यावेळी सहकार भारतीचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर उदय जोशी, महाराष्ट्र प्रदेशचे महामंत्री विवेक जुगादे, यांच्या हस्ते जयसिंगपूरचे नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर, सौ. वैशालीताई आवाडे, जिल्हाध्यक्ष अरविंद मजलेकर, श्रीकांत चौगले यांचे उपस्थितीत हा सन्मान करण्यात आला. संस्थेच्या वतीने संस्थेचे अध्यक्ष मारूती मोरे, संचालक व गारगोटी शाखा चेअरमन आनंद चव्हाण, इचलकंरजी शाखा चेअरमन प्रकाश शिंदे, संचालक महादेव मोरुस्कर जनरल मॅनेजर मधकर खबरे व अनिरुध्द कुंभार आदी उपस्थित होते.

श्रीमंत गंगामाई वाचन मंदिरातर्फे व्याख्यानमाला, पुरस्कार वितरण समारंभाचे आयोजन

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

आजरा येथील शतकोत्तर सुवर्णमहोत्सवाकडे वाटचाल करीत असलेल्या श्रीमंत गंगामाई वाचन मंदिरातर्फ दिनांक ३ ते ५ जानेवारी २०२६ पर्यंत व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार दिनांक ३ जानेवारी रोजी सुप्रसिध्द हृदयरोग तज्ञ डॉ. अक्षय बाफना- कोल्हापूर यांच्या ‘तंदुरूस्त हृदय : निरोगी जीवन’ या व्याख्यानाने व्याख्यानमालेची सुरवात होणार आहे. रविवार दिनांक ४ जानेवारी रोजी जैवतंत्रज्ञान शास्त्रज्ञ डॉ. विश्वास बापट – कोल्हापूर यांचे ‘वनस्पती : बहुमुल्य, बहुगुणी वरदान’ या विषयावर व्याख्यान तर सोमवार दिनांक ५ जानेवारी रोजी मिशन ऑरगॅनिक चे संस्थापक श्री राहुल टोपले आजरा यांचे ‘नैसगिक शेती आणि विषमुक्त जीवन’ या विषयावर व्याख्यान होणार आहे.

ग्रंथालयातर्फे देण्यात येणाऱ्या विविध पुरस्कारांचे वितरणही याप्रसंगी होणार आहे. यावर्षी भूमिपुत्र साहित्यिक गौरव पुरस्कार श्री.अनिल परूळेकर (गोवा), माता गौरव पुरस्कार श्रीमती सरीता समीर घेवडे (भटवाडी), उत्कृष्ठ वाचक पुरस्कार श्री. गजानन भिमराव अपसंगी (चाफवडे) व बालवाचक पुरस्कार कु. कादंबरी पांडुरंग धुरी (हाळोली) यांना जाहीर झाला आहे. सर्व कार्यक्रम ‘मृत्युंजय’कार शिवाजीराव सावंत स्मृतीदालन, जूनी पोष्ट गल्ली आजरा येथे दररोज सायंकाळी ५.३० वाजता होणार आहेत. या व्याख्यानमालेचा, पुरस्कार वितरण व पुस्तक प्रकाशन सोहळयाचा रसिक श्रोत्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन वाचन मंदिराचे अध्यक्ष वामन सामंत, उपाध्यक्षा विद्या हरेर, कार्यवाह कुंडलिक नावलकर व सहकार्यवाह रवींद्र हुक्केरी यांनी केले आहे.

मेंढोली येथे मॅटवरील कबड्डी स्पर्धा

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

श्री लक्ष्मी देवी यात्रेनिमित्त ६० किलो वजनी गटातील स्थानिक कबड्डी स्पर्धांचे मेंढोली येथे गुरुवार दिनांक ८ जानेवारी रोजी आयोजन करण्यात आले असल्याची माहिती संयोजकांनी दिली आहे
स्पर्धेतील प्रथम चार क्रमांकाच्या विजेत्यांना अनुक्रमे १००००/- रुपये व पाच फुटी ढाल, ७०००/- एक रुपये व चार फुटी ढाल ५००१/- रुपये व तीन फुटी ढाल आणि ३०००/- रुपये व दोन फुटी ढाल अशी बक्षिसे देण्यात येणार आहेत. या व्यतिरिक्त इतरही वैयक्तिक बक्षिसे देण्यात येणार असून इच्छुकांनी ग्रामस्थ मंडळ मेंढोलीशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

 छाया वृत्त …

काम चालू पाणी बंद…

नेहमीप्रमाणे पुन्हा एक वेळ पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू  असून यामुळे आजरा शहरवासीयांना पाणी मिळेल याची शाश्वती सध्या तरी दिसत नाही.


विशेष सूचना…

मृत्युंजय महान्यूजच्या बातम्या बऱ्याच वेळा link ओपन होत नसल्याने पहावयास मिळत नाहीत अशा तक्रारी येत आहेत. याकरिता कृपया आपल्याकडे 96 37 59 88 66 हा नंबर “मृत्युंजय महान्यूज’ या नावाने save असणे गरजेचे आहे. सदर नंबर आपल्याकडे save नसल्यास आपणाला बातम्या ओपन करताना अडचण येईल. नंबर save करूनही ज्यांना बातम्या मिळणार नाहीत त्यांच्याकरता या नंबरच्या व्हाट्सअप स्टेटस वर बातम्यांची लिंक टाकण्याची व्यवस्था केली आहे. याचबरोबर jyotiprasad savant या Facebook account वरही बातम्या link द्वारे पहावयास मिळतील. बरेच मोबाईल नंबर मृत्युंजय महान्यूजकडे सेव आहेत परंतु  संबंधितांकडे मृत्युंजय महान्यूज चा नंबर save नसल्याने अशा वाचकांना लिंक पाठवल्यास व्हाट्सअप अकाउंट बंद होत आहे. असा व्हाट्सअप ने नवीन नियम केला आहे.

यापुढे हळूहळू ग्रुप वर बातम्या लिंक पाठवणे बंद/कमी केले जाणार आहे. कृपया सर्वांनी याची नोंद घ्यावी. 

…मुख्य संपादक

 

 

संबंधित पोस्ट

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews
error: Content is protected !!