सोमवार दि.१३ आक्टोंबर २०२५


जि. प., पं.स. साठी आज आरक्षण सोडत…
धाकधूक वाढली

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांच्या आरक्षणाचे चित्र आज, सोमवारी स्पष्ट होणार आहे. आजरा तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या दोन तर पंचायत समितीच्या चार जागांचे मतदारसंघ निहाय आरक्षण जाहीर होणार आहे. यामुळे गेले तीन वर्षे जिल्हा परिषद व पंचायत समितीमध्ये प्रतिनिधित्व करण्यासाठी प्रयत्नशील असणाऱ्या मंडळींची धाकधूक वाढली आहे.
स्थानिक नेते मंडळींनी कमी झालेला जि.प.चा एक व पंचायत समितीचे दोन मतदारसंघ पूर्ववत करण्यासाठी बरेच प्रयत्न केले परंतु यामध्ये फारसे यश आले नाही.
जिल्हा परिषदेच्या उत्तुर व वाटंगी तर पंचायत समितीच्या उत्तुर, भादवण, वाटंगी व पेरणोली मतदार संघाकरीता आज आरक्षण जाहीर होणार आहे.
आजच ठरणार सभापती पदाचे आरक्षण…
या आरक्षणाबरोबरच आज पंचायत समितीच्या सभापती पदाचे आरक्षणही जाहीर होणार आहे
हात्तीवडे गाव शिवारात बिबट्याचा वावर…?
ग्रामस्थांना खबरदारीच्या सूचना

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
हात्तिवडे गाव शिवारामध्ये बिबट्याच्या पाऊलखुला आढळून आल्या असून कांही जणांनी बिबट्याला पाहिल्याचे समोर येत आहे.
बिबट्याच्या पाऊलखुणा आढळल्याने या भागात बिबट्याचा वावर आहे हे अधोरेखित झाले आहे. रविवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास कांही ग्रामस्थांनी बिबट्याला पाहिल्याचेही सांगितले जाते. बिबट्याकडून अद्याप कोणतीही जिवीतहानी झालेली नाही तरी देखील या परिसरातील ग्रामस्थांनी खबरदारी घ्यावी असे आवाहन वन विभागाकडून करण्यात आले आहे.

निधन वार्ता
देवजीभाई पटेल
आजरा येथील देवजीभाई राजाभाई पटेल (वय १०० वर्ष )
यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.
त्यांच्या पश्चात तीन विवाहित मुले, एक मुलगी, सुना, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे
आजरा येथील ज्येष्ठ व्यापारी मुळजीभाई (बुधुभाई),
पुरुषोत्तमभाई
तुलसीभाई यांचे ते वडिल होत.
रक्षा विसर्जन उद्या सोमवारी सकाळी साडेआठ वाजता आजरा येथे आहे.
शालू बारदेस्कर
धनगरमोळा येथील शालू परसु बारदेस्कर
( वय ७८ वर्षे ) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.
त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा सुन, नातवंडे. दोन विवाहीत मुली,जावई, नातवंडे असा परिवार आहे. ग्रामपंचायत सदस्य मायकल बारदेस्कर/ फर्नांडिस यांचे ते वडील होत.
शंकर खवरे
वेळवट्टी ता. आजरा येथील शंकर भागोजी खवरे ( वय ७५ वर्षे) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी तीन मुले,दोन मुली, सुना, जावई नातवंडे असा परिवार आहे.
ते आजरा पंचायत समितीचे सेवानिवृत्त शिपाई होते.

पोश्रातवाडी येथून बांधकाम साहीत्य लंपास
आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
पोश्रातवडी येथे नरसु बाबु शिंदे यांच्या गट नं. १२४ येथून सिमेंनटची पोती,सेडनेट जाळे, लोखंडी सळी असा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी लंपास केला.
या प्रकरणी आजरा पोलीस स्टेशनला अदाखलपात्र गुन्हा नोंद झाला आहे.
पुन्हा पावसाने झोडपले
आजरा शहर व परिसराला शनिवारी दुपारी पुन्हा एकदा जोरदार पावसाने झोडपले. या जोरदार पावसाने शेतकऱ्यांची मोठी अडचण होऊ लागली आहे भात कापणीसह मळणीची कामे वेगावली असतानाच पाऊस जोरदार हजेरी लावत असल्याने सुगीमध्ये मोठ्या अडचणी येत आहेत.

जनता गृहतारण संस्थेकडून पूरग्रस्त निधी सुपूर्त
आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
मराठवाडा-विदर्भात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. जीवित व वित्त हानी अपरिमित झाली आहे. लोकांचे संसार उद्धव झालेत. अन्न – धान्याची, चा-याची टंचाई निर्माण झाली आहे. अशा वेळी आपल्या बांधवाच्या पाठीशी ठामपणे उभे राहणे हे परम कर्तव्य आहे. याच उदात्त भावनेतून पूरग्रस्तांना जनता सहकारी गृहतारण संस्थेच्या वतीने मुख्यमंत्री सहायता निधीसाठी एक लाखाचा धनादेश आज सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री व पालकमंत्री ना. प्रकाश आबिटकर यांच्याकडे सुपूर्त करण्यात आला. संस्थेचे चेअरमन मारुती मोरे यांनी हा धनादेश दिला.
यावेळी बोलतांना ना. प्रकाश आबिटकर म्हणाले, पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी महाराष्ट्रातील दानशूर व्यक्ती, संस्था संघटनानी उभे राहण्याची गरज आहे, हे ओळखून आपल्या आजरा येथील जनता गृहतारण संस्थेने मदतीचा हात पुढे केला, अनेक सहकारी व सामाजिक संस्थासाठी हा आदर्श आहे. संस्था नेहमीच सामाजिक बांधिलकी जपत आली आहे. यावेळी संस्थेचे व्हाईस चेअरमन डॉ. अशोक बाचूळकर, संस्थेचे संचालक व गारगोटी शाखेचे चेअरमन आनंद चव्हाण, व्हाईस चेअरमन डॉ. संजय देसाई, संचालक महादेव मोरुस्कर, सत्यजित चोरगे, रणजित पाटील, प्रशासकीय अधिकारी मारुती कुंभार, व्यवस्थापक दत्तात्रय शिंदे आदी उपस्थित होते.
व्यंकटराव मध्ये “ग्रीन डे” व ,”अर्थ मिनिट ” निमित्त प्रतिज्ञा व प्रभात फेरी संपन्न
.
आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आज ग्रीन डे व अर्थ मिनिटनिमित्त शासनाच्या आदेशानुसार व्यंकटराव हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज आजरा या प्रशालेमध्ये पर्यावरणाचे रक्षण करणे ही आपली जबाबदारी आहे या संदर्भात माहिती श्री एस वाय भोये यांनी दिली. तसेच प्राचार्य श्री. एम.एम. नागुर्डेकर यांनी पर्यावरण प्रदूषण कमी करण्यासाठी आपण व आपल्या कुटुंबापासून सुरुवात केली पाहिजे. जवळच्या अंतरापर्यंत शक्यतो चालत जाणे दूरच्या पल्ल्यासाठी शक्य तितक्या वेळेला एसटी बस अशा मोठ्या वाहनांचा प्रवासासाठी वापर केले पाहिजे. सायकलचा वापर करणे अंगीकृत केले पाहिजे त्यामुळे पर्यावरणाचे रक्षण होणार आहे. व शक्य तितक्या प्रमाणात विजेचा काटकसरीने वापर केला पाहिजे. याबाबत माहिती सांगितली.
एनसीसी ऑफिसर श्री एम एस पाटील यांनी पर्यावरण पूरक ग्रीन डे प्रतिज्ञा विद्यार्थ्यांकडून म्हणवूनन घेतली.
यानंतर विद्यार्थ्यांनी आजरा शहरांमध्ये प्रभात फेरी काढून घोषणा देत जनजागृती केली.या प्रभात फेरीला आजरा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी श्री.सुभाष सावंत आणि त्यांची संपूर्ण शासकीय अधिकारी टीम यांनी भेट दिली.
या कार्यक्रमासाठी पर्यवेक्षिका सौ.व्ही
जे.शेलार,सौ.व्ही.ए.ववळेकर, सौ.ए.एस.गुरव, श्री.कृष्णा दावणे, सौ.एस.डी.इलगे, श्रीम.एन.ए.मोरे, श्री. व्ही.एस.गवारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

पूरग्रस्त शाळेला हेल्पिंग हँड्स फाउंडेशनकडून शैक्षणिक साहित्य वाटप
आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
सिंदखेड येथे
पूरस्थितीमुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेल्या सिंदखेड परिसरातील मराठी शाळेला हेल्पिंग हँड्स फाउंडेशन, उत्तूर (ता. आजरा, जि. कोल्हापूर) तर्फे शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. पूरग्रस्त परिस्थितीत या शाळेला मदतीची अत्यंत गरज होती. या पार्श्वभूमीवर संस्थेच्या स्वयंसेवकांनी पुढाकार घेत ४० डझन वह्या, पेन, कंपास किट, व इतर शैक्षणिक साहित्य पोहोचवले.
या उपक्रमास स्थानिक नागरिक, शिक्षक व पालकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
‘हेल्पिंग हँड्स फाउंडेशन’ दरवर्षी शैक्षणिक उपक्रम राबवत असते. मात्र यंदा मराठवाड्यातील पूरस्थिती पाहता संस्थेने आपला वार्षिक शैक्षणिक उपक्रम पूरग्रस्त भागात राबवण्याचा निर्णय घेतला आणि ही मदत खऱ्या अर्थाने गरजूंना पोहोचली.


