बुधवार दि. २३ जुलै २०२५

धक्कादायक…
लखन बेनाडेची आजरा तालुक्यात हत्या…?

रांगोळी (ता. हातकणंगले) येथील ग्रामपंचायत सदस्य लखन बेनाडे याचे अपहरण करुन त्याचा खून आजरा तालुक्यातील पूर्व भागातील जंगल परिसरात केल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. या प्रकरणी गडहिंग्लज, आजरा या परिसरातील तिघांना स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने जेरबंद केले आहे. आजरा परिसरात खून करुन बेनाडेच्या मृतदेहाचे तुकडे करून संकेश्वर यमगर्णी आणि हिरण्यकेशी नदीमध्ये टाकल्याचे समोर येत आहे .
ग्रामपंचायत सदस्य लखन आण्णप्पा बेनाडे (वय ३६) हा गुरुवार (१० जुलै) पासून बेपत्ता होता. त्याच्या खुनाचा उलगडा शुक्रवारी (१८ जुलै) रोजी झाला होता. या प्रकरणी पोलिसांनी लक्ष्मी विशाल घस्ते (वय ३६ रा. राजेंद्रनगर), विशाल बाबुराव घस्ते (वय ४०), आकाश उर्फ माया दिपक घस्ते (वय २१ रा. तामगांव), संस्कार महादेव सावर्डे (वय २० रा. देवर्डे), अजित उदय चुडेकर (वय २९ रा. राजकपुर पुतळा, जुना वाशी नाका) यांना अटक केली आहे.त्यांनी खुनाची कबूली दिली होती.
या पाच जणांचे कॉल डिटेल्सची पडताळणी स्थानिक गुन्हे अन्वेषणने केल्यानंतर आणखी सात मारेकऱ्यांची नावे निष्पन्न झाली. त्यापैकी तिघांना पोलिसांनी गडहिंग्लज आणि पेद्रेवाडी (ता. आजरा) येथून ताब्यात घेतले. धरपकड सुरू होताच काही आरोपींनी धूम ठोकली असून, पोलिस त्यांच्या मागावर आहेत. या आरोपींचा प्रत्यक्ष कट रचण्यात आणि खून करण्यात सहभाग होता. काही जणांनी शस्त्रांचा पुरवठा केल्याचे तपासातून समोर येत आहे. पेद्रेवाडी येथील एका तरुणाला स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाने रविवारी रात्री ताब्यात घेतले आहे. आजरा परिसरातच हत्या करण्यात आली. सुरुवातीला संशयीतांनी दिशाभूल करणारी माहिती दिली होती. जस जसा या घटनेचा तपास होत गेला तसतसे या गुन्ह्याची धक्कादायक माहिती पुढे येऊ लागली आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे खून प्रकरणानंतर पुन्हा एक वेळ जिल्हा हादरवून सोडणाऱ्या बेनाडे या आणखी एका खून प्रकरणाचे धागेदोरे आजरा तालुक्याशी जोडले गेले आहेत.

आजरा तालुक्याचा पर्यटन विकास आराखडा तयार करा…
आमदार शिवाजीराव पाटील यांच्या सूचना

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
पर्यटनातून व्यवसाय निर्मिती होईल. स्थानिकांना रोजगार उपलब्ध होतील. त्यामुळे आजरा तालुक्याचा पर्यटन विकासाचा आराखडा तयार करावा. अशी सूचना चंदगड विधानसभा मतदारसंघाचे आमदार शिवाजीराव पाटील यांनी केली.
येथील तहसीलदार कार्यालयात बैठक झाली. आमदार श्री. पाटील अध्यक्षस्थानी होते. तहसीलदार समीर माने, गटविकास अधिकारी संतोष नागटिळक, निवासी नायब तहसीलदार म्हाळसाकांत देसाई, सहाय्यक गटविकास अधिकारी दिनेश शेटे प्रमुख उपस्थित होते.
आमदार श्री. पाटील म्हणाले, आजरा, चंदगडमधे पर्यटनासाठी मोठा वाव आहे. या तालुक्यातील रामतीर्थ, चित्री, खेतोबा, चाळोबा यासह विविध ठिकाणी पर्यटनासाठी विकास निधी लावता येईल. यासह अन्य ठिकाणांचे सर्व्हेक्षण करणे गरजेचे आहे. पर्यटन वाढले तर व्यवसाय वाढतील. यातून रोजगार वाढून स्थानिकांच्या हाताला काम मिळेल. याबाबत प्रमुख कार्यकर्त्यांच्या मागण्याही आल्या असून पाठपुरावा सुरु असल्याचे सांगीतले. चितळे ग्रामपंचायतीचे उपसरपंच उदयसिंह सरदेसाई यांनी सुचना मांडली. तालुक्यातील एसटीच्या प्रश्नाबाबतही प्रवाशी संघटनेचे अध्यक्ष सचिन
अध्यक्ष सचिन इंदुलकर व श्री. सरदेसाई यांनी लक्ष वेधले. एसटीचा कारभारात सुधारणा करण्याची सूचना एसटीच्या अधिकाऱ्यांना आमदार श्री. पाटील यांनी दिली. या वेळी सी. आर. देसाई, संदिप देसाई, उमेश घोरपडे, अजित हरेर, उदयराज चव्हाण यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

आता चाफा बोलणारही नाही आणि फुलणारही नाही…
त्याने धबधब्याची संगत सोडली…

ज्योतिप्रसाद सावंत…
गेली अनेक वर्षे रामतीर्थ धबधब्याच्या शेजारी असणारे चाफ्याचे झाड काल जुने व जीर्ण झाल्याने उन्मळून पडले. रामतीर्थ धबधब्याचे विस्तीर्ण रूप छायाचित्रीत करताना हमखास या चाफ्याची पाने,फुले,फांद्या धबधब्यासोबत छायाचित्रात डोकावत असत. धबधब्याशेजारी रॅम्प बांधत असताना हे झाड तोडण्याचा प्रयत्न केला परंतु निसर्गप्रेमींनी हा प्रयत्न त्यावेळी हाणून पाडला होता.
धबधब्याच्या शेजारी दिमाखात उभे असणारे हे झाड अखेर निसर्ग नियमानुसार काल कोसळले. आता चाफा फुलणारही नाही व तो धबधब्याशी बोलणारही नाही…
झाड कोसळल्यानंतर अनेक जणांनी या चाफ्याच्या झाडाची छायाचित्रे टिपून जपून ठेवण्याचा प्रयत्न केला .

आजऱ्यात रक्तदान शिबिर उत्साहात

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
येथील आजरा महाविद्यालयात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी आजरा तालुका यांच्यावतीने रक्तदान शिबिर झाले. भारतीय जनता पक्षाच्या वतीने याचे आयोजन केले होते. ५१ जणांनी या वेळी रक्तदान केले.

भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष अशोक चराटी यांच्या हस्ते शिबीराचे उद्घाटन झाले. या वेळी जनता एज्युकेशन सोसायटीचे मुख्याधिकारी डॉ. अनिल देशपांडे, भाजपचे तालुकाध्यक्ष अनिकेत चराटी, जिल्हा आहेबीसी मोर्चाचे उपाध्यक्ष जयवंतराव सुतार, उदयसिंह सरदेसाई, संभाजीराव सरदेसाई, राजू पोतनीस, एम. टी. पाटील, रणजीत सरदेसाई, सी आर देसाई, योगेश पाटील, उमेश घोरपडे, संदीप गुरव, सूर्यकांत पाटील, दत्तात्रय कालेकर, श्रीधर निऊंगरे, संदीप देसाई, आनंदा कातकर, अमर पाटील, महादेव पाटील, संतोष चौगुले, अभिजीत रांगणेकर, निखिल पाचवडेकर, वैभव लक्ष्मी ब्लड बँकचे सतीश पवार, अजित हरेर, उमेश पारपोलकर, सतीश शिंदे, अभिजीत लाड, अभिजीत रांगणेकर, आकाश पाटील, अमोल पाटील, मंदार बिरजे, राजू दिक्षित, पंकज वास्कर, मंगेश तेउरवाडकर, मनीष टोपले तसेच प्रमुख भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते आणि वाघाची तालीम मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

५ व ६ मे रोजी कोळींद्रेची महालक्ष्मी यात्रा...

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
कोळिंद्रे तालुका आजरा येथील महालक्ष्मी यात्रेच्या पार्श्वभूमीवर काल मंगळवारी मानाचे बकरे सोडण्यात आले.महालक्ष्मी मंदिरात पानविडा ठेऊन गा-हाणे घालण्यात आले. ५ व ६ मे २०२६ हे दोन दिवस यात्रेकरीता सर्व संमतीने ठरवण्यात आले.
सदर कार्यक्रमास मुंबई मंडळाचे अध्यक्ष , संजय सावंत, बाबू पाटील, रवि सावंत , सचिन बोर , रवि भालेकर , आप्पा बोर ,राजन संकपाळ तसेच गावातील, सुभाष सावंत, सुरेश सावंत, रमेश बुगडे , जोतिबा बोर, शंका वाके , गणपती पाटील, शंकर पाटील , आनंदा पाटील, प्रकाश पाटील यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कोळिंद्रेकरांचा जल्लोष…
यात्रेचा कालावधी जाहीर झाल्यानंतर कोळींद्रे येथील अबाल वृद्धांनी गुलालाची उधळण करत सवाद्य जल्लोष केला

भाजपाकडून वृक्षारोपण…

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आजरा तालुका भारतीय जनता पार्टी तर्फे अण्णाभाऊ सहकारी सूतगिरणी लिमिटेड खेडे येथे १००१ वृक्षांच्या रोपणाचा शुभारंभ करण्यात आला.
याप्रसंगी भाजपा तालुका अध्यक्ष अनिकेत चराटी, डॉ. अनिल देशपांडे, जयवंत सुतार, सी.आर. देसाई , राजू पोतनीस,रणजीत सरदेसाई, उदयकुमार सरदेसाई, ज्योत्स्ना चराटी-पाटील, युवराज येसणे, आनंदराव कातकर, संतोष चौगुले, कार्यकारी संचालक अमोल वाघ, सचिव सचिन सटाले, संदीपराव देसाई, उमेश घोरपडे, गणपती पाटील, अमोल सुतार, पंकज वास्कर, राजू दिक्षित आदी उपस्थित होते.

छाया वृत्त…

आजरा येथील सौश्रृती अमित पुंडपळ हिने शिष्यवृत्तीसह नवोदय व इतर परीक्षांमध्ये घवघवीत यश संपादन केल्याबद्दल विठोबा देव ट्रस्टमार्फत तिचा सत्कार करण्यात आला.

संवेदना फाउंडेशन मार्फत संवेदना वनराई नेसरी येथे सरपंच गिरजादेवी शिंदे, उपसरपंच, ग्रामसेवक, सर्व ग्रामपंचायत सदस्य व नेसरी ग्रामस्थांच्या वतीने वृक्षारोपण करण्यात आले.


