गुरुवार दि. २४ जुलै २०२५

बेनाडेची हत्या पेद्रेवाडीतच…
जागाही सापडली, ठोस पुरावेही आढळले

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
रांगोळी येथील ग्रामपंचायत सदस्य लखन बेनाडे याची हत्या आजरा तालुक्यातील पेद्रेवाडी येथेच तलवार, एडका व इतर शस्त्रांच्या सहाय्याने करण्यात आली. हत्या जेथे झाली त्या जागेसह घटनास्थळी स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकाला ठोस पुरावे आढळले आहेत. अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने व शांत डोक्याने मध्यरात्रीच्या सुमारास पेद्रेवाडी गावालगतच्या हद्दीमध्ये जंगल क्षेत्रात बेनाडे याची हत्या करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे.
या प्रकरणातील पेद्रेवाडीसह गडहिंग्लज भागातील संशयितांनी शस्त्रे टाकलेली जागा दाखवल्यानंतर खुनातील शस्त्रे भडगाव (ता. गडहिंग्लज) येथे हिरण्यकेशी नदीतून शोधून काढण्यात पोलिसांना बुधवारी (दि. २३) यश आले. पेद्रेवाडी (ता. आजरा) येथून बेनाडेच्या अवयवांचे काही तुकडे पोलिसांना मिळाले. फॉरेन्सिक विभागाच्या पथकासह स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, राजारामपुरी पोलिसांनी पुरावे गोळा केले.
बेनाडे याचे अपहरण करून खून केल्याप्रकरणी पोलिसांनी आठ आरोपींना अटक केली आहे. यामध्ये पेद्रेवाडी येथील खून केल्यानंतर गुन्ह्यातील काही शस्त्रे भडगाव परिसरातील हिरण्यकेशी नदीच्या पुलावरून पाण्यात टाकल्याची कबुली आरोपींनी दिली. त्यानुसार पोलिसांनी बुधवारी एनडीआरएफ पथकाच्या मदतीने शस्त्रांचा शोध घेतला. काही वेळातच शस्त्रे पोलिसांच्या हाती लागली. त्यानंतर तपास पथक पेद्रेवाडी येथे गेले.
लखनला आरोपी पेद्रेवाडी येथे घेऊन गेले होते. गावाजवळ असलेल्या जंगलात त्याला मारहाण करून काही अवयव तोडले.
आकाश उर्फ माया दीपक घस्ते (रा. तामगाव, ता. करवीर) यासह आशिष शिंत्रे या पेद्रेवाडी येथील संशयिताला सोबत घेऊन पोलिस घटनास्थळी गेले होते.
स्थानिक गुन्हेसह पोलीस पथकही शहारले…
अत्यंत क्रूर पद्धतीने बेनाडे यांच्या मृतदेहाची खांडोळी करण्यात आली. मुळातच तब्येतीने दणकट असणाऱ्या बेनाडे यांची हत्या करताना नेमके कशा पद्धतीने वार केले त्याचे धड व इतर अवयव कसे वेगळे केले हे माया घस्ते याच्याकडून सांगितले जात असताना पोलीस देखील शहारले. सदर हत्या रात्रीच्या वेळी केल्यानंतर पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न झाला परंतु अंधारामध्ये काही पुरावे तसेच राहिले अखेर ते पोलिसांच्या हाती सापडले.

चित्री प्रकल्पाकाठचे धनगरवाडे जोडणारे रस्ते रुंद करा…
ग्रामस्थांची मागणी

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
चित्री प्रकल्पावरून आवंडी धनगरवाड्याकडे जाणारा रस्ता अरुंद आहे. त्यामुळे येथे वाहनांना बाजू देतांना अडचण येत आहे. यामुळे वहातुक खोळंबते त्याचबरोबर अपघातामध्ये वाढ होत आहे. या रस्त्याची रुंदी वाढवण्याची मागणी पर्यटक व ग्रामस्थांतून होत आहे.
आजऱ्याहून आवंडी धनगरवाड्यावर रस्ता जातो. २००१ मध्ये हा रस्ता तयार करण्यात आला. आजऱ्यापासून सुमारे दहा किलोमीटर अंतरावर धनगरवाडे आहेत. या रस्त्यामुळे हे धनगरवाडे आजरा शहराशी जोडले गेले आहेत. ग्रामस्थांची सोय झाली. मध्यंतरी या रस्त्याची दुरवस्था झिली होती. ग्रामस्थांच्या पाठपुराव्यामुळे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी रस्त्यासाठी निधी लावला. स्त्याचे डांबरीकरण करण्यात आले. चित्री प्रकल्पाच्या कडेला लोखंडी सरंक्षक कठडे उभारण्यात आले. सध्या रस्त्यावरील डांबरीकरणाची नऊ फुटाची रुंदी आहे. चित्री पर्यटनामुळे येथे रहदारी वाढली आहे. समोरून एखादे वहान आल्यावर त्याला बाजू देता येत नाही अशी अवस्था आहे. त्यामुळे वहातुक खोळंबून रहाते. त्याचबरोबर वहानांचे अपघातही होत आहेत. त्यामुळे या रस्त्याची रुंदी वाढवावी अशी मागणी पर्यटक व स्थानिक ग्रामस्थाकडून केली जात आहे.
यामुळे वहातूक सुरळीत होण्याबरोबर अपघाती टाळले जातील असे सांगितले जाते. ग्रामस्थांनी काल रस्त्याची रुंदी मोजून सध्या असणारी नऊफुटांऐवजी ती अकरा फूट करावी अशी मागणी केली आहे.

प्राथमिक शिक्षक समितीचा ६३ वा वर्धापन दिन उत्साहात

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
प्राथमिक शिक्षक समितीचा ६३ वा वर्धापन दिन आजरा येथे उत्साहात साजरा केला. या विशेष दिनाचे औचित्य साधून आजरा तालुक्यातील गुणवंत विद्यार्थी आणि त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचा प्रत्यक्ष शाळांमध्ये जाऊन सत्कार करण्यात आला.
आजरा येथील आनंदराव नादवडेकर प्राथमिक शिक्षक पतसंस्थेच्या ठिकाणी कार्यक्रमाची सुरुवात भा.वा. शिंपी गुरुजी यांच्या प्रतिमेच्या पूजनाने झाली. त्यानंतर शिक्षक समितीचे मार्गदर्शक श्री. सुभाष विभूते , पुणे विभाग संपर्क प्रमुख श्री. सुनील शिंदे आणि अध्यक्ष श्री. एकनाथ गिलबिले यांनी भा.वा. शिंपी गुरुजींच्या कार्याचे आणि शिक्षक समिती संघटनेच्या महत्त्वाचे विवेचन केले. त्यांनी संघटना कशी वाढवावी, संघटनेत कसे कार्य करावे, एखाद्या प्रश्नाविरुद्ध कसे लढावे आणि अन्यायाविरोधात कशी दाद मागावी या संबंधीचे मार्गदर्शन आणि अनुभव उपस्थितांसोबत कथन केले.
यावेळी शिक्षक बँक संचालक श्री. शिवाजी बोलके , चेअरमन सदाशिव दिवेकर, जिल्हा उपाध्यक्ष आनंदा पेंडसे सर, केंद्रप्रमुख श्री. आनंदा भादवणकर , सुधाकर आजगेकर , तुकाराम तरडेकर, कार्याध्यक्ष नितीन पाटील , सुभाष नाईक , शशिकांत सुतार , शांताराम केसरकर , सुभाष आजगेकर सर, अनिल गोवेकर , रेबळे , देसाई , अमित कांबळे , निलेश जाधव यांसह महिला अध्यक्षा सारिका पाटील , सरचिटणीस सौ. सुरेखा कांबळे , शुभांगी पेडणेकर , सुरेखा नाईक , स्वाती रेबळे , प्रीती कांबळे , संयोगिता सुतार आणि शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.सरचिटणीस श्री. बळीराम तानवडे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

पुस्तकांचे वाचन ही आयुष्यभर पुरणारी शिदोरी प्रा.श्रीकांत नाईक

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
साठ वर्षापूर्वी समाजात मोठ्याप्रमाणात सामाजिक विषमता होती. ती कमी व्हावी म्हणून अनेक समाजसेवकानी प्रयत्न केले.पाठ्यपुस्तकातील
लेख,कविता,आत्मचरित्र यातून जगण्याचं अनेकांनी प्रयत्न केले.
त्यापैकीच एक आत्मचरित्र
म्हणजे प्रख्यात लेखक माधव कोंडविलकर यांचे “मुक्काम पोस्ट देवाचे गोठणे ” हे होय. आपल्या आयुष्यात किती संकटे ,हाल अपेष्टा सोसाव्या लागल्या त्याचे भेदक चित्रण या पुस्तकात केले आहे.ते प्रत्येक विद्यार्थ्यांने वाचले पाहिजे. त्यामुळेच आपल्यालाही कळेल की, जगण्यासाठी खूप कष्ट घ्यायला हवेत. म्हणून वाचन करा असे आवाहन प्रा.श्रीकांत नाईक यांनी
केले.
सकाळ वाचनालयातर्फे आयोजित कार्यक्रमात कर्मवीर विद्यालय, चिमणे येथे ते बोलत होते.वाचनालयाला हेच पुस्तक त्यांनी भेट दिले. शैक्षणिक क्षेत्रात काम करताना अनेक साहित्यिकांचे जवळचे सबंध आले. त्यामुळे त्यांचं जगण समजलं. त्यातून लिहिण्याची आवड निर्माण झाली. मुलांनी वाचलं पाहिजे , लिहिलं पाहिजे , बोललं पाहिजे असेही ते म्हणाले.
यावेळी प्रा.एकनाथ पाटील यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले. प्रशांत कांबळे यांनी ग्रंथालयातील ग्रंथ संपदेविषयी माहिती दिली. या वेळी प्रा. संजय खोचारे व त्यांचे सहकारी शिक्षक तसेच अमेय कामत, आदित्य नागवेकर, कर्मवीर विद्यालयातील विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रभू यांनी केले, शेख यांच्या आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली.

आज-यात महात्मा फुले योजने अंतर्गत मोफत उपचार शिबीर

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
अथायु हॉस्पिटल कोल्हापूर व स्मिता क्लिनिक आजरा यांच्या वतीने शनिवार दि.२६ जुलै रोजी सकाळी ११ ते २ ह्या वेळेत स्मिता क्लिनिक, शांतादुर्ग रेसिडेन्सी, सोमवार पेठ आजरा येते मोफत दुर्बिणीद्वारे मुतखडा, प्रोस्टेट व लेसरद्वारे व्हेरिकोज व्हेन्स उपचार शिबीर आयोजीत करण्यात आले आहे.
मुतखडा व प्रोस्टेट, व्हेरिकोज व्हेन्सचे रुग्ण शिबीर मध्ये सहभागी होऊ शकता, महात्मा फुले जनआरोग्य योजना अंतर्गत मोफत दुर्बिणीद्वारे मुतखडा, प्रोस्टेट ऑपरेशन लेसरद्वारे व्हेरिकोज व्हेन्स उपचार केले जातील.
येताना आपले सर्व जुने रिपोर्ट्स, आधारकार्ड व रेशनकार्ड घेऊन यावेत. आजरा व परिसरातील रुग्णांनी जास्तीत जास्त शिबीरचा लाभ घ्यावा असे आवाहन हॉस्पिटलचे सी. ई.ओ डॉ बसवराज कडलगे यांनी केले आहे.

व्यापारी बंधूंचा शनिवारी आजऱ्यात स्नेह मेळावा
आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा शहरातील सर्व व्यापाऱ्यांचा ‘व्यापारी स्नेह मेळावा ‘ शनिवार दिनांक २६ जुलै रोजी दूरदुंडेश्वर कार्यालयात आयोजित करण्यात आला आहे. आजरा शहरातील सर्व व्यापारी बंधुचे आप-आपसातील हितसंबंध घट्ट व्हावेत. व व्यापाऱ्यांची एकजुट व्हावी या पार्श्वभूमीवर सदर मेळावा होणार आहे.
आजरा एस. टी. आगारास निवेदन देणे,आजरा बाजार पेठेतील समस्या व अडचणी, आजरा शहर व्यापारी असोसिएशन ची नवीन कार्यकारणी तयार करणे यासह विविध विषयावर या मेळाव्यात चर्चा होणार असल्याचे संयोजकांनी सांगितले.

फोटो क्लिक…


निधन वार्ता
राजाराम पोतनीस
आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
सातेवाडी ता. आजरा येथील राजाराम जानबा पोतनीस ( वय ३६ वर्षे) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.
त्यांच्या पश्चात पत्नी,दोन मुली, आई, वडील,तीन विवाहित बहिणी असा परिवार आहे.


