शुक्रवार दि. २५ जुलै २०२५

नागरी सुविधांच्या पार्श्वभूमीवर सर्फनाला विस्थापित वसाहतींची पाहणी…

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
सर्फनाला प्रकल्पांतर्गत पारपोली येथील विस्थापित झालेली वसाहत ग्रामपंचायत देवर्डे ता. आजरा येथील गायरान मध्ये करण्यात आली आहे सदरच्या नूतन वसाहतीसाठी आवश्यक असणाऱ्या १८ नागरी सुविधाची बांधणी/पाहणी पुनर्वसन कार्यालय यांच्याकडून करण्यात आली.
पाहणी करत असताना पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संतोष नागटिळक सहाय्यक गट विकास अधिकारी दिनेश शेटे व पंचायत समिती कडील विस्तार अधिकारी कुंभार व पाटबंधारे विभागाचे अधिकारी पंचायत समिती कडील पाणीपुरवठा,बांधकाम विभागाकडील उप अभियंता चिंतामणी लोंढे मोरे साहेब/शिक्षण विभागाकडे विस्ताराधिकारी व तसेच ग्रामपंचायत कडील सरपंच कल्पना चाळके, जी.एम. पाटील शैला चाळके व सर्व सदस्य आणि ग्रामपंचायत अधिकारी श्री सुभाष येळणे सर्फनाला प्रकल्पांतर्गत वसाहतीमधील मुख्य नेते सुरेश मिटके गावातील संपूर्ण नागरिक पाहणी करताना उपस्थित होते.
रस्त्यासह बऱ्याचशा नागरी सुविधा सध्या पुनर्बांधणी आल्या असल्याने त्या पुन्हा एकदा पुर्ववत नव्याने कराव्यात अशी मागणी यावेळी करण्यात आली.

आजऱ्याचे धनाजी देसाई एन. सी. सी. ट्रेनिंग ऑफिसर

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजऱ्याचे सुपुत्र लेफ्टनंट कर्नल धनाजी चंद्रकांत देसाई यांची एन. सी.सी. ग्रुप हेड क्वॉटर कोल्हापूरच्या ट्रेनिंग ऑफिसरपदी नियुक्ती झाली आहे. लेफ्टनंट कर्नल देसाई यांच्या रूपाने आजरा तालुक्याला प्रथमच ही संधी प्राप्त झाली आहे. गेली १९ वर्षे त्यांनी भारतीय सैन्य दलात मराठा लाईट इन्फट्रीचे ऑफिसर म्हणून काम पाहिले आहे. देसाई यांनी सैन्यदलात जाऊ – इच्छिणाऱ्या तरूणाईसमोर आदर्श ठेवला आहे.
शिवाजीनगर येथील देसाई यांनी व्यंकटराव हायस्कूलमध्ये माध्यमिक शिक्षण, आजरा महाविद्यालयात ११ वी व १२ वीचे शिक्षण पूर्ण केले. तर कोल्हापूर येथील विवेकानंद कॉलेजमध्ये पदवीचे शिक्षण घेतले आहे . सैन्यातील अधिकारी पदाची परीक्षा २००५ मध्ये दिली. या परीक्षेत यश मिळाल्यानंतर त्यांनी चेन्नई येथे प्रशिक्षण पूर्ण केले आणि सन २००६ मध्ये भारतीय सैन्य दलात लेफ्टनंट या पदावर ते रूजू झाले. देशभरात ठिकठिकाणी सेवा बजाविली.

हिरण्यकेशी नदीवरील बंधाऱ्यांना समांतर पूल बांधावेत….
शिवसेनेची मागणी

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा तालुक्यातील हिरण्यकेशी नदीवर असलेल्या शेळप, दाभिल, साळगावं व हाजगोळी या बंधाऱ्यांना समांतर पूल होणेबाबात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे.
आजरा तालुक्यामध्ये हिरण्यकेशी नदीवर शेळप, दाभिल, साळगांव व हाजगोळी हे कोल्हापूर पद्धतीचे बंधारे आहेत. हे बंधारे बांधून गेली अनेक वर्षे झाली आहेत. सध्या या बंधाऱ्यांवरुन मोठ्या प्रमाणात वाहतूक होत आहे. वेळोवेळी पुरामुळे या बंधाऱ्यावर पाणी आल्यामुळे ते वाहतुकीसाठी अनेक दिवस बंद करण्यात आले होते. हे बंधारे अनेक गावांना जोडले असल्यामुळे यावरुन एस.टी, ट्रॅक्टर, ऊस वाहतूक करणारी वाहने, अवजड वाहने जात असतात. यामुळे बंधाऱ्यावरील रस्त्यात खड्डे पडलेले आहेत. शेतकरी व ग्रामीण भागातील लोकांच्या सोयीसाठी या बंधाऱ्यांना समांतर पूल बांधावेत अशी मागणी करण्यात आली आहे.
याबाबतच्या निवेदनावर उपजिल्हाप्रमुख संभाजी पाटील, तालुका प्रमुख युवराज पोवार, शहर प्रमुख ओंकार माद्याळकर, उपतालुकाप्रमुख संजय येसादे, युवा सेनेचे महेश पाटील, अमित गुरव, सुयश पाटील, अनिल सुतार, विजय गुरव, दिनेश कांबळे, महादेव गुरव सह पदाधिकारी शिवसैनिक यांच्या सह्या आहेत.

आजरा येथे संत शिरोमणी नामदेव महाराजांचा ६७५ वा संजीवन समाधी सोहळा उत्साहात

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
सालाबादप्रमाणे संत नामदेव शिंपी समाज, आजरा यांच्या वतीने संत शिरोमणी श्री नामदेव महाराज यांचा ६७५ वा संजीवन समाधी सोहळा मोठ्या उत्साहात श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर, व्यंकटेश गली, आजरा येथे साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात श्री विठ्ठल-रुक्मिणी यांच्या मूर्तीची पंचामृत अभिषेक व महापूजेनं झाली. ही महापूजा सौ. धनश्री व श्री. ओंकार रेळेकर यांच्या हस्ते संपन्न झाली.
या प्रसंगी समाजाचे पदाधिकारी अध्यक्ष सौ. सुप्रिया श्रीकांत रेळेकर, उपाध्यक्ष सौ. प्रियांका अभिषेक शिंपी, सचिव सौ. अक्षता विशाल रेळेकर व खजिनदार सौ. कार्तिकी दीपक चिक्कुर्डे उपस्थित होते.
श्री रवळनाथ भजनी मंडळ, आजरा यांच्या भजन व भक्तिगीतांनी कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर शिरसंगी येथील वेदमूर्ती पुरोहित ह.भ.प. बाळ महाराज सुतार यांनी संत शिरोमणी श्री नामदेव महाराज यांचे चरित्र व कीर्तन सादर केले.
दुपारी ठीक १२ वाजता श्री नामदेव महाराजांच्या प्रतिमेवर समाजबांधव व भजनी मंडळाच्या सदस्यांतर्फे पुष्पवृष्टी करण्यात आली. सोहळ्यानिमित्त समाजाच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी परिसरातील मान्यवर, ग्रामस्थ व भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संध्याकाळी समाजाची वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली. यावेळी समाजाच्या ज्येष्ठ नागरिकांचा समाजाप्रती केलेल्या सेवेबद्दल सन्मान करण्यात आला. तसेच, समाजातील गुणवंत विद्यार्थी व विविध परीक्षा आणि पदवीप्राप्त विद्यार्थ्यांचा प्रशस्तीपत्र व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला.
याशिवाय, अखिल भारतीय नामदेव क्षत्रिय महासंघ, नवी दिल्ली यांच्यातर्फे आजरा, उत्तूर व चंदगड येथील ९ समाजबांधव व भगिनींची निवड झाल्याबद्दल त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. श्री. दिनेश चिक्कुर्डे यांनी केले, तर खजिनदार सौ. कार्तिकी दीपक चिक्कुर्डे यांनी आभार प्रदर्शन केले.

गिरणी कामगारांचा सोमवारी आजरा येथे मेळावा
आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
गिरणी कामगार वारसदारांना नऊ जुलै रोजी आझाद मैदानात झालेल्या आंदोलनात संघटनेच्या वतीने मांडलेली भूमिका व सरकारचे धोरण यावर चर्चा करणे करीता सोमवार दिनांक २८ जुलै रोजी किसान भवन आजरा येथे सकाळी११ वा. उपस्थीत रहाणेचे आवाहन काँ. शांताराम पाटिल यानी केले आहे.
या मेळाव्यात काँ. अतूल दिघे काँ. दत्तात्रय अत्याळकर काँ. धोडिंबा कुंभार मार्गदर्शन करणार आहेत. यामध्ये सेलू, वागंणी, पनवेल या ठिकाणी मुबंई बाहेर गिरणी कामगारांना घरे लागल्याचे सांगून कागद पत्रे मागणारे दलाल गिरणी कामगारांना फसवत आहेत. ही परस्थिती समजून घेण्यासाठी आजरा व दुपारी दोन वाजता चंदगड येथे मेळावे घेतले जात आहेत तरी सर्व गिरणी कामगार व वारसदारानी उपस्थित रहावे असे आवाहन कॉ. पाटील यांनी केले आहे केले आहे.

हनुमान तरुण मंडळ, गणेशोत्सव मंडळाचे भरत लोखंडे अध्यक्ष तर दीपक रावण उपाध्यक्ष
आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
उत्तूर येथील हनुमान तरुण मंडळ ‘गणेशोत्सव २०२५’ चे नुतन अध्यक्षपदी भरत लोखंडे व उपाध्यक्षपदी दिपक रावण यांची नियुक्ती करण्यात आली आहे.तर खजिनदारपदी संतोष आमणगी, सचिवपदी महेश करंबळी यांनी निवड करण्यात आली आहे.
यावेळी सदस्य अजीत उत्तूरकर, सुहास पोतदार,राजू पाटील, पुंडलिक पाटील, अनिल लोखंडे,किसन पाटील, सुजय पाटील, स्वप्नील पाटील, आतुल घोरपडे,पराग देशमाने रोहन पाटील सर्व सदस्य उपस्थित होते
मराठा गणेशोत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी उत्तूरकर
उत्तूर : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
उत्तूर, ता आजरा येथील हावळ गल्लीतील मराठा गणेशोत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी विशाल तुकाराम उत्तूरकर यांची तर उपाध्यक्षपदी अंकुश दत्तात्रय देसाई यांची निवड करण्यात आली. मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. सचिवपदी विनायक शिवाजी उत्तूरकर, तर खजिनदारपदी संतोष विठोबा कुराडे यांची निवड झाली.
पावसाचा जोर वाढला…
आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा तालुक्यामध्ये बुधवारी रात्रीपासून पावसाचा जोर वाढला असून पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहेत. गेले आठ दिवस पावसाने उघडीप दिली होती. मात्र बुधवारपासून पुन्हा एक वेळ पावसाचा जोर वाढला असून हिरण्यकेशी व चित्री नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होऊ लागली आहे.
रोप लावणीची कामे सध्या अंतिम टप्प्यात आहेत.

फोटो क्लिक…


निधन वार्ता
सुनील सडेकर

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
रामदेव गल्ली, आजरा येथील सुनील विजय सडेकर यांचे आकस्मिक निधन झाले. निधन समयी त्यांचे वय ३६ वर्षे होते.
त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, आई, दोन विवाहित बहिणी असा परिवार आहे.


