

धनगर वाडा येथे घरात शिरला बिबट्या…
हल्ल्यात शेळी ठार

आजरा; मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आवंडी धनगर वाडा क्रमांक दोन येथे कान्हू विठू शेळके यांच्या घरी सोमवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास अचानकपणे बिबट्याने प्रवेश केल्याने शेळके कुटुंबीय गोंधळून गेले. दरम्यान गोठ्यातील शेळीवर बिबट्याने हल्ला करून ठार मारले. सुदैवाने इतर जनावरे व शेळके कुटुंबीय बचावले.
याबाबत मिळालेली माहिती अशी…
धनगर वाडा क्रमांक दोन येथे शेळके दांपत्य रहाते. सोमवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास त्यांना जनावरांचा गोंधळ ऐकू आला. घराच्या पाठीमागच्या खोलीत त्यांनी येऊन पाहिले असता बिबट्याने एका शेळीवर हल्ला करून तिला आपल्या ताब्यात घेऊन ओढून नेत असताना दिसले. शेळके कुटुंबीयांनी त्याच्यावर बॅटरीचा प्रकाशझोत टाकला व गोंधळ केला. हा गोंधळ पाहून बिबट्याने जखमी शेळी तिथेच टाकून जंगलाच्या दिशेने पळ काढला कालांतराने सदर शेळी मृत पावली.
शेळके कुटुंबियांनी प्रसंगावधान दाखवल्याने इतर जनावरे बचावली. बिबट्याच्या बंदोबस्ताचे आव्हान वनविभागा समोर निर्माण झाले आहे.

उत्तुरच्या वृषाली कांबळे यांचे यूपीएससी परीक्षेत यश

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
वृषाली संतराम कांबळे या उत्तुर येथील (सध्या रा. मुंबई) कन्येने पहिल्याच प्रयत्नात देशभरात ३१० वी रँक घेवून यूपीएससी मुख्य परीक्षा उत्तीर्ण झाली. थेट यूपीएससी होणारी पंचक्रोशीतील वृषाली पहिलीच मुलगी ठरली आहे.
वृषाली चे प्राथमिक, माध्यमिक व पदवीचे शिक्षण मुंबई येथे झाले असून ती राज्यशास्त्र विषयातील पदवीधर आहे. तिच्या या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.

मोरेवाडी, मोरेवाडी धनगरवाड्यावर पाण्यासाठी वणवण… कुपनलिका अधिग्रहणाचा निर्णय

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा तालुक्यात पाणी टंचाईच्या झळा जाणवू लागल्या आहेत. तालुक्यात वाटंगी
धनगरवाडा या वसाहतींना पाणी टंचाई भासू लागली आहे. ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. पंचायत समिती प्रशासनाने टंचाई दूर करण्यासाठी
हालचाली सुरु केल्या असून खासगी कुपनलिका अधिग्रहण करण्याचा निर्णय घेतला आहे.
आजरा तालुक्यात पाणी टंचाईचे संकट गंभीर होत आहे. तालुक्यातील वाटंगीपैकी मोरेवाडी व मोरेवाडी धनगरवाडा या वसाहतीवर सामना ग्रामस्थांना करावा लागत आहे. पिण्याचे पाणी मिळवण्यासाठी ग्रामस्थांना धावपळ करावी लागत आहे. पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. वाटंगीपासून तीन किलोमीटर अंतरावर मोरेवाडी व धनगर वसाहतीची पाचशे इतकी लोकसंख्या आहे. या वसाहतींना जंगलातून सायफन पध्दतीने पाणीपुरवठा होतो. यंदा पाऊस कमी झाल्याने जंगलातील झरे आटले आहेत . ग्रामस्थांना पाणी मिळवणे अडचणीचे झाले असून पाण्यासाठी हाल होत आहेत. पाणी टंचाई दूर करण्यासाठी प्रशासनाकडून हालचाल सुरु झाली आजरा पंचायत समितीमध्ये मोरेवाडी, मोरेवाडी धनगरवाड्यावरील पाणी टंचाईबाबत गटविकास अधिकारी संजय ढमाल यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली.
प्रशासनाने हे गांभिर्याने घेतले असून येथील खासगी कुपनलिका अधिग्रहणाचा निर्णय घेण्यात आला आहे. मोरेवाडी व मोरेवाडी धनगर वसाहतीवरील कुपनलिका अधिग्रहण करून त्यातील पाणी ग्रामस्थांना पिण्यासाठी पुरविले जाणार असल्याचे ग्रामिण पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता महादेव तिवले यांनी सांगितले.

आजरा साखर कारखान्याची हंगाम अखेरची संपुर्ण ऊस बिले जमा

आजरा: मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
वसंतराव देसाई आजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्यांने १ फेब्रुवारी २०२४ पासून हंगाम अखेर गाळपास आलेल्या ऊस बिलाची रक्कम विनाकपात रू. १९ कोटी ९२ लाख ४७ हजार व तोडणी वाहतुकीच्या संपुर्ण बिलाची रक्कम रू.२ कोटी १७ लाख ४५ हजार अशी एकूण रक्कम रू. २२ कोटी ९ लाख ९२ हजार संबधित ऊस पुरवठादार शेतक-यांच्या व तोडणी वाहतुकदारांच्या सेव्हींग बैंक खातेवर जमा करण्यात आली असले बाबतची माहिती कारखान्याचे चेअरमन श्री. वसंतराव धुरे यांनी दिली. तरी संबंधी ऊस पुरवठादार शेतकरी व तोडणी वाहतुकदारांनी आपल्या बँकेशी संपर्क साधुन बिल उचल करावे असे आवाहन केले आहे.
त्याचबरोबर कार्यक्षेत्रातील, गडहिंग्लज व चंदगड तालुक्यातील शेतक-यांनी आपल्या कारखान्याच्या शेती सेंटर ऑफिसशी संपर्क साधून संपुर्ण ऊसाच्या नोंदी व करार करावेत असेही मा.चेअरमन यांनी स्पष्ट केले.
यावेळी कारखान्याचे व्हा. चेअरमन श्री. मधुकर देसाई, जिल्हा बँकेचे संचालक तथा बैंक प्रतिनिधी श्री. सुधीर देसाई, कारखान्याचे संचालक श्री. विष्णू केसरकर, श्री. उदयसिह पोवार, श्री. मुकुंदराव देसाई, श्री. मारूती घोरपडे, श्री. सुभाष देसाई, श्री. अनिल फडके, श्री. दिपक देसाई, श्री. रणजित देसाई, श्री. संभाजी रामचंद्र पाटील, श्री. शिवाजी नांदवडेकर, श्री. राजेंद्र मुरूकटे, श्री. राजेश जोशीलकर, श्री. संभाजी दत्तात्रय पाटील, श्री. गोविंद पाटील, श्री. अशोक तर्डेकर, श्री. काशिनाथ तेली, श्री. हरी कांबळे, संचालिका सौ. रचना होलम, सौ. मनिषा देसाई, तसेच कारखान्याचे तज्ञ संचालक श्री. नामदेव नार्वेकर, श्री. रशिद पठाण आणि प्र.कार्यकारी संचालक श्री.व्ही. के. ज्योती व अधिकारी उपस्थित होते.

पेरणोलीत आठवडा बाजार सुरू…

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
पेरणोली ता. आजरा येथे आज दि.१७ पासून आठवडा बाजार सुरू होत असल्याची माहिती पेरणोलीच्या सरपंच सौ. प्रियांका संतोष जाधव यांनी दिली.
सकाळी आठ ते दुपारी बारा वाजेपर्यंत सदर बाजार भरणार असून पेरणोली पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी याची नोंद घ्यावी असे आवाहनही जाधव यांनी केले आहे.

निधन वार्ता
महादेव कडगावकर
करपेवाडी (ता.आजरा ) गावचे रहिवासी महादेव रामचंद्र कडगावकर (वय ७० वर्षे ) यांचे काल दुपारी अल्पश: आजाराने निधन झाले. सरपंच श्री मच्छिंद्र महादेव कडगावकर यांचे ते वडील होत.
त्यांच्या पश्चात दोन विवाहित मुले, एक मुलगी, पत्नी, सूना, जावई नातवंडे असा परिवार आहे.



