रविवार दिनांक २० एप्रिल २०२५




दुचाकी व चारचाकी धडकेत दुचाकीस्वार ठार

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा – आंबोली मार्गावर माद्याळ ते देवर्डे दरम्यानच्या वळणावर दुचाकी (MH – 09 GS – 0008) व चारचाकीची (MH – 43 N – 5001) समोरासमोर धडक होऊन यामध्ये २३ वर्षीय तरुण महाविद्यालयीन दुचाकी रायडरचा मृत्यू झाला. मृत दुचाकीस्वाराचे नाव सिद्धेश विलास रेडेकर (रा.माळी कॉलनी,टाकाळा, कोल्हापूर ) असे आहे.
याबाबत मिळालेली प्राथमिक माहिती अशी…
सिद्धेश रेडेकर याला मोटरसायकल रायडींगचा शौक होता. आज रविवारी सकाळी तो फरहाद खान, नितांत कोराणे व अमेय रेडीज (सर्व.रा.कोल्हापूर) यांच्यासोबत दुचाकी रायडिंग करता आंबोली येथे गेला होता. आंबोली घाट येथून परतत असताना देवर्डे ते माद्याळ दरम्यान कोल्हापूरहून सावंतवाडीच्या दिशेने जाणाऱ्या चारचाकी व दुचाकीची धडक झाली. यामध्ये सिद्धेश हा गंभीर जखमी झाला.
त्याला उपचारासाठी गौराई रुग्णवाहिकेचे चालक सागर नाईक यांनी गडहिंग्लज येथे तातडीने हलविले परंतु प्रवासादरम्यान त्याचा वाटेतच मृत्यू झाला असे सांगण्यात आले.
आर्किटेक्ट चे शिक्षण घेणाऱ्या सिद्धेश याच्या पश्चात आई-वडील, दोन विवाहित बहिणी असा परिवार आहे. सुप्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक विलासराव रेडेकर यांचा तो मुलगा होता.
दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान…

अपघातामध्ये चारचाकीसह दुचाकीचे मोठे नुकसान झाले आहे. दुचाकीचा तर अक्षरशः चेंदामेंदा झाला आहे.
दुचाकी रायडिंग करणाऱ्यांचे यापूर्वीही या मार्गावर छोटे मोठे अपघात झाले आहेत. यामध्ये अनेक जण जखमी झाले आहेत. आजच्या अपघातात मात्र तरुण युवकाचा मृत्यू झाला.






