दि. १६ सप्टेबर २०२४


अखेर त्या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू…

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
कोवाडे ता. आजरा येथील अंजना कृष्णा लिंगनुरे (वय ५५ वर्षे ) या पंधरा दिवसापूर्वी हाजगोळी फाट्यावर झालेल्या मोटरसायकल अपघातातील जखमी महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. गेली पंधरा दिवस त्यांची मृत्यूशी झुंज सुरू होती. अखेर त्याना मृत्यूने गाठलेच.
याबाबत मिळालेले अधिक माहिती अशी की…
पतीच्या श्राद्धाचा कार्यक्रम आटोपून लिंगनूरे या कोवाडे येथून १५ दिवसांपूर्वी आज-याच्या दिशेने चालल्या होत्या. दरम्यान हाजगोळी फाट्यावर गतिरोधकावरून गाडी जात असताना त्या गाडीवरून बाजूला फेकल्या गेल्या व गंभीर जखमी झाल्या. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यानच त्यांचा मृत्यू झाला.
त्यांच्या पश्चात एक विवाहित मुलगा, सून, मुलगी असा परिवार आहे.

चार लाखांचा गाळप टप्पा ओलांडण्यासाठी यंत्रसामग्रीत आवश्यक ते बदल : वसंतराव धुरे

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
येत्या गळीत हंगामामध्ये कोणत्याही परिस्थितीत चार लाख मे.टन ऊस गाळप करण्याच्या दृष्टीने संचालक मंडळ प्रयत्नशील असून यासाठी यंत्र सामग्रीत आवश्यक ते बदल करून घेण्यात आले असल्याचे माहिती वसंतराव देसाई आजरा तालुका शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष वसंतराव धुरे यांनी दिली.
यावेळी अध्यक्ष धुरे म्हणाले, यावर्षी सुदैवाने समाधानकारक पाऊस झाला आहे.महामार्गाचे कामही पूर्णत्वास गेले आहे. तोडणी-ओढणी यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली असून क्रशिंग वाढवण्याच्या उद्देशाने इव्हॅपरेट बॉडीमध्ये बदल करण्यात आले आहेत. यामुळे कारखान्याची गाळप क्षमता वाढण्यास मदत होणार आहे. शुगर सायलो सिस्टीम या ऑटोमॅटिक सिस्टीममुळे हमाली खर्चासह पोत्याच्या वजनामध्ये होणारी तूट अथवा अतिरिक्त साखर जाणे, साखर पोती फाटणे अशा बाबींना प्रतिबंध बसणार आहे. सायलो सिस्टीम मुळे साखरेचे तापमान एकसारखे राखण्यात मदत होणार असून व त्यामध्ये साखरेचे घट्ट होणारे प्रमाण कमी होईल व साखरेची प्रतही चांगली राहील असेही त्यांनी सांगितले. या बदलामुळे निश्चितच ४ लाख मे.टन गाळपाचा टप्पा ओलांडण्यास मदत होणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
कारखान्याचे उपाध्यक्ष एम. के. देसाई, संचालक सुधीर देसाई, मुकुंददादा देसाई, अनिल फडके, राजू मुरकुटे, प्रभारी कार्यकारी संचालक व्यंकटेश ज्योती यावेळी उपस्थित होते.

कचरा गावच्या वेशीपाशी…
वासरू गेले जीवानिशी...

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा शहरातील कचऱ्याची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली असून ठीक- ठिकाणी पडलेला कचरा हा भटक्या जनावरांच्या जीवावर बेतत आहे. काल एका वासराचा यामुळे मृत्यू झाला.
रविवारी सकाळी कचऱ्यातच खाद्य शोधणाऱ्या वासराला चारचाकी वाहनाने धडक दिल्याने वासराचा जागीच मृत्यू झाला.अन्याय निवारण समितीच्या कार्यकर्त्यांनी सदर मृत वासराला उचलून नगरपंचायत कर्मचाऱ्यांच्या मदतीने इतरत्र हलवले.

हारुर येथे संवेदना फलोद्यान अंतर्गत वृक्षारोपण

आजरा: मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
हारूर ता.आजरा येथे संवेदना फलोद्यान उभा करण्याच्या पार्श्वभूमीवर तीन एकर क्षेत्रामध्ये ५८० वृक्षांचे रोपण करण्यात आले.
समारंभ पूर्वक झालेल्या या वृक्षारोपणाची सुरुवात वृक्ष दिंडीने व पारंपारिक भजनाने करण्यात आली. हारुर गावातील ग्रामदैवत चाळोबा मंदिर समोर साहसी खेळांची प्रात्यक्षिके दाखवण्यात आली. गावातील महिलांनी कलश घेऊन चाळोबा मंदिर ते संवेदना फलोद्यान पर्यंत मार्ग परीक्रमा केली. यानंतर हारूर, गजरगाव, सुळे, महागाव ,उंबरवाडी सरंबळवाडी, कानोली गावातील ग्रामस्थांनी वृक्षारोपण केले. शिवाजी विद्यालय, महागाव व सरस्वती विद्यामंदिर, गजरगाव यांनी यावेळी विशेष भूमिका बजावली.


गणेश दर्शन





आजचे कार्यक्रम…

♦आदर्श कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळ, धनगरमोळा यांच्या वतीने भव्य झिम्मा फुगडी स्पर्धा…
♦जाणता राजा कला क्रीडा व सांस्कृतिक गणेशोत्सव मंडळ, बहिरेवाडी यांच्या वतीने डबलबारी शाहिरीचा कार्यक्रम व महाप्रसाद सायंकाळी सात वाजता…

आसपास…
निपाणीजवळ आठ वाहनांचा विचित्र अपघात : दोन ठार तर अकरा जखमी!

निपाणी : निपाणी येथील तंवदी घाटाच्या उतारावर एक विचित्र अपघात रविवारी (दि.१५) घडला. पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर चार ट्रक, तीन कार व एक दुचाकी अशी आठ वाहने एका पाठोपाठ वाहनांना धडकली. या विचित्र अपघातात एका महिला आणि एका पुरुषाचा मृत्यू झाला.
यामध्ये जबीन महंमदहुसेन मकानदार (वय ५८ रा. दर्गा गल्ली निपाणी) आणि संतोष गणपती माने (वय ५९ रा.भोज) अशी मयतांची नावे आहेत. तर ११ जण जखमी झाले आहेत. या अपघातामध्ये ट्रक, कार आणि दुचाकीचा चक्काचूर झाला आहे. तर जखमी पट्टणकडोली, निपाणी, गडहिंग्लज, हुबळी येथील आहेत. घटनास्थळी निपाणी शहर पोलीसांनी भेट देऊन तपास घटनेची माहिती घेतली.
सौजन्य : https://chat.whatsapp.com


