mrityunjaymahanews
अन्य

सातच्या बातम्या

बुधवार १३ मे  २०२६

हिरण्यकेशी नदीपात्रात मामा भाचे बुडाले…

कोवाडे बंधाऱ्या जवळील घटना

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

हिरलगे ता. गडहिंग्लज येथे अरुण बंडू सुतार यांच्या सेवानिवृत्तीचा कार्यक्रम आटोपून कोवाडे ता.आजरा येथे मामाच्या गावी परतत असताना मामा सुनील विष्णू सुतार (वय ४८ वर्षे राहणार कोवाडे) व भाचा प्रवीण पांडुरंग सुतार ( वय ३५ वर्षे रा. वाळकी, ता. निपाणी ) हे दोघेजण हिरण्यकेशी नदीवरील हिरलगे ते कोवाडे बंधाऱ्याजवळ बुडाल्याने त्यांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी…

मृत सुनील व प्रवीण हे दोघे हिरलगे येथे कार्यक्रम आटोपून सोमवार दिनांक ११ रोजी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास कोवाडे येथे मोटरसायकल वरून गेले होते. परंतु प्रवीण हा घरी न परतल्याने त्यांच्या वडिलांनी कोवाडेतील नातेवाईकांना फोन करून विचारले असता सुनील व प्रवीण दोघेही कोवाडे येथे आले नसल्याचे समजले. दरम्यान त्यांचा शोध सुरू असताना त्यांची मोटरसायकल हिरण्यकेशी नदीच्या काठावर आढळून आली पण सुनील व प्रवीण दोघेही आढळले नाहीत. त्यांचा नातेवाईकांनी शोध सुरू केला असता हिरलगे व कोवाडे गावाच्या मधील बंधाऱ्याजवळ दोघांचेही मृतदेह आढळून आले.

सुनील विष्णू सुतार हे सुतार कामातिल अत्यंत कुशल असे कारागीर होते. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, भाऊ, मुलगा व मुलगी आहे. भाचा प्रवीण पांडुरंग सुतार यांच्या पश्चात आई, वडील व पत्नी व दोन मुली आहेत. पोलीस हवालदार श्री. साजिद शिकलदार पुढील तपास करीत आहेत.

अल्बर्ट डिसोजा यांना पुत्रशोक…
नेल्सन डिसोजा यांचे आकस्मिक निधन

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

येथील आजरा साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष, आजरा पंचायत समितीचे माजी सभापती व वाटंगी येथील सन्मित्र संस्था समूहाचे प्रमुख श्री. अल्बर्ट नातवेद डिसोजा यांचे चिरंजीव नेल्सन यांचे अल्पशा आजाराने काल मंगळवारी दुपारी निधन झाले. निधन समयी त्यांचे वय २९ वर्षे होते.

अचानक प्रकृती बिघडल्याने नेल्सन यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यानच त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पत्नी, वडील अल्बर्ट डिसोजा, आई, तीन विवाहित बहिणी असा परिवार आहे. आज बुधवारी दुपारी चार वाजता सेंट सॅबेस्टियन चर्च, वाटंगी येथे त्यांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

विचित्र योगायोग…

वर्षभरापूर्वी १२ मे २०२५ रोजी नेल्सन यांचा विवाह झाला होता. काल त्यांच्या विवाहाचा पहिला वाढदिवस असतानाच त्यांचा मृत्यू झाला.

आण्णासाहेब पाटील महामंडळासह ‘ सारथी ‘ ला शासनाने मदत करावी : अखिल भारतीय मराठा महासंघाची मागणी

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

मराठा समाजाच्या सामाजिक आर्थिक व शैक्षणिक मागासलेपणातून प्रगती होण्यासाठी आण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ व सारथी या दोन संस्था सुरू करण्यात आल्या असून सदरच्या दोन्ही संस्था बंद पाडण्याचे काम सुरू आहे याचा मराठा समाजाला खेद असून समाजामध्ये सरकार विरोधात रोष निर्माण होत आहे. दोन्हीही संस्था व्यवस्थित चालण्यासाठी शासनाने ताबडतोब निधीची तरतूद करावी अन्यथा वेगवेगळ्या प्रकारची आंदोलने उभा केली जातील असा इशारा अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने मुख्यमंत्र्यांना निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.

अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळामार्फत कोल्हापूर जिल्ह्यात आज पर्यंत छोटे-मोठे उद्योग सुरू केलेल्यांची संख्या २३४२४ इतकी आहे सहकारी बँकांनी व्यावसायिकांना सुमारे २१९२ कोटींचे कर्ज पुरवले आहे सदर कर्जावरील १२ टक्के प्रमाणे होणाऱ्या व्याजाचा परतावा महामंडळाकडून गेली आठ महिने मिळालेला नाही यासाठी ३०० कोटीची रक्कम तातडीने देणे गरजेचे आहे त्याचबरोबर बार्टी महात्मा ज्योतिबा फुले महामंडळासारख्या व इतर महामंडळाप्रमाणे भारतीय संस्थेमार्फत विद्यार्थ्यांना सर्वांगीण शैक्षणिक विकास होण्यासाठी शिष्यवृत्ती योजना मागील वर्षापर्यंत सुरू होती पण ही योजना ही अचानक बंद केली आहे असा आरोपही करण्यात आला आहे.

याबाबतची निवेदन देताना जिल्हाध्यक्ष मारुती मोरे, तालुकाध्यक्ष बंडोपंत चव्हाण, जिल्हा उपाध्यक्ष चंद्रकांत राजाराम देसाई, शिवाजी पाटील, शंकरराव शिंदे, प्रकाश देसाई, संभाजी इंजल, शिवाजीराव इंजल, समीर पारधे, सि.डी. सरदेसाई, गणपतराव डोंगरे, शिवाजीराव गुडूळकर आदी उपस्थित होते.

आजरा येथे साहित्य क्षेत्रातील मान्यवरांचा उद्या सन्मान सोहळा

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

ब्रह्माकुमारीज साहित्याचे अष्टपैलू रचनाकार राजयोगी ब्रह्माकुमार आदरणीय जगदीश भाईजी यांच्या २५ व्या पुण्यस्मृती दिनानिमित्त गुरुवार दिनांक १४ मे २०२६ रोजी सकाळी ८ ते ९ या वेळेत ब्रह्माकुमारीज सेवा केंद्र, आजरा येथे विशेष “स्मृतिदिन व सन्मान सोहळा” आयोजित करण्यात आला आहे.

या कार्यक्रमात आजरा तालुक्यात साहित्य, पत्रकारिता व सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या विविध मान्यवरांचा सन्मान करण्यात येणार आहे. लेखक, कवी, नाटककार, पत्रकार, वाचनालय अध्यक्ष, वृत्तपत्र वितरक, प्रकाशक, मुद्रक, छायाचित्रकार तसेच व्यंगचित्रकार अशा विविध क्षेत्रांतील सेवाभावी व्यक्तींना गौरविण्यात येणार आहे.

कार्यक्रमाचे आयोजन ब्रह्माकुमारीज, आजरा यांच्या वतीने करण्यात आले असून समाजात सकारात्मक विचार, संस्कार आणि साहित्यसेवेची प्रेरणा देणाऱ्या व्यक्तींप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा उपक्रम असल्याचे आयोजकांनी सांगितले.

यातालुक्यातील साहित्यप्रेमी, पत्रकार, सांस्कृतिक क्षेत्रातील कार्यकर्ते आणि नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

विशेष बातम्या…

♦ पेपर फुटीचे ग्रहण लागलेली NEET- २०२६ परीक्षा अखेर रद्द करण्याची नामुष्की शासनाला आली असून त्याचा फटका २३ लाख विद्यार्थ्यांना बसणार आहे.

♦ मोटेवाडी तालुका जत जिल्हा सांगली येथील वादळी वाऱ्यामुळे स्वतःचा बचाव करण्यासाठी मंदिराच्या भिंती लगत उभारलेल्या सहा जणांचा भिंत कोसळून मृत्यू झाला तर बारा जण जखमी झाले आहेत.

♦ पुढील चार ते पाच दिवसांमध्ये तापमानात प्रचंड वाढ होणार असून नागरिकांनी काळजी घ्यावी असे आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आले आहे.

♦ जिल्हा परिषदेच्या वतीने घनसाळ देशी वाण संवर्धन योजना नव्याने प्रस्तावित करण्यात आली असून या अंतर्गत २५ हेक्टर क्षेत्रावर घनसाळ लागवड करण्यात येणार आहे.

♦ भारतीय शेअर बाजारात मोठी घसरण झाली असून सेन्सेक्स कोसळल्याने व रुपयाचे निचांकी अवमूल्यन झाल्याने गुंतवणूकदारांचे १७.३० लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.

गट- तट विसरून सर्वांनी गावच्या विकासात योगदान द्यावे : वनश्री देसाई

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

गट- तट विसरून सर्वांनी गावच्या विकासात योगदान द्यावे. राजकारणा पलिकडे गावचा विकास महत्वाचा आहे. रस्ते, गटर्स, पाणंद रस्ते, पिण्याचे पाणी यासह शाश्वत विकासासाठी सर्वांनी एकत्रित आले पाहीजेत असे प्रतिपादन पेरणोली ग्रामपंचायतीच्या नुतन सरपंच सौ. वनश्री देसाई यानी केले.

पेरणोली ग्रामपंचायतीमधे नूतन सरपंच सौ.वनश्री देसाई यांचा कार्यालयीन प्रवेश कार्यक्रम झाला. या वेळी देसाई बोलत होत्या.

उपसरपंच संकेत सावंत, राजेंद्र सावंत, तानाजी देसाई, सर्जेराव देसाई, संतोष जाधव, सुभाष देसाई, जित फगरे, संदिप नावलकर, रुपाली पाईम, सुषमा मोहीते, सुनिता कालेकर, दिनेश कांबळे आदी प्रमुख उपस्थित होते.

ग्रामसेविका अमिषा देवर्डेकर यांनी स्वागत केले. मान्यवरांच्या हस्ते नूतन सरपंच सा. देसाई यांचा सत्कार करण्यात आला.

सुभाष देसाई म्हणाले, पेरणोलीचा दबदबा तालुक्यात आहे. या गावातील अनेकांनी तालुका पातळीवर नेतृत्व केले आहे. गावात विकासाची कामे सुरु आहेत. पण अजूनही पाणंद रस्ते व अन्य विकासकामे शिल्लक आहेत. त्याबाबत प्रयत्न करावेत. तानाजी देसाई म्हणाले, निवडणुकीपुरते राजकारण असते. निवडणुकीनंतर ते विसरून जावे. गावात विविध प्रश्न आहेत. ते सोडवण्यासाठी प्रत्येकांने प्रयत्न करावेत. या दोन वर्षात विकासाची चांगली कशी कामे होतील ते पहावेत. पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या माध्यमातून विकासकामासाठी निधी आणूया. हरीभाऊ कांबळे यांचे भाषण झाले.
काकासो देसाई, उतम देसाई, दीपक देसाई, सुरेश कालेकर, रमेश कालेकर, ज्ञानोबा सासुलकर, विष्णु दारुडकर, दीपक लोखंडे, शंकर लोखंडे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

आजचे कार्यक्रम…

सुलगाव येथील श्री जगदंबा राजेश्वरी भावेश्वरी देवी प्राणप्रतिष्ठापना व कलशारोहण कार्यक्रमाचा शुभारंभ…

रवळनाथ मंदिर पारपोली येथे श्री देव लिंगेश्वर पुन:प्रतिष्ठापना सोहळा व श्री पावणाई रवळणाथ वर्धापन दिन सोहळा आजपासून सुरू होत आहे.

आयपीएल न्यूज 

काल झालेल्या गुजरात विरुद्ध हैदराबाद सामन्यांमध्ये गुजरातने हैदराबादचा ८२ धावांनी पराभव केला. कागिसो रबाडा याला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले. या विजयामुळे गुणतक्त्यात गुजरात प्रथम क्रमांकावर गेला आहे.

गुण तक्ता

गुजरात १६
बंगळुरू १४
हैदराबाद १४
पंजाब १३
चेन्नई १२
राजस्थान १२
दिल्ली १०
कोलकता ९
मुंबई ६
लखनौ ६

आजचा सामना

बंगळुरू विरुद्ध कोलकाता
वेळ : सायंकाळी ७.३० पासून

आजचे पंचांग 

आजचे पंचांग
दिनांक : १३ मे २०२६
वार : बुधवार
माह (अमावस्यांत) : वैशाख
माह (पूर्णिमांत) : ज्येष्ठ
ऋतु : ग्रीष्म
आयन : उत्तरायण
पक्ष : कृष्ण पक्ष
तिथी : एकादशी तिथी (दुपारी ०१ २९ पर्यंत) त्यानंतर द्वादशी तिथी
नक्षत्र : उत्तराभाद्रपदा नक्षत्र (१४ मे रात्री १२.१७ पर्यंत) त्यानंतर रेवती नक्षत्र
योग : विष्कुम्भ योग (रात्री ०८.५४ पर्यंत) त्यानंतर प्रीति योग
करण : बलवा करण (दुपारी ०१.२९ पर्यंत) त्यानंतर कौलव करण
चंद्र राशी : मीन राशी
सूर्य राशी : मेष राशी
अशुभ मुहूर्त:
राहु काळ : दुपारी १२.३५ ते दुपारी ०२.१३ पर्यंत
सूर्योदय : सकाळी ०६.०६
सूर्यास्त : सायंकाळी ०७.०४
संवत्सर : पराभव
संवत्सर(उत्तर) : रौद्र
विक्रम संवत: २०८३ विक्रम संवत
शक संवत: १९४८ शक संवत

 

संबंधित पोस्ट

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

आजरा सूतगिरणी वार्षिक सर्वसाधारण सभा

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

गद्दार हे गद्दारच…राजीनामे दया व निवडून या… युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांचा आजरा येथील सभेत घणाघात…

mrityunjay mahanews
error: Content is protected !!