

आजरा कारखान्यास बोगस धनादेश देणा-या नऊ जणांना शिक्षा

आजरा : प्रतिनिधी
आजरा साखर कारखान्यास सन २०१८ व २०१९ या गळीत हंगामात ऊस तोडणी वाहतुक यंत्रणा पुरविणेसाठी घेतलेल्या ॲडव्हान्स रक्कमेतील थकीत रक्कमेच्या फेडीपोटी बोगस धनादेश दिल्याप्रकरणी आजरा न्यायदंडाधिकारी एस्. पी. जाधव यांनी नऊ जणांना एक वर्षाची कैद शिक्षा व पाच हजार रूपये दंड ठोठावला आहे.
सागर भुजंगा सुतार रा. टिक्केवाडी, हरीबा ईश्वर माने रा.मडिलगे बु..सुभाष साताप्पा पाटील रा.कोनवडे, सुनिल बापु पाटील रा.कोनवडे, पांडूरंग विष्णू पाटील रा.मुदाळ, श्रीधर हरीबा माने रा.मडिलगे बु. श्री. नामदेव कुंडलिक पोवार रा. पळशिवणे, रंगराव पांडूरंग आसबे रा. टिक्केवाडी, श्री. रविंद्र बापुसा नेवगे रा. आवळी, ता. राधानगरी या आरोपींनी कारखान्यास सन २०१९ मध्ये थकीत रक्कम फेडण्यासाठी चेक दिले होते.
सदरचे धनादेश न वटलेने त्यांचे विरुध्द प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी आजरा येथे स्वतंत्ररित्या केसीस दाखल केल्या होत्या.
त्यांनी कारखान्यास दिलेल्या धनादेश रक्कमे इतकी सर्वांची मिळून २८लाख ७५ हजार इतकी नुकसान भरपाई कारखान्यास देणेचा आदेश केला आहे. फिर्यादी कारखान्याचेवतीने वकिल म्हणून ॲड.बी. के. देसाई यांनी काम पाहिले तर फिर्यादी म्हणून अनिल देसाई यांनी केसीस दाखल केल्या व राजकुमार कदम लिगल क्लार्क यांनी जाबजबाब दिले.


बसवर झालेल्या दगडफेकीचा आज-यात निषेध

आजरा: प्रतिनिधी
कोल्हापूर येथे शाळकरी मुलांच्या बसवर झालेल्या दगडफेकीचा निषेध करुन दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी सकल हिंदू समाजाच्या वतीने निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
बुधवार दि.३१ जानेवारी रोजी कोल्हापूरातील दसरा चौक परिसरात शाळकरी मुलांची सहल जात होती.या बसमधील काही लहान मुलांनी जय श्री रामच्या घोषणा दिल्या म्हणून मुस्लिम बोर्डिंग परिसरातील काही समाजकंटकांच्या जमावाने त्या निष्पाप निरागस शाळकरी मुलांच्या बसवर दगडफेक केली व जमाव फरार झाला.
संबंधित घटना ही अत्यंत लाजिरवाणी व सामाजिक सलोखा बिघडवणारी असून सदर हल्ला हा भ्याड व नपुसंक हल्ला आहे.
संविधानाने सर्व नागरिकांना आपला धर्म पाळण्याचा अधिकार दिला आहे.पण त्या निष्पाप शाळकरी मुलांच्यावर हल्ला होणे हे कृत्य फार विघातक आहे.
संबंधित घटनेतील दोषींना शोधून कठोर कारवाई व्हावी अशी मागणी करण्यात आली असून याबाबतची निवेदन आजरा तहसीलदार समीर माने व सहाय्यक पोलीस निरीक्षक नागेश यमगर यांना देण्यात आले आहे.
यावेळी संदीप पारळे, रवी नाईक यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.


उद्योजक होवून नोकऱ्या देणारे बना :समीर माने

आजरा: प्रतिनिधी
कोणताही अधिकारी नोकरी देऊ शकत नाही पण उद्योजक नोकरी देऊ शकतो. विविध योजनांच्या माध्यमातून शासन आपल्या दारात येत आहे त्याचा फायदा घ्यावा. उद्योजक होवून नोकऱ्या देणारे बना. असे आवाहन आजऱ्याचे तहसीलदार समीर माने यांनी केले.
येथील आजरा औदयोगिक वसाहत (एमआयडीसी) मध्ये मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत आज उद्योग मार्गदर्शन मेळावा झाला. उद्योग संचालनालय जिल्हा उद्योग केंद्र, कोल्हापूर व घनसाळ राईस मिल क्लस्टर एमआयडीसी आजरा यांच्यावतीने आयोजन करण्यात आले होते. तहसीलदार समीर माने अध्यक्षस्थानी होते. गटविकास अधिकारी संजय ढमाळ प्रमुख उपस्थित होते.
रणजित कालेकर यांनी स्वागत केले. घनसाळ राईस मिल क्लस्टरचे अध्यक्ष महादेव पोवार यांनी प्रास्ताविक केले. ते म्हणाले, शासनाचा पाठिंबा असल्याने उद्योग, व्यवसाय करण्यास कोणतीही अडचणी येणार नाही. तालुका उद्योगमय करण्यासाठी मेळावा घेतला आहे. जिल्हा बँक विभागीय अधिकारी सुनिल दिवटे म्हणाले, जिल्हा बँकेने विविध योजनामधून कर्जपुरवठा केला आहे. नव उद्योजकांना जिल्हा बँकेतून जास्तीत जास्त मदत करण्यात येईल. जिल्हा उद्योग निरिक्षक प्रज्वल कणसे यांनी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेची माहीती दिली. बँक ऑफ महाराष्ट्र शाखाधिकारी गोपालसिंह, कल्लाप्पा आवाडे बँकेचे ऋषिकेश मूडसाळे, विदर्भ कोकणचे शाखाधिकारी अमोल चौगले यांनी बँकाच्या कर्ज योजनांची माहीती दिली. रविंद्र वंजारे यांनी विविध उद्योगाबाबतचे प्रस्ताव व कर्ज रिपोर्ट याबाबत मार्गदर्शन केले. प्रा. दीपक खेडकर, सुधीर कुंभार, बाबू मांजरेकर यांनी मनोगत व्यक्त केली.
बैंक ऑफ इंडिया, सिरसंगीचे शाखाधिकारी अमोल फूले, प्रभाग समन्वयक शांताराम कांबळे, कल्लाप्पा आवाडे बँकेचे गडहिंग्लज शाखाधिकारी व मान्यवर उपस्थित होते. सूनील पाटील यांनी आभार मानले.


दप्तर तपासणी आवश्यकच…
बोगस बिगर शेती प्रकरणे

आजरा प्रतिनिधी
आजरा येथे बोगस बिगर शेती प्रकरणी झालेल्या घोटाळ्याची व्याप्ती लक्षात घेता शासन दरबारी असणाऱ्या दप्तराची तपासणी होणे आवश्यक आहे .
बिगर शेती प्रकरणी फेरफार नोंदी, डायऱ्या घालणे, पोटहिस्से करणे, रेखांकन बदलणे, नगररचना विभागाची बोगस कागदपत्रे जोडणे, नकाशे बदलणे, गट नंबर बदल करणे असे प्रकार घडल्याचे समजते. सर्व उघडकीस यायचे असल्यास या संपूर्ण कागदपत्रांची व दप्तराची तपासणी होणे आवश्यक आहे.
आता चौकशीचा फार्स थांबवून प्रत्यक्ष कारवाईला सुरुवात होण्याची मागणी ही प्लॉट धारकांकडून केली जात आहे.
प्लॉट घेताना खबरदारी आवश्यक…
शहरामध्ये सध्या दिसेल ती जागा बिगरशेती असा प्रकार सुरू आहे. पैशासाठी हापापलेल्या कर्मचारी व अधिकाऱ्यांना हाताशी धरून बेकायदेशीर रित्या प्लॉट पाडले जात आहेत. यामध्ये अनेक गैरप्रकार दिसत असल्याने गरजूंनी प्लॉट घेताना बिगर शेती प्रकरणांचे आदेश, त्याचे नकाशे, चतु:सीमा,शेड बॅक, रस्ते रिकामे भूखंड(ओपन स्पेस), या करता सोडलेल्या जागा, प्लॉटमधून अतिउच्च दाबाच्या विद्युत वाहिन्या जातात का? प्राथमिक सुविधांची अवस्था सर्व बाबींची वकीलांमार्फत सर्च रिपोर्ट घेऊन त्यानंतरच प्लॉट खरेदी करण्याची गरज निर्माण झाली आहे, अन्यथा फसवणूक होण्याची शक्यता नाकारता येत नाही.


उत्तुर येथे झालेल्या वक्तृत्व स्पर्धेत मिश्रकोटी, साळुंखे प्रथम

उत्तूर : प्रतिनिधी
येथील संयुक्त हिंदवी स्वराज यांच्या वतीने २२ जानेवारी श्रीरामलल्ला प्राणप्रतिष्ठा दिनानिमित्त वक्तृत्व स्पर्धा संपन्न झाल्या. स्पर्धेचे उद्घाटन सरपंच किरण आमनगी,आजरा साखर कारखाना चेअरमन वसंतराव धुरे, माजी जि. प. अध्यक्ष उमेश आपटे, यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी जि प केंद्र शाळा उत्तुरचे शिक्षक संतोष शिवणे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल त्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
स्पर्धा दोन गटात संपन्न झाल्या. स्पर्धेचा निकाल पुढील प्रमाणे मोठा गट – अनन्या मिश्रकोटी (साधना हायस्कूल गडहिंग्लज) , सोहम पाटील, रिया सावंत (पार्वती शंकर उत्तूर) सई पाटील, अवंती तांबेकर. लहान गट -भक्ती साळुंखे( पार्वती शंकर उत्तूर), श्रेया भोसले, ज्ञानेश्वरी पवार यांनी यश मिळवले. स्पर्धेत मोठ्या गटात १५ तर लहान गटात ६० स्पर्धकांनी सहभाग घेतला होता.
परीक्षक म्हणून बी.बी.पाटील, एस.टी.हाळवणकर, टी.ए. कांबळे, अनिल बामणे दिनकर खवरे, संतोष शिवणे यांनी काम पाहिले. स्पर्धा यशस्वी होण्यासाठी सर्व सदस्यांनी परीश्रम घेतले.


निधन वार्ता
अशोक कोरवी

कुंभार गल्लीत आगरा येथील अशोक बाबू कोरवी (वय ५२ वर्षे) यांचे अल्पश: आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक विवाहित मुलगी व मुलगा, सून, जावई, नातवंडे यांचा परिवार आहे.



