शुक्रवार दि.९ जानेवारी २०२६


‘स्वीकृत’ साठी फिल्डिंग…
नावांची फक्त चर्चाच

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा नगरपंचायत निवडणूक निकाल प्रक्रियेला सुमारे तीन आठवड्यांचा कालावधी पूर्ण होत आला असून लवकरच स्वीकृत संचालक निवडीच्या पार्श्वभूमीवर बैठक होत असल्याने ताराराणी आघाडीसह काँग्रेस कडून स्वीकृत नगरसेवक पद पदरात पाडून घेण्यासाठी अनेकांनी आता “फिल्डिंग’ लावण्यास सुरुवात केली आहे.
ताराराणी आघाडी जरी सत्तेवर असली तरीही या आघाडीला कांही प्रभागात मतदारांनी साथ दिलेली नाही. अशा प्रभागातून काही मंडळी इच्छुक आहेत. हीच अवस्था विरोधी आघाडीची असल्याने स्वीकृत सदस्य पदी संधी नेमकी कोणाला द्यायची याबद्दल संभ्रमावस्था आहे.
ताराराणी आघाडी कडून पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांचे कट्टर समर्थक विजय थोरवत, अश्कर लष्करे, विजयकुमार पाटील, विलास नाईक आदींची नावे पुढे येत आहे. ऐनवेळी एखादे नवीन नाव पुढे येण्याची शक्यताही नाकारता येत नाही.
विरोधी काँग्रेस आघाडी कडून विक्रम पटेकर, वैभव सावंत, आलम नाईकवाडे यांची नावे सध्या चर्चेत आहेत. शिवसेना उबाठा गटाचे उपजिल्हाप्रमुख संभाजी पाटील हे देखील स्वीकृत नगरसेवक पदासाठी इच्छुक आहेत. या आघाडीतूनही ऐनवेळी एखादे नवीन नाव समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
या निवडीच्या पार्श्वभूमीवर इच्छुकांनी दोन्ही आघाड्यांच्या प्रमुखांसह ज्या वरिष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली आघाड्या तयार झाल्या त्यांच्याशी थेट संपर्क साधून स्वीकृत नगरसेवक पद मिळवण्यासाठी जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत.
स्थानिक आघाडी प्रमुखांनी माघारी पूर्वी आपणालाच स्वीकृत नगरसेवक पदाचा शब्द दिला असल्याचे काहीजण सांगू लागले आहेत. यामुळे प्रथमच स्वीकृत नगरसेवक पदासाठी मोठी स्पर्धा तयार झाली आहे.

आजऱ्यातील नाट्यरसिक अभिरुची संपन्न : विपुल देशमुख
आजरा येथे नाट्यमहोत्सवास उत्साहात सुरुवात

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा तालुक्यात नाटकांना चांगला प्रतिसाद मिळत असतो. येथे होणाऱ्या नाट्यमहोत्सवाची राज्यात चर्चा आहे. येथील नाट्यरसिक अभिरुची संपन्न असून येथे इटलीसह आंतरराष्ट्रीय स्तरावरील नाटक सादर व्हावीत. असे प्रतिपादन नाट्यलेखक व दिग्दर्शक विपुल देशमुख यांनी केले.
येथील नवनाट्य कलामंच संस्था आजरा यांच्यावतीने आयोजीत कै. रमेश टोपले स्मृती राज्यस्तरीय नाट्यमहोत्सवाला थाटात सुरुवात झाली. ‘भांडा साख्य भरे’ या नाटकांने पडदा उघडला. या वेळी झालेल्या उद्घाटन सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी नवनाट्य कलामंचचे अध्यक्ष व नूतन नगराध्यक्ष अशोक चराटी अध्यक्षस्थानी होते.
नाट्यमहोत्सवाचे अध्यक्ष आनंदा फडके यांनी स्वागत तर योगेश पाटील यांनी प्रास्ताविक केले. श्री. देशमुख यांनी आजरा तालुक्यातील नाट्यप्रेमींची संख्या मोठी आहे. त्यामुळे नाट्यचळवळ वाढीला बळ मिळाले आहे. येथील नाट्यमहोत्सव हे याचेच धोतक आहे. राज्यातील अनेक नामांकीत संस्था येथे नाटक सादर करण्यासाठी उत्सुक असतात.
नगराध्यक्ष श्री. चराटी म्हणाले, नाट्यचळवळ वाढीसाठी पूर्वस्रीनी मोठे योगदान दिले आहे. नवनाट्यमंडळ हा त्याचा भाग आहे. आजऱ्याच्या मातीत नाट्यचळवळ रुजली आहे. त्याला बळ देण्याचे काम करणार आहे. नगराध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल चराटी यांचा सत्कार झाला. त्याचबरोबर प्रायोजकांचाही सत्कार झाला. या वेळी श्रीमती अन्नपूर्णा चराटी, डॉ. अनिल देशपांडे, विजयकुमार पाटील, के. व्ही. येसणे, अनिकेत चराटी, आय. के. पाटील, वासुदेव मायदेव, भिकाजी पाटील यांच्यासह नाट्यप्रेमी उपस्थित होते.
वामन सामंत यांनी सूत्रसंचालन केले तर यशवंत गिरी यांनी आभार मानले.

डॉ. पूजा सामंत लिखित ‘द. ना. गव्हाणकर यांचे शाहिरी वाङमय’ पुस्तक प्रकाशन समारंभ

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
श्रीमंत गंगामाई वाचन मंदिर आजरा च्यावतीने डॉ. पूजा सामंत यांच्या ‘द. ना. गव्हाणकर यांचे शाहिरी वाङमय’ या संशोधनात्मक पुस्तकाचे प्रकाशन ज्येष्ठ समीक्षक व शिवाजी विद्यापीठाच्या मराठी विभागाचे प्रमुख डॉ. रणधीर शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी वाचनालयाचे अध्यक्ष श्री. वामन सामंत होते.
यावेळी बोलताना डॉ. शिंदे म्हणाले, महाराष्ट्राच्या शाहिरी परंपरेतील द. ना. गव्हाणकर हे तेजस्वी पर्व होते. तरीही शाहीर द. ना. गव्हाणकरांसारखा प्रतिभावंत कलावंत उपेक्षीत राहिला डॉ पूजा सामंत यांनी गव्हाणकरांच्या वाङमयाचे सखोल संशोधन करून पुढील पिढीसाठी महत्वाचा दस्तावेज निर्माण केला आहे. केवळ सहा महिन्यात या पुस्तकाची तिसरी आवृत्ती प्रकाशित होते यावरून या संशोधन ग्रंथाचे महत्व अधोरेखीत होते. शाहीर गव्हाणकरंच्या जीवन चरीत्राबद्दल, जडणघडणीबद्दल, वाङमयाबद्दल कुणाला फारशी माहीती उपलब्ध नसतानाही त्यांच्याबद्दल या ग्रंथात विस्तृत अभ्यासपूर्ण नोंदी करण्यात आल्या आहेत हे या पुस्तकाचे वैशिष्ठ आहे. त्याकाळी मार्क्सवादी साम्यवादी चळवळींचा मोठा प्रभाव गव्हाणकरांच्यावर झाला आणि त्यातूनच प्रबोधनाच्या आणि परीवर्तनाच्या चळवळीत ते सामील झाले शृंगारिक, अध्यत्मिक व कालगी तूऱ्याच्या शाहीरीला छेद देत गव्हाणकरांनी नवी परीवर्तनवादी शाहीरी परंपरा उदयास आणली.
लेखिका डॉ. पूजा गव्हाणकर म्हणाल्या, श्रीमंत गंगामाई वाचन ग्रंथालयातील पुस्तकांचा या पुस्तकाच्या निर्मितीसाठी संदर्भ मिळाला शाहीर गव्हाणकरांच्या जन्मभूमीत व ज्या गावात आपण वाढलो त्या आजोळात या ग्रंथाचे प्रकाशन झाले याचा मनस्वी आनंद आहे नव्या पिढीने द.ना. गव्हाणकरांच्या साहित्यावर संशोधनासाठी पुढे यावे त्याला आपली नक्कीच मदत असेल.
वाचनालयाचे देणगीदार ईश्वर गिलबिले व वसुंधरा देसाई व पत्रकार दिनाच्या औचित्याने सर्व पत्रकारांचा डॉ शिंदे यांच्याहस्ते यावेळी सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाला मुकुंदराव देसाई, कॉ. संपत देसाई, डॉ. मारूती डेळेकर, संदीप ठाकूर, सचिन पावले, आपा पावले, मारूतीराव मोरे, जयवंतराव परूळेकर, मनोहर गव्हाणकर, सुहास पाटील, स्मिता गव्हाणकर, शर्मिला सातोसकर, वैशाली वडवळेकर, रेश्मा शिंदे, डॉ. अंजनी देशपांडे, वासुदेव गव्हाणकर, रविंद्र हुक्केरी, संभाजीराव इंजल, बंडोपंत चव्हाण, सुभाष विभुते, महंमदअली मुजावर, विनायक आमणगी, गीता पोतदार, सुचेता गडडी ग्रंथपाल चंद्रकांत कोंडुसकर गणपतराव चव्हाण यासह मोठ्या प्रमाणावर आजरेकर रसिक श्रोते उपस्थीत होते.
स्वागत व प्रास्ताविक अध्यक्ष वामन सामंत यांनी केले उपाध्यक्षा विद्या हरेर यांनी सुत्रसंचालन केले. विजय राजोपाध्ये यांनी करून आभार मानले.

कृषी प्रक्रिया उद्योग : संधी व आव्हाने’ या विषयावर आजरा महाविद्यालयात कार्यशाळा संपन्न

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा महाविद्यालय, आजरा, अर्थशास्त्र विभाग, आणि यशवंतराव चव्हाण महाविद्यालय, हलकर्णी अग्रणी महाविद्यालय योजनांतर्गत आयोजित एकदिवसीय ‘कृषी प्रक्रिया उद्योग : संधी व आव्हाने’ या विषयावर कार्यशाळा संपन्न झाली. जनता एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष श्री. अशोकअण्णा चराटी यांनी अध्यक्षीय मनोगतात आज ग्रामीण भागामध्ये कृषी प्रक्रिया उद्योगाची फार गरज आहे. ग्रामीण भागतील तरुणांनी प्रक्रिया उद्योगामध्ये आपले व्यवसाय सुरु करून आंतरराष्ट्रीय व्यापारात सहभागी राहणे गरजेचे आहे. त्यासाठी आजरा महाविद्यालयामध्ये कृषी प्रक्रिया उद्योगावर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचा लाभ आजरा, चंदगड व गडहिंग्लज भागातील तरुणांनी घ्यावा असे आवाहन केले.
या कार्यशाळेसाठी मार्गदर्शक म्हणून कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, गडहिंग्लजचे अर्थशास्त्र विभाग प्रमुख, प्रा. डॉ. के. आर. तनंगे हे उपस्थित राहून कृषी प्रक्रिया उद्योग : संधी व आव्हाने या विषयावर सखोल मार्गदर्शन केले.
र. भा. माडखोलकर महाविद्यालय, चंदगडचे अर्थशास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ. एस. एस. सावंत हे उपस्थित राहून कृषी प्रक्रिया उद्योगाचे अर्थशास्त्र या विषयावर मार्गदर्शन केले.
या कार्यशाळेमध्ये आजरा, चंदगड व गडहिंग्लज तालुक्यातील १२ महाविद्यालयातील विद्यार्थी व शिक्षक सहभागी राहिले. तसेच आजरा महाविद्यालयाचे प्राचार्य, प्रा, डॉ. ए. एन. सादळे, कार्यालयीन अधिक्षक, श्री, योगेश पाटील यांनी प्रमुख उपस्थित राहून विद्यार्थांना मार्गदर्शन केले. या कार्यशाळेचे नियोजन व प्रस्तावना अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ. संजय चव्हाण, प्रमुख पाहुण्याचे स्वागत व सत्कार अग्रणी महाविद्यालयाचे समन्वयक डॉ. एम. आर. ठोंबरे यांनी केले. संपूर्ण कार्यक्रमाची सूत्रसंचालन प्रा. शेखर शिवूडकर व आभार डॉ. महेंद्र जाधव यांनी मांडले.

पंडित दीनदयाळ विद्यालयात ग्राहक दिन उत्साहात

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
२४ डिसेंबर राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त ग्राहक जागरण मास सर्वत्र साजरा होत आहे .त्याचाच एक भाग म्हणून पंडित दीनदयाळ विद्यालयामध्ये ग्राहक दिन साजरा करण्यात आला
.या कार्यक्रमासाठी अखिल भारतीय ग्राहक पंचायत ,महाराष्ट्र प्रांत संघटन मंत्री श्री. प्रसाद बुरांडे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. विद्यालयाचे मुख्याध्यापक मा
श्री.संजीव देसाई यांनी प्रास्ताविकामध्ये ग्राहक चळवळीचे महत्व सांगीतले. यानंतर प्रमुख पाहुणे श्री.प्रसाद बुरांडे यांचे स्वागत संस्थेचे संचालक श्री.भिकाजी पाटील यांनी पुष्पगुच्छ देऊन केले.
या कार्यक्रमासाठी जिल्हा उपाध्यक्ष श्री.रमेश पाटील ,जिल्हा कार्यकारणी सदस्य श्री.रामदास चव्हाण ,तालुका उपाध्यक्ष श्री.देविदास सूर्यवंशी ,महिला तालुका अध्यक्ष सौ. राजश्री सावंत. पत्रकार श्री.विकास पाटील व संस्थेचे संचालक श्री. भिकाजी पाटील उपस्थित होते. पाहुण्यांची ओळख श्री.भरत बुरुड यांनी करून दिली
. यानंतर प्रमुख पाहुणे श्री प्रसाद बुरांडे यांनी ग्राहक संरक्षण कायदा २०१९ चे मार्गदर्शन केले. आजच्या युगात तंत्रज्ञान ,शहरीकरण आणि वाढत्या गरजामुळे लोकांची जीवनशैली बदलत आहे पण या बदलामुळे ग्राहकांच्या हिताचे रक्षण होताना दिसत नाही .सगळीकडे ग्राहकांची फसवणूक होताना आपल्याला पाहायला मिळते यासाठी ग्राहक जागा राहिला पाहिजेत यासाठी शालेय स्तरावर विद्यार्थ्यांच्या मनामध्ये ग्राहक चळवळीचे महत्त्व बुरांडे यांनी पटवून दिले .एखादी वस्तू घेताना पावतीचा आग्रह धरावा गॅरंटी, वॉरंटी पाहून खरेदी करावी म्हणजे आपल्याला ग्राहक न्यायालयामध्ये दाद मागता येते आपल्याकडे पावतीच नसेल तर आपण काही करू शकत नाही. म्हणून एखादी वस्तू घेत असताना ती पाहून घ्यावी तरीही ती खराब निघाल्यास आपण त्या दुकानदाराला प्रथम विनंती करावी त्याने आपल्याला जर ती बदलून दिली नाही तर ग्राहक पंचायत मध्ये तिची तक्रार नोंदवावी ग्राहक न्यायालयामार्फत ग्राहकाला योग्य तो न्याय मिळवून दिला जातो म्हणून ग्राहकाने सजग असणे महत्त्वाचे आहे या कायद्यानुसार ग्राहकाला सुरक्षिततेचा हक्क ,माहिती मिळवण्याचा हक्क, वस्तू निवडण्याचा हक्क, तक्रार निवारण्याचा हक्क ,ग्राहक शिक्षणाचा हक्क ,आरोग्यदायी पर्यावरणाचा हक्क इत्यादी हक्क मिळालेले आहेत. पूर्वीच्या कायद्यात फक्त ३१ कलमे होती या कायद्यात एकशे सात कलमे आहेत ग्राहकाला या कायद्यानुसार पाच लाखापर्यंत तक्रारीसाठी कोणतीही फी घेतली जात नाही.आपली फसवणूक झाली तर ग्राहक न्यायालयात तक्रार नोंदवावी.
आभार श्री.विजय राजोपाध्ये यांनी मानले.यावेळी विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होत्या.

आजचा नाट्यप्रयोग
पोकळ घिस्सा…
सादरकर्ते :- शिवशक्ती तरुण मंडळ, सातारा
वेळ :- सायं.७-०० वा.
स्थळ:- आजरा महाविद्यालय रंगमंच


