शनिवार दि.१ मार्च २०२५



आजरा येथे घराला आग
संसारोरोपयोगी साहित्य भक्षस्थानी

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
गांधीनगर, आजरा येथे विष्णू ससाणे यांच्या घराला शुक्रवारी दुपारी अचानक आग लागल्याने आगीमध्ये सुमारे एक लाख रुपयांचे संसारोपयोगी साहित्य नष्ट झाले.
अचानक संपूर्ण घर आगीच्या भक्षस्थानी पडले. आगीचे वृत्त समजतात आजरा नगरपंचायतीच्या अग्निशमन दलाच्या गाडीने व स्थानिक नागरिकांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला.
अत्यंत बेताची परिस्थिती असणाऱ्या या कुटुंबीयांचे आगीमुळे मोठे नुकसान झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. आगीचे नेमके कारण समजू शकले नाही.


मुम्मेवाडी येथे मटका घेताना एकास रंगेहात पकडले

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
मुम्मेवाडी तिठ्ठा येथे उघड्यावर मटका घेत असताना सागर भैरू नाईक ( रा.नाईक गल्ली बहिरेवाडी ता.आजरा जि. कोल्हापूर) याला पोलिसांनी रंगेहात ताब्यात घेऊन त्याच्या विरोधात गुन्हा नोंद केला आहे.
शुक्रवार दि.२८ रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास, मुमेवाडी तिठ्ठा मुमेवाडी ता. आजरा येथील भावेश्वरी टी स्टॉल समोर रोडवर उघडयावर मटका घेताना नाईक हा आढळून आला. त्याच्याजवळ २१३५/- रू. रोख व कल्याण मटका जुगाराचे इतर साहित्य मिळून आले.
समीर कांबळे (पो.हे.कॉ.)व राजु ललीता कांबळे ( पो.कॉ.) यांनी सदर कारवाई केली.


सरकारच्या घोषणा म्हणजे लबाडाघरचे आमंत्रण…
आज-यात वीज बिल विरोधात निदर्शने

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
निवडणुकीपूर्वी सरकारने केलेल्या घोषणा म्हणजे केवळ लबाडाघरचे निमंत्रण असा प्रकार झाला असून या फसव्या योजनांची प्रत्यक्ष अंमलबजावणी झालीच नाही. विज बिल माफीची घोषणा बाजूला ठेवून सोलर सारखी सक्ती करून सर्वसामान्य शेतकऱ्यांना अडचणीत आणण्याचे काम सरकारकडून सुरू असल्याचा आरोप करत आजरा येथे संभाजी चौकामध्ये सरकारविरोधी निदर्शने करण्यात आली.
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख प्रा. सुनील शिंत्रे, काँ.संपत देसाई, शिवसेना उपजिल्हाप्रमुख संभाजी पाटील, विक्रम देसाई, दिलीप माने, युवराज पोवार, आजरा कारखाना संचालक हरिबा कांबळे, काँ. शांताराम पाटील, प्रकाश मोरूसकर शिवाजी आढाव, वसंत भुइंबर, नारायण भडांगे, नारायण कांबळे, रवी सावंत, दिनेश कांबळे, महेश पाटील यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.


आजरा येथे स्वारगेट प्रकरणाचा निषेध
आरोपीवर कारवाईची मागणी

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा तालुका एसटी प्रवासी संघटनेच्या वतीने स्वारगेट पुणे येथे झालेल्या महिलेवरील अत्याचार प्रकरणाचा निषेध नोंदवण्यात आला. संबंधितावर कडक कारवाई होण्याची मागणीही प्रवासी संघटनेच्या वतीने करण्यात आली.
बुधवार दिनांक २६ फेब्रुवारी रोजी पुणे शहरातील स्वारगेट एसटी बस स्थानकावर अकलूज कडे जाणाऱ्या प्रवासी युवतीवर दत्तात्रेय गाडे यांनी अत्याचार केला आहे. या घटनेचा आजरा तालुका एसटी प्रवासी संघटना तीव्र शब्दात निषेध करीत आहे. या लांच्छनास्पद घटनेतील नराधम दत्तात्रय गाडे या आरोपीला लवकर पकडून त्याच्यावर जलद गती न्यायालयात खटला चालवून त्याला फाशी शिक्षा द्यावी.
याचबरोवर राज्यातील प्रवासी महिला युवती यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने प्रत्येक बस स्थानकावर पोलीस कक्षाची स्थापना करण्यात यावी. ज्या बस स्थानकावर सुरक्षारक्षक कार्यरत नाहीत त्या ठिकाणी सुरक्षा रक्षकांची नेमणूक व्हावी, बस स्थानकावरील प्रवासी वगळता इतर उनाडकी व टवाळकी करत बसलेले युवक यांना पायबंद घालण्यात यावा अशा मागण्याही करण्यात आल्या आहेत.
यावेळी प्रवासी संघटनेचे अध्यक्ष सचिन इंदुलकर, मारूती मोरे, अनिकेत चराटी, अभिजित रांगणेकर,विकास सुतार, दिपक बल्लाळ,बंडोपंत चव्हाण उपस्थित होते.


नॅनो टेक्नॉलॉजीच्या विद्यार्थ्याकडे जगाचे नेतृत्व करण्याची क्षमता : डॉ. शिवानंद गजरे

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
दैनंदिन जीवनाची सुरुवात नॅनोटेक्नॉलॉजीच्या वापरानेच होते. सोलर सेल, मोबाईल, एलईडी, टीव्ही, वॉटर प्युरिफायर, वाहने, इंजिन, तंत्रज्ञान,स्मार्ट वॉच अशा अनेक गोष्टी नॅनोटेक्नॉलॉजीचा वापर होतो. नॅनो टेक्नॉलॉजीच्या विद्यार्थ्याकडे जगाचे नेतृत्व करण्याची क्षमता आहे असे प्रतिपादन आजरा महाविद्यालयातील प्रा. डॉ. शिवानंद गजरे यांनी केले.
आजरा महाविद्यालयामध्ये विज्ञान आणि पर्यावरण मंडळ, मराठी विज्ञान परिषद व रसायनशास्त्र विभागात यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त आयोजित ‘नॅनो टेक्नॉलॉजी – काळाची गरज’ या विषयावर ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉक्टर अशोक सादळे होते .
यावेळी डॉ. गजरे यांनी नॅनो टेक्नॉलॉजीचा इतिहास,नॅनोटेक्नॉलॉजी साहित्य तयार करण्याच्या पद्धती, त्यांचे विविध गुणधर्म उपयोग व नॅनो टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून निर्माण होणाऱ्या संधी याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.प्राचार्य डॉ. अशोक सादळे यांनी नॅनो टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून विकसित भारतासाठी योगदान देण्यासाठी विद्यार्थ्यांनी प्रयत्न करावे असे आवाहन केले.
यावेळी भित्ती पत्रिकेचे उद्घाटन डॉ. अंजनी देशपांडे यांनी केले. गणित दिनानिमित्त घेतलेल्या प्रश्नमंजुषा स्पर्धेच्या विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. उपस्थितांचे स्वागत प्रा.मल्हारराव ठोंबरे यांनी केले तर आभार प्रा सागर फगरे यांनी मांडले. प्रास्ताविक प्रा. मल्लिकार्जुन शिंत्रे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. तेजस्विनी जाधव यांनी केले.
याप्रसंगी विज्ञान परिषदेचे सचिव प्रा. किरण प्रधान, ज्योती कुंभार, शुभांगी सावंत, रवी मस्कर, उपप्राचार्य दिलीप संकपाळ, योगेश पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.


आजरा येथे आज बालकांची विनामूल्य आरोग्य तपासणी

राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत आजरा येथे ० ते १८ वर्षे वयोगटातील शाळा व अंगणवाडी मुला- मुलींची विनामूल्य आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. येथील स्वामी विवेकानंद विद्यामंदिर मध्ये सदर तपासणी होणार असून जन्मजात आजार व इतर आजारावर मोफत उपचार संदर्भ सेवा देणे व मोफत शस्त्रक्रिया करणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे.


बोंजुर्डीचा जय हनुमान क्रिकेट संघ ठरला अर्पिता चषकाचा मानकरी

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा येथे नुकत्याच पार पडलेल्या अर्पिता चषक क्रिकेट स्पर्धेमध्ये बोंजुर्डी येथील हनुमान क्रिकेट संघाने पहिला क्रमांक मिळवत ५१ हजार रुपये रोख व चषक पटकावला. तर विराज चॅलेंजर्स बटकणंगले संघ उपविजेता ठरला.
आजरा येथील छत्रपती शिवाजी महाराज क्रिडा संकुल येथे उत्साहात या स्पर्धा पार पडल्या.द्वितीय क्रमांक पटकावलेल्या विराज चॅलेंजर्स, बटकणंगले या संघाला २८ हजार आठशे रुपये रोख व चषक देऊन गौरवण्यात आले.
गारगोटी स्पोर्ट्सने तृतीय तर सत्या स्पोर्ट्स, नेसरीने चतुर्थ क्रमांक पटकावला.विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.

साईट : दत्त मंदिर समोर सोमवार पेठ आजरा संपर्क : ९५२७९७३९६९

आजरा महाविद्यालयात ‘ध्वनी प्रदूषण आणि नियंत्रण’ या विषयावर व्याख्यान संपन्न

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा महाविद्यालयामध्ये ‘ध्वनी प्रदूषण आणि नियंत्रण’ या विषयावर व्याख्यान प्रा.एम. आर. शिंत्रे यांचे व्याख्यान पार पडले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी उपप्राचार्य दिलीप संकपाळ होते.
यावेळी बोलताना प्रा. शिंत्रे म्हणावे म्हणाले, ध्वनी प्रदूषण ही एक गंभीर पर्यावरणीय समस्या आहे, जी मुख्यत्वे वाहतूक, औद्योगिक कारखाने, बांधकाम आणि सार्वजनिक कार्यक्रमांमुळे निर्माण होते. याचे दुष्परिणाम मानवी आरोग्यावर (श्रवणशक्ती कमी होणे, अनिद्रा, मानसिक ताण), पर्यावरणावर (प्राणी आणि वनस्पतींच्या वाढीवर नकारात्मक प्रभाव) आणि सामाजिक जीवनावर (शांततेचा अभाव) दिसून येतात. ध्वनी प्रदूषण नियंत्रणासाठी झाडे लावून हरित क्षेत्र विकसित करणे देखील ध्वनी प्रदूषण कमी करण्यासाठी एक प्रभावी उपाय आहे. सर्वांनी मिळून प्रयत्न केल्यास ध्वनी प्रदूषणावर नियंत्रण मिळवता येऊ शकते.
उपप्राचार्य संकपाळ म्हणाले, विद्यार्थ्यांना योग्य शैक्षणिक वातावरण देण्यासाठी ध्वनी प्रदूषण नियंत्रित करणे आवश्यक आहे. कार्यक्रमाचे स्वागत व प्रस्ताविक डॉ. रणजीत पवार यांनी केले आभार डॉ. धनंजय पाटील यांनी व्यक्त केले.

निधन वार्ता
कोडिंबा घोरपडे

आजरा: मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
मलिग्रे ता. आजरा येथील कोडिंबा आप्पा घोरपडे ( वय वर्ष ७९) यांचे वृध्दापकाळ ने निधन झाले.
त्यांच्या पश्चात मुलगा, दोन मुली, जावई, सुन, नातवंडे असा परिवार आहे.
रविवार दि. २ मार्च रोजी रक्षा विसर्जन आहे.


