mrityunjaymahanews
अन्यआजरा तालुका विशेषकोल्हापूरक्रीडागुन्हाठळक बातम्याभारतमहाराष्ट्रराजकीयरोजगारसामाजिकस्थानिक

सातच्या बातम्या

 मंगळवार  दि. ८ जुलै २०२५         

वारीहून परतताना घाटकरवाडीत चार चाकी पलटी

चौघे जखमी

           आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      सोमवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास पंढरपुर येथून आषाढी यात्रा करून परतणाऱ्या गोवा येथील भाविकांच्या चारचाकीचा चालकाचा गाडीवरील ताबा सुटून गाडी पलटी झाल्याने घाटकरवाडी-किटवडे (ता. आजरा) दरम्यान अपघात झाला. यामध्ये दोघे गंभीर तर दोघे किरकोळ जखमी झाले आहेत.

     जखमीमध्ये रिमा रत्नाकर चोडणकर (वय ५७ वर्षे ) आणि स्नेहल शिवराम नागवेकर (६२ वर्षे ) दिव्या देवानंद कवठणकर (४८ वर्षे ) आणि शिवराम नारायण नागवेकर (६७ वर्षे सर्व रा. आतुर्ली, डिचोली, गोवा) यांचा समावेश आहे.

      जखमींवर आंबोली प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करण्यात आले.

पावसाने ‘हजारी ‘ गाठली
उचंगी प्रकल्प आज भरणार…

           आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      आजरा तालुक्यात पावसाचा जोर कायम असून गेल्या वीस वर्षातील रेकॉर्ड ब्रेक पाऊस सध्या सुरू आहे. पावसाने मंगळवार सकाळपर्यंत एक हजार मिलिमीटर चा टप्पा गाठला आहे. सर्व मध्यम प्रकल्प, पाझर तलाव पूर्ण क्षमतेने भरले असून आज मंगळवारी उचंगी प्रकल्पाच्या सांडव्यावरून पाणी बाहेर पडणार असे चित्र आहे.

       सर्व प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरल्याचे एकीकडे समाधान असताना दुसरीकडे शेतीकामामध्ये पावसाचा प्रचंड व्यत्यय सुरू असल्याचे दिसत आहे. भाताचे तरवे वाहून गेले, पेरलेले बियाणे कुजून गेले, रोपे उपलब्ध नाहीत अशा विचित्र परिस्थिती भात उत्पादक शेतकरी अडकलेला दिसत आहे.

एसटीचे वेळापत्रक कोलमडले

प्रवाशांचे प्रचंड हाल

         आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      आजरा आगारातून आषाढी यात्रेनिमित्त पंढरपूरला मोठ्या संख्येने सोडण्यात आलेल्या बस फेऱ्या, दाभिल धरणावरील रस्त्याची झालेली दुर्दशा यामुळे गेले चार दिवस स्थानिक प्रवाशांचे हाल झाले.अनेक मार्गावरील बस फेऱ्या रद्द करण्यात आल्याने वेळापत्रक पूर्णपणे कोलमडून गेले.

      कोल्हापूर, बेळगावसह तालुक्यातील ग्रामीण भागातील ३५ वर बसफेऱ्या रद्द झाल्या तर काही बस फेऱ्यांचे वेळापत्रक विस्कटले. तालुक्यात पावसाचा धुमाकूळ सुरू असताना एसटीचे वेळापत्रक कोलमडल्याने शाळकरी विद्यार्थी व वयोवृद्ध नागरिकांचे प्रचंड हाल झाले.

रस्त्यापेक्षा गटर्स परवडली…

           आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

     आजरा शहरात सर्वत्र चिखल व डबक्यांचे साम्राज्य असून याचा मोठा त्रास शालेय विद्यार्थ्यांना सहन करावा लागत आहे. शेजारून एखादी गाडी केंव्हा जाईल आणि डबक्यातील पाणी उडून केंव्हा गणवेश खराब होईल हे सांगता येत नाही.

      कुंभार गल्ली येथील राईस मिल जवळ पडलेला मोठा खड्डा शाळकरी विद्यार्थ्यांच्या दृष्टीने डोकेदुखी ठरत आहे. शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची या मार्गावरून नेहमी ये-जा असते.

       येथून जाताना पाण्यातून व खड्ड्यातून वाट काढण्यापेक्षा शालेय विद्यार्थी थेट गटर्सवरुन कसरत करत मार्ग काढताना दिसतात.

       किमान शालेय परिसरातील खड्डे तरी मुजवावेत अशी मागणी पालक वर्गातून होत आहे.

सानिया सिदनाळेची जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेसाठी निवड

          आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      येथील आजरा हायस्कूलची वि‌द्यार्थीनी सानिया सिदनाळे हीची जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेसाठी निवड झाली आहे. शिक्षण विभाग पंचायत समिती आजरा व आजरा तालुका मुख्याध्यापक संघटना आजरा यांच्यावतीने स्पर्धेचे आयोजन केले होते. राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती पंधरवड्यानिमित्त राजर्षी छत्रपती शाहू महाराज तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा झाल्या. सानियाने पाचवी ते सातवी या गटात प्रथम क्रमांक पटकावला.

     मुख्याध्यापक अजित तोडकर, उपमुख्याध्यापिका हेमलता कामत व शिक्षकांनी अभिनंदन करून जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

आजरा तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करा…
रिपब्लिकन सेनेची मागणी

         आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      रिपब्लिकन सेनेच्या वतीने आजरा तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी करण्यात आली आहे.

       यावर्षी आजरा तालुक्यामध्ये मे महिन्यापासुन पावसाचे प्रमाण जास्त आहे. जून महिन्यामध्ये तालुक्यातील ओढे, नदी, नाले, ओसंडून वाहू लागले आहेत. तालुक्यातील सर्व धरणेही पूर्ण क्षमतेने भरली आहेत. परंतु सततच्या पावसामुळे शेतकऱ्याच्या पेरण्या झाल्या नाहीत. तसेच ज्यांनी पेरण्या केल्या होत्या त्या अति पावसामुळे खराब आल्या आहेत. ज्या शेतकऱ्यांनी दुबार पेरण्या केल्या त्याही पावसामुळे खराब होऊन बियाणे कुजून जात आहेत व इतर बियाणे भात, नाचणा, भुईमूग, सोयाबीन पेरणी केलेले असून सर्व पीक अतिवृष्टीमुळे खराब होऊन गेलेले आहे. यामुळे आजरा तालुक्यातील शेतकरी वर्ग चिंतेत आहे. आजरा तालुक्यातील पिकांचे पंचनामे करून आजरा तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करावा. शेतकऱ्यांना ओल्या दुष्काळामुळे झालेले नुकसान  व आर्थिक मदत तातडीने मिळण्यासाठी शासनाकडे शिफारस करावी अशी मागणी तहसीलदारांकडे करण्यात आली आहे.

      याबाबतचे लेखी निवेदन तहसीलदारांमार्फत जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहे. निवेदनावर संघटनेचे अध्यक्ष विजय कांबळे, उपाध्यक्ष गोपाळ होण्याळकर, सुरेश दिवेकर, परशुराम कांबळे, नंदकुमार कांबळे, अविनाश कांबळे, मधुकर कांबळे,शामराव कांबळे यांच्या सह्या आहेत.

ग्रामीण रुग्णालयात उद्या रक्तदान शिबिर

       पालकमंत्री ना.प्रकाश आबिटकर यांच्या पुढाकाराने मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमानता अभियान, कोल्हापूर अंतर्गत ‘मृत्युंजय’कार शिवाजी सावंत ग्रामीण रुग्णालय आजरा येथे उद्या बुधवार दिनांक रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

     रक्तदात्यांनी या शिबिरात सहभाग  घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

निधन वार्ता
कृष्णा देसाई

      आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा 

         वाटंगी ता. आजरा येथील कृष्णा उर्फ बाळासाहेब पांडुरंग देसाई यांचे अल्पशा आजाराने मुंबई येथे उपचारादरम्यान निधन झाले.

      त्यांच्या पश्चात तीन मुली, पत्नी, आई, दोन बहिणी असा परिवार आहे.

निधन वार्ता
परसू जोशीलकर

          आजरा :  मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      मेंढोली ता. आजरा येथील परसू भिकाजी जोशीलकर ( वय ४७ वर्षे ) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.

       त्यांच्या पश्चात पत्नी, विवाहित मुलगी, मुलगा, आई, वडील असा परिवार आहे. आठ दिवसापूर्वी शेतात काम करत असताना अचानकपणे चक्कर येऊन पडल्याने व नाका तोंडात चिखल गेल्याने त्यांना उपचारासाठी गडहिंग्लज येथील खाजगी रुग्णालयात ठेवण्यात आले होते.उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

फोटो क्लिक…

 

संबंधित पोस्ट

वाजले की बारा…

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

२३ वर्षीय तरुणाचा गळफास घेतलेल्या स्थितीत मृतदेह आढळला… आजरा तालुक्यातील घटना

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews
error: Content is protected !!