

आजऱ्यात चोरट्यांची चांदी…३ लाखांचे सोने लंपास

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा शहरातील रामतीर्थ शिक्षक कॉलनी येथे अज्ञात चोरट्यांनी बंद घर फोडत सुमारे ३ लाखांचे सोने लंपास केले आहे. गेली पंधरा दिवस सुरू असलेल्या भुरट्या चोऱ्या अखेर चोरांच्या पत्त्यावर पडल्याचे दिसत आहेत.
मारुती पांडुरंग डेळेकर (सध्या रा.रामतीर्थ कॉलनी,मुळ गांव सोहाळे,ता.आजरा) यांचे बंद असलेल्या बंगल्यात अज्ञात चोरट्यांनी कुलुप तोडून २ लाख ९० हजारांचे सोने लंपास केले आहे.चोरी केलेल्या मध्ये दीड तोळ्याची चेन, अर्ध्या तोळ्याच्या २ अंगठ्या, कानातील, लहान मुलांचे लॉकेट व चेन या सोन्याच्या वस्तूंचा समावेश आहे.आजरा पोलिसांत तक्रार नोंद झाली आहे.
गेले पंधरा दिवस ठीक ठिकाणी भुरट्या चोऱ्या झाल्या असून गॅस सिलेंडर, संसारोपयोगी साहित्य लंपास करण्यात चोरट्याना यश आले. याबाबत फारशी चर्चा न झाल्याने हे चोरीसत्र सुरूच आहे. हा प्रकार भुरट्या चोरांनी सहज म्हणून केलेल्या प्रयत्नाचा असावा अशी चर्चा सध्या शहरात सुरू आहे.

मारहाण प्रकरणी दाभिल येथील एका विरोधात गुन्हा नोंद

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
पूर्वीचा राग मनात धरून दाभिल येथील बंडू रामचंद्र निवळे यांना मारहाण करून जखमी केल्याबद्दल श्रीपती सिताराम गुरव रा. दाभिल यांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
निवळे हे युवराज पाटील यांच्या मोटरसायकलवरून जात असताना रस्त्यावर दगड टाकून मोटरसायकल अडवली व कांहीही न बोलता गुरव यांनी निवळे यांना मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार दत्ता शिंदे करीत आहेत.

कळपातील गव्याची धडक दोघे जखमी

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
रस्ता ओलांडणाऱ्या कळपातील गव्याची दुचाकीला धडक बसून विमल मारुती दोरुगडे (वय ७०) व माजी सैनिक सुनील मारुती दोरुगडे (वय ४०) हे दोघेजण जखमी झाले.
सोहाळेच्या दिशेने जात असताना दुचाकीसमोर गवा आडवा आल्याने विमल दोरुगडे व सुनील दोरुगडे हे दोघेजण जखमी झाले. सदरची घटना शनिवारी रात्री ७.४५ वाजण्याच्या सुमारास घडली.
कळेकरांच्या रांगी नावाच्या शेताजवळ दोरुगडे यांच्या दुचाकीच्या गव्यांचा कळप अचानक आडवा आला. कळपातील गवे रस्ता पार करत असतानाच त्यातील एका गव्याची दुचाकीला धडक झाली. सुनील यांना हाताला किरकोळ दुखापत झाली विमल यांच्या डोकीला गंभीर दुखापत झाली. दोघांवर ही प्राथमिक उपचार आजरा ग्रामीण रुग्णालयात करण्यात आले असून पुढील उपचारासाठी विमल यांना गडहिंग्लज येथे दाखल करण्यात आले आहे.

निधन वार्ता
परशराम काकतीकर (बाळू बुरुड)

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
शिरसंगी येथील परशराम सुभाणा काकतीकर उर्फ बाळू बुरुड (वय ४९ वर्षे) यांचे शनिवार दिनांक २५ रोजी अल्पश: आजाराने निधन झाले .
त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले असा परिवार आहे.



