mrityunjaymahanews
अन्य

सातच्या बातम्या

 


 

खोराटवाडी येथे वृद्धाची आत्महत्या

           आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

         मुलगा मयत झाल्याच्या नैराश्यातून खोराटवाडी ता‌ आजरा येथील बाबुराव मरगु खोराटे या ७५ वर्षीय वृद्धाने जनावरांच्या गोठ्यातील छताला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. शुक्रवार दिनांक २४ रोजी सदर घटना घडली.

      याबाबतची फिर्याद सौ‌ रूपाली मारुती परीट यांनी आजरा पोलिसात दिली असून पोलीस हेडकॉन्स्टेबल बाजीराव कांबळे पुढील तपास करीत आहेत.

टोलसह मीटरसक्ती विरोधात राज्यव्यापी आंदोलनाची तयारी

           आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      मोटारपंप धारक शेतकऱ्यांच्यावर लादली जाणारी मीटर सक्ती आणि अन्यायी पाणीपट्टीवाढ विरोधात होत असलेल्या राज्यव्यापी आंदोलननासंदर्भात विचार करण्यासाठी व आजरा शहरालगत होत असलेल्या टोलनाक्याबाबत चर्चा करण्यासाठी तालुक्यातील मोटारपंप धारक शेतकरी, सजग नागरिक आणि वाहनधारक यांची एक व्यापक बैठक एकत्रित आयोजित केली आहे. या बैठकीत दोन महत्वाच्या विषयावर चर्चा करून निर्णय करण्यात येणार आहे.

       गेल्या दोन तीन महिन्यामागे आजरा तालुका मोटारपंप धारक संघर्ष समितीची एक व्यापक बैठक झाली होती. या बैठकित पाण्याच्या मीटर सक्तीला आणि अन्यायी पाणीपट्टी वाढीला विरोध करण्यासाठी एक मोर्चाही तहसील कार्यालयावर काढला होता. याबाबत २९ तारखेला राज्यव्यापी आंदोलन होत असून त्यासाठी या व्यापक बैठकीत निर्णायक चर्चा करण्यात येणार आहे.

       या बैठकीतील दुसरा विषय हा संकेश्वर- बांदा महामार्गावर आजरा शहरानजीक टोलनाका होत असून रस्ता पूर्ण होण्यापूर्वीच टोलनाक्याची उभारणी मात्र वेगाने सुरू आहे. या टोलनाक्यामुळे पश्चिम भागातून आजरा शहरात रोज वाहतूक करणाऱ्या वाहन धारकांना टोलचा भुर्दंड बसणार आहे, याबरोबरच आजरा परिसरातून पश्चिम भागात जाणाऱ्या अनेकांना याचा मोठा फटका बसणार आहे. याबाबतही या व्यापक बैठकीत चर्चा करण्यात येणार आहे.

       तरी आजरा तालुक्यातील सजग विद्युत मोटारपंप धारक शेतकऱ्यांनी,  नागरिक आणि वाहन धारक यांनी सोमवार दि २७ रोजी ठीक ११.३० वाजता आजरा येथील श्री रवळनाथ मंदिराच्या माडीवर वेळेवर उपस्थित राहण्याचे आवाहन आजरा तालुका मोटारपंपधारक शेतकरी संघर्ष समितीचे निमंत्रक कॉ. संपत देसाई, अध्यक्ष अल्बर्ट डिसोझा, सचिव विनय सबनीस यांनी केले आहे.

बोगस बिगर शेती प्रकरणी मुक्ती संघर्ष समिती आक्रमक

          आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

आजरा येथील विद्यमान तलाठी श्री.शिवराज देसाई यांची आजरा येथे नेमणूक झाल्यापासून यांनी मोठ्या प्रमाणावर चुकीच्या पद्धतीने कारभार केला असून तलाठी यांच्या कालावधीतील सर्व दप्तर तपासणी झाली पाहिजे.तसेच खालील मागण्यांची चौकशी समिती नेमून चौकशीसह
विविध मागण्यांच्या पार्श्वभूमीवर आजरा तहसीलदार कार्यालय आजरा येथे जन आंदोलन करणार असल्याचा इशारा मुक्ती संघर्ष समितीच्या वतीने देण्यात आला आहे. याबाबतचे लेखी निवेदन तहसीलदारांना देण्यात आली आहे.

      लँडमामाफीयांना हाताशी धरून नगररचना विभागासह विविध शासकीय विभागांच्या आदेशांना कचऱ्याची पेटी दाखवत आजरा तालुक्यातील बिगरशेती (NA) येथील महसूल विभागाच्या तत्कालीन स्थानिक कर्मचारी व अधिकाऱ्यांनी बिगर शेती प्रकरणांचा घातलेला गोंधळ अद्याप सुरूच असून याप्रकरणी नेमण्यात आलेली चौकशी समिती नेमकी काय करत आहे व यातून काय निष्पन्न झाले? या सर्व प्रकाराला वरदहस्त कोणाचा ? याचा समिती अहवाल काय ? या सर्व बाबी अद्याप उघड झाल्या नसल्याने याचा सर्वसामान्यांना त्रास होत असून नगररचना विभागाच्या आदेशाशिवाय, खरेदी विक्री व्यवहार बंद झाले असल्याने मोठ्या अडचणी निर्माण झाल्या आहेत.

        गेले सहा महिने सुरू असलेल्या मुक्ती संघर्ष समितीच्या बोगस बिगर शेती प्रकरणी आंदोलनामुळे बिगर शेती प्रकरणातील महसूल विभागाची लक्तरे वेशीवर आली आहेत. ग्रीन झोन मधील जमिनीचे बिगर शेती आदेश काढणे, ओपन स्पेस न सोडणे, नाला शेड बॅक न सोडणे, रस्ता शेड बॅक न सोडणे, ग्रामपंचायतींचे ना हरकत दाखले नसणे, बंध पत्र नसणे, मूळ रेखांकन बदलून बिगर शेतीचे आदेश करणे, संशयास्पद पद्धतीने गट नंबर मधील फेरफार घालणे, सातबारा नोंदीं, सर्वच संशयाच्या भोव-यात असून गेल्या काही वर्षात झालेल्या बिगर शेती आदेश प्रकरणांची दफ्तर तपासणी होण्याची मागणी वारंवार केलेली  आहे. मुक्ती संघर्ष समितीने हा प्रश्न उचलून धरला आहे. पण अद्यापही या प्रकरणांचा चौकशी अहवाल बाहेर न आल्याने याला नेमका वरदहस्त कोणाचा? असा प्रश्नही आता उपस्थित केला आहे.

   या सर्वांची ही चौकशी झाली पाहिजे अशा मागण्या करण्यात आलेल्या आहेत. वरील सर्व मुद्द्यांच्या बाबतीत तातडीने कारवाईची प्रक्रिया सुरू करावी. याबाबतीत गांभीर्याने लक्ष दिले नाही तर आजरा तहसीलदार कार्यालय आजरा येथे जन आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. याबाबतच्या निवेदनावर संग्राम सावंत, राज्याध्यक्ष – मुक्ती संघर्ष समिती सुरेश खोत,  प्रमोद पाटील, संजय कांबळे, अक्षय कांबळे ,अबुसईद माणगावकर, विनोद ओतारी, मजीद मुल्ला, समीर खेडेकर,संजय कुंभार, लकमाना पाटील,मोहन गावडा, हजरत मुल्ला, अबु माणगावकर यांच्या सह्या आहेत.

पहिल्याच पावसात साईड पट्ट्यांची दुर्दशा


           आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      आजरा महागाव मार्गावरील चाफ्याची विहीर ते मलिग्रे बसथांब्यापर्यंत माती व मुरुम टाकून केलेल्या साईड पट्ट्या पहिल्याच पावसात खचून गेल्या आहेत.

      रस्त्याशेजारी चिखल व मातीचे साम्राज्य झाल्याने समोरून एखाद्या अवजड वाहन आल्यास दुचाकी स्वारांना या साईड पट्ट्यावरून जाताना मोठी कसरत करावी लागत आहे.

   आजरा गडहिंग्लज मार्गाची कामे सुरू असल्याने बरेच दुचाकीस्वार महागाव मार्गे गडहिंग्लजला जाताना दिसतात. मात्र या मार्गावरील या साईड पट्ट्या धोक्याचा इशारा देऊ लागल्या असून पावसाळ्यात येथे मोठे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

तब्बल १४ तासांनी वीज पुरवठा सुरळीत

          आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

     पावसामुळे खंडित झालेला आजरा शहर व परिसरातील वीजपुरवठा तब्बल १४ तासांनी शुक्रवारी सकाळी साडेआठ वाजता सुरू झाला.

      गुरुवारी सायंकाळी पावणे सात वाजण्याच्या सुमारास पावसामुळे वीज पुरवठा खंडीत झाला. वीजपुरवठा खंडित झाल्याने शहरवासीयांसह आजूबाजूच्या गावातील नागरिकांचे प्रचंड हाल झाले. काही कुटुंबांनी तर संपूर्ण अंधारात रात्र घालवली. शुक्रवारी सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास वीज पुरवठा सुरळीत झाला.

पाऊस आणि वीजपुरवठा समीकरण

      आजरा शहर व परिसरात पावसाला सुरुवात होताच वारंवार वीज पुरवठा खंडित होताना दिसतो अद्याप मान्सूनला सुरुवात झाली नसताना ही परिस्थिती असेल तर पावसाळ्यामध्ये नागरिकांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागणार असल्याचे दिसत आहे. वीज वितरण कंपनीने याबाबत आताच उपाययोजना करण्याची गरज प्रकर्षाने पुढे येऊ लागली आहे.


 

संबंधित पोस्ट

राज्यात आम्हीचं वाढवलं.. आम्हीचं गाडणार…शरद कोळी

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

प्रा. संजय मंडलिक हेच योग्य उमेदवार

mrityunjay mahanews

काँग्रेसची उद्यापासून जनसंवाद यात्रा

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews
error: Content is protected !!