सोमवार दि. १५ डिसेंबर २०२५


आय.के. सर म्हणजे उत्साहाचा झरा…
अमृत महोत्सवानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव
आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
इराण्णा कलाप्पा उर्फ आय. के. पाटील सर म्हणजे उत्साहाचा अखंड झरा आहे. कर्तुत्व, दातृत्वाच्या जोरावर शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडा, नाट्य, सामाजिक क्षेत्रात खणखणीत वाजणार नाणे म्हणजे आय.के. पाटील आहेत… अशा शब्दात अनेकांनी शब्दसुमनांनी त्यांना अमृत महोत्सवानिमित्त शुभेच्छा दिल्या.
अण्णाभाऊ सांस्कृतिक सभागृहात आय.के. पाटील यांच्या अमृत महोत्सवानिमित्त विशेष कार्यक्रम पार पडला. यावेळी सिद्धेश्वर कारीमठाचे गुरु सिद्धेश्वर महास्वामीजी, ज्येष्ठ अभिनेते शरद भुताडिया, कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक प्रा. अर्जून आबीटकर, अण्णा-भाऊ संस्था समूहाचे प्रमुख अशोकण्णा चराटी यांची प्रमुख उपस्थिती होती.
उपस्थितांचे स्वागत कमलेश पाटील यांनी केले. प्रास्ताविकपर भाषणात एस.टी हळवणकर यांनी पाटील यांच्या कार्यकर्तृत्वाचा आढावा घेतला. यावेळी पाटील यांचा मान्यवरांच्या हस्ते मानपत्र , नटराज मूर्ती शाल श्रीफळ व स्मरणिका प्रकाशन करून सपत्नीक सत्कार करण्यात आला.
यावेळी शरद भुताडिया म्हणाले, कलेविषयी असणारे प्रचंड प्रेम व ते मुलांमध्ये उतरवण्याची ताकद असणारा अवलिया शिक्षक म्हणजे आय.के. पाटील आहेत. महास्वामीजी म्हणाले, एका शिक्षकावर प्रेम करणारी इतकी प्रचंड माणसे असू शकतात असा अनुभव प्रथमच आपणाला या कार्यक्रमाद्वारे आला. हा कार्यक्रम म्हणजे त्यांनी शिक्षणासह विविध क्षेत्रात केलेल्या कामाची पोहोच पावती आहे. यावेळी प्रा.अर्जुन आबीटकर यांनीही शुभेच्छापर भाषण केले.

कुटुंबीयांच्या वतीने योगेश पाटील, स्वाती कमती, महेश पाटील, आप्पासाहेब पाटील आदींनी मनोगत व्यक्त केली. तर जॉन्सन डिसोजा, शरद परुळेकर, अजित बिरजे यांनी पाटील यांच्या विषयीचे आपले अनुभव कथन केले. डॉ. आप्पासाहेब बुडके लिखित मानपत्राचे वाचन डॉ. आनंद बल्लाळ यांनी केले.
सत्काराला उत्तर देताना पाटील म्हणाले, कार्यक्रमास उपस्थित असणारी गर्दी हीच माझ्या आयुष्यातील खरी कमाई व श्रीमंती आहे. कोणत्याही क्षेत्रातील बारकावे तपासून आपण काम करत राहिलो. अनेक विद्यार्थी, कलाकार घडत गेले. आपण काहीतरी निश्चितच चांगले केले असावे म्हणून कार्यक्रमाला इतकी मोठी गर्दी झाली असल्याचेही त्यांनी नम्रपणे नमूद केले.
कार्यक्रमास आजरा सूतगिरणीच्या अध्यक्षा अन्नपूर्णादेवी चराटी, उपाध्यक्ष डॉ. अनिल देशपांडे, अनिकेत चराटी, विजयकुमार पाटील,सौ.ज्योत्स्ना चराटी-पाटील, सौ. मनीषा गुरव, प्रा. डॉ. सुधीर मुंज,दशरथ अमृते, सिद्धेश नाईक, सुभाष विभुते, आप्पासाहेब पाटील, वामन सामंत, गोविंद गुरव, डॉ. शिवशंकर उपासे,अशोक तोडकर यांच्यासह कला, क्रीडा,नाट्य व शिक्षण क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. अशोक बाचूळकर यांनी केले .वामन सामंत यांनी आभार मानले.

वेळवट्टी येथे युवकांचे एक दिवशीय प्रशिक्षण उत्साहात

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
कोकण विकास सोसायटी,पणजी व सामाजिक संवेदना संस्था, आजरा यांच्या संयुक्त विद्यमाने
वेळवट्टी येथे तालुक्यातील युवकांचे एकदिवसीय प्रशिक्षण उत्साहात पार पाडले. यावेळी सामाजिक संवेदना संस्थेचे अध्यक्ष संपत देसाई, गडहिंग्लज येथील ओंकार महाविद्यालयाचे प्रा. अनिल पाटील, प्रकल्पाचे समन्वयक राजेंद्र कांबळे, प्रकाश मोरुस्कर,यांच्यासह तालुक्यातील ७० हुन अधिक तरुण उपस्थित होते.
मार्गदर्शन करताना प्रा.अनिल पाटील म्हणाले की, भारतात संसदीय लोकशाही अस्तित्वात आल्यानंतर हा देश कसा चालावा, देशाच्या हिताची कोणती धोरणे घ्यावीत, शेती, शिक्षण, आरोग्य, उद्योग यासह समाजातील विविध घटकांना न्याय देता येईल यासाठी प्रतिनिधी निवडले. त्यांना आपण खासदार आमदार म्हणतो. ते संसदेत, विधानसभेत जातात तिथे कायदे आणि लोकहिताचे निर्णय केले जातात. त्यामुळे आपली जबाबदारी वाढते. योग्य प्रतिनिधींची निवड करणे. आपल्यातूनच नवे नेतृत्व घडवणे यासाठी ही कार्यशाळा आयोजित केली आहे. अशा कार्यशाळेतुनच नवे नेतृत्व विकसित होते.
कॉ.संपत देसाई म्हणाले, की हा देश तरुणांचा देश म्हणून ओळखला जातो. आजच्या तंत्रविज्ञानाच्या काळात आपल्याकडे माहितीचे नवे स्रोत मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. अशावेळी आपण या स्रोतांचा योग्य वापर करून स्वतःचे नेतृत्व विकसित केले पाहिजे.
सुरवातीला प्रकाश मोरुस्कर यांनी प्रास्तविक करून कार्यक्रमाचा हेतू स्पष्ट केला. यावेळी राजेंद्र कांबळे यांनीही मार्गदर्शन केले. कार्यशाळेत पेरणोली, एरंडोळ, हाळोली – मेढेवाडी, पारपोली – खेडगे व अल्याचीवाडी, गवसे या गावातून ७० हुन अधिक युवक-युवती उपस्थित होते.

निधन वार्ता
शोभा पाटील

हात्तीवडे, तालुका आजरा येथील सौ. शोभा तुकाराम पाटील (वय ६० वर्षे) यांचे आकस्मिक निधन झाले . त्यांच्या पश्चात पती, मुलगा, सून, असा परिवार आहे.
त्या तुकाराम रामचंद्र पाटील यांच्या पत्नी व आजरा साखर कारखान्याचे संचालक संभाजी रामचंद्र पाटील यांच्या भावजय होत.
शरद कांबळे

बहिरेवाडी ता. आजरा येथील शरद पांडुरंग कांबळे (वय ३९ वर्षे ) यांचे आकस्मित निधन झाले.
त्यांच्या पश्चात पत्नी, आई, दोन मुलगे असा परिवार आहे.

मलिग्रे शाळा सर्व क्षेत्रात, उत्कृष्ठ : मनिषा सुतार

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
मलिग्रे येथील महात्मा जोतिबा फुले प्राथमिक मराठी शाळा सर्व सोयीनीयुक्त असून, येथील पालक व ग्रामस्थ सजग, जागृत असल्याने या शाळेच्या मुलांचा बुध्यांक चांगला असलेचा व लोक सहभागातून शाळेचा परीसर व खुले मैदान प्रेरणादायी असल्याने, ही शाळा सर्व क्षेत्रात उत्कृष्ठ असल्याने मत मुख्याध्यापक मनिषा सुतार यांनी त्याच्या बदली निमित्ताने आयोजित केलेल्या सदिच्छा समारंभात व्यक्त केले. अध्यक्ष स्थानी गणपती भणगे होते. सुरुवातीला सावित्रीबाई फुले याच्या फोटोचे पुजन करण्यात आले.
सुतार म्हणाल्या, या शाळेत आपण २०१८ साली हजर झाले, त्यावेळी उत्तूर – मलिग्रे हे अंतर लांब असल्यामुळे सुरूवाती पासून बदलीसाठी प्रयत्न करत होते, परंतू या शाळेसाठी असणारा लोकांचा सहभाग, पालकांची तळमळ आणी सृजनशिल विध्यार्थी व शाळेचा परीसर यात असणारी आपलेपणाची भावना आणी विध्यार्थ्याचे प्रेम आदर पाहून या शाळेत सात वर्षे शासकीय उपक्रम व स्पर्धा परीक्षा च्या माध्यमातून तसेच कोरवी मँडम याच्या सहकार्याने सेवा केली. या गावातून आपणाला खूपच प्रेरणा मिळाल्याचे त्यानी सांगितले. यावेळी बदली निमित्ताने त्याचा सत्कार शाळा व्यवस्थापक कमिटी अध्यक्षा सविता कागिणकर याच्या हस्ते केला तर नविन हजर झालेल्या शिक्षीका वैशाली जोशिलकर याचे स्वागत करण्यात आले. यावेळी माजी सरपंच समीर पारदे, अशोक शिंदे, संजय घाटगे, शिवाजी भगुत्रे, मारूती ईक्के यानी मनोगते व्यक्त केली.
यानंतर मनिषा सुतार यानी मराठी शाळेच्या नावाचा बोर्ड, अंगणवाडीच्या मुलांना पाळणे सर्व विध्यार्थ्यांना टोप्या देणगी रूपाने दिल्या.यावेळी उपसरपंच चाळू केंगारे, अंगणवाडी सेविका शशिकला घोरपडे, सुनिता लोहार, पूर्वा देशपांडे, नंदा बुगडे, शितल बुगडे,शोभा बुगडे,मंगल पारदे, रेश्मा चौगुले, शिवानंद आसबे, रणजीत बुगडे, संदीप भगूत्रे, विश्वास बुगडे, बाळू कांबळे, शंकर बुगडे याच्यासह मराठी शाळा पालक उपस्थित होते. सुत्रसंचालन व आभार नुतन मुख्याध्यापीका कल्पना कोरवी यानी मानले.

छाया वृत्त

स्वामी विवेकानंद विद्यामंदिर, आजराच्या विद्यार्थ्यांनी तालुकास्तरीय नाट्य स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला. यामध्ये दीप्ती सावंत ,अनन्या पिळणकर, आरोही पांडव, गौरी मोहिते, साईशा गावडे, विराज बेळगुंदकर, स्वरूप चोडणकर या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.


आवाहन…
आपल्या परिसरातील ताज्या घडामोडींच्या बातम्या स्वच्छ फोटोसह आपण विनामूल्य प्रसिद्धीसाठी खालील व्हाट्सअप क्रमांकावर पाठवू शकता…
९६३७५९८८६६/८६०५७१५५६६


