रविवार दि. १४ डिसेंबर २०२५


वहातुकीची कोंडी..
हतबल पोलीस प्रशासन

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा येथील संभाजी चौकामध्ये वाहतुकीची प्रचंड कोंडी होत असून यामुळे वाहतूक हाताळताना पोलीस प्रशासन अक्षरशः हतबल होताना दिसत आहे.
सध्या ख्रिसमस व वर्षाखेरच्या पार्श्वभूमीवर गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांची संख्या प्रचंड वाढली आहे. यामध्ये साखर कारखान्याच्या दिशेने जाणारी वाहने व खाजगी बसेसची जादाची भर पडत आहे.
या बाबींमुळे गोव्याकडे व आजरा साखर कारखान्याच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांची संख्या प्रचंड वाढली आहे. सायंकाळी पाच ते सहा वाजताच्या दरम्यान खाजगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या मोठ्या बसेस महागाव मार्गे प्रवेश करत असल्याने यावेळी वाहतुकीची मोठी कोंडी होताना दिसते.
पोलीस प्रशासनाचे सदर कोंडी रोखण्यासाठी प्रयत्न सुरू असले तरीही येथील संभाजी चौकामध्ये गडहिंग्लज, कोल्हापूरच्या दिशेने येणारी वाहने, महागाव मार्गावरून येणारी वाहने व कोकणातून येणारी वाहने एकाच वेळी मोठ्या संख्येने आल्याने वाहतुकीची कोंडी होताना दिसत असून यामुळे स्थानिक रहिवाशांचे प्रचंड हाल होताना दिसत आहेत.
रिंग रोडची फक्त चर्चाच…
वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून रिंग रोडचा मुद्दा वारंवार चर्चेत येताना दिसतो. प्रत्यक्षात मात्र कार्यवाहीस विलंब होत असल्याने रिंग रोड होत नाही तोपर्यंत आजरावासीयांची वाहतूक कोंडीची समस्या थांबणार नाही हेही अधोरेखित होत आहे.

उत्तूर परिसरात लांडग्यांचे हल्ले सुरूच
चव्हाणवाडी व उत्तूरमध्ये शेळी ठार…
वनविभागासमोर नवे आव्हान

उत्तूर : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
उत्तूर परिसरात लांडग्यांच्या हल्ल्यांचे प्रकार थांबण्याचे नाव घेत नसून गेल्या आठवड्याभरात शेळीवर हल्ला झाल्याच्या तीन घटना घडल्या आहेत. वन्य प्राण्यांच्या उपद्रवांमध्ये आणखी एका प्राण्याची भर पडल्याने वनखात्यासमोर लांडग्यांच्या बंदोबस्ताचे नवे आव्हान उभे ठाकले आहे.
शुक्रवारी सायंकाळी उत्तूर येथील राऊ पाकले तसेच चव्हाणवाडी येथील महेश चोरगे यांच्या शेळ्यांवर लांडग्याने हल्ला करून त्या ठार केल्या. उत्तूर येथील घटनेत शेळीची दोन पिल्ले सुदैवाने बचावली. अचानक झालेल्या या हल्ल्यांमुळे पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून वन्यप्राणी घरांजवळपर्यंत येऊ लागल्याने नागरिकांमध्ये चिंता वाढली आहे. काही ठिकाणी गुरांच्या ओरडण्यामुळे घरातील मंडळी जागी झाल्याचेही सांगण्यात येते. लांडग्याच्या हल्ल्याची ही पाचवी घटना असल्याचे समजते. त्यामुळे नागरिकांनी रात्रीच्या वेळी आपली जनावरे बंदिस्त व सुरक्षित ठिकाणी ठेवावीत, तसेच अनावश्यक हालचाली टाळाव्यात, असे आवाहन वनविभागाने केले आहे.

प्राथमिक मध्ये पेद्रेवाडी तर माध्यमिक मध्ये व्यंकटराव हायस्कूल प्रथम
तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन…

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
शिरसंगी (ता. आजरा) येथील आदर्श हायस्कूल येथे ५३ वे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन अणुशास्त्रज्ञ शिवराम भोजे विज्ञान नगरी परिसरात झाले. प्राथमिक मध्ये पेद्रेवाडी विद्यामंदिर तर माध्यमिक मध्ये व्यंकटराव हायस्कूलने प्रथम क्रमांक पटकावला.
स्पर्धेतील विजेते असे…
प्राथमिक गट :- (सहावी ते आठवी) रुद्र प्रवीण कबीर, श्लोक शशिकांत पाटील (विठ्ठल विद्यामंदिर, पेद्रेवाडी), ज्योती परसू नाईक, अस्मिता नारायण येरुडकर (उत्तूर विद्यालय), आदेश दत्तात्रय पाटील, दिगंबर दत्तात्रय पाटील (भादवण हायस्कूल). माध्यमिक गट अस्था सचिन गुरव, हाजिफ मोहम्मद इरफान सय्यद (व्यंकटराव हायस्कूल), साईश योगेश, ओम सचिन उत्तूरकर (पार्वती शंकर विद्यामंदिर उत्तूर ), धनश्री सुभाष लाड, आदित्य सुनील नाईक ( आजरा हायस्कूल ). दिव्यांग विद्यार्थी- अनुज दयानंद पाटील, तन्मय किसन देवरकर (भादवण हायस्कूल), अथर्व दिगंबर गुरव (उत्तूर विद्यालय),
प्राथमिक शिक्षक शैक्षणिक साहित्य पुरवठा:- अश्विनी रामचंद्र यादव (छत्रपती शिवाजी विद्यामंदिर चाफवडे) पुनम रमेश नार्वेकर (दाभिल शाळा), परमेश्वर बाळू नलवडे (शेळप शाळा).
माध्यमिक शिक्षक शैक्षणिक साहित्य:- अस्था सचिन गुरव (व्यंकटराव हायस्कूल), सुनील मारुती चव्हाण (केदार रेडेकर हायस्कूल, पेद्रेवाडी), अलका तुकाराम शिंदे (उत्तूर विद्यालय).
प्रयोगशाळा परिचर:- इमरान खान जमादार (उत्तूर विद्यालय) प्रकाश बाबुराव ओतारी (आजरा हायस्कूल). प्रश्नमंजुषा प्राथमिक गट- रवि गुरव, ज्ञानेश्वरी कुंभार, रोहित मगदूम (वसंतदादा पाटील उत्तूर) वेदांग शिंदे मिताली धुरे, अर्णवी कामत (व्यंकटराव हायस्कूल), श्लोक पाटील, नम्रता आरदाळकर, वीरा होडगे (पेद्रेवाडी हायस्कूल).
माध्यमिक गट:- रिया पाटील, स्नेहल पाटील, श्रेया पाटील (आदर्श हायस्कूल गवसे), अक्षरा पाटील, गतिमा अडकुरकर, अदिती भातखंडे (आजरा हायस्कूल) भक्ती खवरे, प्रियंका पन्हाळकर, सोहम दिवटे (महागोंड हायस्कूल).

निधन वार्ता
सुधाकर पाचवडेकर

सोमवार पेठ, आजरा येथील सुधाकर केशव पाचवडेकर (वय ६४ वर्षे ) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.
त्यांच्या पश्चात पत्नी, दोन विवाहित मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे .
प्रकाश पारदे

वझरे ता. आजरा येथील प्रकाश बंडू पारदे (वय ३६ वर्षे ) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.
त्यांच्या पश्चात पत्नी, आई, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे.

उत्तूर कन्या विद्या मंदिर शाळेचे यश

उत्तूर : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
शिक्षण विभाग पंचायत समिती आजरा आयोजित सांस्कृतिक स्पर्धा समूहनृत्य स्पर्धेत उत्तूर येथील कन्या विद्या मंदिरने प्रथम क्रमांक मिळवला. त्यांची जिल्हा स्तरासाठी निवड झाली आहे. संथाली समाजाच्या जीवनावर आधारित गाण्यात पर्यावरणाचे संरक्षण, प्लॅस्टीकचा वापर टाळणे यासारखे संदेश देण्यात आले होते. लोकसंस्कृतीवर आधारित गीतात उत्तम जीवन पध्दतीचे सादरीकरण केले. प्रश्नमंजुषा स्पर्धेमध्ये लहान गटामध्ये अमृता पाटील, धनश्री कदम, वेदिका उत्तुरकर यांनी द्वितीय क्रमांक मिळविला तर मोठ्या गटामध्ये चिन्मयी थोरवत, भार्गवी भादवणकर व सानिका कुंभार यांनी द्वितीय क्रमांक मिळविला.
या विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक बाळगोंडा कोकीतकर व विलास वाईंगडे तसेच शिक्षक स्टाफ यांचे मार्गदर्शन लाभले.
आज शहरात…
आजरा शहराच्या सांस्कृतिक व शैक्षणिक वाटचालीत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या इराण्णा कल्लाप्पा उर्फ आय.के. पाटील सर यांचा अमृत महोत्सव सोहळा सकाळी ११ वाजता अण्णाभाऊ सभागृह, आजरा येथे सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे.

आवाहन…
आपल्या परिसरातील ताज्या घडामोडींच्या बातम्या स्वच्छ फोटोसह आपण विनामूल्य प्रसिद्धीसाठी खालील व्हाट्सअप क्रमांकावर पाठवू शकता…
९६३७५९८८६६/८६०५७१५५६६


