सोमवार दि. २१ जुलै २०२५

‘त्या’ दोघांना पोलीस कोठडी

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
१८ वर्षीय गतिमंद मुलीवर अत्याचार करणाऱ्या श्रावण सुरेश आजगेकर व धनाजी तुकाराम बुगडे (दोघे रा. बादेस्कर गल्ली, मलिग्रे ता. आजरा जि. कोल्हापूर) यांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आल्यानंतर न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना मंगळवार पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे अशी माहिती आजर पोलिसांनी दिली .
गोकूळला जास्तीत जास्त दुध पुरवठा करा : चेअरमन नवीद मुश्रीफ

उत्तूर : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
गोकुळच्या दुधाला पुणे ,मुंबई बाजारपेठेत मोठी मागणी आहे. त्यामुळे गोकुळच्या दुधाचा दर्जा अधोरेखित होतो. ही मागणी पूर्ण करण्यासाठी २५ लाख लीटर दुध संकलन करण्याचा टप्पा गाठायचा असून गोकूळ दूध संघाला अधिकाधिक दुधपुरवठा करावा असे प्रतिपादन गोकूळचे अध्यक्ष नवीद मुश्रीफ यांनी केले . ते उत्तूर येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आयोजित सत्कार कार्यक्रम प्रसंगी बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वसंतराव धुरे होते .
मुश्रीफ म्हणाले , गोकूळ दूध संघ देशात दुसऱ्या क्रंमाकावर ५१२ कोटी च्या ठेवी प्राप्त झाल्या आहेत . दूध उत्पादकाला अधिक फायदा मिळावा यासाठी प्रयत्न करणार असून गोकूळच्या जुन्या योजनांमध्ये पारदर्शकपणा आणणार आहे . गट – तट न पाहता सर्वसामान्य दूध उत्पादकांचे हित जोपासले जाणार आहे . वासाच्या दूध दरवाढ करण्यात येणार आहे दूध उत्पादक शेतकऱ्यांनी जातीवंत जनावरांची पैदास केली पाहिजे . चेअरमन पदाच्या एका महिन्यामध्ये गोकूळला ११ कोटीचा नफा मिळवून दिला आहे .
काशिनाथ तेली, मारुती घोरपडे, तालुका संघाचे अध्यक्ष महादेवराव पाटील, वसंतराव धुरे,संभाजी तांबेकर यांचीही यावेळी भाषणे झाली.
कार्यक्रमास गंगाधर हराळे , शिवाजी कुराडे , राजेश जोशिलकर , दिपक देसाई ,प्रल्हाद सावंत , सुरेश खोत , बी .टी . जाधव , बबन पाटील , शंकर पावले , संजय पोवार , वसंत पाटील , शशिकांत लोंखडे , विश्वासराव देसाई , सुधीर सावंत आदीसह विविध संस्थाचे पदाधिकारी , सभासद उपस्थित होते . प्रास्तविक शिरीष देसाई यांनी केले .गणपती सांगले यांनी सुत्रसंचालन करून आभार मानले.
नविद मुश्रीफ भावी आमदार…?
ना. हसन मुश्रीफानंतर नविद मुश्रीफ यांना कागल विधानसभेचे नेतृत्व करावे लागणार आहे . गोकूळच्या निमित्ताने श्री गणेशा सुरु झाली असून पुढचे आमदार नवीद मुश्रीफ असतील असे यावेळी महादेवराव पाटील यांनी सांगितले .
चार सूत्री पद्धतीने भात लावण केल्यास उत्पादनात वाढ : सूर्यकांत दोरुगडे

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
पारंपरिक पद्धतीने भात रोप लागण केल्यास रोप स्थिर होण्यास वेळ लागतो. चारसूत्री पद्धती रोप लागण केल्यास त्यांची वाढ जोमाने होते. त्याचबरोबर या पद्धतीत भाताचे उत्पादनही चांगले येते. असे प्रतिपादन रिसोर्स फार्मर सुर्यकांत दोरुगडे यांनी केले.
येथील देऊळवाडी, सातेवाडीमधे कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) च्यावतीने खरीप हंगाम भात पीक शेतकरी शेतीशाळा झाली. ग्रामपंचायत सदस्या माधुरी पोतनीस अध्यक्षस्थानी होत्या.
रिसोर्स फार्मर श्री. दोरुगडे म्हणाले, पारंपारिक पध्दतीने भात लागवड केल्यास उत्पादन चांगले मिळत नाही. भाताची चारसुत्री पध्दतीने लागवड करावी. उत्पादन चांगले मिळते. मंडल कृषी अधिकारी प्रदीप माळी यांनी कृषीविभागाच्या महाडिबिटी, अॅग्री स्टॅक, फार्मर आयडी, नैसर्गिक शेती मिशन आदीसह विविध योजनांची माहिती दिली. रिसोर्स फार्मर नानासो चौरे म्हणाले जमिनीतील कार्बन वाढविण्यासाठी शेतकऱ्यांनी माती परीक्षण करणे गरजेचे आहे, माती परीक्षणाच्या आधारे खतांचा संतुलित वापर केल्यास पीक जोमाने वाढते. भात पिकासाठी आवश्यक सेंद्रिय खत, शेणखत तयार करण्याची पद्धत व वापरण्याची पद्धत याबाबत मार्गदर्शन केले.
यावेळी संतोष पोतनीस, रामचंद्र पोतनीस, संभाजी पोतनीस, बंडू पाटील, वृषाली पोतनीस , सविता पोतनीस, जयश्री पोतनीस आदी शेतकरी उपस्थित होते. अमित यमगेकर सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक आजरा यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. मंगेश पोतनीस यांनी आभार मानले.
आजरा, महागांव, हलकर्णीसह
बस सेवा पूर्ववत सुरू करा..

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा एसटी आगारामार्फत मौजे लिंगवाडी, महागाव, हलकर्णी एसटी पूर्ववत सुरू व्हावी यासाठी आजरा आगार व्यवस्थापकांना निवेदन देण्यात आले.
यावेळी बहुजन मुक्ती पार्टीचे तालुका अध्यक्ष डॉ. सुदाम हरेर, डॉ. उल्हास त्रिरत्ने, राहुल मोरे, अमित सुळेकर, मा नितीन राऊत, सुधाकर प्रभू इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.

धाकधूक वाढली…
आज पुन्हा सरपंच पदाचे आरक्षण

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा तालुक्यातील ७३ ग्रामपंचायतींचे २०२५ ते २०३० या कालावधीकरिता सरपंचपदासाठीचे आरक्षण आज पुन्हा काढण्यात येणार तब्बल तिसऱ्या वेळा सरपंच पदासाठी इच्छुक असणाऱ्या मंडळींची धाकधूक वाढली आहे.
८ एप्रिलच्या आरक्षणात अनेक वर्षांनंतर पेरणोली, किणे, इटे, पोळगाव या राजकीय संवेदनशील गावांसह २३ गावांत सरपंचपद सर्वसाधारण, उत्तूर, मडिलगे येथे अनुसूचित जाती, भादवण, वडकशिवाले या मोठ्या गावांत नागरिकांचा मागास प्रवर्ग आरक्षण जाहीर करण्यात आले.
ओबीसी आरक्षणासाठी टक्का वाढवण्यात आल्याने नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी एकदाच आरक्षण पडलेल्या खानापूर, बहिरेवाडी, पेरणोली यांच्यात चिठ्ठीतून जाहीर केलेल्या आरक्षणात पेरणोलीसाठी आरक्षण लागू झाले होते. दरम्यान, दोन्ही वेळा काढण्यात आलेले आरक्षण रद्द करून नव्याने अधिसूचना काढण्यात आल्याने सोमवार, दि. २१ रोजी दुपारी १२.३० वाजता तहसील कार्यालयाच्या सभागृहात आरक्षण काढण्यात येणार आहे. त्यामुळे इच्छुकांची पुन्हा धाकधूक वाढली आहे. तालुक्यातील राजकीय कार्यकर्ते, विविध संस्थांचे पदाधिकारी यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन तहसीलदार माने यांच्यासह निवडणूक नायब तहसीलदार आप्पासाहेब तोंडसे, महसूल सहायक चंद्रकांत पालकर, अव्वल कारकून संभाजी गाडीवड्ड यांनी केले आहे.
किरकोळ बदलांची शक्यता...
आजच्या आरक्षणामध्ये पूर्वी जाहीर झालेल्या आरक्षणामध्ये किरकोळ बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पाच ते सहा ठिकाणी हे बदल अपेक्षित आहेत.

आजरा महाविद्यालयाकडून वृक्षारोपण

आजरा महाविद्यालयाच्या राष्ट्रीय छात्र सेना (NCC) आणि राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभागांच्या वतीने आजरा सूतगिरणीच्या परिसरात वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला. पर्यावरणाचे संरक्षण आणि संवर्धन करण्याच्या उद्देशाने आयोजित या कार्यक्रमात जनता एज्युकेशन सोसायटीचे मान्यवर संचालक, महाविद्यालयाचे विद्यार्थी, शिक्षक आणि सूतगिरणीचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना, जनता एज्युकेशन सोसायटीचे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अनिल देशपांडे म्हणाले की, जनता एज्युकेशन सोसायटी व आजरा महाविद्यालय आजरा नेहमीच पर्यावरण पूरक उपक्रम राबवत असतात. यामध्ये प्लास्टिक बंदी प्रबोधन कार्यक्रम, नो व्हेईकल डे, जंगल संवर्धानाठी वनवा नियंत्रण प्रबोधन कार्यक्रम तसेच वृक्षारोपण यांचा समावेश होतो. वाढत्या प्रदूषणामुळे पर्यावरणाचा समतोल बिघडत चालला आहे. अशा परिस्थितीत, प्रत्येक नागरिकाने झाडे लावून ती जगवण्याची जबाबदारी घेणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनी पर्यावरणाच्या संरक्षणासाठी सक्रिय योगदान देण्याचे आवाहनही त्यांनी केले. तसेच राष्ट्रीय छात्र सेना (NCC) आणि राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभागाच्या या उपक्रमाचे कौतुक करत विद्यार्थ्यांचे अभिनंदन ही केले.
यावेळी बोलताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए. एन. सादळे म्हणाले , या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाबद्दल जागरूकता निर्माण होण्यास मदत तर होईलच शिवाय सामाजिक जबाबदारीचे भान येऊन सक्रिय सहभाग घेण्याची वृत्ती वाढीस लागेल. आजरा महाविद्यालय नेहमीच अशा सामाजिक उपक्रमांमध्ये अग्रेसर राहिले आहे आणि भविष्यातही असेच उपक्रम राबवणार असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमादरम्यान विविध प्रकारच्या रोपांची लागवड करण्यात आली. विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहात खड्डे खोदले, रोपे लावली आणि त्यांना पाणी घातले. सूतगिरणीच्या परिसरात हिरवळ वाढवण्यासाठी हा उपक्रम महत्त्वाचा ठरणार आहे.
या कार्यक्रमामध्ये जनता एज्युकेशन सोसायटीचे सचिव श्री. रमेशअण्णा कुरुणकर, ज्येष्ठ संचालक श्री. सु. ई. डांग, श्री. के. व्ही. येसणे, युवा नेते आणि आजरा सुतगिरणीचे संचालक श्री. अनिकेत चराटी, कार्यालयीन अधीक्षक श्री. योगेश पाटील, उपप्राचार्य श्री. डी. पी. संकपाळ, पर्यवेक्षक श्री. मनोज पाटील, आजरा सुतगिरणीचे अधिकारी श्री. धुमाळ साहेब व सटाले उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रीय छात्र सेना (NCC) प्रमुख डॉ. संजय चव्हाण व प्रा. अनिल निर्मळे, राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभागाचे प्रकल्प अधिकारी डॉ. अविनाश वर्धन व प्रा. रत्नदीप पवार यांनी केले होते.

उत्तूर मध्ये HPV लसीकरण

रविवार दिनांक २० रोजी उत्तूर येथे नामदार हसनसाॊ मुश्रीफ फाउंडेशन तर्फे ह्यूमन पॅपिलोमा व्हायरस (HPV) लसीकरणाचे उद्घाटन गोकुळ दूध संघाचे चेअरमन नविद मुश्रीफ यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आजरा साखर कारखान्याचे माजी चेअरमन वसंतराव धुरे ,पंचायत समिती आजरा माजी उपसभापती शिरीष देसाई उपस्थित होते.
यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ.रविंद्र गुरव यांनी HPV लसीकरणाविषयी माहिती दिली. तसेच ९ ते २६ वयोगटातील सर्व मुलींनी लसीकरण करून घ्यावे असे आवाहन केले. प्राथमिक आरोग्य केंद्र उत्तुर यांच्यामार्फत HPV लसीकरण करण्यात आले. आज शाळेतील ४८ मुलींना आणि २ शाळाबाह्य अशा एकूण ५० मुलींना HPV लसीकरण करण्यात आले. यावेळी प्रा. आ. केंद्रा कडील सर्व आरोग्य कर्मचारी, गटप्रवर्तक व आशा सेविका, ग्रामपंचायत सदस्य,कन्या व कुमार शाळेचे मुख्याध्यापक,शिक्षक,पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक आरोग्य सहाय्यक अनिल कुरणे यांनी केले व आभार श्रीम. भांडकोळी यांनी केले.

‘रोझरी’मध्ये रुजली विद्यार्थ्यांमध्ये लोकशाहीची मूल्ये

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
विद्यार्थ्यांत नेतृत्वगुण व लोकशाहीची मूल्ये रुजवण्यासाठी रोझरी प्रशालेत शालेय मंत्रीमंडळाची स्थापना करून शपथविधी तर सोहळा संपन्न झाला.
कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आजरा महाविद्यालयाचे राष्ट्रीय छात्र सेनेचे विभाग प्रमुख लेफ्टनंट डॉ.संजय चव्हाण यांनी विद्यार्थांनी स्वयंशिस्त, शारीरिक – मानसिक आरोग्य आणि आत्मविश्वास याच्या जोरावर प्रगती साधून सुजाण व समाजनिर्मिक नागरिक व्हावे.
या शपथविधी सोहळ्यात विद्यार्थीप्रतिनिधी म्हणून क्लिंटन बारदेस्कर , शेरेल फर्नांडिस, स्वराज्यसिंह सरदेसाई मायरा डिसोझा यांच्यासहित ३२ विद्यार्थी प्रतिनिधींना शाळेचे प्रिन्सिपॉल फादर अँथोनी डिसोझा यांनी शपथ देऊन जबाबदारीची जाणीव करून दिली.तर मुख्याध्यापक मनवेल बारदेस्कर यांनी प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय करून दिला.मंचावर पर्यवेक्षक श्री. विजय केसरकर,फादर विल्सन गोंसाल्व्हिस उपस्थित होते.
सूत्रसंचालन कु .अनन्या पाचवडेकर व कु. स्वरा निगडे यांनी पार पाडले तर आभार प्रदर्शन मायरा डिसोझा यांनी केले.
चाफवडे केंद्रातील शाळांना शैक्षणिक साहित्य वाटप

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
‘ दि. कॉन्सरखेशन फौंडेशन ऑफ इंडीया’ या संस्थेमार्फत चाफवडे केंद्रातील गरीबू व गरजू शालेय विद्यार्थ्यांना रेनकोट वाटप करणेत आले.
फौंडेशनचे सदस्य श्री. विराज चव्हाण यांचे वतीने चाफवडे केंद्रातील बुरुडे, भटवाडी, मुरुडे, चित्रानगर श्रृंगारवाडी, उचंगी या शाळेतील ४० मुलांना रेनकोट व खाऊ वाटप करणेत आले.
फौंडेशनचे अध्यक्ष श्री. आशिष घेवडे यांना फौंडेशनच्या महाराष्ट्रभर सुरु असलेल्या कामाचा आढावा घेतला, पावसात भिजल्यामुळे मुले आजारी पडतात व शाळेला हजर राहता येत नाही. मुलांचे शालेय नुकसान होऊ नये म्हणून हा उपक्रम राबला असे आपल्या मनोगतात सांगितले .
आपल्या उत्पन्नातील काही हिस्सा समाजासाठी देण्याच्या हेतूने व कुटुंबातील सदस्यांचे वाढदिवस पार्टी न करता त्याचा खर्च सत्कारणी लावणेसाठी हा उपक्रम घेतल्याचे दाते श्री. विराज चव्हाण यांनी सांगितले. त्यांनी व त्यांच्या कुटुबियांनी स्वतःच्या हाताने सर्व मुलांना रेनकोट घातले.

निधन वार्ता
जनाबाई निकम

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
मलिग्रे ता.आजरा येथील जनाबाई मारूती निकम ( वय वर्ष ७२ वर्षे ) यांचे आकस्मीक निधन झाले.
त्यांच्या पश्चात दोन मुलगे,दोन मुली, जावई, सुना, नातवंडे असा परीवार आहे.


