mrityunjaymahanews
अन्य

सातच्या बातम्या

शनिवार  दि. १९ जुलै २०२५         

धक्कादायक…
गतिमंद मुलीवर अत्याचार
दोघांविरोधात गुन्हा नोंद

           आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      १८ वर्षीय गतिमंद मुलीवर ती गतिमंद आहे हे माहित असूनही तिला कानातील डूल देण्याच्या बहाण्याने घरी बोलावून ती प्रतिकार करत असताना तिला मारहाण करून तिच्यावर दोघांनी शारीरिक अत्याचार केले.  संबंधित मुलीच्या आईने तशा स्वरूपाच्या दिलेल्या फिर्यादीवरून श्रावण सुरेश आजगेकर व धनाजी तुकाराम बुगडे (दोघे रा. बादेस्कर गल्ली, मलिग्रे ता. आजरा जि. कोल्हापूर ) यांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आल्याची माहिती आजरा पोलिसांनी दिली.

       सदर घटना १० जुलै २०२५ रोजी घडली. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक नागेश यमगर करीत आहेत.

तूर्तास टोल वसुली थांबली…

तालुकावासीयांच्या रेट्यासमोर टोल प्रशासन नमले

        आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      तालुकावासियांना विश्वासात न घेता भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्रशासनाने अचानकपणे आदल्या दिवशी वृत्तपत्रात जाहिरात व दुसऱ्या दिवशी पासून टोल वसुली असा प्रकार अवलंबण्याचा प्रयत्न केला. परंतु टोलमुक्ती संघर्ष समिती व तालुकावासियांनी एका दिवसात टोलविरोधी पुन्हा एक वेळ तालुकाभर रान उठवून हा प्रयत्न हाणून पाडला. महामार्गबाधित शेतकऱ्यांचे प्रलंबित असणारे प्रश्न, बंद अवस्थेतील पथदिवे, तालुकावासियांना टोल मधून मुक्ती मिळावी ही असणारी आग्रही मागणी व त्याकडे करण्यात आलेले दुर्लक्ष याचे पडसाद अखेर टोल वसुलीच्या शुभारंभ प्रसंगी उमटले. शुभारंभादिवशीच मोठ्या संख्येने तालुकावासिय टोल नाक्यावर एकत्र आले. शासनाच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.    तालुकावासियांना विश्वासात न घेता निर्णय घेण्याची अलीकडे शासनाने प्रथा पाडण्यास सुरुवात केली आहे. प्रांत कार्यालय गडहिंग्लज वरून भुदरगडला हलवण्यात आले, जिल्हा परिषद मतदार संघामध्ये घट करण्यात आली, पाणी प्रकल्पांकरीता तालुकावासीयांच्या जमिनी आणि लाभ मात्र पूर्वेकडील इतर तालुक्यांना असे प्रकार सुरू केले. जर टोल तालुकावासीयांच्या माथी मारण्याचा प्रयत्न केला तर तालुकावासीय पाच पैशाचा टोल तर देणार नाहीत पण टोल हिरण्यकेशी आणि चित्रा नदीमध्ये विसर्जित करू असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला. जोपर्यंत तालुका वासियांचीटोलमुक्ती होत नाही तोपर्यंत टोल वसुली करू देणार नाही. तालुकावासियांना टोलमुक्त करण्यासंदर्भात बैठक बोलवावी अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी यावेळी केली. लेखी पत्र दिल्याशिवाय आंदोलन थांबणार नाही असा इशाराही दिला.

     अखेर विभागीय पोलीस अधिकारी रामदास इंगवले, तहसीलदार समीर माने, सहाय्यक पोलीस निरीक्षक नागेश यमगर, निवासी तहसीलदार म्हाळसाकांत देसाई आदींनी भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांची चर्चा केली. पालकमंत्री नाम. प्रकाश आबिटकर यांच्यासोबत बैठक झाल्यानंतरच टोल वसुली संदर्भात निर्णय होईल असे लेखी पत्र त्यांनी दिल्यानंतर आंदोलन थांबवण्यात आले. पालकमंत्री ना. प्रकाश आबिटकर यांनीही बैठक झाल्याशिवाय टोल वसुली करू नये अशी सूचना संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधून केली. आंदोलन प्रसंगी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

      परशुराम बामणे, आजरा साखर कारखान्याचे अध्यक्ष मुकुंदराव देसाई, उपाध्यक्ष सुभाष देसाई, प्रभाकर कोरवी, युवराज पोवार, संजय पाटील, राजू होलम, सुधीर कुंभार, संजय पाटील, प्रकाश मोरुस्कर, अनिल फडके आदींनी ‌ आंदोलकांना मार्गदर्शन केले.

      यावेळी दशरथ अमृते, यशवंत इंजल, दिनेश कांबळे, इंद्रजीत देसाई,संतोष भाटले, विजय थोरवत, रणजीत सरदेसाई, दिगंबर देसाई, सुधीर सुपल, रणजीत देसाई,ओंकार माद्याळकर, सचिन पाटील, जयसिंग खोराटे, कॉ. शांताराम पाटील, चव्हाण, धनाजी राणे, रवींद्र जाधव, संजय उत्तूरकर, आजरा साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक संभाजी सावंत, संकेत सावंत, सुरेश होडगे, मनोज गुरव, रवी सावंत, प्रकाश पोवार, जावेद पठाण, बिलाल लतीफ, गौरव देशपांडे, जोतिबा आजगेकर,राजू विभूते,जावेद पठाण यांच्यासह तालुक्यातील नागरिक व आजरा साखर कारखान्याचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

गावात हत्ती…
गावाशेजारील शेती पिकांचे मोठे नुकसान

           आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

       गेले महिनाभर पश्चिम भागात धुमाकूळ घालणाऱ्या हत्तीने गुरुवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास थेट घाटकरवाडी गावात प्रवेश केला. तुकाराम पाटील यांच्या घरासमोर त्याने सर्वांना खुलेआम दर्शन दिले.

      त्यानंतर रात्रभर शरद रामू डेळेकर, जयसिंग गोपाळ पाटील, हरिश्चंद्र पाटील, सुनील तांबेकर, मधुकर बाळकृष्ण पाटील आदींच्या ऊस व भातपिकासह मेसकाठ्यांचे मोठे नुकसान केले आहे.

       नुकसान केल्यानंतर पुन्हा तो नेहमीप्रमाणे गावाशेजारील जंगलामध्ये निघून गेला.

   बांबू प्रकल्पाच्या माध्यमातून केंद्र शासन शेतकऱ्यांच्या दारात : तहसीलदार समीर माने


           आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      आजऱ्यामध्ये होवू घातलेल्या बांबू प्रकल्पाच्या माध्यमातून केंद्रशासन शेतक-यांच्या दारात पोहचले आहे. याचा लाभ शेतकऱ्यांनी घेवून आपली आर्थिक उन्नती साधावी असे आवाहन आजऱ्याचे तहसीलदार समीर माने यांनी केले.

      येथील तहसील कार्यालयाच्या सभागृहात बांबू उत्पादक शेतकऱ्यांची कार्यशाळा झाली. आर्थिक आणि सामाजिक बदल संस्था बैंगलुरु आणि आजरा बांबू क्लस्टर फौंडेशनच्यावतीने आयोजन केले होते. तहसीलदार समीर माने अध्यक्षस्थानी होते उपविभागीय कृषी अधिकारी किरण पाटील, भारतीय सामाजिक विज्ञान संशोधन परिषद (आयसीएसएसआर) चे प्रकल्प प्रमुख, संशोधक डा विलास जाधव प्रमुख उपस्थित होते. आर्थिक आणि सामाजिक बदल संस्थेचे कार्यकारी संचालक प्रमोदकु‌मार यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यशाळा झाली

      पत्रकार रणजित कालेकर यानी स्वागत व प्रास्ताविक केले. डॉ.जाधव म्हणाले, पारंपारिक बांबूची उत्पादकता वाढविण्यासाठी आणि शेतक-यांना शाश्वत उत्पन्न मिळवून देण्यासाठी शास्त्रीय पध्दतीने बांबू लागवड आणि मुल्यवर्धनासाठी प्रोत्साहीत केले जाणार आहे.

       पुढील पाच वर्षासाठी संस्था आजरा व चंदगड तालुक्यात शेतकऱ्यांसाठी काम करणार आहे. सतीश कांबळे म्हणाले, बांबूचे पिक शेतकऱ्याला शाश्वत उत्पन्न देण्याचा मार्ग आहे. वसंत तारळेकर म्हणाले, आजरा बांबू क्लस्टर फौंडेशनने चालवलेल्या बांबू चळवळील शेतक-यांनी सहभागी व्हावे. उपविभागीय कृषी अधिकारी श्री. पाटील यांनी शासकीय योजनांची माहीती दिली. अभिषेक शिंपी, भिकाजी गुरव, कृषी अधिकारी प्रदीप माळी, शरंद देशमुख, जी. एम. पाटील, टी. एस. गडकरी, सी. डी. सरदेसाई, रामदास देसाई, दीपक डोंगरे, बाबासाहेब पाटील, सभाजी इंजल, निवृत्ती कांबळे, हिंदुराव कालेकर, ए. के. पावले, प्रशाल कांबळे, शिवाजी इंगळे, सुभाष जाधव, तानाजी भोकरे, गणपती डोंगरे, धनाजी राणे, संयोगीता बापट, डॉ.गौरी भोसले, पुष्पलता घोळसे, हर्षद देसाई यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.

      प्रमोद तारळेकर यांनी सूत्रसंचालन तर दत्ता पाटील यानी आभार मानले.

विविध योजनांच्या लाभाकरीता माहिती अद्ययावत  करण्याचे आवाहन

        आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

     केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृध्दापकाळ निवृत्तीवेतन अनुदान योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्तीवेतन अनुदान योजना या योजना महसुल प्रशासना मार्फत राबविण्यात येतात. सदर केंद्र पुरस्कृत सर्व लाभार्थ्यांचे जीवन प्रमाणपत्र प्रणाली (DLC) Beneficiary Satyapan App व्दारे रजिस्ट्रेशन करण्याच्या सुचना प्राप्त झालेल्या आहेत. रजिस्ट्रेशन केल्याशिवाय पोर्टलवर लाभार्थी ग्राहय धरले जाणार नाहीत. तसेच त्यासाठी निधी देखील मिळणार नाही अशा केंद्र शासनाच्या सुचना प्राप्त झालेल्या आहेत. सदरचे रजिस्ट्रेशन हे माहे जुलै २०२५ अखेर पर्यंत करुन घेणे आवश्यक आहे. जे लाभार्थी मयत झाले आहेत त्या लाभार्थ्यांच्या वारसांनी तसे तहसिल कार्यालयास कळविणे आवश्यक आहे.

      सदर केंद्र पुरस्कृत योजनांचा लाभ घेत असलेल्या सर्व लाभार्थ्यांनी आपले अपडेट करणेत आलेले आधारकार्ड व त्या आधारकार्डास लिंक असलेल्या मोबाईलसह तहसिल कार्यालयात अथवा आपल्या नजिकच्या महा ई सेवा केंद्रामध्ये उपस्थित रहावे व आपले प्रमाणपत्र जनरेट करुन घ्यावे. (डोळयांचे स्कॅनिंग करावयाचे असलेने स्वतः लाभार्थी उपस्थित राहणे अनिवार्य आहे). ज्या लाभार्थ्यांना Beneficiary Satyapan App व्दारे स्वतः प्रमाणपत्र जनरेट करणे शक्य आहे असे लाभार्थी सदरचे प्रमाणपत्र त्यांच्या मोबाईलवर जनरेट करु शकतात. ज्या लाभार्थ्यांनी स्वतः प्रमाणपत्र जनरेट केले आहे त्यांनी सदरचे प्रमाणपत्र पत्राची प्रत तहसिल कार्यालयास जमा करावे असे आवाहन तहसिलदार आजरा यांनी केले आहे.

निधन वार्ता

सुभाष कुंभार

             मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      आजरा येथील हॉटेल व्यावसायिक श्री. सुभाष जोतिबा कुंभार/परळकर (वय ७५ वर्षे सध्या रा. कुंभार वस्ती, मसोली फाटा ) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.

      त्यांच्या पश्चात- पत्नी, मुलगा, सुन, असा परिवार असून रक्षा विसर्जन रविवार २० जुलै रोजी सकाळी ९ वाजता कुंभार वस्ती, मसोली फाटा येथे आहे.

निधन वार्ता 

सरस्वती भोसले

             मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      मसोली ता.आजरा येथील सरस्वती दत्तात्रय भोसले ( वय ६८ वर्षे ) यांचे आकस्मिक निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन विवाहित मुले, सुना, नातवंडे, पती असा परिवार आहे.

     त्या तालुका नाभिक समाजाचे अध्यक्ष गौतम भोसले यांची चुलती होत.

 

संबंधित पोस्ट

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

कोरीवडे सेवा संस्थेचे ९० सभासद अपात्र… आजऱ्यात ना. सतेज पाटील समर्थकांचा जल्‍लोष यासह आजरा स्थानिक बातम्या

mrityunjay mahanews
error: Content is protected !!