दि.११ जानेवारी २०२५


शेती बाधीत झाल्यास भरपाई द्यावी
पेरणोलीतील बैठकीत शेतकऱ्यांचा आग्रहः रस्त्याचे काम सुरु, संयुक्त मोजणीचा निर्णय

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
रस्त्यासाठी शेत जमिन घेतल्यास त्याची नुकसान भरपाई द्यावी. झाडे, बांबूची बेटे, जलवाहीनीचे नुकसान झाल्यास त्याचीही नुकसान भरपाई द्यावी. अशी आग्रही मागणी शेतकऱ्यांनी केली. नुकसान झाल्यास त्याची भरपाई देण्याची हमी अधिकाऱ्याने दिल्यानंतर काम सुरू करण्यास परवानगी देण्यात आली.
आजरा- देवकांडगाव मार्गे गारगोटी रस्त्याचे काम बंद पाडल्याच्या पार्श्वभूमीवर पेरणोली (ता. आजरा) येथील हनुमान मंदिरात सार्वजनिक बांधकाम विभाग, रस्ते बांधकाम कंपनीचे अधिकारी व शेतकऱ्यांची संयुक्त बैठक झाली. निवासी नायब तहसीलदार म्हाळसाकांत देसाई अध्यक्षस्थानी होते. सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता आदित्य भोसले प्रमुख उपस्थित होते.
श्रमिक मुक्ती दलाचे राज्यसंघटक कॉ. संपत देसाई यांनी स्वागत केले.प्रास्ताविकात ते म्हणाले, सध्या अस्तित्वात असलेला रस्त्यापेक्षा जादा जमिन द्यावी लागत असेल तर त्याचा योग्य मोबदला शेतकऱ्यांना मिळायला हवा. झाडा बेटांचीही नुकसान भरपाई मिळावी. दहा मीटर्सच्या पलिकडे रस्त्याचे रुंदीकरण केल्यास व मेसकाठी (बांबू), फळझाडांची तोड झाली तर त्यांचे नुकसान मिळावे. पुर्वीचे गावपाट जलवाहीनी टाकून कायम ठेवावे. खुदाईमध्ये कृषी जलवाहीनीचे नुकसान झालेस त्याची दुरुस्ती करून मिळावी अशी मागणी केली. चढाव, वळणासाठी जादा क्षेत्र घेतले तर त्याची नुकसान भरपाई दिली जाईल. अशी ग्वाही अधिकाऱ्यांनी दिली. पेरणोली ते देवकांडगाव रस्त्याची संयुक्त मोजणी करण्याचे ठरले.
या वेळी पांडुरंग लोंढे, सचिन देसाई, दिनेश कांबळे, जी. एस. देसाई, सुभाष देसाई, संजय मोहीते, आनंदा कुंभार, यशवंत कोडक, अभिजीत देसाई, पांडुरंग कांबळे, विठ्ठल मुळीक, सुरेश पाटील, साळगाव, पेरणोली, कुरकुंदे, हरपवडे, देवकांडगावमधील बाधीत शेतकरी उपस्थित होते.

जन स्वास्थ्य अभियानांतर्गत मार्गदर्शन

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
जन स्वास्थ्य दक्षता समिती कोल्हापूर यांच्या सूचनेनुसार जिल्हा आरोग्य अधिकारी कोल्हापूर यांच्या मार्गदर्शनाखाली प्राथमिक आरोग्य केंद्र वाटंगी यांच्या सहकार्याने दिनांक एक जानेवारी ते ६ जानेवारी पर्यंत वाटंगी प्राथमिक आरोग्य केंद्र कार्यक्षेत्रातील आठवी ते दहावी या वयोगटातील मुला मुलींना क्षयरोग कुष्ठरोग जलजन्य आजार व व्यसनाधीनता या विषयीची प्रत्येक माध्यमिक हायस्कूल मध्ये जाऊन माहिती देण्यात आली.
यामध्ये आजऱ्यातील पंडीत दीनदयाळ हायस्कूल रोजरी हायस्कूल, व्यंकटराव हायस्कूल, डॉक्टर झाकीर हुसेन उर्दू हायस्कूल या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी डॉ. रवींद्र गुरव व द्वितीय वैद्यकीय अधिकारी डॉक्टर मलिका शेख व कार्यक्षेत्रात काम करणारे आरोग्य सेवक समुदाय अधिकारी यांनी शाळेमध्ये प्रत्यक्ष जाऊन विद्यार्थ्यांना माहिती सांगितली.


भादवणचे ग्रामस्थ विमानाने गावच्या यात्रेला येणार

उत्तूर : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
भादवण (ता. आजरा) गावची महालक्ष्मीची यात्रा दरवर्षी साजरी होते. यावर्षी ३१ जानेवारी जागर व १ फेब्रुवारीला मुख्य यात्रा साजरी होणार आहे .या यात्रेला मुंबईकर ग्रामस्थ विमानाने गावी येणार आहेत. यातील बहुतांश ग्रामस्थ पहिल्यांदाच अवकाश सफारीचा आनंद घेणार आहेत. यानिमित्ताने एक अविस्मरणीय क्षण त्यांना अनुभवायला मिळणार आहे.
या विमान प्रवाशांची संकल्पना या गावचे नागरिक मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्टचे वरिष्ठ अधिकारी व भारतीय कामगार सेनेचे एअरपोर्टचे पदाधिकारी आर. बी. पाटील यांची आहे. ग्रामस्थांना एकदा तरी विमानाने गावी घेऊन जायचे हे त्यांचे स्वप्न होते. गणेश चतुर्थीला ते ग्रामस्थांना विमानाने गावी घेऊन जाणार होते. मात्र यावेळी सर्वांना एकाच वेळी सुट्टी न मिळाल्याने तो संकल्प थांबला. यानंतर यात्रेला गावी जाण्याचे नियोजन करण्यात आले. यासाठी २६ ग्रामस्थांचे तिकीट बुक करण्यात आले.३० जानेवारीला सकाळी ९.३५ वाजता हे विमान मुंबई विमानतळावरून सुटणार आहे. एक तासानंतर १०.३५ ला हे विमान कोल्हापूर विमानतळावर पोहोचणार आहे. तिथून मिनी बसणे सर्वजण गावी येतील . या नागरिकांचे ग्रामस्थ स्वागत करणार आहेत.
सर्वसामान्यांच्या इच्छापूर्तीचे समाधान…
सर्वसामान्य नागरिकांना आयुष्यात एकदा तरी विमान प्रवास करावा अशी इच्छा असते या निमित्ताने ती पूर्ण करण्याचे भाग्य मला लाभणार आहे.
……आर. बी .पाटील


निधन वार्ता
सुहास बुवा

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
निंगुडगे ता. आजरा ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच व कामगार आयुक्त कार्यालय कोल्हापूरचे कर्मचारी सुहास कृष्णा बुवा ( वय ५२ वर्ष) यांचे अल्पश: आजाराने काल शुक्रवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, विवाहित मुलगी, मुलगा, भाऊ असा परिवार आहे.


गांधीनगर येथे हरिनाम सोहळ्यास उत्साहात सुरुवात

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
विठ्ठल मंदिर गांधीनगर, आजरा येथे हरिनाम सोहळ्यास काल शुक्रवार दिनांक १० जानेवारीपासून उत्साहात सुरुवात झाली.
शुक्रवारी रात्री दिंडी, ज्ञानेश्वरी पारायण, कीर्तन व सामुदायिक जागराचा कार्यक्रम पार पडला.
आज शनिवार दि. ११ रोजी सकाळी नऊ ते अकरा या कालावधीत ह. भ. प. श्रीधर महाराज जाधव साळगाव यांचे कीर्तन होणार आहे तर दुपारी १२.३० नंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असल्याचे समस्त वारकरी, ग्रामस्थ गांधीनगर आजरा यांनी स्पष्ट केले आहे.






