mrityunjaymahanews
अन्य

सातच्या बातम्या…


मेंढ्यांच्या टकरींचे आयोजन…
पाच जणांविरोधात गुन्हा नोंद

                     आजरा:प्रतिनिधी

      महालक्ष्मी यात्रेनिमित्त भादवण ता. आजरा येथे विनापरवाना मेंढ्यांच्या टकरींच्या स्पर्धा आयोजित केल्या बद्दल प्राणी छळ प्रतिबंधक कलमानुसार सुनील मारुती मुळीक रा. भादवण, दयानंद भोपळे रा. आजरा, बबलू नाईक रा. नेसरी, धीरज सांगले रा. सांगलेवाडी ता. कागल राजू नाईक या पाच जणांविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे ‌.

       याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की,मुळीक व त्यांच्या साथीदारांनी यात्रेनिमित्त विनापरवाना स्पर्धा आयोजन करणे, त्यासाठी मैदान तयार करून मेंढ्यांच्या झुंजी लावणे या कारणास्तव त्यांच्यावर प्राणी छळ प्रतिबंधक अधिनियम १९६८ च्या कलम ११ प्रमाणे दीपक सुभान किल्लेदार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा नोंद केला आहे.


जिल्हा परिषदेने उभारलेले ‘मृत्युंजय’कारांचे स्मृतीदालन आदर्शवत :
मंत्री चंद्रकांत पाटील

                    आजरा:प्रतिनिधी

        ख्यातनाम साहित्यिक व आजऱ्याचे सुपुत्र ‘मृत्युंजय’ कार शिवाजीराव सावंत यांच्या जन्मगावी आजरा येथे जिल्हा परिषदेच्या वतीने उभारण्यात आलेले स्मृतीदालन प्रेरणा देणारे केंद्र ठरेल असा विश्वास राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला. या दालनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ होते.

आमदार प्रकाश आबिटकर, आमदार राजेश पाटील, श्रीमती मृणालिनी सावंत, तहसीलदार समीर माने, यांच्या प्रमुख उपस्थितीत सदर कार्यक्रम पार पडला. समीर देशपांडे यांनी प्रास्ताविक केले.

      यावेळी मंत्री पाटील म्हणाले, जिल्हा परिषदेने उभारलेले हे दालन चांगल्या पद्धतीने सांभाळण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत, याठिकाणी वर्षातून काही मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करावेत असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी आमदार प्रकाश आबिटकर म्हणाले, आजऱ्याला साहित्य तसेच नाट्यसंस्कृतीची उज्वल परंपरा आहे. ‘मृत्युंजय’कारांनी मृत्युंजय च्या माध्यमातून आजऱ्याच्या साहित्य संस्कृतीची पताका जगभर फडकविली आहे. या स्मृतीदालनाच्या माध्यमातून आज-याच्या साहित्य संस्कृतीचा नावलौकीक वाढवावा असे आवाहन त्यांनी केले.

      जिल्हा परिषदेने उभारलेली ही वास्तू आजऱ्याच्या साहित्य विश्वात भर घालणारी असल्याचे आमदार राजेश पाटील यांनी सांगितले. डॉ. सागर देशपांडे यांनी मृत्युंजय कार शिवाजी सावंत यांच्या सहवासातील काही आठवणींना उजाळा दिला.

      अध्यक्षीय भाषणात मंत्री मुश्रीफ म्हणाले, थोर साहित्यिक शिवाजीराव सावंत यांच्या स्मृती तेवत रहाव्यात यासाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून हे दालन उभारण्यात आले आहे. त्यांच्या स्मृती जोपासण्यासाठी आजरेकर प्रयत्नशील राहतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

      या कार्यक्रमाला पंचायत समिती व जिल्हा परिषदेचा अधिकारी वर्ग , सावंत कुटुंबीय व ‘मृत्युंजय’ कार प्रेमी शहरवासीय उपस्थित होते.

बहुतांशी नेत्यांची पाठ…

     कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेत उपस्थितांत जिल्ह्यातील सर्व आमदार व खासदारांची मांदियाळी दिसत होती. प्रत्यक्षात मात्र मंत्री मुश्रीफ , मंत्री चंद्रकांत दादा व स्थानिक दोन आमदार वगळता अन्य कोणीही या कार्यक्रमास उपस्थित राहिले नाही याची दिवसभर आजरा शहरात चर्चा होती.


कोणावरही अन्याय न करता प्रकल्पाचे काम पूर्ण करणार : आ. आबिटकर

                    आजरा : प्रतिनिधी

      २०१४ साली आपण आमदार झाल्यापासून आज टागायत तालुक्यातील सर्वच पाणी प्रकल्प पुर्णत्वास नेण्यासाठी आपण प्रयत्न केला आहे. जिद्द व चिकाटीने सर्फनाला प्रकल्पाची पुर्तता होत असून प्रकल्पग्रस्तांवर कोणत्याही प्रकारचा अन्याय होऊ देणार नाही, असे आश्वासन आमदार प्रकाश आबिटकर यांनी दिले. सर्फनाला प्रकल्पातील लामक्षेत्रातील शेतकऱ्यांची आढावा बैठक पार पडली यावेळी आमदार आबिटकर बोलत होते.

      प्रास्ताविकात कार्यकारी अभियंता रोहित बांदवडेकर यांनी प्रकल्पविषयी आढावा
घेतला. यावेळी आबिटकर म्हणाले, लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना आता पाणी उपलब्ध होणार असून शेतकऱ्यांनी पाणी परवाण्यासाठी आतापासूनच प्रयत्न करावेत. मध्यंतरीच्या कालावधीमध्ये महसूल व पुनवर्सन विभागाच्या कारभारामुळे कामाची गती कमी झाली होती ती आता पुन्हा वाढविण्यात आली आहे. प्रकल्पातील सर्व कामे गतिमान पद्धतीने करून यावर्षी बंधाऱ्यात पाणी साठविण्यात येईल असे त्यांनी सांगितले.

       यावेळी आदेश गुरव, सूर्यकांत दोरूगडे, संतोष पाटील, इंद्रजित देसाई, प्रकाश कविटकर, सुधाकर पाटील, नेताजी पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी कोल्हापूर पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता अभिजित म्हेत्रे, उपविभागीय अभियंता अविनाश फडतारे, स्वाती उरुणकर यांच्यासह प्रियांका जाधव, सुरेखा पाटील, सुधाकर पाटील, दयानंद पाटील,विजय थोरवत, शिवाजी कोंडूसकर,लहू वाकर, दयानंद नेउंगरे, डॉ.धनाजी राणे, उपस्थित होते. मारूती डोंगरे यांनी आभार मानले.


वंचित घटकांना विकासाच्या वाटेवर आणण्याचा प्रयत्न : आमदार आबिटकर

                     आजरा:प्रतिनिधी

        दुर्गम आणि डोंगराळ भागात असलेल्या आवंडी पैकी धनगरवाड्यावर आल्यानंतर इथल्या समस्यांची जाणीव आपल्याला झाली. त्यामुळे गेल्या नऊ वर्षांच्या काळात वंचित घटकांना विकासाच्या वाटेवर आणण्याचा प्रयत्न आपण करीत असल्याचे प्रतिपादन आमदार प्रकाश आबिटकर यांनी केले. आवंडी पैकी धनगरवाडा क्रमांक एक, दोन व तीन यांना जोडणाऱ्या रस्ता कामाच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते.

        जंगलात राहणाऱ्या या मंडळींना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो एक नंबरच्या धनगरवाड्यापर्यंत येण्यासाठी रस्ता झाला असला तरी पुढील दोन वाड्यांना रस्ता नव्हता, वनविभागाकडून परवानगी मिळविताना अनेक अडचणी आल्या मात्र सर्वांच्या सहकार्यातून या कामाची आज सुरूवात झाली. प्रामाणिकपणे कोणतेही काम करायचे ठरविल्यास अशक्य कामही शक्य होत असल्याचे आजच्या कामातून स्पष्ट झाल्याचे ते म्हणाले. जंगलातून हा रस्ता जातो त्यामुळे येथे डांबरीकरण होणार नाही केवळ खडीकरण केले जाईल पण ते अतिशय दर्जेदार काम करा अशी सूचना त्यांनी बांधकाम विभागाचे उपअभियंता सावंत यांना केली. वैयक्तिक लाभाच्या योजनांपासून पात्र असणारा एकही लाभार्थी वंचित राहता कामा नये त्यासाठी प्रशासनाने काटेकोरपणे काम करावे अशीही सूचना आमदार आबिटकर यांनी केली.

        निसर्ग सौंदर्याने नटलेल्या या विभागाच्या विकासासाठी आपण कटीबद्ध असून निसर्गाचे संवर्धन करीत येथे पर्यटन उद्योग वाढविण्यासाठी प्रयत्न करण्याची ग्वाही त्यांनी दिली. तत्पूर्वी गंगाराम येडगे यांनी या परीसरात झालेल्या तसेच प्रलंबित विकास कामांची माहिती दिली. शालेय विद्यार्थ्यांसाठी एक क्रमांच्या धनगरवाड्यापर्यंत सोडण्यात आलेली एस. टी. रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर तीन क्रमांकाच्या वाड्यापर्यंत सोडण्याची मागणी केली. याशिवाय घरकुल योजनेतून मंजूर असलेल्या २८ पैकी २५ घरांचे काम सुरू असून उर्वरीत घरांचे कामही लवकरच सुरू होईल असे येडगे यांनी सांगितले.

        तहसीलदार समीर माने यांनी धनगरवाड्यावरील ग्रामस्थांच्या कोणत्या अडचणी असतील तर त्या तातडीने सोडविण्याची ग्वाही दिली. यावेळी विलास शिवणगेकर या युवकाने पोवाड्याच्या माध्यमातून आमदार आबिटकर यांच्या कार्यपद्धतीची माहिती दिली. या कार्यकमाला नायब तहसीलदार म्हाळसाकांत देसाई, माजी सरपंच बाबू येडगे, बयाजी येडगे, राणू कोकरे यांच्यासह भादवणचे माजी सरपंच संजय पाटील, विजय थोरवत, जितेंद्र भोसले, इंद्रजित देसाई, रणजित सरदेसाई, दत्ता पाटील, संतोष भाटले यांच्यासह मान्यवर तसेच आवंडी पैकी तीनही धनगरवाड्यावरील ग्रामस्थ उपस्थित होते, शितल गावडे हिने आभार मानले.

त्यांची गय नको…

        तालुक्यातील रस्त्यांची कामे दर्जेदार होत नसतील तर क्वॉलिटी कंट्रोल कडे तक्रार करून अशा कामांची शहानिशा करा. कामे दर्जेदार झाली नाही तर आपण नाहक बदनाम होतो. त्यामुळे अशा ठेकेदार मंडळींची गय करू नका अशा स्पष्ट सूचना यावेळी आमदार प्रकाश आबिटकर यांनी उपस्थितांना केल्या.



मराठा आरक्षणाच्या अधिसूचनेचे कायद्यात रूपांतर करा…

मराठा महासंघाच्यावतीने मंत्री व आमदारांना निवेदन

                    आजरा: प्रतिनिधी

       मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी गेल्या अनेक वर्षांपासून लढा सुरू आहे. काही दिवसापूर्वी राज्य शासनाने मराठ्यांच्या आरक्षणासाठी अधिसूचना काढली आहे. मात्र या अधिसूचनेचे कायद्यात रूपांत करून मराठा समाजाला आरक्षणाचा लाभ देण्याची मागणी अखिल भारतीय मराठा महासंघाच्या कोल्हापूर जिल्हा शाखेच्यावतीने करण्यात आली आहे. याबाबतचे निवेदन मंत्री व आमदारांना देण्यात आल्याची माहिती मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष मारुती मोरे यांनी दिली

       राज्याच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून २६ जानेवारी रोजी अनुसुचित जाती, अनुसुचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग (जातीचे प्रमाणपत्र देण्याचे व त्यांच्या पडताळणीचे विनिमय) अधिनियम २०००, अधिसूचना काढण्यात आली आहे. यामध्ये ज्या मराठा व्यक्तींची ‘कुणबी नोंद सापडलेली आहे, त्यांचे सगेसोयरे म्हणजे मराठा समाजात परंपरेनुसार गणगोताशी लग्नाच्या सोयरीक होतात ते सर्व सगेसोयरे मात्र सगे सोयरे याचा सर्वसाधारणपणे अर्थ पितृसत्ताक पध्दतीने नातेवाईक असा घेतला जाईल, तथा लग्नाच्या ज्या सोयरीकी करतात त्या गणगोतात आहेत किंवा सजातीय जाहेत याचा पुरावा उपलब्ध करुन दिल्याची त्याची गृह चौकशी करुन त्यांनाही कुणबी प्रमाणपत्र देण्यात येईल, या अधिसूचनेचे रुपांतर कायद्यात करण्यासाठी आपण विधीमंडळाचे/ विधानपरिषदेचे सदस्य म्हणून मराठा समाजासाठी विशेष प्रयत्न करुन हा कायदा पारीत करुन घ्यावा. हा कायदा पारीत झाल्याने मराठा समाजाचा फायदा होणार आहे.

       पिढ्यानपिढ्या आरक्षणापासून वंचित राहिलेल्या समाजाला न्याय मिळणार आहे. अधिसूचनेचे कायद्यात रूपांतर करण्यासाठी प्रयत्न करावेत अशी मागणीही या निवेदनातून करण्यात आली आहे. या निवेदनाच्या प्रती पालकमंत्री हसन मुश्रीफ, मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह जिल्हयातील सर्व खासदार व आमदारांना देण्यात आल्या आहेत.


कोळींद्रे येथे शिवजयंती निमित्त कार्यक्रम


                   आजरा : प्रतिनिधी

       सोमवार ता.१९ फेब्रुवारी रोजी शिवजयंती निमित्त कोळींद्रे, तालुका आजरा येथे विविध संघटनांच्या वतीने धर्मनिरपेक्ष समतावादी रॅली आणि व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.

        या कार्यक्रमाचे  उद्घाटन समीर माने, तहसीलदार आजरा यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.यावेळी लोकशाही व समतावादी विचार टिकवण्यासाठी छ. शिवाजी महाराज यांचे रयतेच्या राज्याचे विचार समजून घेवून जगूया… या विषयावर प्रा.पी.डी. पाटील यांचे व्याख्यान होणार आहे.

         संग्राम सावंत (राज्याध्यक्ष- मुक्ती संघर्ष समिती),समीर खेडेकर (संघटक संविधान सन्मान परिषद),संजय घाटगे (परिवर्तवादी कार्यकर्ते)अबुसईद माणगावकर
सुरेश बुगडे, राहत खिदमत फौंऊडेशन, आजरा चे पदाधिकारी व सदस्य,रवि भोसले,अध्यक्ष, अपंग संघटना, नेसरी हे उपस्थित राहणार आहेत.


छायावृत्त

       कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास सदिच्छा भेट देऊन अभिवादन केले. याप्रसंगी शिवसेना उपजिल्हाप्रमुख संभाजी पाटील, राजू होलम, दशराज आजगेकर, विजय केसरकर, ओंकार माद्याळकर  सलीम लतीफ,आदी उपस्थित होते.


संबंधित पोस्ट

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

अखेर मदन बापट यांना मृत्युने गाठलेच..

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews
error: Content is protected !!